You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमला मिल आग : 'प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमचा आनंद दुःखात बदलला'
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी
मुंबईच्या कमला मिलला लागलेल्या आगीत १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या १४ मृतांपैकी ११ महिला असून यांमध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेली खुशबू भन्साळीसुध्दा होती.
खुशबूबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तिचे मामा जेठमल बोथरा यांच्याशी संपर्क साधला. जेठमल यांचं खेतवाडीमध्ये कुशल इम्पेक्स नावानं दुकान आहे. त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी खुशबूबद्दलच्या अनेक गोष्टींना उजाळा दिला.
खुशबूच्या वाढदिवसाबद्दल सांगताना ते म्हणाले,
"आजकाल वाढदिवस उद्या असेल तर आज रात्रीच १२ वाजता साजरा केला जातो. त्याप्रमाणे खुशबू तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत २८ तारखेला रात्री वाढदिवस साजरा करायला गेली होती."
"दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ डिसेंबरला आम्ही कुटुंबीय एकत्र येऊऩ तिचा वाढदिवस साजरा करणार होतो. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमचा संपूर्ण आनंद दुःखात बदलला."
जेठमल पुढे सांगतात,
"जेव्हा खुशबूला बाहेर काढण्यात आलं तेव्हा तिच्या शरीरात जीव होता. मात्र रुग्णवाहिका लवकर घटनास्थळी आली नाही. तिला ऑक्सिजन मिळाला नाही."
"पोलिसांच्या गाडीतून तिला KEM हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथंही अर्ध्या तासानंतर तिला ऑक्सिजन देण्यात आला, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता."
खुशबूसोबत असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल सांगताना जेठमल म्हणाले की,
"माझं आणि खुशबूचं मैत्रीचं नातं होतं. ती आमच्या घरी आली की, घरच्यासारखी वावरायची. किचनमध्ये जाऊन स्वतः जेवायला घ्यायची. मुलांसोबतही मिळून मिसळून रहायची."
"ती असं कधीच समजायची नाही की, मी दुसऱ्यांच्या घरी आले आहे. आम्हीसुध्दा त्यांच्या घरी गेलो की, आपलचं घर समजायचो. तसंच ती सुध्दा इथे आली की आपलंच घर समजायची."
त्या रात्री खुशबूचं तिच्या आईसोबत बोलणे झाले होते, असं आम्हाला तिच्या मामाने सांगितलं.
"ही घटना घडली त्या दिवशी खुशबूची आई तीर्थयात्रेला निघाली होती. आग लागण्याच्या काही मिनिटं आगोदर तिच्या आईनं रेल्वेमधून तिला फोन केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या."
"सोबतच रात्री लवकर घरी जा, तुझी बहीण एकटी आहे असेही सांगितले. तेव्हा मी साडेबारा-एक वाजेपर्यंत घरी जाते असं खुशबू म्हणाली. मात्र साडेबारालाच ही आग लागली आणि खुशबू कधीच घरी परतली नाही."
हॉटेलच्या सुरक्षेसंबंधी सांगताना जेठमल यांनी हॉटेल प्रशासनाला जबाबदार धरले.
"त्या हॉटेलमध्ये बाहेर जाण्यासाठी आपातकालीन दरवाजा सुद्धा नव्हता. एक दरवाजा जो किचनमधून होता त्याबद्दल ग्राहकांना सांगण्यात आलं नव्हतं."
"त्यातून केवळ हॉटेल स्टाफलाच बाहेर काढण्यात आलं. या अशा हॉटेल मालकांना कमीत कमी फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)