प्रेस रिव्ह्यू : मुकेश अंबानी यांनी विकत घेतलं अनिल अंबानींचं रिलायन्स कम्युनिकेशन

फोटो स्रोत, STR
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला आता थोरले भाऊ मुकेश अंबानी तारणार आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचे 43,000 टेलिकॉम टॉवर्स, 4G सेवा तसेच ऑप्टिकल फायबरचा मोठा व्यवसाय थोरले बंधू मुकेश अंबानी यांनी विकत घेतला आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सवर 45,000 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये झालेल्या व्यवहारामुळं अनिल अंबानी यांना 23,000 कोटी रुपयांचा दिलासा मिळणार असल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.
अनंतकुमार हेगडे यांनी मागितली माफी
"संविधानात बदल घडवून आणू" असं म्हणून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी गुरुवारी माफी मागितल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.
अनंतकुमार हेगडे हे केंद्र सरकारमध्ये कौशल्य विकास राज्यमंत्री आहेत.

फोटो स्रोत, Anantkumar Hegde/Facebook
"माझ्यासाठी भारताचं संविधान हे सर्वोच्च आहे. हा भारताचा नागरिक म्हणून मी भारताच्या संविधानाचे उल्लंघन करण्याचा विचार देखील करू शकत नाही," असं त्यांनी म्हटलं.
गुरुवारी लोकसभा सत्राला सुरुवात झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हेगडेंना माफी मागण्याची आठवण करून दिली. "जर तुमचा उद्देश कुणाला दुखवण्याचा नव्हता तर माफी मागण्यात गैर काय? क्षमा मागितल्यानं कुणी लहान होत नसतं," असं त्या यावेळी म्हणाल्या.
त्यानंतर हेगडे यांनी माफी मागितली.
मॅग्नस कार्लसनला हरवून विश्वनाथन आनंद बनला विश्वविजेता
आपला जुना प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसनला नमवून विश्वनाथन आनंदने जागतिक जलदगती बुद्धिबळ स्पर्धा जिंकली, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

फोटो स्रोत, RAFA RIVAS/getty
रियाधमध्ये झालेल्या या स्पर्धेत विश्वनाथन आनंदने 9व्या फेरीमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या मॅग्नसला हरवलं.
या संपूर्ण स्पर्धेत विश्वनाथन आनंदला हरवणं कुणालाच जमलं नाही. या स्पर्धेत आनंदने 15 डाव खेळले. त्यापैकी सहामध्ये तो विजयी झाला तर 9 वेळा सामना बरोबरीत सुटला.
2013मध्ये जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नसने विश्वनाथनला हरवलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








