You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणी प्रसारमाध्यमं काय म्हणत आहेत? सर्वांचं लक्ष इराणवर
इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर या हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरात उलट-सुलट चर्चा होते आहे. एकीकडे हा हल्ला यशस्वी झाल्याचा दावा इस्रायलकडून केला जात असताना दुसरीकडे हा हल्ला फारसा तीव्र नव्हता आणि इराणनं इस्रायलची बरीचशी क्षेपणास्त्रे पाडली असं इराणमध्ये म्हटलं जातं आहे.
या हल्ल्याबाबत इराणमध्ये काय वातावरण आहे, तिथे काय प्रतिक्रिया उमटत आहेत आणि पुढे काय होण्याची शक्यता आहे याबद्दल...
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलच्या हल्ल्यावर संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. एरवी आक्रमक भूमिका घेणाऱ्या खामेनी यांनी या हल्ल्यानंतर संयमित प्रतिक्रिया दिली आहे.
इस्रायलच्या हल्ल्याला लगेचच प्रत्युत्तर देण्याचं आश्वासन टाळण्याचा प्रयत्न खामेनी यांनी केला. ते म्हणाले की 'या हल्ल्याला कमी लेखता कामा नये आणि त्याचबरोबर त्याची अतिशयोक्ती देखील करू नये.'
तर इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान म्हणाले की इस्रायलच्या हल्ल्याला इराण 'योग्य ते प्रत्युत्तर देईल.'
मात्र ते असंही म्हणाले की 'इराणला युद्ध नकोय.'
इस्रायलच्या हल्ल्यात किमान चार सैनिक मारले गेल्याची बाब इराणनं स्वीकारली आहे.
इस्रायलनं म्हटलं आहे की इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी शनिवारी (26 ऑक्टोबर) इराणमधील अनेक लष्करी तळांवर हल्ला केला.
एक ऑक्टोबर 2024 ला इराणनं इस्रायलवर हल्ला करताना जवळपास 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
रविवारी (27 ऑक्टोबर) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की इस्रायलनं इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टम) आणि क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य केलं होतं.
ते म्हणाले की "या हल्ल्यामुळे इराणची संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र बनवण्याच्या क्षमतेचं मोठं नुकसान झालं आहे."
ते पुढे म्हणाले, "इराणनं एक साधं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे. जे आमचं नुकसान करतील, आम्ही त्यांचं नुकसान करू."
तर हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानाला इराणनं अधिकृतपणे फारसं महत्त्व दिलेलं नाही. इराणनं म्हटलं आहे की इस्रायलची बहुतांश क्षेपणास्त्रे पाडण्यात आली.
इराणनं म्हटलं आहे की काही क्षेपणास्त्रांमुळे फक्त हवाई संरक्षण प्रणालीचं (एअर डिफेन्स सिस्टम) मर्यादित नुकसान झालं आहे.
'काहीही झालं नाही, असं म्हणणं चुकीचं'
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलनं 26 ऑक्टोबरला इराणवर केलेल्या हल्ल्याला एक 'वाईट पाऊल' असं म्हटलं.
मात्र ते असंही म्हणाले की या हल्ल्याला कमी लेखता कामा नये आणि त्याची अतिशयोक्ती देखील करता कामा नये.
आयआरएनए या इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, खामेनी यांनी हे वक्तव्यं 27 ऑक्टोबरला इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर झालेल्या एका बैठकीच्या वेळेस केलं.
एक ऑक्टोबरला इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांद्वारे मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून 26 ऑक्टोबरच्या पहाटे इस्रायलनं इराणच्या अनेक लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता.
इस्रायलच्या हल्ल्यात किमान चार इराणी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणनं दिली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी म्हणाले की इस्रायल इराणवर केलेल्या हल्ल्याला वाढवून सांगतो आहे. वस्तुस्थिती तशी नाही. मात्र ते पुढे म्हणाले की असं म्हणणं देखील चुकीचं ठरेल की या हल्ल्याला काहीच महत्त्व नाही.
आयातुल्ला अली खामेनी म्हणाले की इस्रायलनं इराणबद्दल 'चुकीचे आडाखे' बांधले आहेत.
ते म्हणाले, "ते इराणला ओळखत नाहीत. इराणचे तरुण, इराणी राष्ट्र याबद्दल त्यांना माहीत नाही. अद्याप त्यांनी आमची ताकद आणि क्षमता योग्यरीत्या लक्षात घेतलेली नाही. आपल्याला त्यांना इराणी राष्ट्राच्या इच्छाशक्तीचा परिचय करून द्यावा लागेल."
इराणमधील प्रसारमाध्यमांमध्ये काय बातम्या येत आहेत?
इराणमधील प्रसारमाध्यमांनी देशभरात दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे फोटो छापले आहेत.
प्रसारमाध्यमांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांचा परिणाम खूपच कमी करून दाखवला जातो आहे.
विश्लेषकांचं म्हणणं आहे की इराणच्या जनतेला निर्धास्त करणं हा यामागचा हेतू आहे.
