न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रची गोष्ट, ‘याच्या खेळात ‘रा’ पेक्षा ‘चिन’ जास्त दिसतो’

रचिन रविंद्र, नेदरलँड्सविरुद्ध वर्ल्ड कप मॅचदरम्यान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रचिन रविंद्र, नेदरलँड्सविरुद्ध वर्ल्ड कप मॅचदरम्यान
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

न्यूझीलंडचा रचिन रविंद्र अलीकडे चर्चेत आहे. त्याच्या नावामुळे आणि खेळामुळेही.

एक आक्रमक फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून रचिन त्याच्या टीमसाठी अष्टपैलू कामगिरी बजावतो आहे.

23 वर्षांच्या या युवा खेळाडूविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे. त्याचं नाव ‘रचिन’ का पडलं, तो कोणाचा चाहता आहे, तो आठ नंबरची जर्सी कुणासाठी घालतो, त्याला भारताविषयी काय वाटतं? याविषयी लोकांना उत्सुकता वाटते आहे.

काहींना आतापासूनच त्याच्यामध्ये क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार दिसतो आहे. आयसीसीनं पोस्ट केलेला हा व्हिडियोच पाहा ना.

विश्वचषकात भारताविरुद्ध धरमशालाच्या मैदानातही त्यानं अर्धशतक ठोकून टीमचा डाव सावरला, तेव्हा सुनील गावसकर यांनी रचिनमध्ये महान खेळाडू बनण्याची क्षमता असल्याचं भाकितही केलं.

वर्ल्ड कपमधलं नवं सेन्सेशन

रचिनच्या फलंदाजीतली आक्रमकता केवळ फटकेबाजीपुरती मर्यादित नाही. त्याच्या भात्यात अनेक शॉट्स असल्याचं दिसतं. एरवीही अनेक डावखुरे फलंदाज खेळताना फार स्टायलिश वाटतात. रचिनचा खेळ त्या शैलीला नजाकतीचीही जोड देणारा आहे.

विश्वचषकातल्या आपल्या दुसऱ्याच सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध खेळताना रचिननं 51 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या आणि त्या खेळीदरम्यान 3 चौकार आणि 1 षटकारही ठोकला.

त्याशिवाय एक विकेटही काढली आणि टीमच्या विजयाला हातभार लावला.

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात रचिनला अनुभवी केन विल्यमसनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. रचिननं वादळी खेळी केली आणि 123 धावा लुटल्या.

त्या खेळीमुळे रचिन पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये पदार्पणातच शतक ठोकणारा चौथा किवी खेळाडू ठरला आहे. 82 चेंडूंमधलं त्याचं शतक विश्वचषकात न्यूझीलंडकडून कोणत्याही फलंदाजानं ठोकलेलं सर्वात वेगवान शतकही ठरलंय

इतकंच नाही, तर डेव्हॉन कॉनवेसह रचिननं 279 धावांची भागीदारी केली, जी विश्वचषकाच्या इतिहासातली तोवरची चौथी सर्वांत मोठी भागीदारी ठरली.

रचिननं त्या सामन्यात हॅरी ब्रुकची विकेटही काढली. त्या सामन्यात न्यूझीलंडनं विजय मिळवला आणि रचिन सामनावीर ठरला.

इंग्लंडविरुद्ध शतक साजरं करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड कप पदार्पणात शतक साजरं करताना

मॅचनंतर त्या खेळीविषयी रचिन म्हणाला होता, “कोणतही शतक नेहमी खास असतं. पण भारतात चांगली कामगिरी करणं ही वेगळीच गोष्ट आहे. माझे आई-वडिल मॅच पाहताना बघून छान वाटलं. ते न्यूझीलंडहून सामना पाहण्यासाठी आले होते. त्या क्षणाचा आनंद घेता आला.”

वॉर्म अप मॅचमध्ये रचिननं पाकिस्तानविरुद्ध 97 रन्सची खेळी केली होती आणि त्याचं शतक 3 रन्सनी हुकलं होतं.

