विराट कोहली शतकी खेळीनंतरही होतोय ट्रोल, जाणून घ्या कारण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, संजय किशोर
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर शनिवारी (6 एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना एकाच सामन्यात एका पाठोपाठ दोन 'वादळं' अनुभवायला मिळाली.
विराट कोहलीनं 67 चेंडूंवर शतक ठोकलं, तर जोस बटलरनं 58 चेंडूंमध्येच शतकी खेळी केली. त्याचाच परिणाम दोन्ही संघांच्या विजय आणि पराभवाच्या निकालावर झाला. दोघंही नाबाद राहिले, पण बटलरनं विजयी षटकार खेचत संघासाठी कामगिरी पूर्णत्वाला नेली.
राजस्थान रॉयल्सच्या संघाचा 5 चेंडू शिल्लक असताना विजय झाला. त्यामुळं संजू सॅमसनच्या नेतृत्वातील हा संघ आतापर्यंत चार सामन्यांत अजेय राहिल्यानं पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर रॉयल चॅलेंजर्सनं पराभवाची हॅटट्रिक केली आहे.
पण दुसरीकडं जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा करिश्मा आधीसारखा राहिला नाही का? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या काही काळापासून कोहलीच्या स्ट्राइक रेटबाबत चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार म्हणून रोहितच्या नावाची घोषणा केली आहे. पण सध्या विराट कोहलीच्या नावावरून मात्र प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.
विराट कोहली आणि केएल राहुल टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही? हे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांतील त्यांच्या कामगिरीवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असू शकतं.
कोहलीचे आठवे शतक
राजस्थान रॉयल्सच्या विरोधात विराट कोहलीनं शतकी खेळी केली. कोहली आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ही त्याची आठवी शतकी खेळी होती.

फोटो स्रोत, ANI
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं कोहलीच्याच नावावर आहेत. तसंच, त्यानं 7500 धावांचा आकडाही ओलांडला आहे.
राजस्थान रॉयल्सच्या विरोधात त्यानं पहिलंच शतक केलं.
कोहलीचं सर्वात संथ शतक
कोहलीनं नांद्रे बर्गरच्या चेंडूवर एक धाव घेत 67 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्यानं 39 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि नंतर पुढच्या 50 धावा अवघ्या 28 चेंडूंमध्ये केल्या. पण कोहलीचं हे शतक आयपीएलमधलं सर्वात संथ शतक ठरलं आहे.
मनीष पांडेनं 2009 मध्ये 67 चेंडूंवर आयपीएलमधील सर्वात संथ शतक केलं होतं. आता विराटचं नावही या नकोशा विक्रमाबरोबर जोडलं गेलं आहे.
19 व्या ओव्हरमध्ये कोहली 98 धावांवर होता. त्या ओव्हरमध्ये बंगळुरूच्या फलंदाजांनी एकही चौकार, षटकार लगावला नाही. त्यांना ओव्हरमध्ये फक्त 4 धावा करता आल्या.
सोशल मीडियावर ट्रोल झाला कोहली
सोशल मीडियावर युजर्सनं संथ खेळीसाठी कोहलीवर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. तसंच कोहलीला 'स्वार्थी' म्हणत ट्रोलही केलं जात आहे.
कोहली अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्यानं 72 चेंडूंमध्ये 113 धावा केल्या. या खेळीमध्ये कोहलीनं 12 चौकार आणि तीन षटकार खेचले.

फोटो स्रोत, ANI
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं 3 विकेट गमावत 183 धावा केल्या. कोहली मैदानावर असतानाही त्यांना 200 चा टप्पा गाठता आला नाही. फाफ डुप्लेसीनं 33 चेंडूंमध्ये 44 धावा केल्या.
अश्विन-चहलसमोर शरणागती
राजस्थान रॉयल्ससाठी रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहलनं मधल्या ओव्हरमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली.
अश्विननं चार ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या. तर चहलनं 34 धावा देत दोन विकेट घेतल्या. फिरकीपटूंचा सामना करताना कोहलीला संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालं.
"खरं म्हणजे बॉल योग्यप्रकारे बॅटवर येत नव्हता. मी चहलच्या गोलंदाजीवर काही शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण मला फक्त स्लॉग करता आलं. बॉल बॅटच्या खाली राहत होता. अश्विनच्या कॅरम बॉलला मिड विकेटवरून मारणंही कठिण जात होतं. फलंदाजी करण्यात खूप संघर्ष करावा लागला," असं कोहली त्याच्या फलंदाजीनंतर म्हणाला.
कोहली आणि डुप्लसिसनं चांगली सुरुवात केली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये 53 धावा केल्या. पण लवकरच त्यांना पिच संथ असून चेंडू खाली राहत असल्याचा अंदाज आला.
त्यानंतर त्यांनी सावध फलंदाजीचा निर्णय घेतला. कोहली आणि कर्णधार डुप्लसिसनं पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागिदारीही केली.

