'बॅड-बॉय'ची इमेज असलेला अष्टपैलू क्रिकेटर शाकिब बनला सत्ताधारी पक्षाचा खासदार

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशचा माजी कर्णधार आणि जागितक क्रिकेटमधील अष्टपैलू क्रिकेटर शाकिब अल हसननं बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे.
शाकिबनं सत्ताधारी आवामी लीग पक्षातर्फे मागुरा-1 मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत काझी रिझाऊल हुसेन यांना जवळपास दीड लाख मतांनी पराभूत करत शाकिब खासदार बनला आहे.
बांगलादेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाकिबनं काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आता विजय मिळाल्यानं त्याला क्रिकेट आणि राजकारण ही तारेवरची कसरत त्याला करावी लागणार आहे.
बांगलादेशच्या संघाला जागतिक क्रिकेटमध्ये स्थान मिळवून देण्यात शाकिबचा मोठा वाटा राहिला आहे. पण त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत त्याची 'बॅड बॉय'ची इमेजही समोर आल्याची पााहायला मिळाली.
क्रिकेटच्या मैदानावरील काही कृत्यांमुळे शाकिबवर अनेकदा टीका झालीच आहे. पण मैदानाबाहेरील त्याच्या वर्तनाबाबतही बरंच बोललं जातं.
अगदी खासदार बनल्यानंतर काही तासांतच चाहत्याला थापड मारण्याचा त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा त्याच्या या 'बॅड बॉय' इमेजची चर्चा सुरू झाली.
19 व्या वर्षी पदार्पण
बांगलादेशच्या मागुरामध्येच जन्म झालेल्या शाकिबनं 2006 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. फलंदाज अष्टपैलू म्हणून त्यानं देशाच्या संघामध्ये स्थान मिळवलं होतं.
त्यानंतर पुढच्याच वर्षी वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी करत शाकिबनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सामन्यातील पराभवामुळं भारतावर नामुष्की ओढवली होती.
त्यानंतर अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून शाकिबनं केलेली कामगिरी ही बांगलादेश क्रिकेटला बरंच काही देऊन गेली. शाकिबनं दीर्घकाळ बांगलादेश क्रिकेट संघाचं नेतृत्वही केलं. 2023 च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्येही तो बांगलादेशचा कर्णधार होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता शाकिबनं 501 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 14,406 धावा केल्या आहेत. तर 690 आंतरराष्ट्रीय विकेटही त्याच्या नावावर आहेत.

फोटो स्रोत, AFP
शाकिबनं बांगलादेशकडून 66 कसोटी सामने खेळताना 4454 धावा केल्या असून 233 विकेटही मिळवल्या आहेत. या दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 39.07 तर गोलंदाजीत 31.06 सरासरी राहिली आहे.
वन डे क्रिकेटचा विचार करता त्यानं 247 सामन्यांमध्ये 7570 धावा आणि 317 विकेटसह अष्टपैलू कामगिरी केली आहे. तर टी ट्वेंटीमध्ये 117 सामन्यांत 2382 धावा आणि 140 विकेट घेतल्या आहेत.
पण काही कृत्यांनी शाकिबची बॅड बॉयची प्रतिमा बनत गेली. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं टाइम आऊटद्वारे मॅथ्यूजला बाद केल्यानं त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती.
मॅथ्यूजला बाद केल्याचा वाद
भारतात झालेल्या 2023 च्या वर्ल्ड कपच्या सामन्यात बांगलादेश विरोधात फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची चौथी विकेट गेल्यानंतर श्रीलंकेचा पुढचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज मैदानावर येत होता.
मॅथ्यूज मैदानावर आल्यानंतर पहिल्या चेंडूचा सामना करण्यापूर्वी त्याच्या हेल्मेटच्या स्ट्रेपमध्ये काहीतरी अडचण असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं हेल्मेट बदलण्यासाठी इशारा केला.
या सर्वामध्ये काही वेळ गेला. त्यामुळं बांगलादेशचा कर्णधार असलेल्या शाकिब अल हसननं टाइम आऊटच्या नियमांतर्गत मॅथ्यूजला बाद करण्यासाठी अपील केलं.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर मॅथ्यूजची अंपायर तसंच शाकिबशीही काहीतरी चर्चा झाली. पण शाकिब त्याच्या निर्णयावर ठाम होता. परिणामी मॅथ्यूजला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
या सर्वानंतर खेळभावनेच्या मुद्द्यावरून शाकिब अल हसनवर बरीच टीका झाली. पण संघाला जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असल्याची प्रतिक्रिया शाकिबनं दिली.
मला खेळ भावनेबद्दल विचारायचं असेल तर, आयसीसीनं यावर विचार करून नियम बदलायला हवे असंही शाकिबनं यावेळी म्हटलं होतं.
