विजेशिवाय हे कारंजे कसे चालतात? कारंज्यांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

फोटो स्रोत, JACKY PARKER PHOTOGRAPHY
- Author, स्नेहा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ताजमहाल, काश्मीरमधलं मुघल गार्डन तसंच दिल्लीतल्या लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तू आपण पाहतो, तेव्हा त्यांच्या आवारात आपल्याला कारंजे दिसतात.
विजेचा शोध लागण्यापूर्वी जगभरातील लोक सुंदर आणि आकर्षक कारंजे बांधत होते, जे पूर्णपणे विजेशिवाय चालायचे.
आजकाल तर सगळीकडे आपल्याला मोटरवर चालणारे कारंजे दिसतात.
पण ज्या काळी वीज नव्हती, त्या काळात बांधलेल्या या वास्तूंमधील हे कारंजे चालत कसे असतील?
त्यामागे काही जादू नव्हती, विज्ञानच होतं. मात्र, त्याचा वापर कसा केला असेल? जाणून घेऊयात.
कारंजे कसे चालते?
तुम्हाला तर माहितेय की पाणी उंचावरून खालच्या दिशेने वाहतं. तो पाण्याचा गुणधर्म आहे.
पर्वतरांगांमध्ये उगम पावणारे झरे, नदी किंवा तुमच्या घरची पाण्याची मोटर सगळ्या गोष्टी याचीच साक्ष देतात.
यामागचं कारण आहे गुरुत्वाकर्षण.
सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही तुमच्या घरची पाण्याची मोटर सुरू केलीत. एखाद्या ठिकाणी तुम्ही पाईप पकडून ठेवलात तर पाण्याचा वेग वाढतो असं तुमच्या लक्षात येईल.
तुम्ही पाईप जिथे पकडला असेल तिथून पाणी एखाद्या फवाऱ्यासारखं म्हणजे कारंज्यासारखं बाहेर पडू लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
आता हेच तत्व ताजमहाल, काश्मीरमधलं मुघल गार्डन तसंच दिल्लीतल्या लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भात समजून घेऊया.
या सगळ्या वास्तू विजेचा शोध लागण्याआधी कैक वर्ष आधी तयार झाल्या होत्या. तरीपण या वास्तूंमध्ये कारंजे होते.
कारंजे तयार करण्यातच कलाकुसर होत असे. कारंज्यांची रचना अशी असे की पाणी एका ठिकाणी जमा केलं जात असे.
त्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह छोट्या कालव्याद्वारे किंवा पन्हळीद्वारे काढलं जात असे.
जेणेकरून पाण्याचा दबाव वाढत असे. दबाव वाढलेलं पाणी कारंज्यांच्या छिद्रातून बाहेर पडत असे तेव्हा त्याचा वेग एकदम जास्त होऊन जात असे.
पाण्याचा वेग आणि कारंज्यांचं आरेखन यामुळे त्या आरेखनातून ओसंडणारं पाणी सुंदरच वाटतं.
कारंज्याचं विज्ञान
सर्वसामान्य भाषेत कारंजे कसे चालते हे तुम्हाला कळलं. आता कारंज्यामागचं शास्त्रही जाणून घेऊया.
अर्बन प्लानर शुभम मिश्रा सांगतात, "मुघल काळात कारंजं तयार करताना टेराकोटा पाईपचा वापर केला जात असे. त्या पाईपचा उतार इतका तीव्र असे की पाणी येऊन, वर जाऊन प्रचंड घुसळणीसह कारंज्याच्या छिद्रातून बाहेर पडत असे."
"यासाठी पाण्याचा वेगही महत्त्वाचा असे. पाण्याची गती नियंत्रित करणं, कारंज्यांची छिद्रं तयार करणं हे खरं कौशल्याचं काम आहे.", असंही ते पुढे सांगत होते.

