ईव्हीएम आणि बॅलेट पेपरबाबत ट्रम्प असं काय म्हणाले, की ज्याची भारतभर चर्चा सुरू आहे?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी (22 फेब्रुवारी) अमेरिकन राज्यांच्या निवडून आलेल्या राज्यपालांना संबोधित करत होते.

यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि पेपर बॅलेटवर (कागदी मतपत्रिका) भाष्य केले, ज्याची भारतातही चर्चा सुरू आहे.

ट्रम्प म्हणाले, "इलॉन मस्क यांनी मला सांगितलं की मशीन्स मतदानासाठी बनवल्या जात नाहीत. त्या यासाठी योग्य नाहीत. याशिवाय, एमआयटीच्या एका प्राध्यापकानंदेखील निवडणुकांसाठी कागदी मतपत्रिकाच योग्य असल्याचं म्हटलं होतं."

ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय. अनेकजण त्यांच्या व्हिडिओचा हवाला देत ईव्हीएमवर विश्वास ठेवू नये असं म्हणताहेत.

ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका तास 13 मिनिटांच्या भाषणातील 44 सेकंदांचा व्हिडिओ भारतीय सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

या संभाषणादरम्यान 51 व्या मिनिटाला ट्रम्प कागदी मतपत्रिका आणि त्याच दिवशी होणाऱ्या मतमोजणीबद्दल म्हणतात, "जर सुरक्षितता, संरक्षण आणि आपल्या राष्ट्राच्या कल्याणाची गोष्ट असेल, तर यासाठी कितीही खर्च आला तरी तो द्यायला हवा. तो खर्च 10 पट जास्त असला, तरी प्रत्यक्षात तुमचा खर्च त्याच्या एका छोट्या भागाइतका असतो."

"तुम्ही कागदी मतपत्रिका वापरायला हव्यात."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कागदी मतपत्रिकेबाबत ते म्हणाले, "हे चांगलं आहे, त्याची कॉपी करता येत नाही, त्यामुळे त्यात फसवणूक शक्य नाही. हे विशिष्ट प्रकारचे पेपर असून त्यावर वॉटरमार्क असतात."

पुढे ट्रम्प म्हणाले, "मी इलॉन मस्क यांना याबाबत विचारलं, त्यांना संगणकप्रणालीविषयी चांगली माहिती आहे. त्यामुळे मतदान प्रणालीबद्दल त्यांना काय वाटतं हे मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला."

"त्याव्यतिरिक्त मी संगणक तंत्रज्ञानातील सर्वोत्तम लोकांशी चर्चा केली आहे. माझे एक काका एमआयटीमध्ये (मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) 41 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते अत्यंत प्रतिभावान आहेत. मी तिथल्या इतर अनेक लोकांनाही ओळखतो.

"ते तुम्हाला सांगतील की निवडणुका घेण्याचा सर्वांत सुरक्षित आणि कदाचित जलद पद्धत म्हणजे कागदी मतपत्रिका. त्यात कोणतीही गडबड होत नाही," असं ट्रम्प म्हणाले.

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही झाला होता उल्लेख

काही दिवसांपूर्वी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी कागदी मतपत्रिकेचं समर्थन केलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोघांनी संयुक्त पत्रकारही परिषद घेतली.

फोटो स्रोत, Andrew Harnik/Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोघांनी संयुक्त पत्रकारही परिषद घेतली.

2020 सालच्या अमेरिकन निवडणुका आणि गेल्या वर्षी भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही हस्तक्षेपाच्या शक्यतेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी निवडणुकीसाठी कागदी मतपत्रिका योग्य असल्याचं म्हटलं होतं.

यावेळी ट्रम्प म्हणाले होते, आम्ही एका वेगळ्या प्रणालीकडे वाटचाल करत आहोत, ती म्हणजे एकदिवसीय मतदान आणि कागदी मतपत्रिका आणि आम्हाला कागदी मतपत्रिका हव्या आहेत.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

काँग्रेसशी संबंधित अनेक कार्यकर्ते त्यांच्या एक्स हँडलवरून ट्रम्प यांचा व्हिडीओचा तो भाग शेअर करत आहेत. ज्यामध्ये ट्रम्प ईव्हीएम आणि मतदान याविषयी इलॉन मस्क आणि काही जाणकारांशी चर्चा करताना दिसतात.

परंतु, भाजपाशी संबंधित एक्स हँडल्सवर याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिसून येत नाही.

काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिलं की, "पंतप्रधान मोदी त्यांचे जवळचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाकडे लक्ष देतील का? ते आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेला उद्देशून संपूर्ण देशातील समस्यांवर आपलं मत व्यक्त करू शकतील का?"

वेणुगोपाल पुढे लिहितात, "मला खात्री आहे की त्यांचे जवळचे मित्र (ट्रम्प) महाराष्ट्रातील लाखो मतदारांची वाढलेली संख्या किंवा विरोधी मतांच्या डिलिट होण्याच्या मुद्यावर आश्चर्यचकित होतील."

