इस्रायलच्या हल्ल्यात नसरल्लाह यांचे उत्तराधिकारी हाशिम सैफिद्दीन यांचाही मृत्यू; हिजबुल्लाहचा दुजोरा

इस्रायलच्या हल्ल्यामध्ये तीन आठवड्यांपूर्वी हसन नरसल्लाह यांचे उत्तराधिकारी हाशिम सैफिद्दीन यांचा मृत्यू झाला असल्याच्या वृत्ताला लेबनॉनमधील हिजबुल्लाह या सशस्त्र संघटनेने दुजोरा दिला आहे.

इस्रायलच्या सैन्याने मंगळवारी (22 ऑक्टोबर) दावा केला होता की, त्यांनी बैरुतमधील दक्षिण उपनगरावर केलेल्या हल्ल्यामध्ये हाशिम सैफिद्दीन यांचा मृत्यू झाला आहे.

हिजबुल्लाहने बुधवारी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं की, "ते एक महान नेते होते. सन्मानजनक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीचं जाणं दु:खद आहे. "

इस्रायलच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की, 4 ऑक्टोबर रोजी बैरुतच्या एअरपोर्टनजवळ केलेल्या हवाई हल्ल्यानंतर त्यांचा सैफिद्दीन यांच्यासोबतचा संपर्क तुटला होता.

हाशिम सैफिद्दीन हे नसरल्लाह यांचे नातेवाईक होते. त्यांनी इराणमध्ये धार्मिक शिक्षण घेतलं होतं.

त्यांच्या मुलाचं लग्न इराणमधील सर्वांत मातब्बर सैन्य कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या मुलीसोबत झालं होतं. 2020 मध्ये इराकमध्ये झालेल्या एका अमेरिकन हल्ल्यामध्ये सुलेमानी मारले गेले होते.

हमासचे नेते याहया सिनवार कसे मारले गेले?

उत्तर गाझामध्ये केलेल्या एका हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या याहया सिनवार यांना ठार केल्याचं इस्रायलनं सांगितलं.

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव योव गॅलंट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की, "आमचे शत्रू कुठेही लपून बसू शकत नाही. आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना ठार करू."

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ यांनी हमास नेते याहया सिनवार यांना इस्रायल सैन्याने ठार केल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी जगभरातील इतर अनेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनाही माहिती दिली.

कॅटझ म्हणाले, "हमास नेता याहया सिनवार 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये केलेल्या अत्याचार आणि नरसंहारामागील प्रमुख सुत्रधार होता. त्याला गुरुवारी (17 ऑक्टोबर) इस्रायली सैनिकांनी ठार केले."

"इस्रायलसाठी हे एक महत्त्वाचं लष्करी आणि नैतिक यश आहे. हा इराणच्या नेतृत्वाखालील कट्टरपंथी इस्लामच्या राक्षसी प्रवृत्ती विरुद्धचा संपूर्ण मुक्त जगाचा विजय आहे," असं मत कॅटझ यांनी व्यक्त केलं.

"सिनवारच्या मृत्यूमुळे हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची तात्काळ सुटका होण्याची शक्यता तयार झाली आहे. यामुळे हमास आणि इराणच्या नियंत्रणाशिवाय गाझाचा नव्या वास्तवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे," असंही कॅटझ यांनी नमूद केलं.

इस्रायलच्या सैन्याने याहया सिनवारवर कारवाई कशी केली?

इस्रायलच्या सैन्याने सांगितलं की, त्यांची 828 वी बिसलामेक ब्रिगेड बुधवारी (16 ऑक्टोबर) रफाहच्या ताल अल-सुल्तान भागात टेहाळणी करत होती.

या दरम्यान टेहाळणी पथकाला तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आणि तात्काळ चकमक सुरू झाली. यात तिघांचाही मृत्यू झाला.

सुरुवातीला या चकमकीतून फार विशेष साध्य झाल्याचं समोर आलं नाही. या कारवाईतील सैनिकही गुरुवारी (17 ऑक्टोबर) सकाळपर्यंत परत आले नव्हते.

चकमकीतील मृतदेहांची ओळख पटवली जात असताना एका मृतदेहाचा चेहरा याहया सिनवार यांच्याशी मिळता जुळता आढळला.

यानंतर हे मृतदेह त्याच ठिकाणी पडलेले होते. हमासकडून अनेकदा सापळाही रचला जातो. त्यामुळे अशा घटनांमध्ये सैन्याकडून अतिशय सावधगिरी पाळली जाते. इस्रायली सैन्याने संशय असलेल्या या मृतदेहाचे एक बोट कापून चाचणीसाठी इस्रायलला पाठवले.

