मोहम्मद शमी : जीव द्यायला निघालेला शमी असा बनला सर्वांत यशस्वी भारतीय गोलंदाज

मोहम्मद शमी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मोहम्मद शमी
    • Author, ओंकार डंके
    • Role, बीबीसी मराठीसाठी

‘ मी हे पुन्हा सांगतो, तुमचा रिदम योग्य हवा. तुम्ही ज्या टप्प्यावर बॉलिंग करता तो टप्पा योग्य पाहिजे. विशेषत: ‘व्हाईट बॉल’तुम्ही अचूक टप्प्यावर टाकणे आवश्यक आहे. तुम्हाला पिचकडून मदत मिळते. ती मदत सर्वात महत्त्वाची असते. हे काही रॉकेट सायन्स नाही. हा फक्त रिदमचा मुद्दा आहे.’

आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मध्ये फक्त 6 सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं या स्पर्धेतील आपल्या यशाचं रहस्य या शब्दात उलगडून सांगितलं.

शमीनं मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये त्याच्या आजवरच्या वन-डे कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यानं 57 धावांमध्ये 7 विकेट्स घेतल्या.

मी मला योग्यसंधी मिळण्याची वाट पाहातो आणि मग त्यानंतर मला दिलेली जबाबदारी पार पाडतो, असं मॅचनंतर बोलताना शमीनं म्हटलंय.

उत्तर प्रदेशच्या छोट्या गावात जन्मलेल्या भारताच्या या फास्ट बॉलरनं आजवरच्या प्रवासात बरेच चढ-उतार पाहिलेत. त्यामुळे त्याला रिदमचं महत्त्व चांगलंच माहिती आहे.

गोलंदाजाचा मुलगा गोलंदाज!

नेत्यांचा मुलगा नेता. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर. उद्योगपतीचा मुलगा उद्योगपती झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. मोहम्मद शमीलाही वेगवान गोलंदाजीचा वारसा त्याच्या वडिलांकडून मिळालाय.

उत्तर प्रदेशातील सहसपूर आज मोहम्मद शमीचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यापूर्वी साखर कारखान्याचं गाव अशी सहसपूरची ओळख होती.

सहसपूरच्या क्रिकेट विश्वात तौसिफ अहमद या वेगवान गोलंदाजाचं मोठं नाव होतं. तो वरिष्ठ पातळीवर क्रिकेट खेळेल असं सर्वांना वाटत असे. तौसिफला ते जमलं नाही. संसाराच्या रहाटगाड्यात अडकल्यानं त्यांचं क्रिकेट सुटलं.

मोहम्मद शमी हा तौसिफ अहमद यांचा मुलगा. त्यांनी आपल्या मुलामधील स्पार्क लगेच ओळखला. त्यांच्या गोलंदाजीला पैलू पाडण्यासाठी वयाच्या 16 व्या वर्षी शमीला कोलकातामध्ये पाठवलं.

एक विकेट, एक प्लेट बिर्याणी

कोलकाता जवळील डलहौसी क्लबमधून मोहम्मद शमीनं सुरूवात केली. बंगाल क्रिकेटचे तत्कालीन अधिकारी देवब्रत दास यांना शमीच्या गोलंदाजांनी प्रभावित केलं. त्यांनी शमीशी वार्षिक 75 हजार रुपयांचा करार करत स्वत:च्या क्लबमध्ये घेतलं.

दास फक्त शमीच्या क्रिकेट क्लबचे मालक नव्हते. ते शमीचे कोलकातामधील पालकही होते. शमी त्यांच्याच घरी राहत असे.

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान विकेट हवी असेल तर ते ‘एक विकेट, एक प्लेट बिर्याणी’ असं ओरडत असतं. शमीनं त्यांना कधीही निराश केलं नाही.

दास यांच्या सल्ल्यानंतर शमी कोलकातामधील प्रतिष्ठित मोहन बागान क्लबचा सदस्य झाला. त्या क्लबमध्ये त्यानं सौरव गांगुली त्याच्या गोलंदाजीनं प्रभावित झाला.

गांगुलीच्या सूचनेनंतर शमीची बंगालच्या रणजी संघात निवड झाली. त्यानंतर तो राष्ट्रीय संघातही दाखल झाला.

पदार्पण ते पहिला वर्ल्ड कप

मोहम्मद शमीनं जानेवारी 2013 साली पाकिस्तान विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये कोलकातामध्ये तो पहिला कसोटी सामना खेळला.

सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीमधील ती शेवटची मालिका होती. शमीनं त्या मालिकेत यशस्वी पदार्पण केलं. पहिल्याच कसोटी सामन्यात 9 विकेट्स घेतल्या.

शमी 2015 साली पहिली वन-डे विश्वचषक स्पर्धा खेळला. त्यानं त्या स्पर्धेत 17 विकेट्स घेतल्या. भारताच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याचं महत्त्वाचं योगदान होतं.

