राष्ट्राध्यक्षपद स्वीकारण्याआधी ट्रम्प यांनी लाँच केली स्वतःची क्रिप्टोकरन्सी, लगेचच आली तेजी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ॲना फागाय
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, वॉशिंग्टन
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची स्वत:ची क्रिप्टोकरन्सी लाँच केली आहे. या क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत लगेचच वाढ होत त्याचं बाजारमूल्य कित्येक अब्ज डॉलर्सवर पोचलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (20 जानेवारी) अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार असतानाच त्यांनी $Trump हे मीम कॉईन बाजारात आणलं आहे.
ही क्रिप्टोकरन्सी लाँच केल्यानंतर काहीच तासांत ट्रम्प यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्सने वाढल्याचे म्हटले जात आहे.
ट्रम्प यांच्या क्रिप्टोकरन्सीच्या लॉंचिंगचं सहसंचालन, सीआयसी डिजिटल एलएलसी या ट्रम्प यांच्याशी संलग्न कंपनीनं केलं आहे. याआधी याच कंपनीनं ट्रम्प यांच्या ब्रँड नावाचे बूट आणि अत्तरं यांची विक्री केली होती.
इंटरनेटवरील व्हायरल ट्रेंड किंवा चळवळींसाठी लोकप्रियता निर्माण करण्यासाठी मीम कॉईनचा वापर केला जातो. मात्र त्यांचं स्वत:चं असं मूल्य नसतं. त्यामुळे या मीम कॉईनमधील गुंतवणूक अतिशय अस्थिर स्वरुपाची असते. त्यात जोखीम असते.
मीम कॉईनची बहुतांश मालकी ट्रम्प यांच्याकडे
सीआयसी डिजिटल एलएलसी आणि फाईट फाईट फाईट एलएलसी या कंपनीची स्थापना या महिन्याच्या सुरुवातीला डेलवेअर मध्ये करण्यात आली होती. यातील 80 टक्के मीम कॉईन या कंपनीच्या मालकीचे आहेत.
या नव्या मीम कॉईनच्या माध्यमातून ट्रम्प नेमक्या किती रकमेची कमाई करणार हे अद्याप स्पष्ट नाही.
"माझं नवं अधिकृत ट्रम्प मीम लाँच झालं आहे! आता आपण ज्यासाठी उभे आहोत त्या सर्व गोष्टींचा आनंद साजरा करण्याची वेळ आहे, ती म्हणजे जिंकणं!" असं ट्रम्प यांनी शुक्रवारी (17 जानेवारी) रात्री त्याचं हे मीम कॉईन लाँच केल्याची घोषणा करताना त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडियावर व्यासपीठावर लिहिलं.
जवळपास 20 कोटी $Trump हे मीम कॉईन किंवा डिजिटल टोकन बाजारात आणण्यात आले आहेत. तर आणखी 80 कोटी मीम कॉईन पुढील तीन वर्षात बाजारात आणले जातील, असं या मीम कॉईनच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
"या ट्रम्प मीम कॉईनच्या माध्यमातून एक असा नेता जो वाकत नाही, कितीही आव्हानं आली तरी त्याला तोंड देतो, जो कणखर आहे अशा नेत्याचं कौतुक केलं जातं आहे," असं या मीम कॉईनच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हे मीम कॉईन बाजारात आणताना त्यावर एक डिस्क्लेमर किंवा टीप देण्यात आली आहे.
हे मीम कॉईन गुंतवणुकीसाठी आणण्यात आलेलं नाही किंवा ते गुंतवणुकीचं साधन नाही. तसंच हे मीम कॉईन "राजकीय स्वरुपाचं नाही आणि त्याचा कोणत्याही" राजकीय मोहिमेशी किंवा प्रचाराशी, राजकीय पक्षाशी किंवा सरकारी यंत्रणेशी कोणताही संबंध नाही, असं त्यात म्हटलं आहे.


क्रिप्टोकरन्सीवरून ट्रम्प यांच्यावर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी हे मीम कॉईन लाँच केल्यावर त्यांच्यावर टीका देखील झाली आहे. त्यांच्या टीकाकारांनी ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आल्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला आहे.
"या नव्या मीम कॉईनची 80 टक्के मालकी ट्रम्प यांची आहे आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या काही तास ते लाँच करणं हे नक्कीच एकप्रकारे शोषण करणारं आहे. त्यामुळे अनेकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे," असं मत निक टोमॅनो यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये व्यक्त केलं आहे. ते बाजारात येणाऱ्या नव्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार आहेत.
या प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल टोकन सट्टेबाजांसाठी कुप्रसिद्ध आहेत. हे सट्टेबाज त्या क्रिप्टोकरन्सीच्या तेजीचा किंवा त्याला अनुकूल असलेल्या परिस्थितीचा (जसा अमेरिकेत ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष होण्यामुळे या नव्या क्रिप्टोकरन्सीला एक अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे) किंवा प्रचाराचा गैरफायदा घेत त्याची किंमत वाढवतात.
मग ते सट्टेबाज त्या क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल टोकनचं बाजारमूल्य उच्चांकीवर पोहोचल्यावर त्याची विक्री करतात. परिणामी या प्रकारची क्रिप्टोकरन्सी नंतरच्या टप्प्यात विकत घेणाऱ्यांचं पुढे त्या क्रिप्टोकरन्सीचं मूल्य घसरल्यामुळे मोठं नुकसान होतं.

क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करणाऱ्यांना आशा आहे की ट्रम्प क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्राला चालना देतील.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सरकारच्या काळात या क्षेत्राच्या नियामक संस्थानी यात होणारी फसवणूक आणि मनी लाँडरिंगबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसंच त्यांनी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आणि त्यांच्या कंपन्यांवर खटले दाखल केले होते.
डोनाल्ड ट्रम्प देखील आधी क्रिप्टोकरन्सीबद्दल साशंक होते. मात्र गेल्या वर्षी नॅशविले इथे झालेल्या बिटकॉईन परिषदेत ते म्हणाले होते की ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा आल्यानंतर अमेरिका ही "जगातील क्रिप्टोकरन्सीचं केंद्र होईल."
ट्रम्प यांची मुलं एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर यांनी देखील गेल्या वर्षी त्यांच्या स्वत:च्या क्रिप्टोकरन्सीची घोषणा केली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











