कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे टाईप 2 मधुमेह होणार की नाही हे कित्येक वर्षे आधीच कळणार

महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल आरोग्य संपादक, बीबीसी न्यूज

लंडनमधील दोन एनएचएस (National Health Service) हॉस्पिटल ट्रस्ट टाईप 2 मधुमेहाचं निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

रुग्णांना टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता आहे का हे एक दशकभर आधीच शोधण्यासाठी ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहेत.

इंपीरियल कॉलेज आणि चेल्सी अँड वेस्टमिन्स्टर हॉस्पिटल एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट यांनी एअर-डीएम (Aire-DM) नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

एरवी डॉक्टरांना निदान करण्यास अवघड असलेली मधुमेहाची अतिशय सूक्ष्म लक्षणं शोधण्यासाठी ही सिस्टम रुग्णांच्या ईसीजीतून (ह्रदयाची तपासणी करणारी चाचणी) मिळणाऱ्या माहितीचा वापर करते.

ज्या प्रमाणे अपेक्षित आहे त्या प्रकारे ही सिस्टम काम करते की नाही हे तपासण्यासाठी 2025 मध्ये क्लिनिकल चाचण्यांचं नियोजन करण्यात आलं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आजाराचं निदान

यासंदर्भातील सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या कामातून असं दिसतं की, ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सिस्टम जवळपास 70 टक्के केसेसमध्ये मुधमेहाचा धोका ओळखू शकते.

या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमला रुग्णाचं वय, लिंग आणि त्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे की नाही आणि ते स्थूल किंवा लठ्ठ आहेत का यासारखी धोक्याची माहिती देऊन या सिस्टमच्या अंदाज वर्तवण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते, असं या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमचे मुख्य संशोधक डॉ. फू सिऑंग एनजी सांगतात.

त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "रुग्णांच्या ईसीजी डेटावरून ही सिस्टम आधीच चांगलं काम करते आहे. मात्र जर तुम्ही रुग्णांची अतिरिक्त माहिती दिली, तर ही सिस्टम आणखी उत्तमरित्या काम करते."

ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राम) ह्रदयाच्या ठोक्यांचा दर किंवा गती आणि लय यासह ह्रदयाच्या इलेक्ट्रिकल क्रियेशी संबंधित अडचणी लक्षात आणून देतो.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. फू सिऑंग एनजी म्हणाले की, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमनं शोधलेले ईसीजीमधील बदल खूपच वैविध्यपूर्ण आणि सूक्ष्म स्वरुपाचे आहेत. अगदी अत्यंत कुशल डॉक्टरांना देखील उघड्या डोळ्यांनी ते लक्षात येऊ शकत नाहीत.

"ईसीजीचा हा भाग आहे किंवा तो भाग आहे, असं सांगण्याइतकं ते सोपं नाही. ही सिस्टम सूक्ष्म गोष्टींचं एकत्रित स्वरुप लक्षात घेते."

क्लिनिकल चाचण्यांचा भाग म्हणून आजाराचा अंदाज वर्तवण्यास किंवा तो शोधण्यास या सिस्टमचा उपयोग होतो की नाही हे पाहण्यासाठी दोन्ही हॉस्पिटलमध्ये 1,000 रुग्णांचे ईसीजी स्कॅन या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमकडून तपासले जातील.

टाईप 2 मधुमेहाचा वाढता धोका

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सिस्टमचा या प्रकारचा वापर हॉस्पिटलमध्ये दैनंदिन कामकाजात अजून केला जात नसला, तरी तज्ज्ञांना आशा आहे की एनएचएस हॉस्पिटलमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करता येईल. त्यासाठी पाच किंवा त्याहून अधिक वर्षे लागू शकतात, असं डॉ. फू सिऑंग एनजी म्हणाले.

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन या संशोधनासाठी आर्थिक पाठबळ पुरवतं आहे. या फाऊंडेशनचं म्हणणं आहे की, मधुमेहाचा धोका असलेल्या लोकांना शोधून काढता आल्यास त्यामुळे लोकांचे जीव वाचू शकतील.

