नरेंद्र मोदी यांना पत्रकारांनी गौतम अदानींबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर प्रश्न विचारताच ते काय म्हणाले?

'भारत जितकं टॅरिफ घेतं तितकंच अमेरिकाही घेणार', ट्रम्प यांनी मोदींसमोर स्पष्ट केली भूमिका

फोटो स्रोत, Getty Images

भारत व्यापारी तूट कमी करण्यासाठी एफ-35 लढाऊ विमानांसह अमेरिकेकडून अधिक तेल, वायू आणि लष्करी उपकरणं खरेदी करेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत फसवणुकीचे आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

परंतु, अमेरिककडून भारताची 'परस्पर शुल्का'पासून सुटका नाही, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ट्रम्प यांनी नुकतंच परस्पर शूल्काचा (रेसिप्रोकल टॅरिफ) अर्थ स्पष्ट केला होता.

"जितकं टॅरिफ इतर देश अमेरिकेवर लावतात. अमेरिका आता तितकंच टॅरिफ त्यांच्यावर लावेल, ना जास्त ना कमी," असं ते म्हणाले होते.

ट्रम्प यांच्याबरोबरील बहुप्रतिक्षित भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातील व्यापारावर खुली चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या भारतीयांना परत नेण्याबाबत भाष्य केलं.

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. मुंबई हल्ल्याप्रकरणी भारताला हवा असलेल्या तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून राणाला भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी फ्रान्सहून अमेरिकेला गेले. शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांनी पत्रकारांसमोर दिलेल्या निवेदनात, तेल, वायू, संरक्षण, टॅरिफ, तंत्रज्ञान आणि व्यापार या विविध पैलूंवर चर्चा केली.

पत्रकारांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि संबंध मजबूत करण्यावर जोर दिला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क (टॅरिफ) तर्कसंगत करेल अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली. संरक्षण खरेदीमध्ये सर्वसमावेशक सहकार्यासह भारताला 'स्टिल्थ फायटर' जेट एफ-35 विकण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

"गौतम अदानी प्रकरणाबद्दल आपण ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्यावर कारवाई करण्याबद्दल काही बोलणं झालंय का?" असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला. यावेळी ट्रम्प सुद्धा उपस्थित होते.

यावेळी मोदी म्हणाले, "भारतात लोकशाही आहे. आमची मूल्य, संस्कृती ही वसुधैव कुटुंबकम मानणारी आहेत. आम्ही पूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मानतो आणि मी प्रत्येक भारतीयाला आपलं समतो. अशा वैयक्तिक बाबींसाठी दोन देशांचे प्रमुख भेटत नाही, बसत नाहीत किंवा बोलतही नाहीत."

काही दिवसांपूर्वीच गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह आठ जणांविरोधात फसवणुकीचे आरोप निश्चित करण्यात आले होते.

अवैधरित्या अमेरिकेत जाणाऱ्यांबद्दल मोदींनी काय म्हटलं?

व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलं. मोदींनी ट्रम्प यांची घोषणा 'मागा' (मेक अमेरिका ग्रेट अगेन) चा उल्लेख करताना, "मेक इंडिया ग्रेट अगेन" ही घोषणा त्यापुढं जोडली. "जेव्हा मागा - मागा एकत्र येतात, तेव्हा ते मेगा होतं," असंही ते म्हणाले.

दोघांनी लोकशाहीच्या समृद्धीसाठी एका मेगा पार्टनरशिपची गरज असल्याचं म्हटलं.

पंतप्रधान मोदी यांनी 2030 पर्यंत अमेरिकेबरोबर व्यापार दुप्पट करणार असल्याचं सांगितलं.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या भारतीयांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "या मुद्द्यावर आमची मतं सारखीच आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाची पडताळणी झाल्यास त्यांना भारतात परत नेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत."

ते म्हणाले की, काही स्थलांतरितांना मानवी तस्कर आणतात. त्यांना अमेरिकेत नेलं आहे हे देखील माहिती नसतं.

अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना माघारी बोलावण्याचं पंतप्रधान मोदींनी मान्य केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना माघारी बोलावण्याचं पंतप्रधान मोदींनी मान्य केले आहे.

"ही खूप सामान्य कुटुंबातील मुलं आहेत. त्यांना मोठी स्वप्नं दाखवली जातात, मोठी आश्वासनं दिली जातात," असं पंतप्रधानांनी म्हटलं.

ते म्हणाले की, बेकायदेशीरपणे अमेरिकेत येण्यासाठी फसवणूक झालेल्या असुरक्षित युवकांचं संरक्षण करण्यासाठी मानवी तस्करी रोखण्याची गरज आहे.

ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून, अमेरिकेनं आपल्या लष्करी विमानातून कागदोपत्री अवैध स्थलांतरित भारतीयांची एक तुकडी भारतात परत पाठवली आहे.

मायदेशी परतण्याच्या प्रक्रियेत भारतीय नागरिकांबरोबर गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत अमेरिकेसोबत काम करत आहे, असं भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मागील आठवड्यात म्हटलं होतं.

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित तहव्वूर हुसेन राणा याच्या अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पणाला परवानगी दिल्याबद्दल मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

भारताच्या टॅरिफबाबत ट्रम्प काय म्हणाले?

भारतातून आयातीवर समान टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याबद्दल ट्रम्प यांनी भाष्य केलं.

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, "आमच्या वस्तूंवर भारत जितके टॅरिफ घेतं. तितकंच टॅरिफ आम्ही त्यांच्यावर लावणार आहोत."