सचिन + राहुल = रचिन?

रचिनच्या नावामागची गोष्ट एव्हाना तुम्हीही ऐकली असेल. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या नावावरून रचिनच्या वडिलांनी त्याचं हे नाव ठेवल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरु होत्या.

रचिन भारतीय वंशाचा आहे. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती मूळचे बंगळुरूचे आहेत आणि ते एक सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहेत.

रवी आणि त्यांची पत्नी दीपा नव्वदच्या दशकात कामाच्या निमित्तानं न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये स्थायिक झाले. तिथेच 18 नोव्हेंबर 18, 1999 रोजी रचिनचा जन्म झाला.

रचिनच्या नावावरून सुरु असलेल्या चर्चेला खुद्द त्याच्या वडिलांनीच पूर्णविराम दिला. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या नावावरून त्याचं नाव ठेवल्याची गोष्ट ही निव्वळ अफवा असल्याचं ते म्हणाले.

याबाबत सांगताना ते म्हणाले की, "त्यांच्या पत्नीने रचिन हे नाव सुचवलं होतं. पुढे जाऊन त्यांना हे कळलं की त्यांच्या मुलाचं नाव हे सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या नावांचं मिश्रण वाटत आहे."

Rachin

फोटो स्रोत, Getty Images

द प्रिंटशी बोलताना रवी रवींद्र म्हणाले की, "आम्ही आमच्या मुलाचं नाव ठेवताना एवढी चर्चा केली नव्हती. रचिन हे नाव ऐकताना छान वाटत होतं, त्याची स्पेलिंग सोपी होती म्हणून आम्ही ते नाव ठेवलं.

आम्ही आमच्या मुलाला पुढे जाऊन क्रिकेटपटू बनवणार आहोत असं ठरवून हे नाव ठेवलेलं नव्हतं.

मुलांनी निवडलेल्या क्षेत्रात करियर करण्यासाठी त्यांना पाठिंबा देणं हे पालक म्हणून आमचं कर्तव्य होतं. रचिनने क्रिकेटमध्ये रस दाखवला आणि आम्हीही त्याला मनापासून साथ दिली."

पण रचिनच्या खेळात ‘रा’ पेक्षा ‘चिन’ जास्त दिसतो, अशी टिप्पणी वर्ल्ड कपमधली त्याची विक्रमी खेळी पाहिल्यावर स्वतः राहुल द्रविडनं केली होती.

बंगळुरूचा नातू, पण कट्टर किवी

रचिनचे आजोबा बालकृष्ण अडिगा बंगळुरूतल्या विजया कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत.

आपल्या बंगळुरूतल्या कुटुंबासोबतचं नातं रचिननं अजूनही जपलं आहे. तो किशोरावस्थेत असताना सुट्टीच्या दिवसांमध्ये क्रिकेटच्या सरावासाठी भारतात येऊन राहातही असे.

रचिनचे वडील रवी यांची भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथशीही दोस्ती आहे, ज्याला रचिन प्रेमानं ‘श्री अंकल’ म्हणून हाक मारतो.

भारतासोबत आपल्या नात्याविषयी एका पत्रकार परिषदेत रचिन म्हणाला होता, "भारतात येणं नेहमीच खास असतं. मी जेव्हाही बंगळुरूत येतो, तेव्हा माझ्या आजी आजोबांना भेटल्यावर कौटुंबिक नात्याची जाणीव होते. ”

पण आपण कट्टर ‘किवी’ म्हणजे न्यूझीलँडर असल्याचंही तो सांगतो. “माझी पाळमुळं आणि माझी वांशिक ओळख यांविषयी मला अभिमान आहे. पण मी पूर्णपणे स्वतःला एक किवी असल्याचं मानतो.”

रचिन, कोबी ब्रायंट आणि 8 नंबरची जर्सी

रचिनला त्याच्या आवडत्या क्रिकेटरविषयी विचारलं, तेव्हा त्यानं साहजिकच सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं. पण डावखुरा फलंदाज असल्यानं तो वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांचा मोठा चाहता आहे.