कारण अनियंत्रित टाईप 2 मधुमेहामुळे रुग्णांना ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतात.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

योग्य वजन राखल्यास, योग्य आहार घेतल्यास आणि व्यायाम केल्यास मधुमेहातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीपासून बचाव होऊ शकतो.

प्राध्यापक ब्रायन विलियम्स, ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनमध्ये मुख्य वैज्ञानिक आणि वैद्यकीय अधिकारी आहेत.

ते म्हणाले, "हे महत्त्वाचं संशोधन ईसीजीचं विश्लेषण करण्यासाठी शक्तीशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतं. त्यातून एरवी नियमित स्वरुपात गोळा केलेल्या वैद्यकीय माहितीमधून ज्या गोष्टी समोर येत नाहीत त्या आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या वापरातून कशा लक्षात येतात हे स्पष्ट होतं."

ते पुढे म्हणाले, "या प्रकारची अंतर्दृष्टी भविष्यात टाईप 2 मधुमेह होण्याच्या काही वर्षे आधीच हा आजार होण्याच्या धोक्याचा अंदाज वर्तवण्यात अतिशय महत्त्वाची किंवा निर्णायक ठरू शकते."

"टाईप 2 मधुमेह हे आरोग्यासंदर्भात झपाट्यानं वाढत असलेलं आव्हान आहे. या आजारामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका वाढतो. मात्र योग्य मदतीमुळे किंवा मार्गदर्शनामुळे लोकांना मधुमेह होण्याचा धोका कमी करणं शक्य आहे."

ते म्हणाले, "क्लिनिकल प्रॅक्टिस किंवा वैद्यकीय सेवांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान कशाप्रकारे वापरलं जाऊ शकतं यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत."

डायबेटिस युकेचे डॉ. फे रिले म्हणाले, "टाईप 2 मधुमेहाचं अनेकदा कित्येक वर्षे निदान होत नाही. एकट्या इंग्लंडमध्ये 12 लाख लोक असे आहेत ज्यांना याची कल्पना नाही की त्यांना टाईप 2 मधुमेह झाला आहे."

"तसंच लाखो लोकांना टाईप 2 मधुमेह होण्याचा मोठा धोका आहे. हा आजार होण्याचा धोका असलेल्यांची लवकर ओळख पटवणं अतिशय महत्त्वाचं आहे."

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या फायद्याबद्दल ते पुढे म्हणाले, "आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचालित स्क्रिनिंग पद्धतींमुळे ज्या लोकांना टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता आहे, अशांची कित्येक वर्षे आधीच ओळख पटवण्याचे नवे आश्वासक मार्ग उपलब्ध होतात."

"यामुळे त्या लोकांना योग्य ती मदत किंवा मार्गदर्शन घेता येऊ शकते आणि भविष्यात निर्माण होणारी ह्रदय विकार, ह्रदय बंद पडणं आणि दृष्टी कमजोर होणं यासारखी गंभीर स्वरुपाची गुंतागुंत टाळता येऊ शकते."

टाईप 2 मधुमेह म्हणजे काय?

टाईप 2 मधुमेह म्हणजे शरीराची अशी स्थिती ज्यात रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी खूपच वाढलेली असते.

आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होतं. जेव्हा आपलं शरीर या इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही किंवा ते पुरेशा प्रमाणात तयार करू शकत नाही, अशावेळी रक्तातील साखरेची पातळी वाढते.

तपासणी करणारा पुरुष

फोटो स्रोत, Getty Images

टाईप 2 मधुमेहाचा काहीवेळा लठ्ठपणा किंवा वाढलेल्या वजनाशी संबंध असतो.

कारण शरीरातील चरबी स्वादुपिंडात आणि त्याच्या अवतीभोवती जमा होऊ शकते. स्वादुपिंडातच इन्सुलिनची निर्मिती होते. त्यामुळे शरीरातील चरबीचा स्वादुपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

तर टाईप 1 मधुमेह हा एक ऑटोइम्युन आजार आहे. यात आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वत:च्याच निरोगी पेशी, ऊती किंवा अवयवावर हल्ला चढवते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.