You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलच्या हल्ल्याला 'कमी लेखण्या'ची गरज नाही - इराणचे सर्वोच्च नेते
- Author, टॉम बेनेट
- Role, बीबीसी न्यूज
इस्रायलने तेहरानवर केलेल्या हल्ल्याला ना कमी लेखण्याची गरज आहे किंवा त्या हल्ल्याबाबत अतिशयोक्ती करण्याची गरज आहे असे विधान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी केले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात चार इराणी सैनिक ठार झाल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इराणनं या महिन्याच्या सुरूवातीला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं इराणमधील विशिष्ट लक्ष्यांवर हल्ला केला होता.
इस्रायलने शनिवारी (26 ऑक्टोबर) इराणवर केलेल्या या हवाई हल्ल्यात इराणच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला होता.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात इराणच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे, असं इराणच्या सैन्याने सांगितलं.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी म्हणाले, "तेहरान आणि इतर भागांवर झालेल्या इस्त्रायली हवाई हल्ल्यांना कमी लेखण्याची गरज नाही किंवा त्याबाबत अतिशयोक्तीही करू नये."
इस्रायल सुरक्षा दलाने (आयडीएफ) या हल्ल्याला इराणच्या सैन्य ठिकाणांवर केलेला अचूक हल्ला म्हटलं आहे. या हल्ल्यात इराणच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इराणच्या सैन्याने दिली.
इस्रायलने इराणबद्दल चुकीची अंदाज लावला. त्यांची ही चूक इराणने दुरुस्त केली पाहिजे, असं मत खामेनी यांनी व्यक्त केल्याचं वृत्त आयआरएनए या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
खामेनी पुढे म्हणाले, "इस्रायल इराणला ओळखत नाही. त्यांना अद्याप इराणची शक्ती, क्षमता आणि इच्छाशक्ती समजलेली नाही. इराणने त्यांना समजावून सांगितली पाहिजे."
हल्ला केव्हा झाला?
स्थानिक वेळेनुसार रात्री 02:00 वाजेच्या (23:30 बीएसटी (ब्रिटिश समर टाईम)) सुमारास इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात स्फोट झाल्याचं वृत्त इराणमधील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
जवळपास रात्री 02:30 वाजता इस्रायलच्या सैन्यानं इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.
या हल्ल्याच्या वेळेस तेल अविव मधील कमांड आणि कंट्रोल सेंटरमधून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षणमंत्री योव गालंट उपस्थित होते.
सकाळी 06:00 वाजेच्या सुमारास इस्रायली सैन्यानं हल्ला पूर्ण झाल्याचं सांगितलं.
हल्ल्याची तीव्रता किती होती?
इस्रायलच्या या हल्ल्यामुळे इराणचं नेमकं किती नुकसान झालं, हे अद्याप स्पष्ट नाही.
इस्रायली सैन्यानं म्हटलं आहे की त्यांनी इराणचे क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तयार करणारी ठिकाणं आणि इतर लष्करी तळांवर हल्ला केला आहे.
या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या कारवाईत दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा इराणच्या लष्करानं सांगितलं आहे. त्याचबरोबर इराणी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की तेहरान, खुझेस्तान आणि इलाम प्रांतात हल्ले झाले आहेत.
मात्र इराणच्या क्षेपणास्त्ररोधक प्रणालीनं (एअर डिफेन्स सिस्टम) इस्रायलची क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या हाणून पाडली आहेत. मात्र "काही ठिकाणी मर्यादित नुकसान झालं आहे."
अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की इराणच्या कच्च्या तेलाच्या केंद्रांवर किंवा आण्विक केंद्रांवर हा हल्ला करण्यात आलेला नाही.
सीरियातील प्रसारमाध्यमांनी मध्य आणि दक्षिण सीरियातील लष्करी तळांवर हल्ला झाल्याचं वृत्त दिलं आहे. इस्रायलकडून याची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.
इस्रायलनं इराणवर हल्ला का केला?
इराणचा पाठिंबा असलेल्या हमास, हिजबुल्लाह यांच्याबरोबर सध्या इस्रायलचं युद्ध सुरू आहे.
एप्रिल महिन्यात इराणनं जवळपास 300 क्षेपणास्त्रं आणि ड्रोनद्वारे थेट इस्रायलवर हल्ला केला होता.
इस्रायलनं सीरियातील इराणी दुतावासावर केलेल्या हल्ल्यात इराणच्या रेव्होलुशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)चे अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं हा हल्ला केला होता.
दरम्यान जुलैमध्ये इस्रायलच्या बैरूतवरील हल्ल्यात हिजबुल्लाहचे वरिष्ठ कमांडर मारला गेला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तेहरानमधील एका स्फोटात हमासचे नेते इस्माइल हानिये मारले गेले होते.
तर सप्टेंबरच्या शेवटी हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह हे देखील इस्रायलच्या हल्ल्यात बैरूतवरील हल्ल्यात मारले गेले होते.
या सर्व घटनांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं 1 ऑक्टोबरला इस्रायलवर जवळपास 200 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनिशी हल्ला केला होता.
आता पुढे काय?
इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याबाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हा हल्ला जितका मोठा असण्याची अपेक्षा केली जात होती तितका तो दिसत नसल्याचे चिन्हे आहेत.
महत्त्वाचं म्हणजे एक्सिओस या अमेरिकन प्रसारमाध्यमात वृत्त आलं आहे की हा हल्ला करण्यापूर्वी इस्रायलनं इराणला एक संदेश पाठवला होता आणि त्यात हल्ल्याची काही माहिती पुरवली होती आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर न नेण्याची धमकी इराणला दिली होती.
इस्रायल सध्यातरी या युद्धाची व्याप्ती आणखी वाढवू इच्छित नाही या दृष्टीकोनातून याकडे पाहिलं जाऊ शकतं.
"आमचं लक्ष गाझा पट्टी आणि लेबनॉनवर आहे. इराण आम्हाला या युद्धाची व्याप्ती वाढवण्यासाठी भरीला घालतो आहे," असं इस्रायलच्या सैन्यानं म्हटल आहे.
इराणच्या आयआरजीसीशी निगडीत तस्मिन या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, "इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार इराणला आहे आणि या हल्ल्याला याच स्वरुपाचं चोख प्रयुत्तर दिलं जाईल याबद्दल कोणतीही शंका नाही."
जगभरात काय प्रतिक्रिया उमटल्या?
युकेचे पंतप्रधान सर किएर स्टार्मर म्हणाले, इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. या संघर्षातील सर्वांनी "संयम बाळगावा." त्यांनी इराणला प्रत्युत्तर न देण्याचं आवाहन केलं आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा कौन्सिलचे प्रवक्ते सीन सॅवेट म्हणाले, "इस्रायलनं इराणवर हल्ला करताना लोकवस्त्या टाळल्या आणि फक्त लष्करी तळांवरच हल्ला केला आहे. त्याउलट इराणनं इस्रायलवर हल्ला करताना इस्रायलच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरावर हल्ला केला होता."
सौदी अरेबियानं या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि या प्रदेशातील "सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कारवाई"विरोधात इशारा दिला आहे.
इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या हल्ल्यांबाबत "गंभीर चिंता" वाटत असल्याचं म्हटलं आहे.
हमासनं या हल्ल्याला "इराणच्या सार्वभौमत्त्वाचं स्पष्ट उल्लंघन आणि या प्रदेशातील सुरक्षितता आणि लोकांच्या सुरक्षेला लक्ष्य करणारा हल्ला" म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)