कशी असेल स्थलांतरित नागरिक नसलेली अमेरिका? त्यांच्यामुळं खरंच आर्थिक फटका बसतो का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, लुईस बरुको
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थलांतरीत किंवा त्यांच्या भाषेत 'घुसखोर' असलेल्यांवर निशाणा साधला.

त्यांनी अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. त्यासाठी लष्कराला सीमा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले.

जन्मतः मिळणाऱ्या नागरिकत्वाचा अधिकार रद्द करण्याचा विचार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. या अधिकारामुळं अमेरिकेत जन्मलेल्या कुणालाही थेट अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. याला लगेचच न्यायालयात आव्हानही देण्यात आलं.

अवैधरित्या देशात येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर परत पाठवण्याच्या संदर्भातही ट्रम्प यांनी वक्तव्य केलं होतं.

पण जगातील विदेशात जन्मलेली सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या अमेरिकेसारख्या देशात स्थलांतरीतांची भूमिका काय आहे? आणि हे स्थलांतरीत नसतील तर नेमकं काय होईल? हे प्रश्न आणि त्याच्या उत्तरांवर एक नजर टाकुयात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

लोकसंख्येवर होणारे परिणाम

2023 च्या अखेरीस मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये मोठ्या संख्येनं स्थलांतरीतांनी प्रवेश केला. पण तेव्हापासून हा आकडा सातत्याने घसला आणि गेल्या चार वर्षातील नीचांकी पातळीवर तो पोहोचला आहे.

स्थलांतरीतांचा आकडा घटवल्यास अमेरिकेची लोकसंख्या लक्षणीयरित्या कमी होईल.

अमेरिका आणि मेक्सिको दरम्यानची सीमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2023 च्या अखेरीस मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये मोठ्या संख्येनं स्थलांतरीतांनी प्रवेश केला.

अमेरिकेतील विदेशात जन्मलेल्या लोकसंख्येचा आकडा 2023 मध्ये विक्रमी 4.78 कोटींवर वर पोहोचला. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 14.3 टक्के एवढं हे प्रमाण आहे. यात मेक्सिकोतील सर्वाधिक 10.6 दशलक्ष तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय 28 लाख आणि चीनचे 25 लाख स्थलांतरीत आहेत.

पण एकिकडे स्थलांतरितांचे आकडे विक्रमी उंचीवर असतानाही अमेरिकेतील लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी होत आहे. जन्मदरात होणारी घट हे त्यामागचे कारण आहे.

2010 आणि 2020 दरम्यान अमेरिकेतील लोकसंख्येची वाढ ही सर्वात कमी वेगानं झाली. 1930 नंतरचं कोणत्याही दशकातील हे सर्वात कमी प्रमाण होतं. 1930 मध्ये मंदीच्या प्रभावानं अमेरिकेत सर्वात कमी जन्मदराची नोंद झाली होती.

अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील 70 टक्के कामगार वर्ग हा स्थलांतरीतांपैकी आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील 70 टक्के कामगार वर्ग हा स्थलांतरीतांपैकी आहे.

याचाच अर्थ असाही होतो की, इतर अनेक देशांप्रमाणेच अमेरिकेलाही वाढत्या वयाच्या लोकसंख्येच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. कारण आरोग्य सेवांवरील वाढता खर्च आणि काम करणाऱ्या नागरिकांची घटणारी संख्या अशा पद्धतीनंही त्याचा परिणाम पाहायला मिळतो.

याचा सर्वाधिक फटका बसणारी स्थिती किंवा आकडा 2040 मध्ये निर्माण होणार आहे. त्यावेळी जन्मापेक्षा मृत्यूच दर अधिक असेल. काँग्रेशनल बजेट ऑफिसच्या अंदाजांनुसार त्यावेळी लोकसंख्या वाढीचं कारण हे स्थलांतरीच हेच असतील.

त्यामुळं काही अर्थतज्ज्ञ आणि स्थलांतराचे समर्थक हे अर्थव्यवस्तेमुळं निर्माण होणाऱ्या आणि प्रामुख्यानं ग्रामीण भागातील गरजा पूर्ण करण्यासाठी स्थलांतरीतांना मान्यता द्यायला हवी, असं म्हणत आहेत.

आर्थिक परिणाम

स्थलांतरीत नागरिक नसतील तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो असं मत, बॉस्टन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक तारेक हसन यांनी व्यक्त केलं. "स्थलांतरीतांना पूर्णपणे बाहेर करणं म्हणजे, आपण पर कॅपिटा जीडीपीमधील जवळपास 5 ते 10 टक्के घटवण्याबाबत बोलत आहोत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या संपत्तीवर त्याचा परिणाम होईल. शिवाय कमी लोकांमुळं एकूण जीडीपी हा खूपच कमी असेल," असं ते म्हणाले.

हसन म्हणाले की, "त्यांच्या संशोधनानुसार स्थलांतरीतांमुळं नावीन्य वाढतं, तसंच उत्पाकतेलाही वाढ मिळते. हे काही एका क्षेत्रापुरतं मर्यादीत नाही. त्याचा एकूणच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो."

