शिवम दुबे हा हार्दिक पांड्याला पर्याय ठरत आहे का?

शिवम दुबे

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, शिवम दुबे
    • Author, संजय किशोर
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
    • Reporting from, बीबीसी हिंदीसाठी

भारताचा 30 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेनं अफगाणिस्तानच्या विरोधातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतकी खेळी करत लक्ष वेधून घेतलं आहे.

मुंबईत जन्मलेल्या शिवम दुबेच्या पॉवर हिटिंगचं प्रत्येकजण कौतुक करत आहे.

सोशल मीडियावर एका चाहत्यानं लिहिलं की, "हार्दिक पांड्या तू लवकर परत यायला हवं, नाहीतर दुबे तुला इतिहासजमा करून टाकेल."

तसं पाहता एका किंवा दोन मालिकांमधून कोणत्याही खेळाडुचं करिअर यशाच्या शिखरावर जात नाही किंवा उद्ध्वस्तही होत नसतं.

पण शिवम दुबेच्या जबरदस्त फॉर्मचा संबंध सध्या हार्दिक पांड्याशी लावला जात आहे.

शिवम दुबेची स्फोटक खेळी

रविवारी (15 जानेवारी) इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर सहा विकेटनं जबरदस्त विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं विजयी आघाडी घेतली.

या विजयात शिवम दुबेनं महत्त्वाची भूमिका निभावली. दुबेनं 32 चेंडूंवर 63 धावांची खेळी केली. त्यात पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. यशस्वी जयस्वालबरोबर त्यानं 92 धावांची भागीदारी केली. तसंच एक विकेटही घेतली.

यापूर्वी मोहालीतील पहिल्या सामन्यात त्यानं 150 च्या स्ट्राइक रेटनं 40 चेंडूंमध्ये 60 धावांची खेळी केली होती. त्यात पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दोन्ही सामन्यांत शिवम नॉट आऊट राहिला. मोहालीमध्येही त्यानं दोन विकेट घेतल्या होत्या.

टी 20 सामन्यात किमान एक विकेट आणि अर्धशतक करणारा दुबे सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला. पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ही कामगिरी करणारा तो केवळ तिसरा भारतीय आहे. युवराजनं तीन तर विराटनं दोन वेळा ही कामगिरी केली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार

अफगाणिस्तानवर दुसऱ्या विजयानंतर दुबेनं म्हटलं की, टीम मॅनेजमेंट आणि विशेषतः कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कामगिरीने आनंदी आहेत.

"कॅप्टन माझ्या कामगिरीने खरंच आनंदी आहे. मी चांगला खेळलो असं त्यानं सांगितलं. आम्ही दोघं (शिवम आणि जायस्वाल) स्ट्रोक खेळाडू आहोत. आम्हाला आमचा खेळ कसा आहे माहिती आहे. माझी भूमिका स्पिनर्सचा सामना करण्याची होती. आम्हाला आक्रमक खेळ करून लवकर सामना संपवायचा होता. मनात काही लक्ष्य नव्हतं. उलट आम्हाला आणखी लवकर खेळ संपवायला हवा होता."

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "दुबेची शरीरयष्टी सडपातळ आहे. तो अत्यंत शक्तिशाली असून फिरकीपटूंचा सामना करू शकतो. तीच त्याची भूमिका असून त्यानं आमच्यासाठी दोन वेळा महत्त्वाच्या खेळी केल्या."

शिवम दुबे

फोटो स्रोत, GETTY IMAGES

आयपीएलमुळं चमकला

शिवम दुबे 2022 मध्ये चेन्नईच्या संघातून आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्याच्या करिअरचा आलेख चढता राहिला. त्यावर्षी त्यानं 11 सामन्यांत 289 धावा केल्या.

गेल्या आयपीएलमध्ये तर त्याची कामगिरी आणखी जोरदार होती. त्यानं 16 सामन्यांत 418 धावा करत चेन्नईला विक्रमी पाचव्या वेळी चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका निभावली होती.

