You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील किमान 73 जणांचा मृत्यू, हमासच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती
- Author, सोफिया फरेरा सँटोस
- Role, बीबीसी न्यूज
इस्रायलने उत्तर गाझामधील बीट लाहिया शहरात केलेल्या हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 73 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती हमास संचलित गाझातील प्रशासनाने दिली आहे.
या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्री झालेल्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेक लोक उद्ध्वस्त इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत.
या हल्ल्यानंतर इस्रायलने या वृत्ताबाबतची माहिती तपासत असल्याचं सांगितलं. तसेच हमासच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी अतिशयोक्तीपूर्ण आहे आणि इस्रायल सैन्याच्या माहितीशी जुळत नसल्याचं म्हटलं.
या भागातील दळणवळण आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्याने सध्या बीट लाहियामधील मदत कार्यात अडथळे येत आहेत, अशी माहिती गाझातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
इस्रायलने गर्दीच्या रहिवासी भागात हल्ला केला. यात 73 लोक मारले गेले, अशी माहिती गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने दिली. मात्र, बीबीसी स्वतंत्रपणे या आकडेवारीची पडताळणी करू शकत नाही.
पॅलेस्टिनी न्यूज एजन्सी वाफाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात संपूर्ण निवासी संकुल उद्ध्वस्त झाले आहे.
इस्रायलच्या सैन्याने (आयडीएफ) बीबीसीला सांगितलं की, त्यांनी हमासच्या दहशतवादी अड्ड्याला लक्ष्य केलं आहे आणि नागरिकांना इजा होऊ नये म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.
हमास अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात सांगितलेला मृतांचा आकडा अतिशयोक्ती आहे. आधीच्या घटनांवरून अशा माहितीच्या स्रोतावर विश्वास ठेवता येणार नाही, असं इस्रायल सैन्याने म्हटलं आहे.
इस्रायलने ऑक्टोबरच्या सुरुवातीला उत्तर गाझामध्ये नव्या लष्करी रणनीतीसह आक्रमण सुरू केलं. तसेच ते हमासला या भागात पुन्हा एकत्र येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही म्हटलं.
इस्रायली सैन्याने शुक्रवारी (18 ऑक्टोबर) दाट लोकवस्ती असलेल्या जबलिया भागाला वेढा घातला आणि हल्ला केला. यात शहरी निर्वासित शिबिराचाही समावेश आहे. या हल्ल्यात किमान 33 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
गेल्या काही आठवड्यांत या भागात अक्षरशः कोणतीही मदत पोहोचलेली नाही, असा इशारा मानवतावादी गटांनी दिला आहे. इस्रायलच्या स्वतःच्या आकडेवारीवरूनही असंच दिसून आलं आहे की, सप्टेंबरमधील याच कालावधीच्या तुलनेत सध्या संपूर्ण गाझाला मिळणारी मदत कमी झाली आहे.
यूएनचे वरिष्ठ मानवतावादी अधिकारी जॉयस मसुया शनिवारी (19 ऑक्टोबर) म्हणाले की, उत्तर गाझामधील पॅलेस्टिनी लोक सांगूही शकत नाहीत अशा भयानक स्थितीत जगत आहेत. हा अत्याचार थांबला पाहिजे.
इस्रायलने उत्तर गाझाच्या काही भागांची नाकेबंदी केली आहे, अशी माहिती इस्रायलचे मंत्री अमिचाई चिकली यांनी बीबीसीला दिली.
"आम्ही सामान्य नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची परवानगी दिली आणि नाकेबंदी केलेल्या या भागात पुरवठा रोखला," अशी माहिती चिकली यांनी न्यूजहावर या कार्यक्रमात दिली. यावेळी त्यांनी आयडीएफने स्थानिक लोकांना उत्तर गाझातून बाहेर पडण्याबाबत दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख केला.
इस्रायलने उचललेली पावलं आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कायदेशीर आहेत, असा दावाही चिकली यांनी केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)