You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित शर्मा : पुन्हा विक्रमवीर! श्रीलंकेविरुद्ध 35 बॉलमध्ये सेंच्युरी
वन डे क्रिकेटमधल्या आपल्या तिसऱ्या विक्रमी द्विशतकाला गवसणी घातल्यानंतर रोहित शर्माने शुक्रवारी आणखी एका जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने फक्त 35 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली.
या आधी दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने बांग्लादेशविरोधात 35 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधला सर्वांत वेगवान शतकाचा विक्रम आहे.
या शतकी खेळीदरम्यान त्याने 12 चौकार आणि 10 षटकार ठोकले. तसंच त्याने लोकेश राहुलबरोबर 165 धावांची सलामीही दिली. भारतासाठी टी-20 सामन्यांमधील ही सगळ्यात मोठी सलामी आहे.
रोहित शर्मा 13 व्या ओव्हरमध्ये आउट झाला त्या वेळी त्याच्या खात्यात 43 बॉल्समध्ये 118 धावा जमा झाल्या होत्या. श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराच्या दोन ओव्हर्समध्ये मिळून त्याने 38 धावा कुटल्या.
कर्णधारपदाला साजेशी खेळी करत रोहितने सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. 50 ते 100 हा टप्पा तर त्याने 12 बॉलमध्येच गाठला.
त्याच्याबरोबर सलामीला आलेल्या लोकेश राहुलनेही 38 बॉलमध्ये नाबाद 62 धावा केल्या आहेत. राहुलने पहिल्या टी-20मध्येही अर्धशतक ठोकलं होतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम असला, तरीही टी-20 क्रिकेट प्रकारात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरोधात फक्त 30 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)