पाहा व्हीडिओ : राज ठाकरेंना मराठी फेरीवाल्या महिलांचा सवाल, 'आता आम्ही काय करायचं?'

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी, मुंबई

मुंबईत एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन झालेल्या चेंगराचेंगरीला उत्तर भारतीय, अनधिकृत फेरीवाले जबाबदार आहेत, असा आरोप राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इतर नेत्यांनी केला आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेला मनसेने 'परप्रांतीय विरुद्ध स्थानिक मराठी' असा रंग दिला. पण मुंबईतले सर्व फेरीवाले उत्तर भारतीय आहेत, असं यात गृहितक आहे.

बुधवारी मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या फेरीवाल्यांच्या मोर्चात अनेक मराठी फेरीवाले सहभागी झाले होते. मनसे आणि काँग्रेसच्या धुमश्चक्रीत अनेक स्थानिक मराठी महिलांचेही रोजगार हिरावले जाण्याची भीती आहे.

या सगळ्या फेरीवाल्या महिला स्थानिक, महाराष्ट्रीय आहेत. जेव्हापासून मनसेचं "आंदोलन" सुरू झालं, तेव्हापासून त्यांचा व्यवसाय थांबला आहे. त्यांतल्या अनेकजणी त्यांच्या कुटुंबातल्या एकमेव कमावत्या आहेत.

1. छाया नारायणकर

छाया नारायणकर ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर लाईनवर दागिने विकतात. कधी स्टेशनबाहेर असतात तर कधी ट्रेनमध्ये. जेव्हा त्यांना आम्ही विचारलं की अनेक फेरीवाले हे महाराष्ट्राबाहेरून येतात आणि विनापरवाना इथे व्यवसाय करतात या आक्षेपाबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, तेव्हा त्या आक्रमक होतात.

"महाराष्ट्राच्या बाहेरचे जे आहेत त्याला खतपाणी कोण घालतं? पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी. ते लोक बाहेरच्यांना धंदा करायला संधी देतात. केसेस करायच्या तर हे लोक बाहेरून आलेल्यांना फोन करणार आणि पळून जायला सांगणार.

मग आम्ही जेवढ्या महिला आहोत, आमच्यावर केस होणार. मग तिथे दाखवणार की आम्ही हे इतके लोक पकडले. जे उत्तर भारतीय धंदा करतात, ते वाचतात."

2. रेखा खरटमल

रेखा खरटमल चिंचपोकळी स्टेशनबाहेर पापड, फरसाण असे खाद्यपदार्थ विकतात.

"हे आमच्यामुळे नाही होत. तुम्हाला त्रास होतो ना, मग आम्हाला तुम्ही कामं द्या. माझं पती अपंग आहेत. त्यांनाही काम नाही. मग आम्ही खाणार काय? आम्हाला दोन मुलं आहेत. गेला एक महिना झाला मी घरात आहे. काहीतरी खायची व्यवस्था झाली पाहिजे ना? मग आम्ही लोकं काय करणार?" त्या विचारतात.

3. ममता येरवाल

ममता येरवालसुद्धा वाशी ते पनवेल हार्बर लाईनवर अनेक वर्षांपासून दागिने विकतात. फेरीवाला कायद्यानुसार या स्टेशनवर किंवा फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना वेगळ्या जागा प्रमाणित होणं अपेक्षित आहे. पण येरवाल यांना त्याबद्दल आक्षेप आहे.

"आम्हाला तर कुठला जॉब नाही. पण सरकारनं असा कायदा का काढला की थेट रेल्वेचे धंदे बंद, फुटपाथचे धंदे बंद. मग गरीब लोकांनी जायचं कुठे? आमचा समाज भीक मागून खायचा तर भीक नका मागू म्हणतात, कोणी चोऱ्या करायचे तर काम करा म्हणायचे आणि आता मेहनत करायला लागलो तर तीही बंद केली. तर आम्ही काय करायचं? कुठं डोंगरावर जाऊन धंदा करायचा? डोंगरावर कुठं कोणी खरेदी करायला येणार आहे का?"

4. कस्तुरबाई कांबळे

फेरीवाल्यांची गर्दी स्टेशनच्या फुटपाथवर अशीच राहिली तर प्रश्न सुटणार कसा? ठाणे वाशी ट्रान्सहार्बर लाईनवर अनेक वर्षं दागिने विकणाऱ्या कस्तुरबाई कांबळेंना हा प्रश्नच मान्य नाही.

"स्टेशनच्या फूटपाथवर आम्हाला जागा दिली तर मान्य आहे. नाहीतर आम्ही ट्रेन सोडणार नाही. ट्रेनमध्येच आम्ही धंदा करणार. ट्रेन सोडून तुम्ही चार कोस लांब जागा दिली तर आम्ही धंदा करणार नाही. पहिल्यापासून आम्ही इथेच धंदा करतो, इथेच जागा पाहिजे," त्या म्हणतात.

5. इंदू जुनगरे

इंदू जुनगरे पनवेल ते बेलापूर हार्बर लाईनवर व्यवसाय करतात. त्या आणि त्यांच्यासारख्या अनेकींना एल्फिन्स्टन दुर्घटना आणि फेरीवाल्यांचा संबंध लावणं योग्य वाटत नाही.

"चेंगराचेंगरी होते त्यात आमच्या जिवाला सर्वांत जास्त धोका असतो. जर त्या चेंगराचेंगरीत कोणी बाई पडली, कोणाचं लेकरू पडलं तर आम्ही स्वत:हून त्यांना उचलतो. आम्ही आमच्या जिवाची, आमच्या मालाची पर्वा करत नाही, पण त्यांच्या जिवाची करतो. आमचे चार धंदेवाले गोळा होतात आणि त्यांना उचलून दवाखान्यात नेतात. आम्ही त्यात पोलिसांचाही विचार करत नाही," इंदू जुनगरे त्यांच्या अनुभवांचा दाखला देत सांगतात.

मुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्नाला केवळ प्रांतिकवादाचा रंग नसून तो तितकाच स्थानिकांचाही आहे. विशेषतः दक्षिण मध्य मुंबईत आणि गिरणी कामगारांची वस्ती असलेल्या भागांत अनेक मराठी महिला रस्त्यावर अन्न किंवा वस्तू विकून घर चालवत आहेत.

राडेबाजीच्या राजकारणात त्यांच्या तोंडचा घास हिरावला जाईल, अशी त्यांना भीती आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)