ट्रम्प यांनी जाहीर केले टॅरिफचे दर, डिस्काऊंट नंतरही भारतावर लावलेला टॅरिफ किती?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून सर्व देशांवर लावण्यात आलेल्या टॅरिफची आकडेवारी जाहीर केली. ट्रम्प यांच्या कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर ही सुची जाहीर केली आहे. यात भारताचाही समावेश आहे.
ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के टॅरिफ जाहीर केले आहे. भारताच्या शेजारी देशांवर वेगवेगळे टॅरिफ जाहीर केले आहेत. यात पाकिस्तान 29%, बांगलादेश 37%, चीन34%, म्यानमार आणि श्रीलंकेवर 44% टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे. सर्वात कमी सिंगापूरवर 10 टक्के टॅरिफ लागू केले आहे.
युरोपियन युनियनवर ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावले आहे.
कोणत्या देशावर किती टॅरिफ
- चीन - 34%
- व्हिएटनाम - 46%
- जपान - 24%
- भारत - 26%
- दक्षिण कोरिया - 25%
- थायलंड - 36%
- मलेशिया - 24%
- कंबोडिया - 49%
- बांगलादेश - 37%
- सिंगापूर- 10%
- फिलिपाइन्स - 17%
- पाकिस्तान - 29%
- श्रीलंका - 44%
- म्यानमार - 44%
- लाओस - 48%
यापूर्वीही ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांवर टॅरिफ लावले होते.
अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा आदेश दिला आहे.
या टॅरिफ टॅक्सच्या घोषणेनंतर अमेरिकेमध्ये या धातूंच्या आयातीवर अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. कॅनडातील काही राजकारण्यांच्या इशाऱ्यानंतरही ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे.
विशेष बाब म्हणजे, कॅनडामधून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर धातूंचा पुरवठा केला जातो.
आयातीवर अवलंबून असलेल्या अमेरिकेतील व्यावसायिकांनी मात्र या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. पण, ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या योजनांमुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल.
ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, या आयात शुल्कामुळे जगातील कोणत्याही देशाला सूट मिळणार नाहीये.
ट्रम्प यांनी ही घोषणा करण्याआधी सोमवारी अमेरिकेतील स्टील निर्माती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वधारल्या होत्या.
2018 मध्ये, आपल्या पहिल्या कार्यकाळाच्या दरम्यानही ट्रम्प यांनी स्टीलवर 25 टक्के आणि ॲल्युमिनियमवर 15 टक्के टॅरिफची घोषणा केली होती. मात्र, सरतेशेवटी ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि मेक्सिकोशी चर्चा केल्यानंतर हा टॅरिफ टॅक्स हटवण्यात आला होता.
अमेरिका हा जगातील सर्वाधिक स्टील आयात करणारा देश आहे. कॅनडा, ब्राझील आणि मेक्सिको हे तीन देश स्टीलची ही गरज प्रामुख्याने भागवतात.
गेल्यावर्षी अमेरिकेत आयात करण्यात आलेल्या ॲल्युमिनियममधील 50 टक्क्याहून अधिक वाटा हा एकट्या कॅनडातून आलेला होता.
ट्रम्प यांनी रविवारीच हे स्पष्ट केलं होतं की, ते अशा प्रकारचं पाऊल उचलणार आहेत.
कोणत्या देशांवर होणार परिणाम?
ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याचा जो निर्णय घेतला आहेक, त्याचा सर्वाधिक परिणाम कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर होणार आहे.
अमेरिकेला स्टील अथवा स्टीलची उत्पादने निर्यात करणाऱ्या टॉप 5 देशांमध्ये कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि जपान यांचा समावेश आहे.
अमेरिकन आयर्न अँड स्टील इन्स्टिट्यूटच्या (एआयएसआय) माहितीनुसार, 2024 मध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक स्टील कॅनडातून आयात झालेलं होतं. कॅनडानंतर ब्राझील, मेक्सिको आणि दक्षिण कोरियाने अमेरिकेमध्ये स्टील निर्यात केलं होतं.


