अमेरिकेला धक्का देणाऱ्या डीपसीकचे संस्थापक लिआंग वेनफेंग कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनच्या डीपसीकने धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेत सगळ्यात जास्त डाउनलोड करण्यात आलेल्या अॅप्सच्या यादीत चॅटजीपीटी पहिल्या स्थानावर होतं, पण आता 'डीपसीक'ने चॅटजीपीटीला मागे टाकलं आहे.
या घटनेमुळे डीपसीकचे संस्थापक लिआंग वेनफेंग यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहे.
चॅटजीपीटीचा स्पर्धक असलेलं हे चॅटबॉट अत्यंत कमी खर्चात तयार केल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटला या डीपसीकने धक्के दिले असून एका रात्रीत इतर सगळ्या स्पर्धकांना मागे टाकलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी हा 'वेकअप कॉल' असल्याचं म्हटलं आहे. तसेच या कंपनीशी स्पर्धा करून जिंकणं गरजेचं असल्याचंही नमूद केलं.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या या कंपनीचे संस्थापक नेमके कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? आणि भविष्यात लिआंग वेनफेंग हे नाव किती मोठं होऊ शकतं? हेच आपण जाणून घेणार आहोत.


तंत्रज्ञानाची आवड असलेला बॉस न वाटणारा बॉस
लिआंग वेनफेंग यांनी डिसेंबर 2023 मध्ये डीपसीक ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर 2024 मध्ये डीपसीकने पहिलं लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित केलं.
दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग येथे जन्मलेल्या आणि झेजियांग विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक माहिती अभियांत्रिकी आणि संगणक शास्त्रात पदवी घेतलेल्या या 40 वर्षीय संस्थापकाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाहीये.
टेक्नॉलॉजीवर माहिती प्रकाशित करणाऱ्या '36केआर'वर त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखात असा उल्लेख आहे की, लिआंग वेनफेंग यांना ओळखणारे लोक म्हणतात की, ते एखाद्या बॉसपेक्षा टेकगीक (तंत्रज्ञानाची आवड असलेला व्यक्ती) जास्त वाटतात.
अतिशय कमी मुलाखती देणारे आणि सार्वजनिक मंचावर येण्याचं टाळणारे लिआंग वेनफेंग आता मात्र जगभरात चर्चेत आले आहेत.
चीनचे दुसरे सर्वात शक्तिशाली नेते ली किआंग यांच्यासोबत उद्योजकांची एक जाहीर बैठक झाली होती. त्या बैठकीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातून फक्त लिआंग वेनफेंग यांची निवड करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी लिआंग वेनफेंग यांना जागतिक पातळीवर महत्त्वाच्या असणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत शाखांमध्ये मोठं संशोधन करण्याचे आणि नवनवीन उत्पादने घडवण्याचे' निर्देश देण्यात आले होते.
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये आणि लिआंग वेनफेंग यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे लिआंग हे फायनान्समधून (वित्त) या तंत्रज्ञान क्षेत्रात आले आहेत. हाय फ्लायर या हेज फंडचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हेज फंड पर्यायी किंवा जटिल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा वापर करून जास्त नफा मिळविण्यासाठी विशिष्ट संस्थांनी केलेल्या गुंतवणुकींचा समूह आहे.
हाय फ्लायर हा हेज फंड कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गोळा केलेल्या माहिती आणि आकडेवारीच्या आधारे गुंतवणुकीचे निर्णय घेतो. यालाच गुंतवणुकीच्या भाषेत क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग असं म्हणतात.
2019मध्ये हाय फ्लायर हा 100 बिलियन युआन (13 दशलख अमेरिकन डॉलर)पेक्षा जास्त निधी उभारणारा चीनमधील पहिला क्वांट हेज फंड बनला.
हाय फ्लायरमध्ये काम करत असताना लिआंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अल्गोरिदमचा वापर करून स्टॉकच्या किंमती बदलू शकतील असे पॅटर्न विकसित केले. त्यातूनच त्यांनी मोठं यश मिळवलं. लिआंग वेनफेंग यांच्यासोबत काम करणारी त्यांची टीम एच800 आणि एनव्हीडीया या बहुचर्चित कंपनीने बनवलेल्या चिप्सचा वापर करून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यात यशस्वी ठरली.
2023मध्ये लिआंग यांनी डीपसीक बनवलं. डीपसीकचा माध्यमातून त्यांना माणसासारखा विचार करू शकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेला विकसित करायचं आहे. डीपसीकच्या संशोधनात स्वतः सहभागी असलेल्या लिआंग यांनी सांगितलं की, त्यांनी हेज फंडच्या ट्रेडिंगमधून कमावलेल्या संपत्तीचा वापर करून जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेतलं.
