इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले हमास नेते याह्या सिनवार कोण होते? त्यांना ‘कसाई’ असं का म्हटलं जायचं?

    • Author, फ्रँक गार्डनर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गाझामधील हमासचे नेते याह्या सिनवार यांना ठार मारल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सिनवार असल्याचा इस्रायलचा दावा आहे.

हमासच्या त्या हल्ल्यात 1200 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 251 लोकांचं अपहरण झालं होतं. त्यानंतर इस्रायलने तातडीने प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली होती. हे युद्ध सुरू झाल्याबरोबर सिनवार गायब झाले होते.

ड्रोन, हेरगिरी करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि गुप्तहेर यांच्या मदतीने हजारो इस्रायली सैनिक त्यांचा शोध घेत होते. त्यामुळे त्यांचं फरार होणं स्वाभाविक होतं.

मात्र, अखेर दक्षिणी गाझामध्ये सक्रिय असलेल्या सैनिकांनी सिनवार यांना एका इमारतीजवळ ठार मारल्याचं, इस्रायली सरकारचं म्हणणं आहे. त्या इमारतीत कोणी ओलीस असल्याचे पुरावे मिळालेले नाही. बोटाचे ठसे आणि दातांच्या नोंदी या दोन गोष्टींच्या आधारे पुष्टी केल्यानंतर त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, “ज्या माणसाने आमच्या लोकांविरुद्ध इतिसाहातील सर्वांत भीषण नरसंहार केला, एक कट्टर आतंकवादी ज्याने हजारो इस्रायली सैनिकांची हत्या केली, शेकडो नागरिकांचं अपहरण केलं, त्याचा आज आमच्या साहसी सैनिकांनी खात्मा केला आहे आणि आम्ही जसं वचन दिलं होतं त्याप्रमाणे आता हिशोब चुकता केला आहे.”

‘त्याचा मृत्यू निश्चित आहे’

पांढरे केस आणि काळ्या भुवया असलेले याह्या सिनवार गाझातील राजकीय गटाचे नेते आणि इस्रायलसाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्यांपैकी एक होते.

7 ऑक्टोबरला इस्रायलच्या दक्षिण भागात झालेल्या हल्ल्यासाठी हमासच्या इतर नेत्यांबरोबर याह्या सिनवार यांनाही जबाबदार मानलं जात होतं.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलच्या संरक्षण दलांचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डेनियल हगारी यांनी एक घोषणा केली होती. “याह्या सिनवार एक कमांडर आहेत आणि त्यांचा मृत्यू निश्चित होणार,” असं ते म्हणाले होते.

इस्रायलच्या संरक्षण दलाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ हर्जी हलेवी याबाबत म्हणाले होते की, “या निर्घृण हल्ल्याचा निर्णय सिनवारने घेतला होता. त्यामुळं तो आणि त्याच्यासाठी काम करणारा प्रत्येक व्यक्ती आता आमचं लक्ष्य आहे.”

त्यात लोकांच्या नजरेपासून दूर असणारे मोहम्मद दैफसुद्धा सामील होते. ते हमासची लष्करी शाखा इज्जेदीन अल कासम ब्रिगेडचे नेते होते. दैफ यांचासुद्धा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

युरोपियन काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे सिनियर पॉलिसी फेलो ह्यू लोवाट्ट यांच्या मते, 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचं नियोजन करण्यामागं मोहम्मद दैफ यांचंच डोकं होतं. कारण ती एक लष्करी मोहीम होती.

त्यांच्या मते, “हमासच्या ज्या नेत्यांनी या हल्ल्याची योजना तयार केली होती, आणि त्याला मूर्त रूप दिलं होतं, त्यात याह्या सिनवारही सहभागी असण्याची दाट शक्यता आहे.”

याह्या सिनवार इस्माइल हानियानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जायचे. या वर्षी जुलैमध्ये इस्माइल हानिया यांनाही इस्रायलने ठार केलं होतं. त्यानंतर हमासचं नेतृत्व याह्या यांनी केलं होतं.

सिनवार जमिनीखाली असलेल्या, सुरक्षारक्षकांनी वेढलेल्या गाझामधील एखाद्या भूयाराखाली लपले होते याची इस्रायलला कल्पना होती आणि ते कोणाशीही संपर्क करायचे नाहीत कारण त्यांना भीती होती की, ते जर कोणाशी बोलले तर त्यांचा ठावठिकाणा कळेल.

