प्रेस रिव्ह्यू: "डांबराचा खर्च अर्धाच दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना 'मॅनेज' करा"

राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अतिरिक्त डांबर लागणार आहे. मात्र डांबराचा अर्धाच खर्च कागदावर दाखवा आणि चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना 'मॅनेज' करा, असा अजब सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानं अधिकारी आश्चर्यचकित झाले!

'लोकमत'च्या बातमीनुसार, खड्डेमुक्तीच्या अभियानाचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रत्येक जिल्ह्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.

गुरुवारी तशीच एक बैठक जळगाव जिल्ह्यात झाली. शाखा इंजिनिअरपासून तर सुपरिटेंडंट इंजिनिअर दर्जाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

खड्डेमुक्त अभियान वेगानं मार्गी लावण्यासोबतच टीका टाळण्यासाठी चार युक्तीच्या गोष्टीही पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितल्या.

ते म्हणाले, खड्डे बुजवण्यासाठी मशीन घेतलं आहे. त्याला नियमित कामापेक्षा दुप्पट डांबर लागतं. अतिरिक्त डांबर वापरल्यावरून टीका होऊ शकते.

त्यामुळे डांबराचा निम्मा खर्च अदृश्य करा आणि जो खर्च सर्वसाधारण तंत्राला लागतो, तेवढाच पेपरवर घ्या, असा कानमंत्र त्यांनी दिल्याचं 'लोकमत'नं म्हटलं आहे.

रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात सरकारी निर्णयांमध्ये सतत बदल होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या अडचणी काही अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावरही त्यांनी 'बौद्धिक' घेतलं.

शिवसेनेचं 'जय गुजरात'

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील दोन मुख्य पक्ष शेजारील गुजरातमध्ये आपलं नशिब आजमवणार असल्याची बातमी 'लोकसत्ता'नं दिली आहे.

भाजपवर कुरघोडी करण्याकरता शिवसेनेनं 'जय गुजरात'चा नारा देत ५० पेक्षा अधिक जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

तर, गुजरातमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी असून, चर्चा सुरू असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच जाहीर केलं.

गुजरातमध्ये शिवसेनेची ताकद नगण्य असली तरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरणार आहे.

पक्षानं इच्छुकांच्या मुलाखती अहमदाबादमध्ये सुरू केल्या आहेत. पक्षाचे खासदार अनिल देसाई आणि हेमराज शहा हे निवडणुकीचे सारं नियोजन करीत आहेत.

गुजरातमध्ये शिवसेनेची चांगली ताकद असून, भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून शिवसेना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावाही खासदार देसाई यांनी केला.

कोण होणार गुजरातचा मुख्यमंत्री?

एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीनं घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजपाला 113 ते 121 तर काँग्रेसला 58 ते 64 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

'एबीपी माझा'नं याची बातमी दिली आहे. हा सर्व्हे 26 ऑक्टोबर 1 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आला होता.

काँग्रेसला 41 टक्के तर भाजपाला 47 टक्के मते मिळतील.

2012साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 48 टक्के मते आणि 116 जागा मिळाल्या होत्या.

तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.

जीएसटी: आजच्या बैठकीकडे लक्ष

जीएसटी काऊंसिलची बैठक शुक्रवार, 10 नोव्हेंबरला गुवाहाटीत होणार आहे. या बैठकीत जीएसटीच्या रचनेत आणखी बदल अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे, रेस्टॉरंटवरील पदार्थांवरील टॅक्सचे दर, तसंच 28 टक्के टॅक्स असणाऱ्या दैनंदिन गरजेच्या काही वस्तूंवरील करात कपात बदलांची शक्यता आहे.

'लोकसत्ता'तील बातमीनुसार, सिलिंग फॅन, एअर कूलरवर शॅम्पू, टूथपेस्ट, शू पॉलिश अशा किमान २०० गोष्टींवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे.

सवाई महोत्सवात महागाईचा राग?

सांस्कृतिक, कला आणि करमणूक क्षेत्रालाही जीएसटीचा मोठा फटका बसला आहे. याबद्दलचं वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'नं दिलं आहे.

'केंद्र सरकारनं अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या २८ टक्के जीएसटीमुळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटाच्या किंमती वाढत आहेत.

"तिकिटांच्या किंमती वाढल्या, तर श्रोत्यांच्या संख्येवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊन शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा श्रोतृवर्ग कमी होईल. त्यामुळे शास्त्रीय संगीत मैफलींवरील जीएसटी रद्द करावा," अशी आग्रही मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळ या संगीतातील मातब्बर संस्थेनं सरकारकडे केली आहे.

शास्त्रीय संगीत मैफलींवरील जीएसटी रद्द करावा, या मागणीचे पत्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठविण्यात आल्याचं मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं.

याबाबतीत निर्णय झाला नाही, तर सवाई महोत्सवाच्या तिकिट दरांमध्ये वाढ होईल, असे संकेत त्यांनी दिले. आहेत

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ संतूर वादक शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया, ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना, ज्येष्ठ ध्रुपद गायक बंधू पं. राजन व पं. साजन मिश्रा, प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार, ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रह्मण्यम यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.

दिल्लीतील प्रदूषणावर पुन्हा सम-विषमचा उतारा

राजधानी दिल्लीतील भयावह स्तरावर पोहोचलेल्या हवेच्या प्रदूषणाच्या संकटातून सुटण्यासाठी

१३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान दिल्लीच्या रस्त्यांवर वाहनांसाठी पुन्हा 'सम-‌विषम'ची योजना दिल्ली सरकारनं जाहीर केल्याची बातमी 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिली आहे.

सोमवार ते शुक्रवार पाच दिवस सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत ही योजना राबविण्यात येईल. त्यासाठी शुक्रवारपासून मेट्रो रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढही करण्यात येत आहे.

दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी ही घोषणा केली. दिल्लीमध्ये सम-विषमचा प्रयोग तिसऱ्यांदा अंमलात आणला जात आहे.

यापूर्वी १ ते १५ जानेवारी २०१६ आणि १५ ते ३० एप्रिल २०१६ दरम्यान, ही योजना राबविण्यात आली होती. त्यावेळी या योजनेला चांगले यश मिळाले होते.

या योजनेतून महिला कारचालक, दुचाकी वाहने तसेच सीएनजी वाहनांना वगळण्यात आलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)