राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचा अर्थ काय ? - विश्लेषण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अँथनी झर्कर
- Role, उत्तर अमेरिका प्रतिनिधी
अमेरिकेतील सद्यस्थितीबाबत नाराज, असमाधानी असलेल्या मतदारांच्या लाटेवर स्वार होत पुन्हा सत्तेत परतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या पहिल्याच भाषणात अमेरिकेच्या 'सुवर्णयुगा'चं आश्वासन दिलं.
त्यांचं हे भाषण म्हणजे आश्वासनं आणि विरोधाभासांचं मिश्रण होतं. या भाषणातून डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्यासमोर असलेल्या संधी आणि आव्हानांना अधोरेखित केलं.
सोमवारी (20 जानेवारी) दुपारी त्यांनी बोलण्यास सुरूवात केली आणि काहीवेळा असं वाटलं की ते अखंड बोलत आहेत.
कोणत्याही तयारीशिवाय ते कॅपिटॉल हिलवर बोलले, स्पोर्ट्स अरेना मधील त्यांच्या इनडोअर परेड सभेत बोलले आणि नंतर व्हाईट हाऊसमध्ये आदेशांवर सह्या करताना बोलले. संध्याकाळपर्यंत ट्रम्प यांचं बोलणं सुरूच होतं.
या सर्वांमधून ट्रम्प यांनी वाद आणि संघर्षासाठीचं त्यांचं नाटकीय कौशल्यं आणि आवड दाखवली. त्यातूनच त्यांच्या समर्थकांना ऊर्जा मिळाली आणि त्यांचे टीकाकार संतापले.
ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात बायडन सरकारवर टीका आणि समर्थकांमध्ये जल्लोष
राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेत होणारं स्थलांतर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विशेष लक्ष दिलं. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेतील मतदारांनी याच मुद्द्यांना महत्त्व दिल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलं.
अमेरिकन सरकारपुरस्कृत विविधता कार्यक्रमांवर बंदी घालण्याचंही आश्वासन ट्रम्प यांनी दिलं. त्यांनी असंही सांगितलं की अमेरिकेच्या अधिकृत धोरणात फक्त पुरुष आणि महिला या दोन लिंगांना मान्यता दिली जाईल.
त्यांच्या भाषणातील शेवटच्या वाक्यानं कॅपिटॉल हिलवर असलेल्या लोकांमध्ये एक उत्साह निर्माण केला. तसंच जवळच्याच स्पोर्ट्स अरेना किंवा क्रीडा संकुलामध्ये जमलेल्या ट्रम्प यांच्या समर्थकांच्या गर्दीत त्यामुळे जोरदार जल्लोष निर्माण झाला.
त्यातून असं दिसतं की सांस्कृतिक मुद्दे हे ट्रम्प यांच्या सर्वात शक्तीशाली मार्गांपैकी एक असतील. याद्वारेच ते त्यांच्या समर्थकांशी जोडले जातात. याच बाबतीत गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाशी सर्वात स्पष्ट स्वरुपाचा विरोधाभास निर्माण केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या नव्या कार्यकाळात आणि अमेरिकेच्या सुवर्णयुगात काय समाविष्ट असेल हे सांगण्यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीचं एक नकारात्मक आणि गंभीर चित्र रंगवलं.
कार्यक्रमात ट्रम्प फटकेबाजी करत असताना अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष, जो बायडन आणि इतर डेमोक्रॅटिक पक्षाचे इतर नेते एका बाजूला निर्विकार चेहऱ्यानं बसले होते. ट्रम्प म्हणाले की सरकारमध्ये विश्वासार्हतेचा अभाव आहे. हेच सर्वांत मोठं संकट आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाचा "दुष्ट, हिंसक आणि अन्याय्य" स्वरूपाचा वापर करण्याचा त्यांनी निषेध केला. ट्रम्प यांनी 2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालांना आव्हान दिल्याबद्दल न्याय विभागानंच ट्रम्प यांची चौकशी केली होती आणि त्यांच्यावर खटला चालवला होता."
ट्रम्प यांनी "भयानक विश्वासघात" उलटवण्याचा कौल दिल्याचा दावा केला आणि त्यांनी "कट्टरतावादी आणि भ्रष्टाचारी प्रशासनावर" सडकून टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की अमेरिकन सरकारनं अमेरिकेच्या नागरिकांकडून सत्ता आणि संपत्ती हिसकावून घेतली होती.


