तडाखेबाज फलंदाजीमुळे धावांचा पाऊस, क्रिकेट आहे की बेसबॉल?

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अयाज मेमन
    • Role, क्रिकेट समीक्षक

जगातील सर्वाधिक पैसा असलेली क्रिकेट स्पर्धा आयपीएलमध्ये यावर्षी फलंदाज धावांचा अक्षरशः पाऊस पाडत आहेत. सावधपणे किंवा सांभाळून फलंदाजी करण्याचा विचार ड्रेसिंग रूममध्येच सोडून फलंदाज क्रिकेटच्या मैदानांवर उतरत आहेत.

अत्यंत तडाखेबाज फलंदाजीचं प्रदर्शन हे फलंदाज करत आहेत. त्यामुळं प्रत्येक सामना जणू षटकार खेचण्याची स्पर्धा असावी अशा पद्धतीनं ते फलंदाजी करत आहेत. परिणामी गोलंदाजांची अवस्था वाईट असून ते हताश दिसत आहेत.

पण यामुळं नेमकं टी 20 क्रिकेट कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न क्रीडा क्षेत्राचे जाणकार आणि चाहत्यांच्याही मनात उपस्थित होत आहे.

आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामात फलंदाजींनी जो धुमाकूळ घातला आहे, त्यासाठी काही आकडे पाहूया..

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 44 सामन्यांचा विचार करता आयापर्यंत 1382 चौकार आणि 814 षटकारांची आतषबाजी झालेली पाहायला मिळाली आहे. पण गेल्यावर्षीच्या म्हणजे 2023 च्या आकड्यांचा विचार करता त्यावेळी एकूण स्पर्धेत 2174 चौकार आणि 1124 षटकार खेचले होते. पण यंदाचा अर्धा हंगाम अजूनही शिल्लक आहे.

त्यामुळं आयपीएलमध्ये गेल्या वर्षीच्या चौकार षटकारांचा हा विक्रम मोडणं जवळपास निश्चित आहे, ही आशा बाळगणं चुकीचं ठरणार नाही.

फलंदाजांच्या या तुफानी चौकार, षटकारांच्या खेळीनं त्यांच्या संघांचाही उत्साह चांगलाच वाढलेला आहे.

आयपीएलच्या सुरुवातीच्या काळामध्ये 150 ते 160 पर्यंतच्या धावा या भरपूर समजल्या जात होत्या. प्रतिस्पर्धी संघाला एवढ्या धावा करण्यापासून सहज रोखता येईल असं समजलं जायचं होतं. पण आजची स्थिती पाहता एवढ्या धावा करणाऱ्या संघांना 10 पैकी 8 वेळा पराभवाचा सामना करावा लागतो.

युवराज सिंग

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES

स्कोरींगमध्ये झालेला हा बदल समजून घेण्यासाठी 2007 मधील पहिल्या टी-20 सामना आठवा. त्यावेळी युवराज सिंगनं स्टुअर्ट ब्रॉडला ओव्हरच्या सहा चेंडूवर सहा षटकार खेचले होते.

त्या सामन्यात भारतानं 218 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यावेळच्या स्थितीत भारतानं केलेली ही कामगिरी म्हणजे मोठं यश समजलं जात होतं.

पण आज 16 वर्षांनंतर टी-20 सामन्यांमध्ये कोणत्याही संघानं 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणं ही अगदी सामान्य बाब ठरली आहे.

शनिवारपर्यंतचा विचार करता आयपीएलच्या या हंगामात झालेल्या 44 सामन्यांमद्ये संघांनी 26 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी 12 सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या धावांनी 400 चा टप्पा ओलांडला. तर 4 सामन्यांमध्ये एकूण धावांनी 500 चाही टप्पा ओलांडला.

हे एवढ्यावरच थांबत नाही.

आयपीएलच्या या हंगामात प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी रनरेट 10 चा राहिला आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा तसा पाहता फार बोलबाला नाही. पण या हंगामात हैदराबादच्या संघानं एका पाठोपाठ विक्रमी कामगिरी केली आहे.

200 धावा म्हणजे 'न्यू नॉर्मल'

दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये 125 धावा केल्या होत्या. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही संघानं केली नव्हती. त्याची सरासरी ओव्हरमागे 20.83 धावा एवढी होते. ती पाहून गोलंदाजांना चक्कर आल्याशिवार राहणार नाही.

सनरायझर्स हैदराबादनं या हंगामात तीन वेळा एका डावात 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरोधात तर त्यांनी 287 धावांचा डोंगर उभा केला होता. हा आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

ट्रॅव्हिस हेड

फोटो स्रोत, AFP

त्यामुळं या हंगामात 300 धावांचा टप्पाही ओलांडला जाऊ शकतो, याचे संकेत मिळतात.

टी 20 सामन्यात मुळातच अत्यंत रंजक आणि अटीतटीचे सामने होतात. त्यात फलंदाजांनी स्फोटक फलंदाजीच करावी, अशी आशा केली जाते.

एकही चेंडू वाया जाणं म्हणजे जवळपास गुन्हा असल्यासारखं समजलं जातं. प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा कराव्या हीच फलंदाजांची जबाबदारी असते.

त्यामुळं त्यांना पूर्णपणे मोकळेपणाने खेळण्याची सूटही दिली जाते. त्यात जोखीम असते, पण या हंगामात ज्याप्रकारे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत आहे, त्याला कशाचीही तोड नाही.

स्फोटक फलंदाजीचे कारण काय?