फोटो स्रोत, BARTEK ODIAS
टेराकोटा म्हणजे आगीत जाळून भाजलेली माती.
इतिहासकार राना सफवी सांगतात, "मुघल वास्तूंमध्ये उभारण्यात आलेली कारंज्यांमध्ये गुरुत्वाकर्षण आणि हाइड्रॉलॉजिकल प्रणालीचा उपयोग केला जात असे.
राना सफवी यांच्या मते, "मुघल वास्तूरचनेत मग मकबरा असो किंवा मशीद यामध्ये पाण्याचा मार्ग अतिशय महत्त्वाचा असे. मकबरे चार बागांभोवती तयार केले जात. या बागांभोवती कारंजे असे. याच धर्तीवर 'हुमायून का मकबरा' तयार करण्यात आला आहे. काश्मीरमधली उद्यानंही अशीच तयार करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारंजे उभारण्यात आले आहेत."
पुढे ते सांगतात, "लाल किल्ल्यामध्ये नहर-ए-बहिश्त असे. संपूर्ण किल्ल्यात ही रचना होती आणि ठिकठिकाणी कारंजे तयार करण्यात आले होते. यासाठी यमुनेच्या पात्रातून पाणी घेतलं जात असे. नहर-ए-बहिश्तच्या माध्यमातून पाणी कारंज्यापर्यंत पोहोचत असे. जामा मशिदीत तलावापर्यंत पाणी आणण्यासाठी विहीर आणि पन्हळीची व्यवस्था होती. ही व्यवस्था आजही पाहायला मिळते".
कारंज्यांचा इतिहास
भूतलावर 70 टक्के पाणी आहे. जिथे पाणी आहे, त्या भूभागावरून आजही लढाया होत आहेत. माणसाने आपल्या विकासासाठी पाण्याचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. मग तो पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी.
आवश्यकता आणि गरजांपल्याड विचार केला तर माणसाने सौंदर्यदृष्टीने कारंज्यांची निर्मिती केली.

फोटो स्रोत, Getty Images
द गार्डियन वेबसाईटनुसार, जगातलं पहिलं कारंजे मेसोपोटामिया इथे मिळाल्याची माहिती आहे. इसवीसनपूर्व 3000 वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली होती. मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराक, इराण, टर्की आणि सीरियाचा भाग.
नैसर्गिक झऱ्यांचा वापर करून कारंज्यांची निर्मिती करण्यात आली होती.
गॉर्डन ग्रिमले यांच्या पुस्तकात द ओरिजिन ऑफ एव्हरीथिंग दिलेल्या माहितीप्रमाणे ग्रीक आणि रोमन अवशेषांमध्येही कारंजे सापडले आहेत. इटलीत 15व्या शतकादरम्यान कारंजे उभारण्यात आले होते.
प्रसिद्ध कारंजे
कारंज्यांशी निगडीत एक रंजक कहाणी फ्रान्सची आहे. फ्रान्सचे राजा लुई 14वे यांनी एक निर्णय घेतला. यामुळे केवळ राजघराण्यातील माणसंच नव्हे तर प्रशासनालाही त्रास झाला.
त्यांनी दरबाराचं कामकाज सत्ताकेंद्र पॅरिसहून व्हर्सायला नेण्याचा निर्णय घेतला. पॅरिसप्रमाणे व्हर्साय हे चमचमतं शहर नव्हतं.
पॅलेस ऑफ व्हर्साय रिसर्च सेंटरचे बेंजामिन रिंगट यांनी नॅशनल जिओग्राफिकशी बोलताना ही आठवण सांगितली.
ज्याठिकाणी लुई यांना मुख्य केंद्र उभारायचं होतं तो पडीक भाग होता. लुई यांच्या स्वप्नातील बगीचे आणि कारंज्यांसाठी पुरेसं पाणी तिथे नव्हतं.
या समस्येच्या निराकरणासाठी बेल्जियमहून अभियंत्यांना पाचारण करण्यात आलं. उदंचन (पंपिंग स्टेशन) आणि तलावांच्या माध्यमातून सीन नदीचं पाणी आणण्यात आलं.
त्यामुळे कारंज्यांना पाणी मिळालं. व्हर्सायच्या शीशमहल आणि बगीच्यात असलेलं कारंजे आज जगभरातील पर्यटकांच्या आकर्षण आहे. दरवर्षी सरासरी 50 लाख पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

फोटो स्रोत, Getty Images
कारंज्यांसाठी इटली जगभरात प्रसिद्ध आहे. 'फाऊंटन ऑफ द फोर रिव्हर' असेल किंवा ट्रिवी फाऊंटन यामध्ये नाणं टाकून दुवा मागण्याची परंपरा आहे.
राजा लुई 14वे यांनीच ही परंपरा सुरू केली. इथली कारंजे अतिशय सौंदर्यपूर्ण मानली जातात.
इतिहासकार फिरोज बख्त अहमद सांगतात, इटलीत काही जुनी कारंजे आहेत. पियात्सा नवोना यापैकीच एक आहे. फ्रान्स आणि जर्मनीतही अनेक कारंजे आहेत.
जगात अलीकडे तयार करण्यात आलेल्या कारंज्यांमध्ये दुबईतील कारंज्याचा समावेश होतो.
तुम्हाला यापैकी कोणतं कारंजे सर्वाधिक आवडतं? हे आम्हाला नक्की सांगा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