डोनाल्ड ट्रम्प.

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शिवाय स्थलांतरीत हे शक्यतो काम करणाऱ्या वर्गातील असतात. ते अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 14 टक्के असल्यामुळं अमेरिकेतील एकूण काम करणाऱ्यां नागरिकांपैकी त्यांचं प्रमाण 19 टक्के आहे. 31 मिलियन च्या जवळपास आहे. तसंच जन्मजात अमेरिकन नागरिकांच्या तुलनेतही काम करणाऱ्या वर्गातील त्यांचं प्रमाण अधिक आहे. अमेरिकेची सरकारी संस्था ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली आहे.

काँग्रेशियल बजेट ऑफिसनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 16 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे स्थलांतरीत 2022 ते 2034 दरम्यान अमेरिकेत येतील त्यांच्यापैकी जवळपास 91 टक्के हे 55 पेक्षा कमी वयाचे असण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील एकूण प्रौढ लोकसंख्येशी तुलना करता हा आकडा फक्त 62 टक्के आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील कृषीसारखी काही क्षेत्रं तर प्रामुख्यानं स्थलांतरीत कामगार वर्गावरच अवलंबून आहेत.

अमेरिकेच्या लेबर्स नॅशनल अॅग्रिकल्चर वर्कर्स सर्व्हेच्या माहितीनुसार कृषी क्षेत्रातील 70 टक्के कामगार वर्ग हा स्थलांतरीतांपैकी आहे. पण त्यातील बहुतांश कागदपत्रं नसेलले किंवा अवैध आहेत.

हे स्थलांतरीत नसतील तर अनेक शेत मालकांना पिकं किंवा उत्पादन घेण्यासाठी, फळशेती आणि भाजीपाल्याच्या शेतीसाठीही पुरेसे कामगार मिळवणं कठिण होऊन बसेल. तशाने अमेरिकेतील ग्राहकांना ऐक हंगामानं फळं, भाज्या मिळणार नाहीत, असं मत अमेरिकन इमिग्रेशन काऊन्सिल (AIC) मधील संशोधन संचालक नान वू यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील स्थलांतरितांच्या बाजूनं बोलणारा हा गट आहे.

स्थलांतरीतांवर टीका करणाऱ्यांकडून प्रामुख्यानं एका मुद्द्यावर प्रतिवाद केला जातो. विदेशातील कामगार कमी पगारावर काम करायला तयार होतात. त्यामुळं स्थानिक नागरिकांना मिळणाऱ्या वेतनावर परिणाम होतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

पण, 2014 मध्ये डेव्हीच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियानं स्थलांतरितांशी संबंधित 27 संशोधनांचा एकत्रित अभ्यास केला. त्यानुसार मूळ नागरिकांच्या वेतनावर स्थलांतरितांमुळं काहीही परिणाम होत नाही.

इस्टर्न इलिनॉइल युनिव्हर्सिटीच्या ताज्या सर्वेक्षणानुासर उलट स्थलांतरितांचा आकडा वाढल्यानं, वेतनावर सकारात्मक आणि लक्षणीय परिणाम पाहायला मिळतो.

करामध्ये स्थलांतरितांचा वाटा

पण करातून मिळणाऱ्या महसुलावर होणाऱ्या परिणामाचं काय?

AIC नं केलेल्या विश्लेषणानुसार स्थलांतरीत कुटुंबांनी 2022 मध्ये एकूण करामध्ये जवळपास 580 अब्ज डॉलर एवढं योगदान दिलं. एकूण कराच्या सहाव्या भागाएवढं हे प्रमाण आहे.

या संघनेच्या प्रतिनिधी असलेल्या वू यांच्या मते, कराच्या उत्पन्नामध्ये फक्त वैध स्थलांतरीतच योगदान देतात असं नाही.

कागदंपत्रं नसेलेल किंवा अवैध स्थलांतरीतांचा आकडा हा एकूण स्थलांतरितांच्या जवळपास 23 टक्के आहे. या अंदाजे 1.10 कोटी नागरिकांत जवळपास 40 लाख मेक्सिकोतील आहेत, असं विश्लेषण प्यू रिसर्च सेंटर या थिंट टँकनं केलं आहे.

तसंच इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड इकॉनॉमिक पॉलिसी या संस्थेच्या अभ्यासानुसार या अवैध स्थलांतरीतांनी 2022 मध्ये जवळपास 100 अब्ज डॉलर एवढा कर भरला होता.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कागदंपत्रं नसेलेल किंवा अवैध स्थलांतरीतांचा आकडा हा एकूण स्थलांतरितांच्या जवळपास 23 टक्के आहे.

दुसरीकडं, इकॉनॉमिक पॉलिसी इन्स्टिट्यूट या थिंक टँकमधील इमिग्रेशन लॉ अँड पॉलिसी रिसर्चचे संचालक डॅनियल कोस्टा यांच्या मते, राष्ट्रीय पातळीवर स्थलांतरितांमुळं होणारा परिणाम सकारात्मक असला तरी काही राज्यांमध्ये तो नकारात्मक असू शकतो.