यानंतर त्याच दिवशी सिनवार यांचा मृतदेहही इस्रायलला पाठवण्यात आला. तसेच चकमक झाली त्या संपूर्ण भागाची घेरेबंदी करण्यात आली.

इस्रायल सैन्याचे (आयडीएफ) प्रवक्ते डेनियल हगारी म्हणाले की, त्यांच्या सैन्याला सिनवार त्या भागात आहे हे माहिती नव्हतं. मात्र सैन्य सातत्याने त्या भागात कारवाई करत होते.

इस्रायली सैन्याने तीन लोकांना एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत पळताना पाहिलं. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यानंतर तिघांपैकी एक व्यक्ती दुसऱ्या इमारतीकडे पळत असताना इस्रायली सैन्याने ड्रोनच्या मदतीने त्याला ठार केलं.

यावरून असं दिसतं की, चकमक सुरू झाली तेव्हा सिनवारकडून स्वतःच्या सुरक्षेसाठी ढाल म्हणून ओलीस ठेवलेल्या नागरिकांचा उपयोग होत नव्हता. त्यावेळी ते आपल्या एक दोन सहकाऱ्यांसह गुपचूप त्या भागातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. दुसरी शक्यता अशीही आहे की, सिनवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील काही लोकांचा मृत्यूही झाला असू शकतो.

सिनवार यांना कोणत्याही योजनाबद्ध सैन्य कारवाईत ठार करण्यात आलेले नाही.

इस्रायलच्या सैन्याने म्हटले की, ते या भागात मागील अनेक आठवड्यांपासून गस्त घालत होते. दरम्यान, सूत्रांनी या भागात सिनवार उपस्थित असू शकतो अशी माहिती दिली.

इस्रायलच्या सैन्याने सिनवार यांच्या ठिकाणाचा ढोबळमानाने अंदाज बांधला होता. तसेच या भागाची टप्प्याटप्प्याने घेराबंदी करण्यात येत होती.

सिनवार मागील एक वर्षांपासून इस्रायली सैन्याला हुलकावणी देत होते. हमासचे नेते मोहम्मद दीफ आणि इस्माइल हनिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर इस्रायलचा दबाव वाढला असावा.

इस्रायलच्या सैन्याने हमासकडून 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात वापरलेल्या पायाभूत सुविधाही नष्ट केल्या.

इस्रायलच्या सैन्याने म्हटले की, मागील काही आठवड्यांपासून दक्षिण गाझात सुरू असलेल्या सैन्य कारवायांमुळे याहया सिनवारच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या.

मागील काही आठवडे सुरू असलेल्या कारवाईमुळे सिनवारला या भागातून दुसरीकडे जाणे कठीण झाले होते. हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरले.

हमास नेते याहया सिनवार यांच्या मृत्यूवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष व राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जो बायडेन म्हणाले, "इस्रायली अधिकाऱ्यांनी माझ्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाला माहिती दिली आहे की, गाझामधील त्यांच्या सैन्य कारवाईत हमास नेता याहया सिनवारचा मृत्यू झाला आहे. डीएनए चाचणीतही सिनवारच्या मृत्यूला दिजोरा मिळाला आहे. हा इस्रायल, अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी एक चांगला दिवस आहे."

कमला हॅरिस यांनी हमास नेते सिनवार यांच्या मृत्यूवर म्हटलं, "याहया सिनवार 7 ऑक्टोबरला गाझात झालेल्या हजारो निरपराध नागरिकांच्या हत्येला जबाबदार होते."

''सिनवार यांचे हात अमेरिकेच्या रक्ताने माखलेले होते. त्यांच्या मृत्यूमुळे अमेरिका, इस्रायल आणि संपूर्ण जग चांगल्या स्थितीत आहे. ही गाझात होत असलेल्या युद्धाला थांबवण्यासाठी एक संधी आहे", असंही कमला हॅरिस यांनी नमूद केलं.

दरम्यान, गाझातील हमासतर्फे चालवल्या जाणाऱ्या संरक्षण मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की, इस्रायलने उत्तर गाझात असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीवर हल्ला केला आणि त्यात 22 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

इस्रायलच्या सैन्याने स्पष्ट केलं आहे की, जबालियामध्ये असणाऱ्या या ठिकाणाचा वापर हमास आणि इतर इस्लामी जिहादी संघटनांकडून बैठकांसाठी केला जायचा. तर हमासनं हल्ल्यावर टीका करताना सांगितलं की, जबालियमधल्या या शाळेचा वापर हमास करत नव्हतं.

हमासतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या शाळेचा वापर हमासचं कमांड सेंटर म्हणून करत असल्याचा इस्रायलने केलेला दावा धादांत खोटा आहे.

कोण होते याहया सिनवार?

याहया सिनवार यांचा जन्म 1962 मध्ये झाला. गाझा पट्टीतील हमासच्या चळवळीचे ते नेते आहेत.

'मज्द' या हमासच्या सुरक्षा सेवा किंवा दलाचे ते संस्थापक आहेत. या व्यवस्थेकडून अंतर्गत सुरक्षा विषयक बाबींचं व्यवस्थापन केलं जातं, इस्लायलच्या संशयित हेरांची चौकशी केली जाते. त्याचबरोबर इस्रायलचे गुप्तहेर आणि सुरक्षा अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम देखील मज्द कडून केलं जातं.

सिनवार यांना तीन वेळा अटक करण्यात आली आहे. 1988 मध्ये तिसऱ्यांदा अटक करण्यात आल्यानंतर त्यांना चार जन्मठेपांच्या तुरुंगवासची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

मात्र, हमासच्या कैदेत पाच वर्षांहून अधिक काळ असलेल्या आपल्या सैनिकाच्या बदल्यात इस्रायलनं 1,027 पॅलेस्टिनी आणि अरब कैद्यांची सुटका केली होती. यामध्ये सिनवार यांचाही समावेश होता.

त्यानंतर सिनवार हमासच्या प्रमुख नेतेपदावर परत आले. 2017 मध्ये त्यांची नियुक्ती गाझापट्टीतील हमासच्या राजकीय ब्युरोच्या प्रमुखपदी करण्यात आली.

2015 मध्ये अमेरिकेने सिनवार यांचा समावेश 'आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यां'च्या काळ्या यादीत केला.

इराणचे कमांडर इन चीफ काय म्हणाले?

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे कमांडर-इन-चीफ, मेजर-जनरल होसेनी सलामी यांनी म्हटले आहे की, जर इस्रायलने इराणच्या ठिकाणांवर हल्ला केला तर त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळेल.

लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या अधिकाऱ्याला शेवटचा निरोप देण्यासाठी गेलेले सलामी म्हणाले की, "जे तुम्ही चूक केली आणि आमच्या ठिकाणांवर हल्ले केले, तर आम्ही त्याच्या प्रत्युत्तरादाखल तुमच्यावर पुन्हा हवाई हल्ले करू."

1 ऑक्टोबर रोजी इराणने 200 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला होता.

ब्रिटनचे संरक्षण सचिव म्हणाले-सिनवार यांच्या मृत्यूचे दुःख व्यक्त करणार नाही

जोनाथन बेल

संरक्षण प्रतिनिधी

ब्रिटनचे संरक्षण सचिव जॉन हिली म्हणाले की, हमासचे नेते याहया सिनवार यांच्या मृत्यूची पुष्टी होण्याची आम्ही वाट बघत आहोत.

पण जर ही बातमी खरी असेल तर ते म्हणाले की, "याहया सिनवार सारख्या दहशतवाद्याचा मृत्यू झाला असेल तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करणार नाही. 7 ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांपैकी एक असणाऱ्या सिनवार याच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त करण्याची गरज नाही."

हिली म्हणाले की, 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याने दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ज्यूंच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवसच फक्त आणला नाही, तर या हल्ल्यामुळे वर्षभर एका नवीन युद्धाला सुरुवात झाली आणि यामुळेच पॅलेस्टाईनमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले.

जबालियामध्ये हजारो लोक अडकल्याचा दावा

ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या परिसरात दोन आठवड्यांपूर्वी जमिनीवरून लष्करी कारवाईला सुरुवात केली होती.

हमासच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एकत्रित येता येऊ नये म्हणून आम्ही हा मार्ग निवडला असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्रायली सैन्याने डझनभर नावे घोषित करून सांगितलं आहे की, या हल्ल्याच्या वेळी हे लोक या इमारतीत उपस्थित होते.

दुसरीकडं संयुक्त राष्ट्रांचं असं म्हणणं आहे की, जबालिया इथं अडकलेले हजारो पॅलेस्टिनी नागरिक अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहेत. त्यांच्याकडे खायला अन्न देखील नाही.

ही बातमी सतत अपडेट होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)