याचा पहिलं कारण म्हणजे पाटा खेळपट्टी.

पांढऱ्या चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या वन डे आणि टी20 सामन्यांसाठी संपूर्ण जगासाठीचा नियम म्हणजे खेळपट्टी गोलंदाजांचा नव्हे तर फलंदाजांचा विचार करून तयार केली जाते. त्याचं कारण म्हणजे प्रेक्षक या सामन्यांच जबरदस्त अॅक्शनचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.

त्यामुळं अशा सामन्यांमध्ये मोठे शॉट खेळणं ही अगदी सामान्य बाब बनली आहे. चाहते असो, समालोचक असो वा प्रायोजक सगळेच फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा करत असतात. त्यामुळं सामन्यातही त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असतात.

आशुतोष शर्मा

फोटो स्रोत, AFP

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इतर टी 20 सामन्यांच्या उलट आयपीएलमध्ये याचा गांभीर्यानं विचार केला जातो. त्यामुळं खेळपट्टी जास्तीत जास्त फलंदाजांसाठी अनुकुल असेल याची काळजी घेतली जाते.

पण गोलंदाजांना फक्त या पाटा खेळपट्ट्यांचंच आव्हान असतं असंही नाही.

आधीच्या तुलनेत आता फलंदाज अधिक फिट, शक्तीशाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणदे जोखीम पत्करणारे बनले आहेत. विशेषतः टी 20 च्या सुरुवातीच्या काळात करिअर सुरू करणाऱ्या फलंदाजांमध्ये हा ट्रेंड दिसतो.

त्यामुळं फलंदाजी करताना ते बिनधास्त धोका पत्करत मोठे शॉट खेळतात. सामना आणि बक्षीसं जिंकण्यासाठी तसंच प्रतिस्पर्ध्यांना पछाडण्यासाठी ते अत्यंत तडाखेबाज फलंदाजी करतात.

त्याशिवाय नियमांतही काही बदल करण्यात आल्यानं टी 20 सामने फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांसाठी अधिक कठिण बनले आहेत.

उदाहरण द्यायचं झाल्यास आयपीएलच्या सामन्यांत इम्पॅक्ट सबस्टिट्यूट व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यामुळं संघाला त्यांच्या आवश्यकतेनुसार खेळाडुला हवं तेव्हा मैदानावर उतरवण्याचा पर्याय मिळाला आहे.

हा अत्यंर रंजक असा बदल आहे. या पर्यायाचा वापर करून गोलंदाजालाही मैदानात उतरवता येतं. पण आतापर्यंत याचा फायदा फलंदाजीमध्ये कमाल करणाऱ्यांनाच मिळाल्याचं दिसून आलं आहे.

गोलंदाजी बनली अधिक कठीण

क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे अशी एक जुनी म्हण आहे. पण सध्या फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यातील हे असंतुलन टी 20 क्रिकेटसाठी योग्य आहे की नाही, याची मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे.

भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर या चर्चेत गोलंदाजांच्या बाजुनं आहेत हे विशेष

"हे सामने जर अशाप्रकारे एकतर्फी बनणार असतील तर लोकांचा या खेळातला रसच निघून जाईल," असं गावस्कर म्हणतात.

त्याशिवाय गावस्करांची सर्वात मोठी तक्रार म्हणजे, सीमारेषेचं अंतर पूर्वीच्या 75 मीटरहून घटवून आता 65 किंवा त्यापेक्षा कमी करण्याबाबत आहे.

जसप्रित बुमराह

फोटो स्रोत, AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, जसप्रित बुमराह

नाराजी व्यक्त करताना ते म्हणतात की, "गोलंदाज त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या गोलंदाजाला चूक करण्यासाठी भाग पाडतात. पण त्याच्या बदल्यात त्यांना चौकार किंवा षटकाराची शिक्षा मिळते. फलंदाजांच्या ज्या फटक्यामुळं ते बाद होऊ शकणार होते, त्याचं षटकारात रुपांतर होतं."

आजच्या काळातील फलंदाजांचं कौशल्य पाहता त्यांनी चुकीचा फटका खेळला तरी तो सीमारेषेपलिकडं जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. त्याबाबतही गावस्करांची तक्रार योग्य वाटते.

फलंदाजांचा बोलबाला असण्यासंदर्भातील आणखी एका पैलूकडं दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेननं लक्ष वेधलं आहे.

त्यांच्या दृष्टीनं या सर्व परिस्थितीमुळं गोलंदाजांसाठी आणि त्यांच्या कौशल्यासाठी एक वेगळं आव्हान उभं राहतं. "गोलंदाजांना चार ओव्हरमध्ये हिरो बनण्याची संधीही असते आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहनही दिलं जातं."

टी 20 सामन्यांत ज्या पद्धतीचं कौशल्य आणि मानसिकता गरजेची आहे, ती क्रिकेटमध्ये पूर्वीपासून असलेल्या मानसिकतेपेक्षा वेगळी आहे.

नव्या आणि बदललेल्या वातावरणात सर्व क्रिकेटपटुंनी काळानुसार बदल घडवून आणावेत आणि आक्रमकपणे खेळ करत नव्या पद्धतींचाही अवलंब करावा अशी अपेक्षा केली जात आहे.

पण, आपल्याला क्रिकेटला गोल्फ आणि बेसबॉलचं मिश्रण बनण्यापासून वाचवायचं असेल, तर टी 20, सामन्यांत गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्यातील संतुलन कायम राखावं लागणार आहे.