मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र दिलेले शेतकरीही अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

व्हीडिओ कॅप्शन, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र दिलेले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
    • Author, गजानन उमाटे
    • Role, नागपूरहून बीबीसी मराठीसाठी

'गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होईल,' असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप काहीच रक्कम जमा झालेली नाही.

नागपूरजवळच्या एका शेतकऱ्याने बीबीसी मराठीला सांगितलेला हा अनुभव.

प्रमोद मोरबाजी गमे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातले शेतकरी. मुंबईतील कर्जमाफीच्या मेगा इव्हेंटमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रमोद गमे यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं.

प्रमाणपत्र मिळाल्याच्या आठ दिवसानंतरही प्रमोद गमे यांच्या बँक खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही, असं ते सांगतात.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिलेल्या शेतकऱ्यांनाही अजून कर्जमाफी मिळालेली नाही. यावरून अन्य शेतकऱ्यांचा विचार करता येऊ शकतो.

प्रमोद मोरबाजी गमे

प्रमोद मोरबाजी गमे हे नागपूर जवळच्या येरला गावचे शेतकरी. त्यांच्याकडे सहा एकर शेती आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावावर हे कर्ज आहे. पारंपरिक कापूस-सोयाबीनच्या शेतीने त्यांनाही कर्जाच्या खाईत नेलं.

कोलमडलेलं नियोजन

2013 साली गमे यांच्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतलं, पीक हातात आल्यानंतर कर्ज फेडणार, असं नियोजन त्यांनी केलं. पण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं.

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गमे यांच्या पीकाचं नुकसान झालं.

गारपीटीमुळेही राहिलेलं पीक हातचं गेलं. त्यामुळे त्यांना कर्ज फेडता आलं नाही, असं प्रमोद गमे सांगतात.

अवकाळी पावसानंतरची नापिकी मोठं संकट घेवून आली. कर्ज वाढत गेलं आणि आज त्यांच्या डोक्यावर 1 लाख 2000 रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे.

महाराष्ट्रातील एक कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली.

त्या अंतर्गत शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतच कर्ज माफ करण्यात आलं. या कर्जमाफीमुळे येरल्याच्या प्रमोद गमे यांनाही कर्जमुक्तीची आस निर्माण झाली.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली.

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/Twitter

फोटो कॅप्शन, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी कर्जमाफी होणार असल्याची घोषणा केली आणि हजारो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.

या आशेवर इतरांप्रमाणेच गमे यांनीदेखील कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरला. सुरुवातीला त्यांना ऑनलाईन लिंक मिळण्यास अडचण आली, असं प्रमोद गमे सांगतात.

पण फॉर्म भरल्यानंतर कर्जमाफीच्या लिस्टमध्ये त्यांचं नावंही आलं, असं गमे म्हणाले.

18 तारखेला मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या काही निवडक शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलंकर्जमाफीचं प्रमाणपत्र

गमे यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचं प्रमाणपत्र दिलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी काही निवडक शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र स्वतः दिलं. त्यावेळी प्रमोद गमे यांनासुद्धा कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळालं. पण आठ दिवस झाले त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे अजूनही जमा झाले नाही.

56 लाख शेतकऱ्यांचे अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यावेळी राज्यातल्या 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली. तर 56,59,187 जास्त शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला.

त्यापैकी कर्जमाफी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत नावं आलेल्या शेतकऱ्यांना अद्याप प्रत्यक्ष कर्जमाफी मिळालेली नाही.

ऑनलाईनच्या कचाट्यात अडकलेल्या या कर्जमाफीत अनेक घोळ झाले आहेत, याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी आल्या, ही गोष्ट खरी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं.

दरम्यान नागपूर जिल्हा बँकेच्या शाखा फेटरीचे प्रभारी शाखा प्रमुख सोपान मासूरकर यांनी माहिती दिली की, त्यांच्या शाखेत आतापर्यंत चार शेतकऱ्यांचे पैसे आलेले आहेत.

"शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वैयक्तिक जमा झालेले नाहीत. सोसायटी स्तरावर त्याचा जमाखर्च घेण्यात आलेला आहे. सोसायटी स्तरावर चार लोकांची अशी तडजोड करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यालयातूनही अशाच पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे", असं मासूरकर म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)