You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'मोनोरेल म्हणजे स्वत:च्या 'कमाई'साठी राजकारण्यांनी केलेलं काम'
मुंबईतील मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना बुधवारी सकाळी मोठी आग लागली आणि यामुळे मोनोरेल पुन्हा एकदा चर्चेत आली.
या आगीत मोनो रेलचे दोन्ही डबे जळून खाक झाले. या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण मोनोच्या उपयुक्ततेबाबत सोशल मीडियावर चर्चा मात्र सुरू झाली.
बीबीसी मराठीने आपल्या वाचकांना विचारलं होतं की 'मुंबईतली मोनोरेल हा फसलेला आणि दुर्लक्षित प्रकल्प आहे, असं तुम्हाला वाटतं का?' वाचकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया पाठवल्या. त्यातल्याच या काही प्रतिक्रिया.
"गरज नसताना स्वत:च्या 'कमाई'साठी राजकारण्यांनी केलेलं काम", असं मत शशिकांत दाबाडे यांनी व्यक्त केलं आहे. त्याला प्रियांका सुतार यांनीही अनुमोदन दिलं आहे.
"काँग्रेस आणि भाजपने मोनो आणि मेट्रोवर पैस वाया घालवले आहेत," अशी प्रतिक्रिया मनिष रोकडे यांनी दिली आहे.
"फसलेल्या प्रकल्पांची यादी काढली तर जनतेची झोप उडेल", असं प्रवीण विभुते यांनी म्हटलं आहे.
"मुंबईच्या पायाभूत सुविधांचा विचार करून प्रकल्पांचे नियोजन करा", असा सल्ला संदेश कुंभार यांनी दिला आहे.
तसंच, "मोनोरेल किंवा बुलेट ट्रेन हे प्रकल्प भविष्यात पांढरा हत्ती ठरतात आणि त्याचा भुर्दंड मुंबईकरांना भरावा लागतो", असं मत संदेश कुंभार यांनी मांडलं आहे.
मोनोरेलचे व्यवस्थापन हे मेट्रोच्या तुलनेत ढिसाळ असल्याचं मत सचिन चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. "मेट्रोची व्यापकता पूर्व ते पश्चिम उपनगरं अशी आहे तर मोनोची केवळ एक ठरावीक कक्षेत आहे. म्हणूनच मोनोला मिळणारा प्रतिसाद थंड आहे", असं ते म्हणतात.
"मोनोरेल हा फसलेला प्रयोग आहे हे मान्य करून मोनोरेलचे इतर प्रलंबित 11 प्रोजेक्ट रद्द करून तेच पैसे पादचारी पूल आणि इतर दुरुस्तीसाठी वापरण्यात यावेत," असा सल्ला अभिजीत वानखेडे यांनी दिला आहे.
"मोनोरेलचा पूर्ण टप्पा तयार झाला की निष्कर्ष काढता येईल", असं म्हणत निखील मनोहर यांनी तो लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
"शहराच्या गर्दीला मार्गी लावण्यासाठी अनेक पातळ्यांवर, अनेक प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक साधनांची गरज असते", असं मत विशाल नवेकर यांनी मांडलं आहे.
"मोनोरेलमध्ये योग्य ते बदल करून इतर वाहतूक जाळ्यांशी तिला जोडून तिचा वापर वाढवला जाऊ शकतो", असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
"आधी रेल्वेबाबतच्या मूलभूत सुविधा प्रवाशांना द्या आणि मग मोनो किंवा इतर रेल्वे प्रकल्पांचा विचार करावा", असा सल्ला स्वप्नील देशमाने यांनी दिला आहे.
तर गिरीश पिसे यांनी "इलेक्शनमध्ये आम्ही ही कामं केली हे दाखवण्यासाठी केलेला हा फसवा प्रयत्न" असल्याचं म्हटलं आहे.
राजेश बाईकर हे स्वत: मोनोने प्रवास करतात आणि ही सेवा त्यांच्यासाठी कशी फायदेशीर आहे, हे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सांगितलं आहे.
तर प्रदीप मसकर यांनी मोनोरेल प्रकल्प फसलेली नसून तो अजून पूर्णावस्थेत पोचलेला नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. मोनोरेलच्या फायद्याचं गणितही त्यांनी मांडलं आहे.
सुनील भोर यांनीही "मोनोचं काम खूप हळूहळू सुरू असून ते पूर्ण झालं तर बस आणि रेल्वेला पर्याय ठरू शकेल", असं मत व्यक्त केलं आहे. पण असं का होत नाही तेच कळत नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
"मेट्रो आणि बुलेटचे पण हेच हाल होणार," अशी प्रतिक्रिया वैभव घोरपडे यांनी दिली आहे. तर, श्रेयश पाटील यांनी मोनोरेल हे मुंबईतील पिकनिक पॉईंट झाले असल्याचं म्हटलं आहे.
शिरिष वैद्य, सखाराम परब, चेतन गिरप, किशोर देशमुख, सुयश मुसळे, सतिश पाटकर यांनी मोनोरेल हा फसलेला आणि दुर्लक्षित प्रकल्प असल्याचं म्हटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)