चीन आणि हाँगकाँगचे पार्सल स्वीकारणे अमेरिकन पोस्टल सेवेने थांबवले, कारण काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जाओ दा सिल्वा
- Role, बीबीसी न्यूज
चीन आणि हाँगकाँगकडून येणारे पार्सल स्वीकारणे अमेरिकन पोस्टल सेवेनी थांबवले आहे.
हाँगकाँग आणि चीनवरून येणारी पार्सल्स स्वीकारली जाणार नसल्याचं अमेरिकेच्या टपाल सेवा विभागाकडून (युएसपीएस) सांगण्यात आलं आहे.
या स्थगितीचा साध्या पत्रांवर काहीही परिणाम होणार नाही, असं टपाल विभागाच्या वेबसाईटवर जाहीर केल्या गेलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
'पुढील सूचना येईपर्यंत' ही स्थगिती कायम ठेवणार असल्याचंही युएसपीएसने म्हटलं आहे. या निर्णयामागची कारणं त्यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाहीत.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून येणाऱ्या सर्व मालावर जास्तीचा 10 टक्के आयात कर लादणं सुरू केलं होतं.
त्याआधी चीनकडून येणाऱ्या 800 डॉलर्स किंवा त्यापेक्षा लहान किमतीच्या मालावर कोणताही कर आकारला जात नसे.
मात्र, करामधल्या या पळवाटेचा फायदा घेऊन शीन आणि टेमूसारख्या चिनी ई-कॉमर्स कंपन्या लाखो अमेरिकन ग्राहकांशी थेटपणे व्यवहार करत होत्या.
त्यामुळे या 'डी मिनिमिस' कर नियमावर टीका केली जात होती.
हा नियम मोडीत काढला जात असून चीनवरून आलेल्या लहान मोठ्या सगळ्या मालावर कर लावला जाईल, असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलं.


येत्या काही दिवसांत ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही बोलणार असल्याची शक्यता आहे.
"चीनच्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून अमेरिकेत पाठवलेल्या मालावरच ट्रम्प यांनी कडक आयात कर लावलेत," व्यापार तज्ज्ञ डेबोरा ईल्म्स सांगतात.
युएस काँग्रेशनल कमिटी ऑन चायना या समितीच्या 2023 च्या अहवालानुसार, 'डी मिनिमिस' नियमाची सूट घेऊन अमेरिकेत येणाऱ्या एकूण मालापैकी अर्धी पार्सल्स चीनकडूनच आलेली असतात.
या नियमाचा फायदा घेऊन मोठ्या संख्येनं पार्सल्स अमेरिकेत येत असल्याने त्यांची तपासणी करणं अवघड होत चालल्याचं अमेरिकेतील अधिकारी सांगत आहेत. या पार्सल्समधून अवैध्य पदार्थांची तस्करी होण्याचा धोका असतो.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याच्या बीबीसीच्या विनंतीला युएसपीएसने अजून उत्तर दिलेले नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











