बैरुतमधील इमारतीवर इस्रायलचा हल्ला, 11 जणांचा मृत्यू

    • Author, हुगो बचेगा, डिअरबेल जॉर्डन आणि जोरोस्लाव लुकिव्ह
    • Role, बीबीसी न्यूज

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लेबनॉनची राजधानी बैरुतमधली एक निवासी इमारत जमीनदोस्त झालीय. त्यात 11 लोकांचा मृत्यू झाला असून 60 लोक जखमी झालेत असं लेबनॉनच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.

कुठलीही पूर्वसूचना न देता इस्रायलने केलेल्या हल्ल्यात बास्ता जिल्हातील 8 मजली इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असे लेबनॉनची वृत्तसंस्था एनएनएने सांगितले.

शनिवारी पहाटे 4 वाजता करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले.

या हल्ल्याबाबत इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या हवाई हल्ल्याची तीव्रता खूप जास्त होती. त्यामुळेच हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेतल्या एखाद्या वरिष्ठ सदस्याला लक्ष्य करण्यासाठी तो केला असल्याचं म्हटलं जातंय. पण त्याबद्दल अतिरेकी संघटना किंवा इस्रायल लष्कर यापैकी कोणीही काहीही म्हटलेलं नाही.

हल्ल्याच्या ठिकाणी झालेल्या मोठ्या खड्ड्यातून धुराचे लोट येत होते. तिथे आपत्कालीन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला.

ढिगाऱ्यातून लोकांचा शोध घेणं अजूनही सुरू असल्याने मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.

पीडितांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा वापर केला जाणार असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

"हा एक महाभयंकर स्फोट झाला. खिडकीच्या काचा फुटल्या आणि माझ्या शरीरात काचा घुसल्या. माझी बायका-मुलं यांना देखील जखम झाली. माझ्या घराची अवस्था युद्धभूमीसारखी झाली," असं 55 वर्षांच्या अली नासर यांनी सांगितलं.

बैरुतच्या मध्य भागात झालेला हा या आठवड्यातला चौथा हल्ला होता. सोमवारी झालेल्या हल्ल्यात मोहम्मद अफीफ हा आपला प्रवक्ता मारला गेला असल्याचं इराणचा पाठिंबा असणाऱ्या हिजबुल्लाह संघटनेनं सांगितलं.

शनिवारी बैरूतला झालेल्या हल्ल्यानंतर शहरात इतर ठिकाणीही छोटे हल्ले झाले.

हिजबुल्लाहच्या केंद्राजवळ राहणाऱ्या दक्षिण बैरुतमधल्या काही स्थानिकांना इस्रायलच्या संरक्षण दलानं घरं मोकळी करण्याचे आदेश दिले.

तासाभरातच, हिजबुल्लाहची काही कमांड केंद्रं, शस्त्रसाठे आणि इतर काही संसाधनांवर लढाऊ विमानांनी हल्ले केले, असं इस्रायलच्या संरक्षण दलाने जाहीर केलेल्या एका निवेदनात सांगितलं आहे.

गेल्या काही महिन्यात अशा प्रकारे इस्रायल लष्कराने हिजबुल्लाहमधल्या अनेक मोठ्या नेत्यांना बैरुतमधे ठार केलंय. त्यात या गटाचा प्रमुख हसन नासराल्लाह याचाही समावेश आहे.

हिजबुल्लाह विरोधातल्या या हवाई हल्लांची सुरूवात इस्रायल संरक्षण दलाने सप्टेंबर महिन्यात केली. शिवाय, दक्षिण लेबनॉनमध्ये सैन्यही पाठवण्यात आलं.

पॅलेस्टाईनच्या हमास या गटाने 7 ऑक्टोबर 2023 ला दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्लाचं समर्थन म्हणून हिजबुल्लाहनेही इस्रायलवर रॉकेट हल्ले केले तेव्हा त्यांच्यातल्या संघर्षाची तीव्रता आणखीनच वाढली.

उत्तर इस्रायलमध्ये झालेल्या हल्लामुळे विस्थापित झालेल्या साधारण 60,000 स्थानिकांना परत आणणं हाच हिजबुल्लाहविरोधात पुकारलेल्या युद्धाचा उद्देश असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे.

पण याच संघर्षानं आत्तापर्यंत लेबनॉनमधल्या 3,500 लोकांचा जीव घेतलाय तर 10 लाख लोकांना विस्थापित होण्यास भाग पाडलं आहे.

युद्ध थांबवण्यासाठी एक अमेरिकन मध्यस्थ या आठवड्याच्या सुरूवातीला इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशात गेला होता. त्यात काही प्रमाणात यश आलं असल्याचं ॲमोस होचस्टाइनने म्हटलं. पण त्याबद्दलची कोणतीही माहिती जाहीरपणे सांगण्यात आली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)