19 व्या वर्षी इस्रायलकडून पहिल्यांदा अटक

याह्या सिनवार यांना लोक अबू इब्राहीम या नावाने ओळखायचे. त्यांचा जन्म गाझा पट्टीत असलेल्या दक्षिण भागातील खान युनूसमधील निर्वासितांच्या छावणीत झाला होता.

त्यांचे आईवडील अश्केलॉन शहरातील होते. मात्र जेव्हा 1948 मध्ये इस्रायलची स्थापना झाली तेव्हा हजारो पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या वडिलोपार्जित घरातून काढून टाकलं होतं. तेव्हा याह्या यांचे आईवडील निर्वासित झाले होते. पॅलेस्टिनी त्याला ‘अल- नकबा’ किंवा विध्वंस म्हणतात

याह्या सिनवार यांनी खान युनूस येथील मुलांच्या शाळेत सुरुवातीचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर गाझा येथील इस्लामिक विद्यापीठातून अरबी भाषेत पदवीचं शिक्षण घेतलं होतं.

वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट ऑफ निअर इस्ट पॉलिसीचे फेलो एहूद यारी म्हणतात की, जेव्हा याह्या शिक्षण घेत होते तेव्हा युनूसमध्ये ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या आंदोलनाच्या समर्थकांचं मोठं केंद्र होतं. एहूद यांनी याह्या यांची तुरुंगात चारवेळा मुलाखत घेतली होती.

एहूद यारी यांच्या मते, “ मुस्लीम ब्रदरहूड हे मशिदीत जाणाऱ्या आणि या शिबिरात राहणाऱ्या तरुणांसाठी हे मोठं आंदोलन होतं. त्यानंतर हमाससाठीही त्याचं महत्त्व खूप वाढलं.”

याह्या सिनवार यांना इस्रायलने पहिल्यांदा 1982 मध्ये अटक केली होती. त्यावेळी ते फक्त 19 वर्षांचे होते. याह्या यांच्यावर ‘इस्लामिक कारवायांमध्ये’ सहभागी असल्याचा आरोप होता. 1985 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्याच काळात त्यांनी हमासचे संस्थापक शेख अहमद यासीन यांचा विश्वास जिंकला.

तेल अवीवमधील इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सेक्युरिटी स्टडीजचे ज्येष्ठ संशोधक कोबी मायकल यांच्या मते, “याह्या आणि शेख यासीन एकमेकांच्या अगदी जवळ आले.”

मायकल सांगतात की, त्यांच्यात जवळीक असल्यानं हमासचे आध्यात्मिक नेते सिनवार यांची हमासमध्ये प्रतिष्ठा वाढली.

1987 मध्ये हमासची स्थापना झाल्यावर दोन वर्षांनी याह्या यांनी अतिशय धोकादायक अशी अंतर्गत सुरक्षा संघटना अल-मज्दची स्थापना केली होती. तेव्हा ते फक्त 25 वर्षांचे होते.

मायकल यांच्या मते , “अल-मज्द ही संघटना कथित अनैतिक गुन्हे करणाऱ्या लोकांना शिक्षा करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.”

ज्या लोकांकडे ‘सेक्स व्हीडिओ’ असायचे अशा लोकांना या संघटनेच्या माध्यमातून लक्ष्य केलं जायचं. ज्या लोकांवर इस्रायलशी लागेबांधे असल्याचा संशय यायचा अशा लोकांचा माग घेऊन त्यांना मारलं जायचं.

या बातम्याही वाचा:

गुप्तहेरीच्या आरोपात एकाला जिवंत गाडले

एहूद यारी सांगतात की इस्रायलशी लागेबांधे असल्याची शंका असलेल्या अनेक लोकांच्या हत्येमागे याह्या यांचा हात होता. ते सांगतात की, “यापैकी अनेकांना तर याह्या यांनी स्वतःच्या हाताने मारलं आहे. त्याचा त्यांना खूप गर्व होता. मला आणि अनेकांना त्यांनी हे सांगितलं होतं.

इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नंतर याह्या यानी कबूल केलं होतं की त्यांनी इस्रायलसाठी हेरगिरी करणाच्या संशयाखाली एका माणसाला त्याच्या भावाच्या हातून जिवंत गाडलं होतं.

यारी म्हणतात, “आपल्याशी जो शत्रुत्व पत्करणार नाही आणि आपली भीती आहे अशा लोकांचा आणि अनुयायांचा त्यांच्याभोवती गराडा असायचा.”

