मयांक यादव : पदार्पणातच ताशी 155 किमी वेगानं चेंडू टाकणारा गोलंदाज

फोटो स्रोत, ANI
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्यात 2024 च्या IPL मोसमातील सगळ्यात वेगवान चेंडू टाकला गेलाय. मयांक यादवने पदार्पणाच्या सामन्यात ताशी 155.8 किमी वेगाने टाकलेल्या या चेंडूची सध्या खूप चर्चा होतेय.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा संघ विजयाच्या दिशेनं आगेकूच करत होता. पण मयांक यादव गोलंदाजीला आला आणि त्यानं त्याच्या वेगाच्या जोरावर सामना पुन्हा लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या दिशेनं वळवला. त्यामुळं लखनऊच्या संघाला 21 धावांनी विजय मिळवता आला.
पंजाबच्या शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टो यांच्या सलामीच्या जोडीनं 102 धावांची भागिदारी करत 200 धावांचं आव्हान संघासाठी सोपं बनवलं होतं.
पण मयांक यादवनं गोलंदाजीत वेगाच्या जोरावर पंजाबच्या धावसंख्येवर ब्रेक लावला. त्याचा हा स्पेल दीर्घकाळ चाहत्यांच्या लक्षात राहील आणि त्यावर चर्चाही होत राहील.
भारतात मध्यमगती गोलंदाजांना वेगवान समजलं जायचं
एक काळ होता जेव्हा क्रिकेटमध्ये भारत आणि वेगवान गोलंदाज हे अगदी विरुद्ध समीकरण होतं. सत्तर ऐंशीच्या दशकात एका कपील देव यांचा अपवाद सोडला तर भारताकडून मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्यांनाच वेगवान गोलंदाज समजलं जायचं.
ऐंशी-नव्वदच्या दशकातही शेजारच्या पाकिस्तानात वसीम अक्रम, इरफान खान, शोएब अख्तर अशा तेजतर्रार गोलंदाजांचं क्रिकेटवर वर्चस्व होतं. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज सारख्या संघांमध्येही अनेक वेगवान गोलंदाज यायचे.
भारतीय संघात मात्र मध्यमगतीचे गोलंदाजच यायचे. 21व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात हे चित्र बदलायला लागलं. झहीर खान, इरफान पठाण, मुनाफ पटेल अशा गोलंदाजांनी भारताकडून वेगवान गोलंदाजी करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
2007 येता एस. श्रीशांत, आर. पी. सिंग अशा नावांची चर्चा होऊ लागली. भारतातही वेगवान गोलंदाजांसाठी वेगवेगळ्या अकॅडमी सुरु झाल्या.
वेगवेगळ्या राज्यांमधून वरुण अॅरोन, उमेश यादव, जसप्रीत बुमरा असे ताशी 140 किमीपेक्षा वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज तयार होऊ लागले.
सध्या भारतीय वेगवान गोलंदाजांचा जागतिक क्रिकेटमध्ये बोलबाला आहे. बुमरा, मोहम्मद शमीसारखे खेळाडू वेग आणि अचूक गोलंदाजीच्या बळावर भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये मयांक यादवने टाकलेल्या सुमारे 156 किलोमीटर प्रतितास वेगाच्या बॉलची सध्या चर्चा आहे.
मयांक यादव, उम्रान मलिकसारखे भारतीय गोलंदाज ताशी 150 किमीच्या वेगाने गोलंदाजी करत आहेत.
सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयांक यादव
मयांक यादव गोलंदाजीला आला तेव्हा सामन्यावर शिखर आणि बेयरस्टो यांनी वर्चस्व निर्माण केलेलं होतं. त्यामुळं पंजाब सामन्यात अगदी सहज विजय मिळवेल असं सर्वांना वाटू लागलं होतं.
पण मयांक गोलंदाजीला येताच त्याच्या वेगामुळं सगळंकाही बदलून गेलं. शिखर आणि बेयरस्टो च्या शतकी भागिदारीची चर्चा थांबली आणि मयांकच्या गोलंदाजीची चर्चा सुरू झाली.