पण शाकिब वादात अडकल्याचं हे काही पहिलंच प्रकरण नव्हतं.
दोन वर्षांच्या बंदीची कारवाई
शाकिब अल हसनवर झालेली सर्वात मोठी कारवाई म्हणजे आयसीसीनं त्याच्यावर केलेली 2 वर्षांच्या बंदीची कारवाई.
भ्रष्टाचार प्रकरणाची माहिती आयसीसीला दिली नसल्याच्या कारणावरून शाकिबला या कारवाईचा सामना करावा लागला होता. शाकिब अल हसनवर 2019 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती.
कारवाईच्या दोन वर्षांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आधी एका बुकीनं शाकिबला संपर्क केला होता. शाकिबनं त्याबाबत आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा विभागाला माहिती देणं गरजेचं होतं.
पण शाकिबनं माहिती दिली नाही म्हणून आयसीसीनं कठोर पावलं उचलत शाकिबवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वर्षांची बंदी घातली होती.
कॅमेऱ्यासमोरचा इशारा
यापूर्वी शाकिबला 2014 मध्ये श्रीलंकेच्या विरोधातच ढाकामध्ये एका वन डे सामन्यातील कृत्यामुळं तीन सामन्यांचा बॅन आणि दंड अशी शिक्षा भोगावी लागली होती.
बांगलादेशसमोर श्रीलंकेच्या संघानं 290 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना शाकिब अवघ्या 24 धावा करून बाद झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
शाकिब परतल्यानंतर कॉमेंटेटर्स तो बाद झाल्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी कॅमेरा पॅव्हेलियनमधील शाकिबवर आला तेव्हा त्यानं अभद्र इशारा केला होता.
त्याचं ते कृत्य स्टेडियममधील सर्व प्रेक्षकांनीच नव्हे तर संपूर्ण जगानं टीव्हीवर लाइव्ह प्रक्षेपण सुरू असताना पाहिलं. त्यामुळं त्याच्यावर टीका झाली. तसंच त्याला बॅन आणि दंडाचाही सामना करावा लागला.
मैदानावरच स्टंप उखाडले
शाकिब अल हसन याचा आणखी एक व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतो. एका प्रादेशिक स्पर्धेमध्ये स्टंप उखडून फेकल्याचा तो व्हिडिओ आहे.
शाकिबचा हा व्हीडिओ 2021 मध्ये झालेल्या ढाका प्रिमियर लीग या स्पर्धेतील असल्याचं सांगितलं जातं. यात तो अंपायरवर चिडल्याचं पाहायला मिळतं.
2014 मध्ये शाकिबनं त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या आरोपावरून एका फॅनवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं होतं. याचीही बरीच चर्चा झालेली पाहायला मिळाली.
मारण्याची धमकी
शाकिबवर 2010 मध्ये एका सामन्यात ग्राऊंड स्टाफला बॅटनं मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप लागला होता. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यातील हा प्रकार होता.
बांगलादेशच्या संघाची फलंदाजी सुरू असताना शाकिब 92 धावावंर खेळत होता. त्यावेळी साइडस्क्रीनजवळ काहीतरी हालचार झाल्याचं पाहायला मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचा त्रास झाल्यानं शाकिब अल हसन स्वतः धावत त्यादिशेनं गेला आणि तिथं उभ्या असलेल्या व्यक्तीला अपशब्द बोलला. तसंच त्याला बॅटनं मारण्याची धमकीही दिली.
या प्रकारानंतर शाकिबवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र त्याला या कृत्याबाबत इशारा देण्यात आला होता.
काचेचा दरवाजा फोडला?
2018 मध्ये निदाहस ट्रॉफी दरम्यान झालेल्या एका सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात एका सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली होती.
त्या सामन्यात एका नो बॉलच्या निर्णयावरून वाद झाला होता. अंपायरनं त्यांचाच नो बॉलचा निर्णय पलटवल्यानं हा वाद झाला होता.
त्यावेळी शाकिब अल हसननं रागामध्ये फलंदाजांना खेळपट्टीवरून परत बोलावून घेतलं होतं. त्या सामन्यात बांगलादेशचा विजय झाला होता.
त्यानंतर बांगलादेशच्या ड्रेसिंग रूमचा काचेचा दरवाजा तुटल्याच्या बातम्या आल्या होत्या. शाकिबनं या प्रकरणी माफी मागत, खेळाडूंना भावना अनावर झाल्या होत्या असं म्हटलं होतं.
असे अनेक वाद शाकिबच्या सोनेरी कारकीर्दीची झळाली करण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. आता बांगलादेशच्या राजकीय मैदानावर त्याच्या नव्या इनिंगमध्येही त्याची कामगिरी अष्टपैलू होणार का? हे पाहावे लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