आत्महत्येचा विचार

2015 साली झालेल्य विश्वचषक स्पर्धेनंतर शमीच्या कारकिर्दीला वेगळं वळण लागलं. तो तब्बल 18 महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता.

दुखापतीचा सामना करणाऱ्या शमीच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठं वादळ आलं.

शमीची पत्नी हसी जहांनं त्याच्यावर छळवणूक केल्याचा आरोप केला. या प्रकरणात स्थानिक कोर्टानं त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढलं होतं. वैयक्तिक आयुष्यात अडचणीत आलेला शमी एका अपघातामध्ये जखमी झाला.

मोहम्मद शमी

फोटो स्रोत, ANI

‘या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला होता,’ असा खुलासा मोहम्मद शमीनं त्याचा तेव्हाचा सहकारी आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्माशी एका इन्स्टाग्राम चॅटवर बोलताना केला होता.

‘माझ्या आयुष्यातील खासगी घटनांना मोठ्या प्रमाणात मीडियामध्ये प्रसिद्धी मिळत होती. त्या काळात कुटुंबानं मला साथ दिली नसती तर मी आत्महत्या केली असती,’ असा अनुभव शमीनं सांगितला.

मोहम्मद शमी 2.0

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आयुष्यातील सर्वात खराब कालखंडातून जात असलेल्या शमीला क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्याच्या घरच्यांनी दिला होता. शमीनं हा सल्ला मानला.

‘यो-यो टेस्ट’ मध्ये नापास झालेल्या शमीनं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं. स्वत:चं वजन कमी केलं. इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत शमीचं बदललेलं सकारात्मक रूप सर्वांनी पाहिलं.

शमीला मागील विश्वचषक स्पर्धेत फक्त 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्या चार सामन्यात त्यानं 14 विकेट्स घेतल्या. यामध्ये अफगाणिस्ताविरुद्धच्या हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.

वन-डे विश्वचषक स्पर्धेत चेतन शर्मानंतर (1987) हॅट्ट्रिक घेणारा शमी हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे.

वन-डे क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही शमी तितकाच प्रभावी गोलंदाज ठरतोय. इशांत शर्मा-मोहम्मद शमी- जसप्रीत बुमरा या फास्ट बॉलर्सनी कसोटी क्रिकेटमधील एक काळ गाजवला. बुमरा-शमी-सिराज हे त्रिकूट सध्याचा काळ गाजवतंय.

कसोटी क्रिकेटमध्ये नवी बॉलनं विकेट घेणं असो किंवा जमलेली जोडी फोडणं भारतीय कर्णधाराला शमीची आठवण होते. शमीनंही कर्णधाराचा हा विश्वास वारंवार सार्थ ठरवलाय.

शमीचा वर्ल्ड कप!

मोहम्मद शमी विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दोन एकदिवसीय सामने खेळला. त्यामधील मोहालीमधील सामन्यात त्यानं 5 विकेट्स घेतल्या होत्या.

या प्रभावी कामगिरीनंतरही शमी विश्वचषक स्पर्धेतील पहिली चॉईस नव्हता. टीम इंडियाच्या चौथ्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाला आणि शमीला संधी मिळाली.

शमीनं या वर्ल्डकपमधील त्याच्या पहिल्याच बॉलवर न्यूझीलंडच्या विल यंगची दांडी उडवली आणि हा आपला वर्ल्ड कप असल्याचं जाहीर केलं.

धरमशाला, लखनौ आणि मुंबईतील सामन्यात तो खेळलाय. धरमशालातील सामन्यात न्यूझीलंडची मोठ्या धावसंख्येकडं वाटचाल सुरू होती. त्यांच्या या वाटचालीला शमीनं ब्रेक लावला.

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

लखनौमध्ये 229 धावांचं संरक्षण करताना शमीकडून झटपट विकेट्सची संघाला गरज होती. त्यानं ती गरज पूर्ण केली.

मुंबईत बुमरा आणि सिराजनं सुरूवातीलाच श्रीलंकेच्या 4 विकेट्स घेतल्या होत्या. कोंडीत सापडलेल्या श्रीलंकेला शमीनं श्वास घेण्याची संधीच दिली नाही.

न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका या प्रत्येक सामन्यात हा माझा वर्ल्ड कप आहे, हे शमी दाखवतोय. त्यामुळेच तो वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज बनलाय.

क्रिकेटच नाही तर आयुष्यातील कोणत्याही टप्प्यात रिदम सापडणं महत्त्वाचं आहे. तो सापडला की कितीही अवघड परिस्थितीमधून सावरता येतं. यशस्वी होता येतं अगदी अविश्वसनीय वाटेल अशी कामगिरी करता येते, हेच मोहम्मद शमीनं या वर्ल्ड कपमध्ये दाखवून दिलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)