कोका-कोलाचा इशारा, 'तर आम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा जास्त वापर करू'

"तर पेय विकण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा अधिक वापर करणार", 'कोका कोला'ने असं का म्हटलं?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जाओ दि सिल्वा
    • Role, बीबीसी न्यूज, व्यापार प्रतिनिधी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या आयात शुल्कामुळे अ‍ॅल्युमिनियमच्या कॅन अधिक महाग झाल्या 'कोका-कोला'ला अमेरिकेत प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये कोल्ड्रिंक विकाले लागेल', असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विन्सी यांनी सांगितलं.

ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमवरील कर 25 टक्के केल्यानंतर 'कोका-कोला'कडून ही प्रतिक्रिया आली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे कॅनमध्ये साठवलेल्या पदार्थांच्या किमती वाढू शकतात.

डिसेंबर 2024 मध्ये कोका कोला कंपनीनं एक घोषणा केली होती आता त्यांनी या घोषणेत बदल केला आहे.

2030 पर्यंत 50 टक्के पुनर्प्रकिया करता येईल अशी सामग्री वापरू असं त्यांनी आधी सांगितलं होतं. पण, आता सांगितलंय 2035 पर्यंत 30-40 टक्के सामग्री वापरली जाईल.

कोका-कोला हे जगातील सर्वाधिक प्लॅस्टिक प्रदूषक असल्याचं पर्यावरणवादी गेल्या सहा वर्षांपासून सातत्यानं सांगत आहेत.

गुंतवणकूदारांसोबत बोलताना क्विन्सी म्हणाले, जर एखाद्या पॅकेजिंगच्या खर्चात वाढ झाली तर आमच्याकडे अजून इतर पॅकेजिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे आम्हाला परवडणाऱ्या क्षेत्रात स्पर्धा करण्याची संधी मिळेल.

म्हणजेच अ‍ॅल्युमिनियमच्या कॅन महाग झाल्या तर आम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर अधिक भर देऊ शकतो, असं क्विन्सी म्हणाले.

सोबतच पॅकेजिंगचा खर्च हा कंपनीच्या एकूण खर्चाच्या तुलनेत कमी असतो त्यामुळे वाढलेल्या आयात शुल्काचा व्यवसायावर कमी परिणाम होईल हे त्यांनी स्पष्ट केले.

कॅन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

अलीकडच्या काही वर्षांमध्ये कोका-कोलानं आपल्या मार्केटिंग आणि पर्यावरणाशी संबंधित धोरणांचा भाग म्हणून कोल्ड्रिंक अ‍ॅल्युमिनियम कॅनमध्ये विकण्यास सुरुवात केली होती.

अ‍ॅल्युमिनियम कॅन अधिक महाग असल्या तरी प्लॅस्टिक बाटल्यांपेक्षा त्या पुनर्वापर करण्यासाठी सोयीस्कर असतात.

अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, देशात अ‍ॅल्युमिनियमचा जितका वापर केला जातो त्याच्या 50 टक्के अ‍ॅल्युनिमियम हे बाहेरून आयात केलेलं असतं. त्यामुळे आता आयात वस्तूंवरील कर 20 टक्के केल्यानंतर अ‍ॅल्युमिनियम कॅनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

2018 मध्ये ट्रम्प यांनी पहिल्यांदा स्टील वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा आदेश दिला होता तेव्हा अनेक कॅन उत्पादकांना या करामधून वगळण्यात आलं होतं. पण, यावेळी या नियमांमधून कोणालाही सूट मिळणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला भेट द्या
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला भेट द्या

कागदाच्या स्ट्रॉ ऐवजी प्लॅस्टिकच्या वापराला परवानगी

याआधी, डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदांच्या स्ट्रॉ ऐवजी प्लॅस्टिकच्या स्ट्रॉचा वापर करण्याला परवानगी दिली.

प्लॅस्टिक प्रदूषण हे मोठं संकट आहे, असं म्हणणाऱ्या जो बायडन यांनी घेतलेला एक निर्णय ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात फिरवला.

बायडन यांनी प्लॅस्टिक स्ट्रॉऐवजी कागदी स्ट्रॉ वापरण्याचा नियम आणला होता. पण, आता अमेरिकेत पुन्हा कागदीपेक्षा प्लॅस्टिक स्ट्रॉ वापरला जाईल असा आदेश ट्रम्प यांनी काढला आहे.

2020 च्या निवडणूक प्रचारात ब्रँडेड प्लॅस्टिक स्ट्रॉ विकणारे ट्रम्प गेल्या आठवड्यात म्हणाले की कागदी स्ट्रॉ काम करत नसून ग्राहकांच्या तोंडात विरघळतो.

गेल्या 2024 मध्ये बायडन यांनी प्लॅस्टिकचे स्ट्रॉ आणि पॅकेजिंग हळूहळू कमी करण्याचे आदेश काढले होते.

पण, आता ट्रम्प यांनी अगदी विरोधात जात सरकारी संस्थांना कागदी स्ट्रॉ खरेदी करण्यापासून रोखलं असून हे स्ट्रॉ देशभरातून पूर्णपणे संपवण्यास सांगितलं आहे.

कोल्ड कॉफी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की "आता आपण प्लॅस्टिक स्ट्रॉ वापरणार आहोत. कागदी स्ट्रॉ काम करत नाही. माझ्यासोबत असं खूपदा घडलं आहे. हे स्ट्रॉ जास्त वेळ टिकत नाही. गरम पदार्थ असतील तर अगदी काही सेकंदात तुटतात."

2027 पर्यंत अन्न पॅकेजिंग आणि कार्यक्रमांमधून सिंगल युज प्लॅस्टिक हळूहळू कमी केलं जाईल आणि 2035 पर्यंत पूर्णपणे त्याचा वापर बंद होईल, असा आदेश बायडन यांनी गेल्या वर्षी प्लॅस्टिक प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी दिला होता.

पण, ट्रम्प यांचा खूप आधीपासून कागदी स्ट्रॉला विरोध होता.

2020 च्या निवडणुकीत त्यांनी 10 स्ट्रॉचा पॅक 15 युएस डॉलरला विकला होता. हे कागदी स्ट्रॉला पर्याय म्हणून विकण्यात आले होते. पूर्ण निवडणुकीच्या प्रचारात जवळपास 5 लाख युएस डॉलर्सच्या स्ट्रॉची विक्री झाली होती.

काही आकडेवारीनुसार युएसमध्ये दिवसाला जवळपास 500 दशलक्षपेक्षा अधिक प्लॅस्टिक स्ट्रॉ वापरले जातात. हा आकडा वादग्रस्त असला तरी यापेक्षा अर्धी तरी ही संख्या नक्कीच आहे.

अमेरिकेतील सिएटल, वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि न्यू जर्सी या या शहरांनी प्लॅस्टिक स्ट्रॉच्या वापारावर मर्यादा घातली आहे. कधी कधी ग्राहकांनी मागितला तरच प्लॅस्टिक स्ट्रॉ दिला जातो.

युएन पर्यावरण कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 460 मिलियन मेट्रिक टन प्लॅस्टिक उत्पादन होतं. यामुळे महासागरातील कचरा आणि मायक्रोप्लॅस्टिक वाढतं. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

काही अभ्यासकांच्या मते कागदी स्ट्रॉवर पॉलॉफ्लुरोअल्काईल किंवा पीएफएएस सारखे दीर्घकाळ टिकणारे रसायनं असतात. हे रसायनं पर्यावरणात कितीतरी दशकापर्यंत राहू शकतात.

तसेच यामुळे पाण्याचं प्रदूषण होण्याची भीती असते. तसेच या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)