पंजाब किंग्जचा ऐतिहासिक विजय, बेअरस्टो-शशांकच्या फटकेबाजीमुळे सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग

फोटो स्रोत, ANI
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, वरिष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
जॉनी बेअरस्टो आणि शशांक सिंह यांच्या धमाकेदार खेळीनं आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला. सोबतच त्यांनी सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याची ऐतिहासिक कामगिरीही केली.
टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजविरुद्ध 259 धावांचं लक्ष्य गाठण्याचा विक्रम केला होता.
पण आता आयपीएलमध्ये पंजाब किंग्जनं केकेआर विरोधात 262 धावांचं लक्ष्य गाठून इतिहास रचला आहे.
या विजयामुळं पंजाब किंग्जनं प्ले ऑफसाठीच्या आशा टिकवून ठेवल्या आहेत.
या सामन्यांत तब्बल 42 षटकारांचा विक्रम झाला. यामध्ये पंजाब किंग्जने 24, तर केकेआरने 18 षटकार मारले.
बेअरस्टो-शशांकने उडवली गोलंदाजांची दाणादाण
बेअरस्टो आणि शशांक यांनी प्रचंड आक्रमक पद्धतीने फलंदाजी केली. त्यामुळं 262 धावांचं आव्हानही त्यांच्यासाठी अगदी सर्वसाधारण होतं, असं दिसून आलं.
बेअरस्टो दोन सामन्यांसाठी बाहेर होता. पण तो शुक्रवारी (26 एप्रिल) फलंदाजीसाठी आला तेव्हा मात्र त्यानं आक्रमकता दाखवली.
पहिल्या सहा सामन्यांत बेअरस्टोला केवळ 96 धावा करता आल्या होत्या.
या खराब कामगिरीमुळं त्याला दोन सामन्यांत बाहेर बसवलं होतं. त्यामुळं तो दुखावला गेला, पण संघात परतला तेव्हा त्यानं आक्रमक फलंदाजीची झलक दाखवून दिली.

फोटो स्रोत, ANI
आयपीएलमधलं दुसरं शतक झळकावण्यासाठी बेअरस्टोला केवळ 45 चेंडू लागले. यामध्ये त्याने आठ चौकार आणि नऊ षटकार मारले.
त्याने 222.22 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. सामन्यात त्यानं 48 चेंडूत 108 धावा केल्या त्यात आठ चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश होता.
शशांकची अविस्मरीय खेळी
शशांक सिंहनं या हंगामात केलेल्या कामगिरीनं त्यावर संघानं लावलेला डाव योग्य असल्याचं दाखवून दिलं.
पंजाब किंग्ज समोर 262 धावांचं लक्ष्य असताना बेअरस्टो आणि प्रभसिमरन यांनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर रौसोनं धावांचा वेग कायम ठेवल्यानंतर शशांकनं आक्रमक शैलीनं ईडन गार्डनवर उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्याच जोरावर आठ चेंडू शिल्लक असतानाच पंजाबला तो लक्ष्यापर्यंत घेऊन गेला.
शशांकनं ज्या पद्धतीनं गोलंदाजांना झोडपलं, त्यावरून केकेआरच्या गोलंदाजांना नेमकी कशी गोलंदाजी करायची हेही कळत नव्हतं.
हर्षित राणाला स्लोअर चेंडूचा चांगला वापर करण्यासाठी ओळखलं जातं. पण त्याच्या ओव्हरमध्ये शशांकने सलग दोन षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं.

फोटो स्रोत, ANI
यापूर्वी शशांक सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. पण संघ व्यवस्थापनानं त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला आणि तो या भूमिकेत पूर्णपणे यशस्वी ठरला.
दोन विकेट पडल्यानंतर त्याने सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली.
शशांकने बेअरस्टोबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. त्यातील त्याच्या 68 धावा पाहता त्यानं मैदानावर असताना गाजवलेलं वर्चस्व लक्षात येतं.
शशांक हा या फॉरमॅटचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो, कारण त्याच्याकडे सर्व प्रकारचे चेंडू मैदानाबाहेर टोलवण्याची क्षमता आहे.
बऱ्याचदा त्याचे फटके पाहून आश्चर्य वाटतं. अवघ्या 28 चेंडूंत दोन चौकार आणि आठ षटकारांसह 68 धावा करत त्यानं विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रभसिमरनने रचला विजयाचा पाया
यंदाच्या मोसमात पंजाब किंग्जचा प्रवास पाहता 262 धावांचं लक्ष्य त्यांच्यासाठी कठीण ठरणार असं मानलं जात होतं.
पण प्रभसिमरननं पहिल्या ओव्हरपासून वेगवान धावसंख्या करत हे लक्ष्य गाठण्यासाठी संघात आत्मविश्वास निर्माण केला.
प्रभासिमरन चांगली फटकेबाजी करतो, तरी त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी खेळी करता आली नाही. पण, या सामन्यात त्याच्या खेळण्याच्या शैलीवरून तो जणू सामना तडीस लावण्याच्या उद्देशानंच मैदानावर आल्याचं दिसत होतं.