फोटो स्रोत, ANI
त्याचवेळी मयांकनं ताशी 156.8 किमी वेगाचा चेंडू टाकला आणि या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज बनला. त्यापूर्वी आंद्रे बर्गर यांनं ताशी 153 किमी वेगाचा चेंडू टाकला होता.
मयांक एकापाठोपाठ एक 150 कि.मी. पेक्षा जास्त वेगानं चेंडू टाकत पंजाबच्या फलंदाजांवर दबाव वाढवत होता. जॉनी बेयरस्टोनं हा दबाव कमी करण्यासाठी पुल शॉट खेळला आणि गतीचा अंदाज लावता न आल्यानं तो झेलबाद झाला.
मयांक यादवनं प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांना बाद करत आयपीएल पदार्पण अविस्मरणीय बनवलंच, पण त्याचबरोबर त्यानं पंजाबच्या हातून सामनाही खेचून आणला.
राजधानी एक्सप्रेस म्हणून ओळख
"पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला रावळपिंडी एक्सप्रेस म्हटलं जातं कारण त्यांच्या शहरातून ती रेल्वे सुटते. मयांक दिल्लीचा आहे. तिथून राजधानी एक्सप्रेस सुटते, त्यामुळं तो राजधानी एक्सप्रेस आहे," असं संजय मांजरेकर म्हणाले.
मयांकच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यानं वेग कायम ठेवत सातत्यानं हार्ड लेंथवरच गोलंदाजी केली. तो जर यॉर्कर गोलंदाजी करू लागला, तर फलंदाजांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, असं मांजरेकर म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
हरभजन सिंग तर मयांकच्या गोलंदाजीनं एवढा प्रभावित झाला होता ती, मयांकला भारतीय संघात घ्यायला हवं असं त्यानं म्हटलं.
काहीतरी बनायचं असेल तर जिद्द मनात असावी लागते आणि त्या जिद्दीमुळंच इथपर्यंत पोहोचल्याचंही भज्जीनं म्हटलं.
मयांकला दिल्लीच्याच संघाकडून खेळण्याची इच्छा होती. त्यामुळं सुरुवातीला इतर काही संघाकडून त्याला खेळण्याचा प्रस्ताव मिळाला. पण त्यानं ते प्रस्ताव नाकारले होते.
पदार्पणातच प्लेयर ऑफ द मॅच
मयांक यादवनं पदार्पणाच्या सामन्यातच 27 धावा देत तीन बळी घेतले आणि पंजाबच्या तोंडून विजयाचा घास हिसकावत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कारही पटकावला.
मयांकच्या गोलंदाजीनं सरप्राइज केल्याचं शिखर धवननंही मान्य केलं. मयांकच्या 150 किमी वेगाच्या बाऊन्सरवर त्यानं मारलेला शॉट हवेत गेला होता. पण सुदैवानं कुणाला तो झेल घेता आला नाही.
मयांक 14 वर्षाचा असताना सोनेट क्लबच्या अकादमीमध्ये गेला होता, असं सांगितलं जातं.

फोटो स्रोत, ANI
या अकादमीत तारक सिन्हा यांच्या मार्गदर्शनात अनेक क्रिकेटपटू घडले आहेत. त्यात आता मयांकच्या नावाचाही समावेश झाला आहे.
मयांक 2022 पासून लखनऊच्या टीममध्ये आहे. त्यावेळी त्याला 20 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं होतं. पण जखमी असल्यानं तो खेळू शकला नाही. त्यामुळं आता त्याचं पदार्पण झालं आहे.
"मला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. सुरुवातीला विकेटवर चांगली गती मिळत होती त्यामुळं मला वेगानं गोलंदाजी करण्याचा सल्ला देण्यात आला होता," असं मयांक म्हणाला.
पहिली विकेट सर्वात महत्त्वाची असल्याचंही मयांक म्हणाला.
लिव्हिंगस्टोनला मागे ठेवणं महागात पडलं
पंजाबचा लिव्हिंगस्टोन फिल्डिंग करताना जखमी झाला होता. कदाचित त्यामुळं त्याला पाचव्या क्रमांकावर उतरवण्यात आलं.
त्यानं फलंदाजीला येताच फटकेबाजी करत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण उशिरा फलंदाजीला आल्यानं त्याला कामगिरी फत्ते करता आली नाही.
पंजाबनं त्याला प्रभसिमरन आणि जितेश शर्माच्या आधी मैदानात उतरवलं असतं तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
पंजाबच्या टीमला धवन आणि बेयरस्टोच्या शचकी भागिदारीचा फायदा उचलण्यात यश आलं नसलं तरी, हा संघ ज्या पद्धतीनं खेळला त्यावरून या हंगामात संघाची कामगिरी चांगली होणार हे स्पष्ट आहे.
क्रुणालची खेळी ठरली महत्त्वाची
क्रुणालनं लखनऊसाठी 22 चेंडूत 43 धावा केल्या. त्या संघाच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या. पूरन बाद झाल्यानंतर 170-180 धावा होतील असं वाटत होतं. पण क्रुणालनं जबरदस्त फलंदाजी करत वेगानं धावसंख्या पुढं नेली.
त्यामुळं लखनऊला घरच्या मैदानावर त्यांची सर्वाधिक 199 धावसंख्या करण्यात यश आलं. त्यात सलामीवीर क्विंटन डिकॉकच्या 54 धावांच्या खेळीचाही मोलाचा वाटा होता.

फोटो स्रोत, ANI
जखमी असल्यानं के.एल. राहुल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला. त्याला फार धावा करता आल्या नाही. पण त्याच्यावरच संघाची मदार असणार आहे.
निकोलस पूरनची फटकेबाजी
निकोलस पूरननं मैदानावर येताच फटकेबाजी केली. तीन विकेट गेल्याचाही त्याच्यावर दबाव दिसला नाही. त्यानं अगदी बिनधास्त सगळे शॉट खेळले.
त्यानं आणखी 2-3 ओव्हर फलंदाजी केली असती तर त्यांचा स्कोर 220-223 च्या पुढं जाऊ शकला अशता. पण रबाडाच्या चेंडूवर तो बाद झाला. पूरननं 200 च्या स्ट्राइक रेटनं 21 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 3 चौकार खेचत 42 धावा केल्या.
पूरन राहुल या सामन्यात कर्णधार होता त्यामुळंही त्याची फलंदाजी महत्त्वाची ठरली.