दुसऱ्या टी20 सामन्यानंतर दुबेनं ब्रॉडकास्टर जियो सिनेमाबरोबरच्या चर्चेत सांगितलं त्यानुसार, कर्णधार एमएस धोनी आणि कोच स्टिफन फ्लेमिंगसह सुपर किंग्जच्या सिनिअर्सनी त्याचा आत्मविश्वास वाढवण्यात मदत केली.

शिवम दुबे

फोटो स्रोत, GETTY IMAGES

"याचं श्रेय सीएसके टीम आणि माहीभाईला जातं. माझ्याकडं कौशल्य आधीपासून होतं. सीएसकेला खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणं चांगलं जमतं. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला. मी आयपीएलमध्ये धावा करू शकतो, असं त्यांनी सांगितलं. माझ्यावर विश्वास ठेवला. हसी आणि फ्लेमिंग सारख्या अनुभवी क्रिकेटपटुंनी विश्वास दाखवला. मला हवं ते मी करू शकतो," असं तो म्हणाला.

"मी जेव्हा सीएसके बरोबर खेळू लागलो तेव्हा त्यांनी (एमएस धोनी) मला म्हटलं की, माझ्यात चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळं मी अधिक स्मार्टपणे खेळावं असं त्यांनी सांगितलं. मी कमकुवत बाजूवर लक्ष द्यायला सुरुवात केली," असंही तो म्हणाला.

आशियाई खेळांनंतर दुबेची ऑस्ट्रेलिया विरोधातील टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली, पण त्याला संधी मिळू शकली नव्हती.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेत त्याचा समावेश झाला नाही. टी-20 वर्ल्ड कपमधील हार्दिक पांड्याचा बॅकअप म्हणूनही दुबेकडं पाहिलं जातं. पांड्या सध्या जखमी आहे.

'स्वतःवर काम करतोय'

टी20 क्रिकेटसाठी मानसिकदृष्ट्या मजबूत असणं अत्यंत गरजेचं असल्याचं दुबे मानतो. गोलंदाजीत सुधारणेसाठी त्यानं बरेच प्रयत्न केले आहेत.

"अनेक गोष्टींवर मी काम केलंय. कौशल्याबरोबरच तुम्ही टी-20 साठी स्वतःला मानसिकदृष्ट्या कसं तयार करता हेही अत्यंत महत्त्वाचं असतं. दबावात स्वतःला कसं सांभाळायचं आणि कोणत्या गोलंदाजाविरोधात आक्रमक भूमिका घ्यायची. प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा नसतो. मी गोलंदाजीवरही काम करत आहे," असं तो म्हणाला.

सातत्यानं चांगली कामगिरी करत दुबेनं यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप साठी दावा ठोकला आहे.

भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राच्या मते, शिवम दुबे, रिंकू सिंह आणि यशस्वी जैस्वाल या तीन डावखुऱ्या फलंदाजांनी 2024 टी 20 वर्ल्डकपसाठी दावा सादर केला आहे. पण यापैकी एकालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकेल.

शिवम दुबे

फोटो स्रोत, GETTY IMAGES

"दुबेची स्ट्रायकिंग पॉवरही चांगला आहे. यशस्वीचं कौशल्य आणि इंटेंट उल्लेखनीय आहे. त्यानंतर आहे रिंकू. हे तिघेही डावखुरे आहेत. ते टी 20 वर्ल्ड कपसाठी दावेदार आहेत. पण दुर्दैवानं त्यांच्यापैकी एकालाच प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल," असं चोप्रा यांनी सोशल साइट एक्सवर लिहिलं.

शिवम दुबे मूळ उत्तर प्रदेशच्या भदोहीचा आहे. पण अनेक वर्षांपूर्वी त्याचं कुटुंब मुंबईत स्थलांतरीत झालं होतं.

त्याचे वडील भिवंडीमध्ये जीन्सच्या व्यवसायात आहेत. जुलै 2021 मध्ये शिवम दुबेनं गर्लफ्रेंड अंजुम खानबरोबर लग्न केलं होतं. त्यावेळीही तो सोशल मीडियावर चर्चेत होता.

आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला जबरदस्त फॉर्ममुळं तो चर्चेत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)