फोटो स्रोत, ANI
ब्रेकदरम्यान कोहलीनं स्वतःची बाजू मांडताना, या पिचवर फलंदाजी करणं तेवढं सोपं नव्हतं असं म्हटलं.
"खेळपट्टी पाहून त्यानुसार फलंदाजी करावी लागते. मी फार आक्रमक होऊ शकत नव्हतो. विरोधी गोलंदाजांना अंदाज येईल असं खेळून चालत नाही. मी चेंडूला चांगलं हिट करत होतो. कधीही आक्रमक होऊन फटकेबाजी करू शकतो हे मला महिती होतं. पण मला गोलंदाजांना संभ्रमात ठेवायचं होतं," असं तो म्हणाला.
"मी फटकेबाजी करावी म्हणजे माझी विकेट लवकर मिळेल असं त्यांना वाटत होतं. पण मला वाटलं, मी सेट आहे, आणखी सहा ओव्हरपेक्षा जास्त फलंदाजी करू शकतो. त्यामुळं मोठी धावसंख्या उभारण्याची चांगली संधी असेल," असं तो म्हणाला.
यावर्षी आतापर्यंत कोहलीनं स्पर्धेत पाच सामन्यांत 146 च्या स्ट्राइक रेटनं 316 धावा केल्या आहेत. तसंच सध्या ऑरेंज कॅपही त्याच्या ताब्यात आहे. वेगवान गोलंदाजांच्या विरोधात त्याचा स्ट्राइक रेट सुमारे 172 चा आहे. तर फिरकीपटूंच्या विरोधात 139 चा स्ट्राइक रेट आहे.
बटलरचे शतक महागात पडले
राजस्थान रॉयल्सचा संघ 184 धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरताच जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसननं विराट कोहलीनं उभं केलेलं आव्हान त्यांच्या फलंदाजीनं गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढलं.
खरं म्हणजे सलामीवीर फलंदाज यशस्वी जायस्वाल शून्य धावांवर असतानाच बाद झाला. त्याला यंदा फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.
पण आतापर्यंत अपयशी ठरलेल्या जोस बटलरनं या सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. बटलरनं गेल्या तीन सामन्यांत 11, 11 आणि 13 धावांची खेळी केली होती. कोहलीनं बटलरचा एक झेल सोडत सुरुवातीलाच त्याला जीवदानही दिलं.
त्यानंतर मात्र बटलर आणि सॅमसन यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांची धुलाई केली.
ज्या पिचवर कोहलीसह बेंगळुरूचे फलंदाज संघर्ष करत होते, त्याच पिचवर बटलर-सॅमसन अगदी सहज फटकेबाजी करत होते. बटलरनं 30 आणि सॅमसननं 33 चेंडूंमध्ये अर्धशतक केलं.
दोन्ही संघांच्या गोलंदाजीमध्येही बराच फरक दिसून येतो. पण बेंगळुरूनं सर्वधिक निराशा गोलंदाजीनं केली. ओव्हर थ्रो पासून रन आऊटच्या संधी सोडण्यापर्यंत बेंगळुरूनं जणू राजस्थानचं काम आणखी सोपं केलं.

फोटो स्रोत, ANI
सॅमसन-बटलर यांच्यात अवघ्या 86 चेडूंमध्ये 148 धावांची भागिदारी झाली. संजू सॅमसन 42 चेंडूंमध्ये 69 धावा करून बाद झाला. रियान परागनं 4 आणि ध्रुव जुरैलनं दोन धावा केल्या.
बटलरनं 58 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं नाबाद 100 धावा केल्या. हेटमायरनं नाबाद 10 धावा केल्या. शतकी खेळी करणारा जोस बटलर सामनावीर ठरला.
सामन्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लसिसनं पराभवाचं खापर टॉसवर फोडलं.
या हंगामात रॉयल्सची सुरुवात चारपैकी चार विजयानं चांगली झाली आहे. पण पुढे काय होणार याचा विश्वास नसल्याचं त्यांनाही माहिती आहे. तर आरसीबीचा विचार करता टीम मॅनेजमेंटला अनेक गोष्टींवर काम करावं लागणार आहे.