ट्रम्प यांच्या भाषणात लोकनुनय करणाऱ्या, अभिजात वर्गविरोधी मांडणीचा समावेश होता. गेल्या दशकभरापासून तो ट्रम्प यांच्या भाषणांचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
2015 मध्ये ट्रम्प जेव्हा राजकीय सत्तेच्या शिखरावर पोहोचू लागले होते, त्यापेक्षा हे वेगळं होतं. ट्रम्प सध्याच्या उदयोन्मुख प्रशासनाचं जितकं प्रतिनिधित्व करतात तितकंच ते एका माणसाचं देखील करतात.
ट्रम्प भाषण करत असताना, त्यांच्या मागे व्यासपीठावर जगातील काही सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली, उद्योजक, धनाढ्यांपैकी काहीजण बसलेले होते.
पहिल्याच दिवशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य
राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवर ट्रम्प यांचं लक्ष होतं आणि ते विविध मुद्दयांवर पुढाकार घेणार आहेत. अमेरिकेत होणारं स्थलांतर, ऊर्जा क्षेत्र, व्यापार, शिक्षण क्षेत्र आणि वादग्रस्त सांस्कृतिक मुद्द्यांसह इतर विविध शेकडो विषयांवर पावलं उचलण्याचं आश्वासन ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी दिलं आहे.
राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी त्यातील काही मुद्द्यांचा तपशीलात उल्लेख केला. ऊर्जा आणि स्थलांतराच्या मुद्द्यावर त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे ट्रम्प यांना अमेरिकेच्या सीमेवर सैन्य तैनात करता येणार आहे.
तसंच अमेरिकेत आश्रय घेऊ पाहणाऱ्यांचे अधिकार लक्षणीयरीत्या कमी करता येणार आहेत आणि अमेरिकन सरकारच्या जमिनीचा मोठा हिस्सा ऊर्जेसंदर्भातील उत्खननासाठी खुला करता येणार आहे.
"गल्फ ऑफ मेक्सिको"चं नाव बदलून "गल्फ ऑफ अमेरिका" करण्याचं आणि पनामा कालवा पुन्हा ताब्यात घेण्याच्या वचनाची त्यांनी यावेळेस पुनरोक्ती केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पनामा कालव्याचं नियमन चीन करत असल्याचा निराधार दावा ट्रम्प यांनी केला. ते म्हणाले की अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांसह अमेरिकन जहाजं पनामा कालव्यातून वाहतूक करताना खूप जास्त शुल्क भरत आहेत.
किंबहुना भविष्यात पनामा सरकारशी करायच्या वाटाघाटीमधील खऱ्या उद्दिष्टासंदर्भात केलेला हा इशारा आहे.
"अमेरिका पुन्हा एकदा स्वत:ला एक विस्तारणारं राष्ट्र मानेल," असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या संपत्तीत वाढ करण्याचं आणि "अमेरिकेच्या भूप्रदेशाचा" विस्तार करण्याचं वचन त्यांनी याप्रसंगी दिलं.
त्यांच्या शेवटच्या मुद्द्यामुळे कदाचित अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांचं लक्ष वेधलं जाऊ शकतं. ग्रीनलंड ताब्यात घेण्याच्या ट्रम्प यांच्या इच्छेमुळे आणि कॅनडाला अमेरिकेचं 51 वं राज्य करण्याच्या उपहासात्मक विधानामुळे अमेरिकेची मित्रराष्ट्रं आधीच चिंतेत आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात आणि या भाषणात, ट्रम्प यांनी असंख्य मोठाली आश्वासनं दिली. आता ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे, ती आश्वासनं पूर्ण करण्याचं आणि ते अमेरिकेच्या ज्या "सुवर्णयुगा"बद्दल बोलतात, त्याचा खरा अर्थ काय आहे, हे देखील दाखवून देण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं भाषण संपवल्यानंतर आणि मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन मरीन हेलिकॉप्टरमधून जात असल्याचं पाहिल्यानंतर, ट्रम्प यांनी कॅपिटॉलमध्ये इतरत्र जमलेल्या त्यांच्या समर्थकांसमोर आधी विचार न करताच बेफिकिरीने विधानं केली.
तिथेच कोणत्याही तयारी शिवाय अचानक वाटेल तसं बोलणारे आणि ज्यामुळे वारंवार चर्चा होते आणि अमेरिकेच्या राजकारणात उलथापालथ होते, असे ट्रम्प पुन्हा दिसले.
2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार किंवा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं. 6 जानेवारी 2021 ला कॅपिटॉल हिलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सभागृहाच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी गुन्हेगारीदृष्ट्या जबाबदार होत्या.