एका ताज्या अभ्यासात त्यांनी आणि त्यांच्या टीमनं कमी वेतन पण जास्त लाभांसाठी पात्र ठरणाऱ्या स्थलांतरीतांच्या एका मोठ्या गटाचं उदाहरण दिलं. त्यासाठी केंद्रीय आणि राज्याच्या पातळीवर वेगळ्या पद्धतीनं निधीचं पुनर्वितरण करण्याचा प्रतिवाद त्यांच्या टीमनं केला. स्थलांतरितांचं प्रमाण जास्त असलेल्या भागामध्ये आव्हानांचा सामना करण्यासाठी जास्त पैसा देण्यासारख्या गोष्टी यातून उद्भवतात, असं ते म्हणाले.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील स्थलांतर विषयाचे तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ प्राध्यापक जिवोवान्नी पेरी एका मुद्द्याकडं लक्ष वेधतात. अमेरिकेतील नागरिकांची लोकसंख्या वाढते तेव्हा जसा दबाव वाढतो तसाच दबाव स्थलांतरितांचे समुदाय वाझल्यामुळं निर्माण होऊ शकतो.

"त्यामुळं सेवा, गृहनिर्माण असा गोष्टींवरचा दबावही वाढतो. म्हणून सहजच त्यांच्यावर बोट ठेवलं जातं."

कल्पकता आणि उद्योजकता

स्थलांतरितांपैकीचे काही जण किंवा त्यांची मुलं आघाडीचे उद्योजक बनले आहे. हा आकडा लक्षणी आहे.

अमेरिकेतील महसुलाच्या दृष्टिनं 500 सर्वात मोठ्या कंपन्यांची एक वार्षिक यादी तयार केली जाते. या यादीला फॉर्च्युन 500 म्हणतात. त्यातील 45 टक्के कंपन्या स्थलांतरीत किंवा त्यांच्या मुलांनी सुरू केलेल्या होत्या. तसंच अमेरिकेतील स्टार्टअप्समध्ये स्थलांतरिकांनी सुरू केलेल्या स्टार्टअपचे प्रमाण 55 टक्के आहे. त्याचे मूल्य अंदाजे 1 अब्ज डॉलर किंवा त्याहून जास्त आहे.

स्टिव्ह जॉब्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेतील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली अॅपल कंपनी स्टिव्ह जॉब्स यांनी स्थापन केली होती. तेही स्थलांतरीत कुटुंबातील होते.

बहुतांश स्थलांतरीत विद्यार्थी म्हणून अमेरिकेत येतात. त्यामुळं जागतिक तांत्रिक प्रगतीमध्येही त्यांची मोलाची भूमिका असते.

2022-2023 या शैक्षणिक वर्षामध्ये 10 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्तेला 40 अब्ज डॉलर एवढा हातभार लावला. तसंच शिक्षण, राहण्याचा खर्च या माध्यमातून 3 लाख 68 हजारांहून अधिक रोजगारनिर्मितीत हातभार लावला, असं असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल एज्युकेटर्सच्या माहितीत समोर आलं.

जनमत काय सांगतं?

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थलांतरितांची एवढी महत्त्वाची भूमिका असतानाही, जुलै 2024 मध्ये गॅलपनं घेतलेल्या मतचाचणीत 55 टक्के अमेरिकेतील नागरिकांनी स्थलांतर कमी व्हायला हवं, असं मत मांडलं. तसंच स्थलांतरासंबंधिचे कायदे अधिक कठोर व्हावे यातही एकमत दिसलं. विशेषतः मेक्सिकोच्या सीमेवरून होणाऱ्या अवैध स्थलांतराबाबत, ही भूमिका समोर आली.

प्राध्यापक पेरी यांच्या मते, काही राजकीय नेते आणि माध्यमं स्थलांतराचं वर्णन अनागोंदी कारभारासारखं करतात. स्थलांतराच्या व्यापक परिणामांचा विचार न करता ते फक्त त्याच्या अवैध घुसखोरीवर लक्ष केंद्रीत करतात.

स्थलांतराविरोधी आंदोलन करताना आंदोलक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गॅलपनं घेतलेल्या मतचाचणीत 55 टक्के अमेरिकेतील नागरिकांनी स्थलांतर कमी व्हायला हवं, असं मत मांडलं.

"दक्षिण सीमेवरून होणारं स्थलांतर म्हणजे लोकांची गर्दी होणं आणि ते खूप जास्त किंवा त्रासदायक असावं, असा विचार लोक करतात. पण स्थलांतरितांचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम किंवा इतर मुद्द्यावर चर्चा होत नाही," असंही ते म्हणाले.

तर बोस्टन विद्यापीठातील तारेक हसन यांच्या मते, "गेल्या दोन दशकांमध्ये प्रामुख्यानं स्थलांतराचं प्रमाण अधिक राहिलं आहे. त्यामुळं येणाऱ्यांना सामावून घेण्याच्या सामाजिक क्षमतेवर ताण निर्माण होत आहे.

"त्यामुळं स्थलांतराचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम असताना, काही अशाही बाबी असू शकतात ज्या लोकांसाठी त्रासदायक ठरत असाव्यात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)