इंटरनॅशनल ट्रेड ॲडमिनिस्ट्रेशननुसार, अमेरिकेमध्ये ॲल्युमिनियम उत्पादनांपैकी सर्वाधिक उत्पादने कॅनडातूनच आयात होतात.
कॅनडाव्यतिरिक्त संयुक्त अरब अमिरात, चीन, कोरिया, बहरीन, अर्जेंटीना आणि भारतदेखील अमेरिकेला ॲल्युमिनियमची उत्पादने निर्यात करतो.
आपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान, ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि युरोपीय संघाकडून स्टील आयात करण्यावर 25 टक्के आणि ॲल्युमिनियम आयात करण्यावर 10 टक्के टॅरिफ टॅक्स लागू केला होता.
कॅनडाने काय म्हटलं?
मात्र, एका वर्षानंतर अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोसोबत हा टॅरिफ टॅक्स समाप्त करण्यासाठी एक करार केला. मात्र, युरोपीय संघावर हा टॅरिफ टॅक्स 2021 पर्यंत लागू राहिला.
ट्रम्प यांनी याआधीच टॅरिफ टॅक्सबाबतचे मनसुबे स्पष्ट केले होते.
ट्रम्प यांच्या या मनसुब्यांवर कॅनडाचे इंडस्ट्री मिनिस्टर फ्रान्सवा-फिलीप शॅम्पेन यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "कॅनडातील स्टील आणि ॲल्युमिनियम हे अमेरिकेतील संरक्षण, जहाज निर्मिती आणि ऑटो यांसारख्या प्रमुख उद्योगांसाठी वापरलं जातं. आम्ही कॅनडातील श्रमिक आणि उद्योगांना साथ देऊ."

फोटो स्रोत, Getty Images
या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोतील उत्पादनांवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही देशातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ही योजना 30 दिवसांकरीता पुढे ढकलण्यात आली.
दुसऱ्या बाजूला अमेरिकेत येणाऱ्या सर्व चायनीज सामानावर 10 टक्के नवीन अमेरिकन शुल्क लागू करण्यात आलं आहे. यानंतर चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातम्याही वाचा:

कॅनडाकडून तीव्र प्रतिक्रिया
कॅनडातील नेत्यांनी ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफ योजनेवर कठोर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, यामुळे दोन्ही देशांच्या सीमेपल्याडच्या नोकऱ्या समाप्त होतील.
कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख कॅन्डेस लैंग यांनी म्हटलं की, "आजचं हे वृत्त स्पष्ट करतं की, येणाऱ्या काळात अनिश्चितता अशीच राहणार आहे."
लँग यांनी एका वक्तव्यात म्हटलं की, "व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आधीपासूनच 30 दिवसांपर्यंत टॅरिफ पुढे ढकलण्यात आल्याच्या कारणामुळे अस्थिर स्थितीमध्ये आहेत.
आता अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या सामायिक यशासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियम उद्योगांना अक्षरश: आग लागली आहे."