"निवडणूक प्रणालीत गंभीर फेरफार केला जाऊ शकतो, या गंभीर मुद्याकडे भाजप जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, ही चिंतेची आणि खेदजन्य बाब आहे. पारदर्शकतेपासून दूर पळून जाण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या त्यांच्या चुकांबद्दलच्या आमच्या शंकेला अधिक बळकट करते."

दरम्यान, प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनीही हा व्हिडिओ एक्स हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं की, "भाजप आणि मोदींचे हिरो ट्रम्प यांनी म्हटले आहे की ईव्हीएम विश्वासार्ह नाहीत, प्रामाणिक मतदानासाठी कागदी मतपत्रिकाच योग्य आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मुंबई काँग्रेसनं लिहिलं कि, "ट्रम्प म्हणाले की त्यांनी इलॉन मस्क यांना याबाबत विचारले होते. इलॉन मस्क यांनी स्पष्टपणे सांगितलं की संगणकीकृत मतदान योग्य नाही. मी संगणक तंत्रज्ञान समजणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकांशी चर्चा केली आणि त्या सर्वांनी सांगितलंय की निवडणुकीसाठी मतपत्रिका हीच सर्वात सुरक्षित पद्धत आहे."

उत्तराखंड युवक काँग्रेसनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या एक्स हँडलवरून त्यांनी असा दावा केला आहे की, "ट्रम्प यांनी मोदींच्या उपस्थितीतही ईव्हीएम अविश्वसनीय असल्याचं सांगून भारतात झालेल्या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसदेखील हा मुद्दा आधीपासूनच उपस्थित करत आली आहे."

पंजाब काँग्रेसच्या मीडिया विंगचे दलबीर सिंग रंधावा लिहितात, "ट्रम्प यांनी सांगितलं की त्यांनी संगणक समजणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकांशी चर्चा केली आणि सर्वांनी सांगितलं की निवडणुकीसाठी मतपत्रिकाच सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचं नमूद केल्याचं म्हटलंय."

काँग्रेसचे राष्ट्रीय संयोजक नितीन अग्रवाल यांनीही हा व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. तर, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनीही व्यंगात्मक टिप्पणी करत ईव्हीएमवर विश्वास नसल्याचं म्हटलं.

समाजवादी पक्षाचे आजमगढचे माजी आमदार आय.पी. सिंह यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

ते लिहितात, "मोदीजींचे परममित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलंय की निवडणुकीसाठी (मतदानासाठी) ईव्हीएमवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही. ही बाब आपल्या पंतप्रधान मोदींना का समजत नसावी?"

ईव्हीएमवरुन भारतात काय वाद सुरू आहे?

ईव्हीएमच्या मुद्यावरुन विरोधकांनी अनेकदा शंका उपस्थित केल्या आहेत. परंतु, निवडणूक आयोगानं ईव्हीएममध्ये गडबड असण्याच्या गोष्टी फेटाळून लावत असं काही नसल्याचं म्हटलंय.

ईव्हीएम हे मतपत्रिकेच्या तुलनेत अधिक स्पष्ट असून त्यामुळे चुकीचं किंवा संदिग्ध मत देण्याची शक्यता कमी होते.

भारतात हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचलं आहे. गेल्या वर्षी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टानं मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची आणि व्हीव्हीपॅटशी 100 टक्के जुळणी करण्याची याचिका फेटाळून लावली होती.

कोर्टानं असंही म्हटलं होत की, लोकशाही ही सुसंवाद राखण्यासाठी आहे आणि निवडणूक प्रक्रियेवर ठेवल्याने अनावश्यक शंका निर्माण होऊ शकतात.

दुसरीकडे इलॉन मस्क यांनीही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाद करुन टाकण्याबाबतचं मत व्यक्त केलं होतं.

मतदान

फोटो स्रोत, Getty Images

गतवर्षी अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनिअर यांचं एक ट्विट रीट्विट करत लिहिलं की, "मानव असो वा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) यांच्याद्वारे हॅकिंगचा धोका कमी असला तरी तो नगण्य आहे असं अजिबात म्हणता येणार नाही."

याचं स्पष्टीकरण गेल्या सरकारमध्ये आयटी मंत्री असलेले राजीव चंद्रशेखर यांनी दिलं. मस्कच्या टिप्पण्यांना उत्तर देताना त्यांनी लिहिलं की, "हे एक सामान्यीकरण आहे जे सूचित करतं की कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही. हे चुकीचं आहे."

त्यांनी स्पष्ट केलं की "भारतीय ईव्हीएम मशीन वेगळ्या आहेत, त्या कस्टम डिझाइन केलेल्या आहेत. त्या सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नेटवर्क किंवा माध्यमांशी जोडलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना हॅक करण्याचा कोणताही मार्ग नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.