तर सध्याच्या काळातल्या क्रिकेटर्सपैकी केन विल्यमसन आणि विराट कोहलीचा खेळ त्याला जास्त आवडतो.

रचिन रविंद्र

फोटो स्रोत, Getty Images

रचिन आठ नंबरची जर्सी घालून खेळायला उतरतो. यामागेही एक खास कारण आहे. बास्केटबॉलच्या महानतम खेळाडूंमध्ये ज्याची गणना केली जाते, तो दिवंगत कोबी ब्रायंट कारकीर्दीच्या सुरुवातीला आठ नंबरची जर्सी घालूनच खेळायचा.

रचिन सांगतो, “माझ्या जर्सीचा नंबर आठ आहे आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण मी बास्केटबॉलचा मोठा चाहता आहे. कोबी ब्रायंटनं जेव्हा एनबीएमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा तो आधी याच नंबरची जर्सी घालून खेळायचा.”

क्रिकेटमधला नवा तारा

14 जुलै 2019 रोजी वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला, तेव्हा तो सामना रचिननं बंगळुरूमध्ये एका पबमध्ये बसून पाहिला होता.

त्यावेळी रचिन 19 वर्षांचा होता आणि त्याआधीच्या दोन अंडर नाईंटीन विश्वचषकांमध्ये न्यूझीलंडकडून खेळला होता. न्यूझीलंडच्या सीनियर संघात खेळण्याचं स्वप्न तो पाहात होता. पण चार वर्षांनंतरच्य विश्वचषकात आपण न्यूझीलंडकडून खेळू असं त्याला तेव्हा वाटलंही नसेल.

पण पुढच्या दोन वर्षांत चित्र वेगानं बदललं.

rachin ravindra

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रचिननं 2021 मध्ये भारताविरुद्ध कानपूर इथं झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात त्यानं चिवट खेळी करत न्यूझीलंडचा पराभव टाळला.

रचिन तेव्हा एजाझ पटेलसह शेवटच्या विकेटसाठी क्रीझवर पाय रोवून उभा राहिला आणि त्यानं भारताला तो सामना काही जिंकू दिला नाही. त्यामुळे भारतात सलग 14 कसोटी जिंकण्याची टीम इंडियाची विजयाची मालिकाही तुटली.

त्याच वर्षी रचिननं मिरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध सामन्यातून ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण तो सामना एखाद्या दुःस्वप्नासारखा होता. रचिनच्या नावावर ‘गोल्डन डक’ जमा झालं, म्हणजेच आपल्या पहिल्या ट्वेन्टी20 सामन्यात पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद झाला.

वन डे क्रिकेटमध्ये रचिननं पदार्पण केलं ते 2023 च्या मार्च महिन्यात. श्रीलंकेविरुद्धच्या त्या एकदिवसीय सामन्यात रचिननं 49 धावांची खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं.

भारतीय खेळपट्टीवर त्याची उपयुक्तता लक्षात घेत रविंद्रला 2023 च्या विश्वचषकाचं तिकीट मिळालं. या स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 61 धावा आणि 4 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली होती.

वर्ल्ड कप 2023 मधली कामगिरी

विश्वचषकापूर्वी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात रचिन न्यूझीलंडकडून पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर उतरला. त्यानं पाकिस्तान विरुद्ध 97 धावा केल्या.

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात रचिनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा उठवत त्यानं इंग्लंड विरुद्ध दमदार शतक झळकावलं आणि क्रिकेट चाहत्यांचं मनही जिंकलं.

मग हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक साजरं केलं. चेन्नईत बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध त्याला मोठी खेळी करता आली नाही.

पण धरमशालामध्ये रचिनची बॅट पुन्हा तळपली. त्यानं अर्धशतक ठोकलंच शिवाय डॅरिल मिचेलसह भागीदारी रचून टीमचा डावही सावरला.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)