फोटो स्रोत, Reuters
ओंटारियोतील कन्झर्व्हेटीव्ह पार्टीचे प्रमुख डग फोर्ड अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका करणारे पहिले कॅनेडियन राजकारणी आहेत.
त्यांनी असं लिहलंय की, हा टॅरिफ टॅक्स अमेरिकेतील व्यापाराचं नुकसान करतील. त्यांचं असं म्हणणं आहे की, यामुळे किंमती वाढतील आणि अमेरिकेतील श्रमिकांच्या नोकऱ्या जातील.
त्यांनी 'एक्स'वर पोस्ट केली, "अमेरिकेचं नुकसान, कॅनडाचं नुकसान, चीनचा फायदा.."
कॅनडा हा अमेरिकेला स्टीलचा पुरवठा करणारा मोठा देश आहे. हा उद्योग कॅनडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ओंटारियोमध्ये केंद्रित आहे.
भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
ट्रम्प यांच्या या घोषणेचा परिणाम भारतातील स्टील आणि ॲल्युमिनियम इंडस्ट्रीवर देखील होईल.
अमेरिका ज्या देशांकडून स्टील आणि ॲल्युमिनियम आयात करतो, त्या देशांमध्ये भलेही भारत टॉप लिस्टमध्ये नाही.
मात्र, इंटरनॅशनल ट्रेड ॲडमिनिस्ट्रेशननुसार, अमेरिकेने भारताकडून 2024 मध्ये 2 लाख मेट्रिक टनहून अधिक स्टील आयात केलं होतं.
या स्टीलची किंमत 4 लाख 71 हजार डॉलरहून अधिक होती.
अमेरिकेने भारतातून 2024 मध्ये 1 लाख 60 हजार मेट्रिक टनहून अधिक ॲल्युमिनियम उत्पादने आयात केली होती. याची किंमत 44 कोटी डॉलरहून अधिक होती.
बिझनेस एक्सपर्ट बिस्वजीत धर सांगतात की, भारतातील जे आयर्न, स्टील आणि ॲल्युमिनियम निर्यात होतं, त्यामध्ये अमेरिका हा देश महत्त्वपूर्ण आहे. ते सांगतात की, गेल्या वर्षी भारतातील एकूण स्टील निर्यातीमध्ये सर्वाधिक स्टील अमेरिकेमध्ये निर्यात झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
बिस्वजीत धर यांच्या मते, "गेल्या वर्षी भारतातील एकूण स्टील निर्यातीमध्ये 28 टक्क्यांहून अधिक स्टील अमेरिकेला निर्यात करण्यात आलं. तर भारताकडून ॲल्युमिनियम निर्यातीमध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भारताने गेल्या वर्षी आपल्या एकूण ॲल्युमिनियम निर्यातीमधील जवळपास 14 टक्के निर्यात अमेरिकेला केली होती."
धर यांना असं वाटतं की, टॅरिफ टॅक्स लावल्याने भारतातील स्टील आणि ॲल्युमिनियम इंडस्ट्रीला नुकसान होऊ शकतं.
टॅरिफ टॅक्स हा ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांचा महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढवणं, नोकऱ्यांचं रक्षण करणं आणि कर महसूल वाढवण्याचा एक मार्ग म्हणून ट्रम्प याकडे पाहतात.
नरेंद्र तनेजा यांच्या मतानुसार, "ट्रम्प अमेरिकेतील स्टील आणि ॲल्युमिनियम इंडस्ट्रीला चालना देऊ इच्छित आहेत. त्यासाठी जे परदेशातून येतं, त्याच्यावर रोख लावणं गरजेचं ठरतं."
नरेंद्र तनेजा पुढे सांगतात की, यासाठी एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे एकतर टॅरिफ टॅक्स लावायचा अथवा तो वाढवायचा.
ऑस्ट्रेलियाला सूट मिळणार?
एका रिपोर्टरने ट्रम्प यांना विचारलं की, स्टील आणि ॲल्युमिनियम टॅरिफ टॅक्समधून ऑस्ट्रेलियाला सूट मिळेल का?
या प्रश्नावर ट्रम्प यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियासोबत अमेरिकेचा ट्रेड हा सरप्लस आहे, त्यामुळे अमेरिका ऑस्ट्रेलियाला सूट देण्यासंदर्भात विचार करत आहे.
"याचं कारण म्हणजे, ते आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर विमानं खरेदी करतात."
ट्रम्प यांनी पुढे असं म्हटलं की, ते ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना म्हणाले आहेत की, ते यावर विचार करत आहेत.

फोटो स्रोत, Reuters
याआधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या फोन कॉलबाबत माध्यमांना माहिती दिली होती.
त्यांनी म्हटलं होतं की, या चर्चेदरम्यान त्यांनी टॅरिफबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच यामधून ऑस्ट्रेलियाला सूट दिली जाऊ शकते, असंही सुचवलं होतं.
अल्बानीज यांनी म्हटलं की, "दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने अशी सूट देण्याबाबत विचार केला जात आहे, यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सहमती दर्शवली आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











