इस्रायलकडून हमासला हवे आहे कायमस्वरूपी पूर्ण युद्धविरामाचे वचन

    • Author, मॅट मर्फी
    • Role, बीबीसी न्यूज

गाझामधील युद्धविरामासाठी आपण अमेरिकेच्या योजनेला प्रतिसाद दिला असल्याचं हमासने सांगितलं आहे. मात्र यासाठी इस्रायलने गाझात कायमस्वरूपी युद्धविरामाचे वचन द्यावे असं हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं.

पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद (पीआयजे) सहयोगींनी निवेदनातून या करारावर "सकारात्मकता" दाखवली आहे.

सोमवारी रात्री यूएन सुरक्षा परिषदेने मान्यता दिलेल्या प्रस्तावित युद्धविराम योजनेत सहा आठवड्यांच्या युद्धविरामाची मागणी करण्यात आली आहे, जी अखेरीस कायमस्वरूपी होईल.

कतार आणि इजिप्त यांनी अमेरिकेसह, इस्रायल आणि हमास यांच्यातील वाटाघाटींमध्ये मध्यस्थी केली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पॅलेस्टिनी गटाने त्यांचे उत्तर सादर केले आहे.

मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या निवेदनात, हमासने गाझामधील लढाई थांबवण्याचे आवाहन केले आहे.

"आम्ही आमच्या पॅलेस्टिनी लोकांच्या हितसंबंधांना प्राधान्य देतो आणि गाझावरील चालू असलेल्या आक्रमणास पूर्णपणे थांबविण्याच्या आवश्यकतेवर भर देतो," असं हमास आणि पीआयजे यांनी म्हटलंय.

सोबतच हे युद्ध संपवणाऱ्या करारापर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक सहभाग घेण्यास तयार असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं.

व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की हमासने प्रतिसाद दिला हे बरं झालं. अमेरिकन अधिकारी त्यांच्या विनंतीचे मूल्यांकन करत आहेत.

याआधी मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटलं होतं की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा युद्धविराम योजनेसाठी आपली वचनबद्धता दाखवली आहे. ते हमासच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी मांडलेल्या प्रस्तावात सुरुवातीच्या सहा आठवड्यांच्या युद्धविरामाचा समावेश होता, ज्यामध्ये हमासने काही ओलिसांना सोडावं त्या बदल्यात इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी असं म्हटलं होतं.

दुसऱ्या टप्प्यात हमासने उर्वरित ओलीस सोडावे आणि युद्धविरामाचा भाग म्हणून गाझामधून संपूर्ण इस्रायली सैन्य माघार घेईल.

इस्रायलने जो प्रस्ताव दिलाय तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. 31 मे रोजी इस्रायलच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या विधानात जे काही सांगितलं त्यापेक्षा ते वेगळं आहे का याबाबत स्पष्टता नाही.

नेतन्याहू यांनी कबूल केलंय त्यांच्या युद्ध मंत्रिमंडळाने या योजनेला अधिकृत केले आहे परंतु त्यासाठी त्यांनी स्पष्ट समर्थन दिलेलं नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत उजव्या विचारसरणीच्या सदस्यांनी युती सोडण्याची आणि करार पुढे गेल्यास तो संपुष्टात आणण्याची धमकी दिली आहे, आणि हमासचं हे आत्मसमर्पण म्हणून पाहिलं जाईल असं म्हटलंय.

ब्लिन्केन यांनी मंगळवारी तेल अवीवमध्ये इस्रायली अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांच्या हॉटेलबाहेर निदर्शकांनी अमेरिकेचे झेंडे हातात धरून घोषणाबाजी केली. अनेकांनी ओलिसांची छायाचित्रे हातात धरून "SOS, USA" आणि "आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, ब्लिंकन, करारावर शिक्कामोर्तब करा" अशा घोषणा दिल्या.

7 ऑक्टोबर रोजी हमासने अपहरण केलेला इस्रायली सैनिक निमरोद कोहेनची (19) आई विकी कोहेन यांनी निमरोदचा फोटो असणारा बॅनर धरला होता.

त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्ही इथे ब्लिंकन आणि यूएसए सरकारला आमच्या सरकारपासून आम्हाला वाचवा असं सांगण्यासाठी आलो आहोत. आमचे पंतप्रधान आमच्या प्रियजनांना परत आणू इच्छित नाहीत, आमच्या सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्हाला त्यांची मदत हवी आहे."

7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झाले, सुमारे 1,200 लोक यात मारले गेले आणि 251 लोकांना ओलिस म्हणून गाझाला नेण्यात आलं. गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचे म्हणणं आहे की तेव्हापासून इस्रायलच्या हल्ल्यात 37,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.