इराणमधील वृत्तपत्रांनी 26 ऑक्टोबरच्या इस्रायलच्या हल्ल्यानंतर देशाच्या हवाई संरक्षण प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टम)चं कौतुक केलं. वृत्तपत्रांत म्हटलं आहे की या हवाई संरक्षण प्रणालीमुळे इस्रायलच्या हल्ल्याचा काहीही प्रभाव पडला नाही. इराणचं फारसं नुकसान झालं नाही.
इराणमधील वृत्तपत्रांनी पहिल्यांदा 27 ऑक्टोबरला इस्रायलच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. कारण 26 ऑक्टोबरच्या पहाटे (किंवा 25 ऑक्टोबरच्या रात्री) जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा 26 ऑक्टोबरची वृत्तपत्रे आधीच छापली गेली होती.
सजांदेगी या सुधारणावादी वृत्तपत्राचे आणि जाम-ए-जाम या सरकारी वृत्तपत्राचे मथळे होते - 'आयर्न एअर डिफेन्स सिस्टम.'
दोन्या-ए-इक्तेसाद या आर्थिक विषयाशी निगडित वृत्तपत्रानं पहिल्या पानावर तेहरानच्या आकाशाचा फोटो मथळ्यासह छापला. तो मथळा होता, "ही रात्र इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमच्या नावावर."
इराणच्या प्रसारमाध्यमांनी देखील हा हल्ला कमी "घातक" होता असं म्हटलं आहे. सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या इराणी वृत्तपत्रानं इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची देखील धमकी दिली आहे.
अत्यंत उजव्या विचारसरणीच्या कीहान या वृत्तपत्रानं इस्रायलच्या हल्ल्याला "अँटिक्लायमॅटिक" म्हटलं आहे. या वृत्तपत्रात म्हटलं आहे की आता "इराणनं विनाशकारी प्रतिक्रिया देण्याची वेळ" आली आहे.
कीहाननं असाही दावा केला की इराणमध्ये सर्वकाही आलबेल आहे. या वृत्तपत्रानं पहिल्या पानावर शहरातील दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचे फोटो छापले आहेत.
कुड्स या परंपरावादी वृत्तपत्रानं छापलेला मथळा असा होता, "तेहरानमध्ये शांतता, तेल अवीवमध्ये अस्वस्थता."
संघर्षाच्या 'शेवटाची सुरुवात'?
वतन-ए-इमरूज या कट्टरतावादी वृत्तपत्रानं देखील, इराणनं इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे या गोष्टीवर भर दिला.
जावन या आणखी एका कट्टरतावादी वृत्तपत्रानं म्हटलं आहे की कमकुवत हल्ल्याला निर्धारानं प्रत्युत्तर देण्याचा इराणला अधिकार आहे. जावनमध्ये म्हटलं आहे की हा हल्ला म्हणजे इस्रायलसाठी "भीतीदायक दिवसांची" सुरुवात आहे.
फरहिख्तेगन या परंपरावादी वृत्तपत्रानं "पुढील सूचनेपर्यंत" या मथळ्यासह एक व्यंगचित्र देखील छापलं आहे. त्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू एका बिळात एका उंदराबरोबर लपले असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
काही वृत्तपत्रांनी हल्ल्याच्या परिणामांबद्दल त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. त्यात त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर याचप्रकारे हल्ले होत राहिले तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल का?
हम्मीहान या सुधारणावादी वृत्तपत्रानं आणि सेतारेह सोब नावाच्या आणखी वृत्तपत्रानं प्रश्न विचारला आहे की ही शेवटाची सुरूवात आहे का?
मात्र सेतारेह सोभ या वृत्तपत्रानं युद्धाच्या मानसिकतेला तीव्र विरोध केला आहे.
इराणी नेते काय म्हणत आहेत?
इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान यांनी प्रतिक्रिया देताना, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी मांडलेल्या मुद्द्यांचाच पुनरुच्चार केला.
एका कॅबिनेट बैठकीत ते म्हणाले, "आम्हाला युद्ध नको आहे. मात्र आम्ही आमच्या राष्ट्राच्या अधिकारांचं रक्षण करू."
काही निरीक्षकांना असं वाटतं की अपेक्षेपेक्षा इस्रायलचा हल्ला फारच कमी तीव्र होता.
इराणमधील कच्च्या तेलाची केंद्रं आणि अणुभट्ट्यांवर हल्ला करू नये यासाठी अमेरिकेने उघडपणे इस्रायलवर दबाव टाकला होता. त्यामुळे या हल्ल्यातून असं दिसतं की इस्रायलनं अमेरिकेचा सल्ला ऐकला आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री रविवारी (27 ऑक्टोबर) म्हणाले होते की इस्रायलच्या हल्ल्याबद्दल इराणला काही तास अगोदरच "संकेत" मिळाले होते.
परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी विस्तृत माहिती न देता प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "त्या रात्री हल्ला होणार असल्याबद्दल आम्हाला संध्याकाळपासून संकेत मिळाले होते."
इस्रायलच्या या हल्ल्याला इराणनं प्रत्युत्तर देऊ नये म्हणून पाश्चिमात्य देशांनी आग्रह धरला आहे. त्यांना भीती वाटते आहे की जर इराणनं प्रत्युत्तर दिलं तर संपूर्ण मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडू शकतो. त्याचबरोबर संपूर्ण जगावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.