2024 च्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेल्या प्रचंड विजयाबद्दल त्यांनी फुशारकी मारली. ते म्हणाले की पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच भाषणात "एकते"बद्दल बोलण्यास ते अनिच्छेनंच तयार झाले.
टिप्पण्या आणि आदेशांवर सह्या
उर्वरित दिवसात आणि त्यांच्या कार्यकाळातील पुढील चार वर्षात काय घडणार आहे याची ती फक्त झलक होती.
संध्याकाळच्या सही करण्याच्या समारंभात, ट्रम्प यांनी एक सामान्य अध्यक्षीय कृती केली. त्यांनी आधीच्या सरकारनं दिलेले आदेश रद्द केले आणि त्याचं रूपांतर एखाद्या मनोरंजक सादरीकरणात केलं.
कार्यक्रमाची सांगता करणारं आणखी एक भाषण दिल्यानंतर - दिवसातील त्यांचं तिसरं भाषण- ट्रम्प स्पोर्ट्स अरेना मधील व्यासपीठावर असणाऱ्या एका छोट्या डेस्ककडे गेले. तिथेच त्यांची उद्घाटनाची इनडोअर परेड नुकतीच संपली होती.
त्यानंतर ते अमेरिकन सरकारचे नवे नियम आणि नोकरभरती थांबवण्याचे काम करायला, बायडन सरकारचे आदेश रद्द करायला गेले. त्यांनी अमेरिकन सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ कार्यालयातून काम करण्याची सक्ती केली आणि पॅरिसमध्ये झालेल्या पर्यावरणासंदर्भातील करारातून माघार घेतली.
"जो बायडन यांना असं करतानाची कल्पना तुम्ही करू शकता का?" असा प्रश्न ट्रम्प यांनी सरकारचे बायडन यांच्या कार्यकाळातील नियम स्थगित करण्याच्या निर्णयावर सही करताना विचारला. मात्र आदेशातील मजकुरांइतकंच ते त्या क्षणाला लागू होतं.
"सरकारचा शस्त्र म्हणून वापर" करण्यास थांबवण्यासाठी आणि प्रशासनाला राहणीमानाच्या वाढत्या खर्चाकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यासाठी त्यांनी आणखी प्रतीकात्मक आदेशांवर सही केली.
स्पोर्ट्स अरेनामधील समारंभानंतर, ट्रम्प यांनी आदेशांवर सही करण्यासाठी वापरलेलं पेन लोकांमध्ये फेकलं. त्यातून ट्रम्प यांची शैली आणखी वाढीला लागली.
त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले आणि सरकारकडून नवे आदेश येणं सुरू राहिलं.
त्यात 6 जानेवारीला कॅपिटॉलवरील दंगलीत अटक करण्यात आलेल्या जवळपास सर्व 1,600 हून अधिक समर्थकांना माफ करणं, टिकटॉकवरील बंदी तात्पुरती स्थगित करणं आणि जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिकेनं बाहेर पडणं, या निर्णयांचा समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर अमेरिकेच्या राज्यघटनेतील एका महत्त्वाच्या घटनादुरुस्तीचा त्यांनी नव्यानं अर्थ लावला आणि अधिकृत कागदपत्रं नसलेल्या स्थलांतरितांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व देणं थांबवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
हे सर्व करताना, त्यांनी एक सद्यपरिस्थितीवर टिप्पणी केली. त्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून मेक्सिको आणि कॅनडा या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव, 2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षानं फसवणूक केल्याचा आरोप आणि गाझा युद्धविरामाबद्दल शंका व्यक्त करणं, या गोष्टींचा समावेश होता.
राज्यकारभाराची सविस्तर रणनीती असलेल्या आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आक्रमक धोरण असलेल्या सहकाऱ्यांसह डोनाल्ड ट्रम्प सत्तेत परतले आहेत.
स्वत: ट्रम्प हे अजूनही तितकेच बेभरवशाचे किंवा कधीही कसलाही धक्का देणारे आणि लक्ष केंद्रित नसलेले आहेत. ते अशा टिप्पण्या करतात किंवा विधानं करतात जे कदाचित त्यांचं नवीन धोरण असू शकतं किंवा ती तात्पुरती लक्ष विचलित करणारी विधानं असतात.
अमेरिकेत आणि जागतिक पटलावर दुसऱ्या ट्रम्प युगाची खरोखरंच सुरूवात झाली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












