You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायल - हमास युद्धाच्या मध्यस्थीतून कतारची माघार
- Author, जो इनवूड आणि रुश्दी अबालौफ
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, जेरुसलेम
कतारने इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या चर्चेतील मध्यस्थतेतून माघार घेतली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
जेव्हा हमास आणि इस्रायल दोघे चर्चेसाठी इच्छा दाखवतील तेव्हा मध्यस्थीचे काम पुन्हा करू, असं कतारने म्हटलं आहे.
पॅलेस्टिनने गाझामधील युद्ध संपवण्याचा नवा प्रस्ताव नाकारल्याचा आरोप झाल्यानंतर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापुढे आम्ही कतारमध्ये हमासच्या प्रतिनिधींची उपस्थिती स्वीकारणार नाही, असं सांगितल्याचं वृत्त आहे.
मध्यस्थी करण्यातून माघार घेतल्याचं आणि हमासचे दोहामध्ये कार्यालय असण्याचा हेतू पूर्ण होत नाही असं म्हटल्याचं वृत्त अयोग्य आहे, असं कतारने म्हटलं आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले, "कतारने 10 दिवसांपूर्वी झालेल्या मध्यस्थीच्या शेवटच्या प्रयत्नात इस्रायल आणि हमासला सांगितलं आहे की, जर या फेरीत करार झाला नाही, तर कतार मध्यस्थी करण्याचे प्रयत्न थांबवेल."
"इस्रायल आणि हमास हे क्रूर युद्ध संपवण्याची इच्छा आणि गांभीर्य दाखवतील तेव्हा कतार मध्यस्थीचे प्रयत्न पुन्हा सुरू करेल," असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.
बराक ओबामा यांच्या प्रशासनाच्या प्रयत्नानंतर 2012 पासून कतारची राजधानी दोहात हमासचे कार्यालय आहे, असं सांगितलं जातं.
शनिवारी अनेक माध्यमांनी वृत्त दिलं की, युद्ध थांबवण्याच्या प्रस्तावावर वाटाघाटी करण्यास नकार दिल्याने दोहातील हमास कार्यालय बंद करण्याचं आश्वासन कतारने अमेरिकेला दिलं.
दुसरीकडे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं. हमासच्या अधिकाऱ्यांनीही असं काही झाल्याचे दावे फेटाळले आहेत.
कतार हा छोटा देश आहे, मात्र प्रभावशाली आखाती देश आणि या भागातील अमेरिकेचा प्रमुख सहयोगी अशी त्याची ओळख आहे. त्यामुळेच येथे अमेरिकेचा एक प्रमुख हवाई तळ आहे. कतारने इराण, तालिबान आणि रशियासह अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये राजकीय वाटाघाटी करण्यात भूमिका निभावली आहे.
कतारने अमेरिका आणि इजिप्तच्या बरोबरीने गाझामधील इस्रायल आणि हमास यांच्यात एका वर्षाहून अधिक काळ सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
हमासचे नेते याह्या सिनवार यांच्या हत्येनंतर हमासने दोहामध्ये दोन तासांची एक छोटी शोकसभा आयोजित केली होती. विशेष म्हणजे त्याआधी हमास नेते इस्माईल हानिये यांची शोकसभा मोठ्या सुरक्षा व्यवस्थेसह तीन दिवस झाली होती.
हमासने अल्पकालीन युद्धविराम प्रस्ताव नाकारल्याने ऑक्टोबर महिन्यात झालेली चर्चेची फेरी अयशस्वी ठरली. हमासने नेहमीच पूर्णपणे युद्धविराम आणि गाझामधून इस्रायली सैन्याच्या पूर्ण माघारीची मागणी केली आहे.
दोहामधील हमासच्या कार्यालयाबाबतचे माध्यमांनी दिलेले वृत्त चुकीचे आहेत, असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
"कतारमधील कार्यालयाचा मुख्य उद्देश चर्चेचं माध्यम हा आहे. या माध्यमानं मागील काळात युद्धविराम करण्याचं योगदान दिलं आहे," असं निवेदनात म्हटलं आहे.
इस्रायलनेही युद्धविराम करण्याचे प्रस्ताव नाकारल्याचा आरोप होत आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवलं. यानंतर काही दिवसांनी गॅलंट यांनी नेतन्याहू त्यांच्या सुरक्षा प्रमुखांच्या सल्ल्याविरुद्ध जाऊन शांतता करार नाकारत असल्याचा आरोप केला.
बायडन यांच्या सरकारचा कार्यकाळ जानेवारीत संपत आहे. त्याआधी इस्रायल आणि हमास यांच्या शांतता करार व्हावा यासाठी बायडन प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठीच बायडन प्रशासन हमासला कतारमधून बाहेर जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण करून दबाव तयार करत आहे.
हमासला दोहामधील कार्यालय बंद करण्यास भाग पाडलं गेलं, तर त्यांचं नवं कार्यालय कोठे असेल हे अद्याप स्पष्ट नाही. हमासकडे कार्यालयासाठी मित्र राष्ट्र असलेला इराणचा एक पर्याय आहे.
मात्र, जुलै महिन्यात तेहरानमध्येच हमास नेते इस्माईल हनीयेह यांची हत्या झाल्याने तेथे हमासला इस्रायलकडून धोका असू शकतो. दुसरीकडे इराणमध्ये कार्यालय असल्याने त्यांना पाश्चिमात्य देशांशी निकटवर्ती असलेल्या देशांच्या मध्यस्थीप्रमाणे उपयोग होणार नाही.