फोटो स्रोत, ANI
प्रभसिमरननं 270 च्या स्ट्राइक रेटनं 20 चेंडूत 54 धावा केल्या. त्यात चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. पण तो धावबाद झाला.
अनुकुल रॉयच्या ओव्हरमध्ये पहिल्या पाच चेंडूंमध्ये बेअरस्टोने तीन चौकार आणि दोन षटकारांसह 24 धावा केल्या होत्या. त्यामुळं गरज नसतानाही एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला.
ही धाव टाळून प्रभासिमरनची विकेट वाचवता आली असती.
केकेआरसमोर कमकुवत गोलंदाजीची समस्या
केकेआरला या मोसमात जेतेपदाचे दावेदार समजले जात आहे. पण कमकुवत गोलंदाजीमुळं त्यांच्या या मोहिमेला खिंडार पडू शकतं.
गोलंदाजीची फळी मजबूत व्हावी म्हणून त्यांनी मिशेल स्टार्कला विकत घेतलं. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण मिशेल पूर्ण फॉर्ममध्ये दिसलाच नाही. त्यात आता तर तो जखमी आहे.
शुक्रवारी सुनील नारायण व्यतिरिक्त केकेआरचा दुसरा कोणताही गोलंदाज प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला नाही. स्टार्कच्या जागी संघात आलेल्या दुश्मंता चामिरानं अवघ्या तीन षटकांत 48 धावा दिल्या.

फोटो स्रोत, ANI
मागील सामन्यातील यशस्वी ठरलेला गोलंदाज हर्षित राणानं चार षटकात 61 धावा दिल्या.
केकेआरला यंदा विजेतेपद मिळवायचं असेल तर त्यांना गोलंदाजीमध्ये सुधारणा कराव्या लागतील, अन्यथा त्यांना ते शक्य होणार नाही, असं इरफान पठाणनं म्हटलं.
हंगामातील सर्वोत्तम भागिदारी ठरली निरर्थक
सुनील नारायण आणि फिल सॉल्ट यांनी मोसमातील सर्वोत्तम सलामी भागीदारी रचून केकेआरला 261 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण ती निरर्थक ठरली.
यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्ससाठी केएल राहुल आणि डीकॉक यांनी 134 धावांची भागिदारी केली होती.
सुनील नारायणनं या हंगामात त्याच्या शैलीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. पण, त्यात केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीरची भूमिका महत्त्वाची आहे.
गंभीरच्या आगमनानं माझा आत्मविश्वास वाढला आहे. गंभीरने मला डावाची सुरुवात करण्यास सांगितलं आणि चार-पाच सामन्यात चांगली सुरुवात झाली तर प्रयोग यशस्वी झाला असं समजायचं, असं नारायणनं म्हटलं.

फोटो स्रोत, ANI
चहरच्या चेंडूवर नारायण झेलबाद झाल्याने त्यांची भागीदारी तुटली. पण तोपर्यंत त्यानं आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.
त्याने 32 चेंडूत 221 च्या स्ट्राईक रेटनं नऊ चौकार आणि चार षटकारांसह 71 धावा केल्या.
सॉल्टचा विचार करता शेवटच्या क्षणी जेसन रॉयच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आणि तोही ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला.
त्याने 202 च्या स्ट्राइक रेटने 75 धावा केल्या. त्यात सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. साल्टचं हे या हंगामातलं तिसरं अर्धशतक ठरलं.
मधल्या षटकांमध्ये केकेआरची धावगती थोडी कमी झाली होती. पण कर्णधार श्रेयस अय्यरनं तीन षटकार खेचत पुन्हा वेग वाढवला. मात्र, त्याच्या या प्रयत्नानंतरही केकेआरला विजय साकारता आला नाही.