या कंपनीत अमेरिकन संस्थांमधील तज्ज्ञांऐवजी, पेकिंग, त्सिंगुआ आणि बेहांग विद्यापीठांमधील उच्च दर्जाच्या चिनी विद्यापीठातून शिकलेल्या पीएचडीधारकांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Reuters
एआय अभियंत्यांना सगळ्यात जात पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये डीपसीकचा समावेश होतो. टिकटॉकची मालकी असणाऱ्या बाईटडान्स या कंपनीमध्ये देखील या अभियंत्यांना मोठे पगार दिले जातात. चीनच्या हांग्झु आणि बीजिंगमध्ये डीपसीकचे कर्मचारी काम करतात.
मागच्या वर्षी देशांतर्गत माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत लिआंग म्हणाले होते, "त्यांच्या टीममध्ये परदेशातून परत आलेले लोक नाहीत, ते सगळे चीनचे रहिवासी आहेत. आपल्याला आपल्याच देशात दर्जेदार लोक विकसित करावे लागतील."
लिआंग वेनफेंग म्हणाले, "चीन जगभरातील एआय क्षेत्राचा केवळ पाठलाग करत अनुयायी बनून राहू शकत नाही."
ते पुढे म्हणाले, "अमेरिकन आणि चायनीज एआयमध्ये किमान एक ते दोन वर्षांचा फरक असल्याचं आपण नेहमी म्हणतो. पण या दोन्ही देशांमध्ये खरा फरक हाच आहे की एक देश स्वतः तंत्रज्ञान विकसित करतो आणि दुसरा देश त्याची नक्कल करतो. जर यामध्ये बदल झाला नाही तर चीन नेहमीच एक अनुयायी (फॉलोअर) राहील."
डीपसीकने सिलिकॉन व्हॅलीतील अनेकांना धक्का कसा दिला? याबाबत बोलताना लिआंग म्हणाले, "एखाद्या चिनी कंपनीने इनोव्हेटर बनणं सिलिकॉन व्हॅलीतल्या अनेकांना रुचलेलं नाहीये. इतर चिनी कंपन्यांसारखी नक्कल न करता स्वतःच काहीतरी विकसित केल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे."
डीपसीक इतर स्पर्धकांच्या पुढे का आहे?
डीपसीक म्हणतं की त्यांचं आर1 हे मॉडेल सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेलं आहे. एका ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करून ते विकसित केलेलं असल्याने कुणीही त्याचा वापर विनामूल्य करू शकतं आणि ते शेअर देखील करू शकतं.
पण वायर्ड या नियतकालिकाने असा दावा केला आहे की डीपसीकचे संस्थापक लिआंग वेनफेंग यांच्या हाय फ्लायर या हेजफंडाकडून, एआय साठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) चिप्स एकत्र केल्या जात होत्या. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूच्या अंदाजानुसार लिआंग वेनफेंग यांनी किमान 10,000 ते 50,000 चिप्स खरेदी केल्या असाव्यात.
कोणत्याही सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरं देण्यापासून ते अत्यंत किचकट गणितं सोडवण्यापर्यंतची कामं अगदी हुबेहूब माणसासारखी करू शकणारं एआय मॉडेल विकसित करण्यासाठी या चिप्स अत्यंत आवश्यक आहेत.
सप्टेंबर 2022मध्ये अमेरिकेने या हाय पॉवर (उच्च क्षमतेच्या) चिप्स चीनला विकण्यास बंदी घातली होती. चिनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये लिआंग यांनी अमेरिकेने घातलेली ही बंदी 'सगळ्यात मोठं आव्हान होतं' असं म्हटलं आहे.
पाश्चिमात्य देशांमधील आघाडीच्या एआय मॉडेल्समध्ये किमान 16 हजार विशेष चिप्स वापरल्या जातात. पण डीपसीकने असा दावा केला आहे की, त्यांच्या आर1 या एआय मॉडेलसाठी फक्त 2 हजार चिप्स वापरल्या आहेत. तसेच कमी दर्जाच्या हजारो चिप्सचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. यामुळेच हे मॉडेल खूप स्वस्त आहे.
आर1च्या डेव्हलपर्सनी असा दावा केलाय की हा चॅटबॉट बनवण्यासाठी फक्त 56 लाख अमेरिकन डॉलर्स लागले. दुसरीकडे ओपनआयने चॅटजीपीटी बनवण्यासाठी 5 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले.
इलॉन मस्क आणि इतर काही व्यक्तींनी डीपसीकच्या या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनवर लादलेल्या निर्बंधांचा विचार करता कोणतीह कंपनी अशापद्धतीने नेमक्या किती चिप्सचा वापर केला हे सांगू शकत नाही असा दावा त्यांनी केला आहे. वॉशिंग्टनच्या निर्बंधांमुळे नवीन आव्हानं आणि संधी निर्माण झाल्याचं चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं.