1988 मध्ये याह्या सिनवार यांनी दोन इस्रायली सैनिकांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्याची योजना आखली होती आणि ती अंमलात आणली होती. त्यांना त्याच वर्षी अटक करण्यात आली. इस्रायलने त्यांना 12 पॅलेस्टिनी नागरिकांच्या हत्येसाठी दोषी ठरवलं आणि जन्मठेपेच्या चार शिक्षा एकत्रितपणे सुनावल्या.”

तुरुंगातले दिवस

याह्या सिनवार यांनी आयुष्यातील 22 वर्षं म्हणजे 1988 ते 2011 इस्रायलच्या विविध तुरुंगात घालवले आहेत. या तुरुंगवासात त्यांना अनेकदा एकांतवासाची शिक्षाही झाली. त्यामुळेच ते कदाचित आणखी कट्टरतावादी झाले.

एहूद यारी म्हणतात, “तुरुंगात असतानाही शक्ती वापरून त्यांनी दबदबा कायम ठेवला. कैद्यांमध्ये त्यांनी स्वत:ला नेता म्हणून प्रस्थापित केलं. ते कैद्यांच्या वतीने तुरुंग प्रशासनाशी चर्चा करायचे आणि त्यांच्यामध्ये समेट घडवून आणायचे.”

याह्या सिनवार यांनी तुरुंगात जो काळ घालवला. त्याचं इस्रायलच्या सरकारने जे विश्लेषण केलं. त्यात त्यांचं, ‘निर्दयी, दबदबा निर्माण करणारा, अतिशय सहनशील. धूर्त, लोकांना आपल्या जाळ्यात ओढणारा, कमी सोयी सुविधांमध्ये संतुष्ट, कैद्यांच्या गर्दीतही एखादं रहस्य लपवून ठेवण्यात पटाईत आणि गर्दी खेचणारा,’ असं वर्णन करण्यात आलं होतं.

याह्या सिनवार यांची मुलाखत घेतल्यावर एहूद यारी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं जे मूल्यांकन केलं त्यानुसार याह्या हे एक मनोरुग्ण होते. मात्र त्याचवेळी ते म्हणतात की, त्यांना फक्त मनोरुग्ण म्हणता येणार नाही कारण एका विचित्र आणि गुंतागुंतीच्या माणसाची सत्य परिस्थिती तुम्हाला माहिती नसते.”

एहूद यारी बीबीसीशी बोलताना म्हणाले, “याह्या अतिशय धूर्त आणि चलाख व्यक्ती होते. एखाद्यावर प्रभाव टाकून त्याला कसं ताब्यात घ्यायचं हे त्यांना चांगलंच माहिती होतं.”

याह्या सिनवार एहूद यारींना म्हणायचे की, इस्रायलचा नायनाट करायला हवा. तेव्हा ते असंही म्हणायचे की पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचं काहीही स्थान नाही. ते गंमतीत असंही म्हणायचे, “ठीक आहे, अपवाद म्हणून आम्ही तुम्हाला जागा देऊन देऊ.”

तुरुंगात असताना याह्या इस्रायलमधील वर्तमानपत्र वाचून अस्खलित हिब्रू बोलायला शिकले होते.

एहूद यारी म्हणतात की, त्यांना अरबी भाषा येते तरीही सिनवार त्यांना कायम हिब्रू भाषेत बोलायचा आग्रह करायचे.

एहूद यारी म्हणतात, “ते हिब्रू भाषेवर प्रभूत्व मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटतं की ते तुरुंगातील कर्मचाऱ्यांपैकी चांगलं हिब्रू बोलणाऱ्या कर्मचाऱ्याकडून त्यांना फायदे उकळायचे होते.

तुरुंगातून सुटका

2011 मध्ये जेव्हा कैद्याच्या अदलाबदलीचा करार झाला तेव्हा इस्रायलचा एक सैनिक गिलाड शालिट याच्या बदल्यात इस्रायलने 1027 पॅलेस्टिनी अरब कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला.

त्यात याह्या सिनवार यांचाही समावेश होता.

गिलाड शालिट यांचं अपहरण केल्यावर त्याला पाच वर्षं ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यांचं अपहरण करण्यात याह्या सिनवार यांच्या भावाचाही सहभाग होता. ते हमासचे ज्येष्ठ कमांडर आहेत. त्यानंतर याह्या यांनी आणखी इस्रायली सैनिकांचं अपहरण करण्याचं आवाहन केलं होतं.

तेव्हापर्यंत इस्रायलने गाझा पट्टीवरचा ताबा सोडून दिला होता आणि गाझाची सूत्रं हमासच्या हातात गेली होती.

