डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मेक्सिकोनंतर कॅनडावरील टॅरिफही थांबवण्याची वेळ

अमेरिकेच्या नव्या ट्रम्प सरकारने घेतलेले निर्णय 30 दिवसांसाठी थांबवले आहेत. याआधी मेक्सिकोवर टॅरिफ लावण्याचा निर्णय थांबवण्यात आला होता, आता कॅनडावरील टॅरिफही 30 दिवसांसाठी थांबवले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाला दुजोरा दिलेला आहे.
कॅनडा सीमेवरुन अमेरिकेत येणाऱ्या फेंटानिलसारख्या बेकायदेशीर ड्रग्जला थांबवण्याच्या निर्णयानंतर टॅरिफ 30 दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे असं ट्रम्प म्हणाले.

कॅनडाला लागून असलेली अमेरिकेची उत्तर सीमा सुरक्षित राहील याकडे लक्ष देण्यात येत आहे असं त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं आहे.
याबरोबरच त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या एक्सवरील पोस्टचा उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये ट्रुडो यांनी सीमेच्या रक्षणासाठी आतापर्यंत 1.3 अब्ज डॉलर्स खर्च केल्याचं सांगितलं होतं.
ट्रुडो यांनी अमेरिका सीमेवर ड्रग्जचा व्यापार थांबवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचंही सांगितलं होतं.
ट्रम्प यांनी आधी मेक्सिको आणि कॅनडावर प्रत्येकी 25 टक्के तर चीनवर 10 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद थेट अमेरिकेतील नागरिकांना संबोधित केलं.
या निर्णयाचा थेट परिणाम दरांवर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांवर बोलताना त्यांनी हे नातं जगाला हेवा वाटावा असं असल्याचं म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
ट्रुडो यांनी कॅनडा सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना म्हटलं की, "कॅनडाला हे नको होतं, पण टॅरिफसंदर्भातील ट्रम्प यांच्या निर्णयाला उत्तर देण्यासाठी ते तयार आहे."
"4 फेब्रुवारीपासून बहुतेक कॅनडियन वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आणि वीजेवर 10 टक्के शुल्क लागू करण्याचा विचार असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे."

"मी आमचे प्रमुख मंत्री आणि मंत्रिमंडळाची भेट घेतली आहे. तसंच लवकरच मी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष शीनबाम यांच्याशी बोलेन," असंही ते म्हणाले.
आम्हाला हे करायचं नव्हतं, पण आता कॅनडाही सज्ज आहे. संध्याकाळी मी कॅनडातील नागरिकांना याबाबत संबोधित करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मेक्सिको आणि चीनने काय प्रतिक्रिया दिली होती?
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 25 टक्के शुल्कावर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लाऊडिया शीनबाम यांनीही प्रतिक्रिया दिली होती.
आम्हीही अमेरिकेच्या विरोधात टॅरिफसह इतर कारवाई करत प्रत्युत्तर देऊ, असं ते म्हणाले.
आम्ही काम करत आहोत तो प्लॅन बी लागू करण्यासाठी मी अर्थ सचिवांना निर्देश देत असल्याचं त्या म्हणाल्या. त्यात मेक्सिकोच्या संरक्षणाशी संबंधित टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ उपाय योजनांचा समावेश आहे.
मात्र, नेमकं काय केलं जाणार आहे, याबाबत नेमकी काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयानंही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
"चीन या निर्णयावर पूर्णपणे असमाधानी असून त्याचा ठामपणे विरोध करत आहे," असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. हा प्रकार म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं 'गंभीर उल्लंघन' असल्याचं त्यात म्हटलं आहे.
अशा निर्णयांमुळं चीन आणि अमेरिका यांच्यातील सामान्य आर्थिक आणि व्यापारी सहकार्याला हानी पोहोचेल, असंही चीननं म्हटलं आहे.


अमेरिकेच्या या 'चुकीच्या' वर्तनाच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेत खटला दाखल करणार असल्याचं चीननं म्हटलं आहे. तसंच 'चीनच्या हक्क आणि हितसंबंधांचं रक्षण'करण्यासाठी तसंच या निर्णयाला उत्तर देण्यासाठी पावलं उचलणार असल्याचंही चीननं म्हटलं आहे.

अमेरिकेनं त्यांच्या चुका सुधाराव्यात आणि या समस्या सोडवण्यासाठी चीनच्या साथीनं काम करावं असं चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, याआधी चीनच्या शिन्हुआ या अधिकृत वृत्तसंस्थेच्या माध्यमातून वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते ही यादोंग यांची या मुद्द्यावरची प्रतिक्रिया समोर आली होती.
टॅरिफबाबतचे हे निर्णय चीन किंवा अमेरिकेच्या आणि उर्वरित जगाच्याही हिताचे नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर, "आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याद्वारे (आयईईपीए) हे शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असं म्हटलं होतं
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