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी येथे सहाय्यक प्राध्यापक असणाऱ्या मरिना झँग म्हणतात, "या नवीन आव्हानांमुळे डीपसीक सारख्या चिनी कंपन्यांना नवीन बदल करावे लागले. या निर्बंधांमुळे आव्हानं आली असली तरी त्यामुळेच या कंपन्यांना कल्पकतेचा वापर करण्यास भाग पाडलं आणि त्यांनी अथक प्रयत्नांनी नवनवीन मॉडेल विकसित केले. तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या चीनच्या उद्दिष्टाला हे बदल पूरक ठरत गेले."
जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनने बिगटेकमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. इलेक्ट्रिक गाडयांना चालवणाऱ्या बॅटरी, सौर पॅनल पासून ते एआयपर्यंत वेगवगेळ्या मोठ्या तंत्रज्ञानाच्या शाखांमध्ये चीननं ही गुंतवणूक केलेली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सर्वोच्च प्राधान्य जाहीर केलं आहे. टेक्नॉलॉजीच्या जगात त्यांना चीनला महासत्ता बनवायचं आहे. त्यामुळे वॉशिंग्टनने लादलेले निर्बंध हे चीनने एखाद्या आव्हानासारखं स्वीकारले आहेत.
जगभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत
डीपसीकच्या लाँचनंतर, प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
उदाहरणार्थ, एनव्हिडियाचे शेअर्स सोमवारी अमेरिकन बाजार बंद होईपर्यंत 17%नी घसरले. शेअर्सच्या किमतीमध्ये घसरण झाल्याने 600 अब्ज डॉलर्सच्या बाजार मूल्याची हानी झाल्याचा दावा ब्लूमबर्गने केला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण होती.
व्हेंचर कॅपिटालिस्ट मार्क अँड्रीसन याचं वर्णन करताना म्हणाले, "डीपसीक-आर हा एआय क्षेत्रासाठी स्पुतनिक मोमेन्ट आहे". त्यांनी रविवारी एक्सवर पोस्ट करताना या उपग्रहाचा उल्लेख केला. स्पुतनिक या कृत्रिम उपग्रहाने अंतराळ क्षेत्रातल्या जागतिक स्पर्धेची सुरुवात केली होती.
पण या चिनी अॅपने अनेकांसाठी चिंता निर्माण केली आहे.
डीपसीकच्या आर्थिक दाव्यांचा संदर्भ देत ज्येष्ठ विश्लेषक जीन मुनस्टर म्हणालेकी, "मला अजूनही वाटते की प्रत्यक्षात काय सुरू आहे यामागील सत्य अद्याप समोर आलेलं नाही," त्यांनी हेही विचारलं की या स्टार्टअपला विशेष सूट दिली जात आहे का? किंवा त्यांचे आकडे खरे आहेत का? हे तपासलं पाहिजे.
ते पुढे म्हणाले, "हा चॅटबॉट आश्चर्यकारकरीत्या चांगला आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे."

फोटो स्रोत, EPA
ऑस्ट्रेलियाचे विज्ञान मंत्री एड ह्यूसिक यांनी एबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीपसीकमुळे निर्माण झालेल्या सुरक्षाविषयक चिंतांकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले, "गुणवत्ता, ग्राहक प्राधान्य, डेटा आणि गोपनीयता व्यवस्थापन यासंदर्भात वेळोवेळी उत्तर द्यावे लागणारे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहे."
"मी याविषयी खूप काळजीपूर्वक विचार करेन. अशा प्रकारच्या मुद्द्यांचा नीट विचार करणे गरजेचे आहे."
मागील आठवड्यात, ओपनएआयचे सॅम अल्टमन आणि ओरॅकलचे लॅरी एलिसन यांनी 'स्टारगेट'ची घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील त्यावेळी उपस्थित होते. एआय क्षेत्रातील सुविधांसाठी 500अब्ज डॉलर्सच्या खासगी गुंतवणुकीचे आश्वासन यामध्ये देण्यात आलं. टेक्सास आणि इतर भागांत डेटा सेंटर्ससह, नवीन 1 लाख नोकऱ्यांची घोषणा देखील करण्यात आली आहे.
परंतु एआय क्षेत्रात आणखीन एक मजबूत कंपनी उभी राहिल्याने, काही तज्ज्ञांना असं वाटतं की डीपसीकच्या अचानक उदयामुळे अमेरिकेच्या वर्चस्वाच्या भविष्यासंदर्भात आणि अमेरिकन कंपन्या ज्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत त्या संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