हमासने निवडणुका जिंकल्यावर आपले विरोधक म्हणजे यासर अराफात यांच्या पक्षातील नेत्यांना ठार मारलं. अल-फतह च्या अनेक नेत्यांना तर अनेक उंच इमारतींवरून खाली ढकलून देण्यात आलं होतं.

मायकल सांगतात की जेव्हा याह्या सिनवार गाझाला परतले तेव्हा त्यांना नेता म्हणून तातडीने स्वीकारण्यात आलं. एखादा असा व्यक्ती ज्याने अनेक वर्षं इस्रायलच्या तुरुंगात व्यतित केले आहेत या प्रतिमेचाही त्यांच्या हमासचे संस्थापक होण्यात मोठा वाटा होता.

मात्र मायकल म्हणतात की, “लोक त्यांना घाबरायचे कारण त्यांनी स्वत: अनेक लोकांची हत्या केली होती. याह्या एका बाजूला अतिशय निर्दयी आणि आक्रमक नेते होते मात्र ते अतिशय प्रभावशाली होते.”

एहूद यारी म्हणतात, “ते फार चांगले वक्ते नव्हते. जेव्हा ते लोकांना संबोधित करायचे तेव्हा असं वाटायचं की गर्दीतून कोणीतरी व्यक्ती बोलत आहे.”

एहूद यारी सांगतात की, तुरुंगातून सुटल्यावर लगेच सिनवार यांनी इज्जेदीन अल-कसाम ब्रिगेड आणि या संघटनेच्या चीफ ऑफ स्टाफ मारवान इस्सा यांच्याबरोबर हातमिळवणी केली होती.

खान युनूसचा ‘कसाई’

2013 मध्ये याह्या यांची गाझा पट्टीतील राजकीय ब्युरोचा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि 2017 मध्ये ते त्याचे प्रमुख झाले.

याह्या सिनवारचे छोटे भाऊ मुहम्मदही हमासमध्ये मोठ्या पदावर काम करू लागले. 2014 मध्ये त्यांची हत्या झाली. त्यांना मृत घोषित करण्याआधी इस्रायलने अनेकदा त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता पण ते बचावले.

त्यानंतर प्रसारमाध्यामांतील अनेक बातम्यांमध्ये दावा केला की, मुहम्मद अजून जिवंत आहेत आणि लष्करी विभागात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुहम्मद यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की, ते गाझातील भूयारात लपले आहेत आणि 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असावी.

अत्यंत क्रूर आणि हिंसक पद्धतींमुळे सिनवार यांना खान युनूस भागाचा ‘कसाई’ असं म्हटलं जायचं.

यारी म्हणतात, “ते अत्यंत कडक शिस्तीचे होते. हमासच्या लोकांना माहिती होतं की, जर सिनवारचं ऐकलं नाही तर आयुष्य पणाला लागू शकतं.”

2015 मध्ये हमासचे कमांडर महमूद इश्तिवी यांना नजरकैदेत ठेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना ठार मारण्यातही सिनवार यांचा हात होता असं म्हटलं जातं. महमूद इश्तिवी यांच्यावर समलैगिक असल्याचा आणि पैशाची अफरातफर केल्याचा आरोप होता.

2018 मध्ये अमेरिकेने त्यांचा दुतावास तेल अवीवहून जेरुसलेमला नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी बोलताना याह्या सिनवार म्हणाले की, याच्या विरोधात हजारो पॅलेस्टिनींबरोबर इस्रायलच्या सीमेवर असलेले कुंपण तोडून इस्रायलमध्ये घुसण्याला त्यांचा पाठिंबा आहे.

त्याचवर्षी त्यांनी दावा केला की, पश्चिम किनाऱ्यावर सत्ता गाजवणाऱ्या आणि हमासचे शत्रू असलेल्या पॅलेस्टिनी प्राधिकरणाने त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते बचावले.

असं असलं तरी, याह्या यांनी अनेकदा अत्यंत व्यावहारिक भूमिका घेत इस्रायलबरोबर युद्धविराम, कैद्यांची अदलाबदली, आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाबरोबर जुळवून घेण्याचं समर्थन केलं होतं. या भूमिकेमुळे याह्या फारच मवाळ झाले असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं होतं.

इराणशी जवळीक

इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेशी संबंधिक अनेकांच्या मते, कैद्यांची अदलाबदल करताना याह्या सिनवार यांना सोडणं ही मोठी चूक होती.