या पार्श्वभूमीवर हमाससाठी अधिक संभाव्य पर्याय तुर्कीचा असेल. तुर्की नाटो सदस्य आहे आणि सुन्नी बहुसंख्य देश आहे. त्यामुळे तुर्कीत हमासला आधार मिळू शकतो. तुर्कीतून काम करणं तुलनेने हमाससाठी अधिक सुरक्षित असेल.
एप्रिल महिन्यात तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी इस्तंबूलमध्ये हमासचे तत्कालीन राजकीय प्रमुख इस्माईल हानिये आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले होते. यावेळी एर्दोगान यांनी गाझाला पुरेशा आणि अखंडित मानवतावादी मदतीवर भाष्य केलं. तसेच निष्पक्ष आणि चिरस्थायी शांतता प्रक्रिया सुनिश्चित करण्यावरही मत व्यक्त केलं होतं.
हमासने तुर्कीत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचं तुर्कीकडूनही स्वागत होऊ शकतं. कारण तुर्कीने स्वतःला पूर्व आणि पाश्चिमात्य जगातील मध्यस्थ म्हणून स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
माध्यमांमध्ये नेहमीच दिसणारे ओसामा हमदान, ताहेर अल-नुनु आणि इतर हमासचे प्रमुख नेते एका महिन्यापेक्षा जास्त काळ इस्तंबूलमध्ये राहिले आहेत.
याआधी या नेत्यांच्या भेटी खूपच कमी कालावधीच्या असायच्या. मात्र सध्या हमास नेत्यांकडून होत असलेल्या दीर्घकालीन तुर्कस्तान भेटी सूचक आहेत.
चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हमासचे दोन नेते मारले गेले. जुलैमध्ये हानिये यांचा मृत्यू झाला आणि ऑक्टोबरमध्ये याह्या सिनवार यांचा मृत्यू झाला. यानंतर हमाससाठी त्यांच्या नेतृत्वाची वैयक्तिक सुरक्षा आता एक मोठी चिंता बनली आहे. दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यामागे याह्या सिनवार यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप इस्रायलने केला होता.
युरोपियन कौन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सच्या मते, "भविष्यात इस्रायलकडून पुन्हा हमास नेतृत्वावर हल्ला होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून हमासने सामूहिक नेतृत्वाचा तात्पुरता पर्याय स्वीकारला आहे."
“कतारमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांपासून ज्याप्रमाणे हमास नेत्यांना संरक्षण मिळते तसे कोठेही मिळणार नाही. येथे अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे," रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमधील (रुसी) वरिष्ठ सहयोगी फेलो एच ए हेलियर यांनी बीबीसीला सांगितले.
इस्रायली सरकारने युद्ध संपवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे अमेरिकन अधिकारी हताश झाल्याचे दिसत आहेत. अशातच कतारने हमासबाबत ही भूमिका घेतली आहे.
ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी सांगितले की, इस्रायलने 12 नोव्हेंबरपर्यंत अधिक मानवतावादी मदतीला परवानगी दिली नाही, तर त्यांना या धोरणाच्या परिणामांना सामोरं जावं लागेल.
मागील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या अनेक अधिकाऱ्यांनी उत्तर गाझामधील परिस्थिती विनाशकारी असल्याचा इशारा दिला होता. दुसरीकडे शनिवारी स्वतंत्र दुष्काळ पुनरावलोकन समितीने या क्षेत्रात दुष्काळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
गाझामधील युद्धाच्या काळात अमेरिकेवर पॅलेस्टिनींसाठी मानवतावादी मदत पोहचवण्यासाठी, परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्यासाठी दबाव वाढल्याने जो बायडन आणि नेतन्याहू यांच्यातील संबंध बिघडले आहेत.
असं असलं तरी, वाटाघाटीचे अमेरिकेचे प्रयत्न घातक ठरले आहेत, असा आरोप डॉ. हेलियर यांनी केला.
“बायडन प्रशासनाने आधी युद्धाबाबत मर्यादा ठरवून दिली. नंतर नेतन्याहू यांना ती मर्यादा ओलांडू दिली आणि त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यातून बायडन प्रशासनाने अशा कृत्यांना प्रोत्साहन दिलं. आता त्यांच्या उर्वरित 10 आठवड्यांच्या कार्यकाळात यापैकी काहीही स्थिती बदलेल असे मला वाटत नाही,” असं मत हेलियर यांनी व्यक्त केलं.
नेतन्याहू आणि त्यांच्यासोबत युतीत असलेल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी युद्धविरामाचा प्रस्ताव वारंवार नाकारला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील आगामी ट्रम्प सरकारबाबत ते उत्साही आहेत.
ट्रम्प या युद्धावर नेमकी काय भूमिका घेतील हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, ट्रम्प इस्रायलला त्याच्या अटींवर काम करण्यास परवानगी देण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प यांनी याआधी म्हटलं आहे की, इस्रायलने गाझामध्ये सुरू केलेली मोहीम पूर्ण करावी. ट्रम्प याआधी अध्यक्ष असताना शेवटच्या काळात त्यांनी इस्रायलला अनुकुल निर्णय घेतले होते. यात अमेरिकन दूतावास जेरुसलेममध्ये हलवण्याच्या निर्णयाचाही समावेश होता.
असं असलं तरी, ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हे युद्ध संपवायचं आहे, असं नेतन्याहू यांना सांगितल्याचंही वृत्त आहे.
एकूणच सध्याच्या बायडन प्रशासनाचा सध्या इस्रायल सरकारवर प्रभाव कमी असेल, असंच दिसत आहे. त्यामुळेच बायडन प्रशासन हमासवर दबाव वाढवून शांतता करार करण्यावर भर देताना दिसत आहे. हे सर्वस्वी कतारच्या भूमिकेवर अवलंबून आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)