आमचे मित्र देश शत्रूपेक्षाही वाईट आहेत, असं ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल म्हटलं.

ट्रम्प यांनी 2025 पासून भारताला संरक्षण विक्री वाढवणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "आम्ही भारताला अब्जावधी डॉलरचे शस्त्रास्त्रं आणि तंत्रज्ञानाची विक्री करू. भारताला एफ-35 स्टिल्थ लढाऊ विमानं देण्याचा मार्ग शोधू."

एक दिवसापूर्वीच ट्रम्प यांनी दुसऱ्या देशांवर परस्पर टॅरिफ लावण्याबाबत भाष्य केलं होतं.

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock

फोटो कॅप्शन, एक दिवसापूर्वीच ट्रम्प यांनी दुसऱ्या देशांवर परस्पर टॅरिफ लावण्याबाबत भाष्य केलं होतं.

पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याच्या एक दिवस आधीच गुरुवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इतर देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याचं वक्तव्य केलं होतं.

जेव्हा पत्रकारांनी याबाबत ट्रम्प यांना विचारलं, त्यावेळी ते म्हणाले, "भारत असो किंवा इतर कोणताही देश. यावर काही फरक पडत नाही. आम्ही त्यांच्यावर तितकंच शुल्क लावणार आहोत, जितकं ते आमच्यावर लावतात."

ट्रम्प म्हणाले की, ही प्रशासकीय कामाची पद्धत आहे आणि अमेरिका परस्पर शुल्क लागू करणार आहे.

ते म्हणाले, "अलीकडंच पंतप्रधान मोदींनी भारताच्या अयोग्य आणि अतिशय कडक टॅरिफमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं भारतीय बाजारपेठेत अमेरिकन वस्तूंचा प्रवेश कमी होतो. हीच एक मोठी समस्या आहे, असं मी म्हणेन."

परस्पर टॅरिफ

रेसिप्रोकल टॅरिफबाबत ट्रम्प यांनी गुरुवारी मेमोवर स्वाक्षरी केली. त्यात चालू टॅरिफ, विनिमय दर, व्यापार संतुलन आणि इतर नियमांच्या आधारावर प्रत्येक देशासाठी वेगवेगळे टॅरिफ फॉर्म्युले तयार करण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या भेटीपूर्वीच भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेतून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील टॅरिफ कमी केले आहे.

ज्या वस्तूंवरील टॅरिफ कमी केलं आहे, त्यात मोटारसायकलचाही समावेश आहे. या विषयावर ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही दोन्ही देशांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढेल, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढेल, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आपल्या एका मेमोत "रेसिप्रोकल ट्रेड अँड टेरिफ" च्या नियोजनासाठी 180 दिवसांची मुदत दिली आहे. ट्रम्प यांचे अर्थ मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी त्यांची टीम 1 एप्रिलपर्यंत याचं नियोजन राष्ट्राध्यक्षांकडे सोपवेल असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांचा परस्पर टॅरिफ लावण्याचा निर्णय हा प्रत्यक्षात अमेरिकेत गुंतवणूक वाढावी आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या योजनेचा भाग आहे.

मेमोवर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, "जर अमेरिकेत तुम्ही वस्तू बनवत असाल तर त्यावर कोणत्याच प्रकारचं टॅरिफ नसेल. आणि जे योग्य आहे, तेच मी करत आहे."

ते म्हणाले, "जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये, ते खूप जास्त शुल्क घेतात. आम्ही त्यांच्याकडून जेवढं शूल्क घेतो त्याहूनही ते जास्त आहे. पण आता ते दिवस गेले आहेत. हे फार पूर्वीच व्हायला हवं होतं."

बांगलादेशाबद्दल काय म्हणाले ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशात झालेल्या सत्ता परिवर्तनावर भाष्य करताना 'आमची यात कोणतीही भूमिका नाही' असं स्पष्ट केलं.

ट्रम्प यांना विचारण्यात आलं, "बांगलादेशबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे का, कारण आम्ही पाहिलं की बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेचे डीप स्टेट काम करत होते. मोहम्मद युनूस यांनी ज्युनियर सोरोस यांचीही भेट घेतली होती. या एकूण भूमिकेबाबत तुम्हाला बांगलादेशबद्दल काय म्हणायचं आहे?"

यावर ट्रम्प म्हणाले, "यामध्ये आमच्या डीप स्टेटची कोणतीच भूमिका नाही. यावर पंतप्रधान मोदी दीर्घ काळापासून काम करत आहेत."

तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातील त्यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान 5 ऑगस्ट रोजी देश सोडला होता. सध्या त्या भारतात वास्तव्यास आहेत.

यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं. बांगलादेशच्या विद्यमान सरकारनं भारताला अनेकदा शेख हसीना यांना देशात परत पाठवण्याची मागणी केली आहे.

बांगलादेशातील सत्तापालटात अमेरिकन डीप स्टेटच्या भूमिकेवर ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशातील सत्तापालटात अमेरिकन डीप स्टेटच्या भूमिकेवर ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला.

भारत तटस्थ नाही, पण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचाही उल्लेख केला.

पीएम मोदी म्हणाले की, लोकांना वाटतं की रशिया-युक्रेन संघर्षात भारत तटस्थ आहे. परंतु हे चुकीचं आहे.

ते म्हणाले, "भारत शांततेच्या बाजूने राहिला आहे. आम्ही नेहमी म्हणतो की, दोन्ही बाजूंनी (युक्रेन आणि रशिया) चर्चा होणं गरजेचं आहे."

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांचेही नरेंद्र मोदींनी कौतुक केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)