हमासला आर्थिक प्रोत्साहन दिलं आणि काम करण्याचा परवाना मोठ्या प्रमाणावर वाटला तर इस्रायल सुरक्षित राहील त्याचप्रमाणे ते इस्रायलशी युद्ध करणं टाळतील असं इस्रायलला वाटलं आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली. ती चूक होती हे वारंवार सिद्ध झालंच आहे.

एहूद यारी म्हणतात की, “याह्या सिनवार स्वत:ला अशा रुपात पहात होते की, जणू त्यांचा जन्म पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच झाला आहे. त्यांचा गाझा पट्टीतील आर्थिक स्थिती सुधारण्याचा आणि सेवा सुधारण्याचा त्यांचा काहीही इरादा नाही. त्यांचा तो उद्देशच नव्हता.”

2015 मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अधिकृतरित्या याह्या सिनवार यांना ‘विशेष नामांकित जागतिक दहशतवादी’ अशा वर्गवारीत टाकलं होतं. मे 2021 मध्ये इस्रयलाच्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीतील याह्या यांचं घर आणि ऑफिस यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. एप्रिल 2022 मध्ये टीव्हीवर प्रसारित झालेल्या एका भाषणात याह्या यांनी सर्व प्रकारे इस्रायलवर हल्ला करण्यास उद्युक्त केलं होतं.

विश्लेषकांच्या मते याह्या हे हमासचा राजकीय ब्युरो आणि त्यांची सशस्त्र शाखा इज्जेदीन अल-कसाम ब्रिगेड यांना जोडणारा महत्त्वाचा धागा होता. अल-कसाम ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करण्यात आला होता.

14 ऑक्टोबर 2023 ला इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हॅख्त यांनी याह्या सिनवार यांना ‘राक्षसाचा चेहरा’ असं संबोधलं होतं. ते म्हणाले होते, “ती व्यक्ती आणि त्यांची पूर्ण टीम हे आमचं लक्ष्य आहे. आम्ही त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचणार.”

याह्या सिनवार इराणचे निकटवर्तीय होते. एखादा शिया प्रदेश आणि सुन्नी अरब संघटना यांच्यातली भागीदारी म्हणजे काही साधी बाब नाही. मात्र दोघांचं उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे इस्रायलचं अस्तित्व मिटवणं आणि जेरुसलेमला इस्रायलच्या ताब्यातून सोडवणं.

इराण आणि याह्या सिनवार एकमेकांशी ताळमेळ साधून काम करायचे. आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी, हजारो रॉकेट गोळा करण्यासाठी आणि त्याचा वापर हमास, इस्रायली शहरांना लक्ष्य करण्यासाठी करता येईल म्हणून इराण हमासला पैसे देतो आणि त्यांच्या सैनिकांना प्रशिक्षण देतो.

2021 मध्ये एका भाषणादरम्यान याह्या सिनवार यांनी इराणने केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानले. ते म्हणाले होते की, “जर इराणने मदत केली नसती तर पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य मोहिमेत आज जी ताकद आहे ती नसती.”

हमाससाठी भूकंपासारखा धक्का

याह्या सिनवार यांचा मृत्यू हमाससाठी एखाद्या भूकंपाच्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

ऑगस्टमध्ये इस्माल हानिया यांच्या मृत्यूनंतर सिनवार यांची निवड केली तेव्हा तो एक चांगला निर्णय होता. कारण सिनवारसारख्या व्यक्तीची निवड म्हणजे कोणत्याही परिस्थितीत इस्रायलशी तडजोड करणार नाही हाच संदेश होता.

त्यामुळे गेल्या वर्षभरापासून गाझा पट्टीचा सर्वनाश करणाऱ्या इस्रायली लष्करी मोहिमेची समाप्ती करण्यासाठी तडजोड करण्याची हीच खरी वेळ आहे की, पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू होत असूनही इस्रायसलच्या धैर्याचा सहनशक्तीचा अंत होईपर्यंत लढत रहायचं याचा निर्णय हमासला घ्यावा लागेल

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की, गाझामध्ये 90 टक्के युद्धबंदी झाली आहे. सिनवार यांची हत्या म्हणजे ही मोहीम पूर्ण करण्याचा आणि ओलिसांना सोडवण्याची संधी असू शकते.

मात्र त्यात एक धोकाही आहे. सिनवार यांच्या मृत्यूमुळे हमास युद्धविरामापासून कधीही माघार घेऊ शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)