You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गाझाची ती नर्स जिने बॉम्बस्फोटानंतरची परिस्थिती फोनवर रेकॉर्ड केली
- Author, जेरेमी बॉवेन
- Role, आंतरराष्ट्रीय संपादक, बीबीसी न्यूज
गाझाच्या नागरिकांना कोणत्या मर्यादेपर्यंत अडचणींचा सामना करावा लागतोय, याचा बाहेरून अंदाज बांधणं अतिशय कठीण आहे.
सोमवारी (21 ऑक्टोबर) जबालिया भागातला एक व्हीडिओ समोर आला आहे. त्यातून इस्रायलच्या हल्ल्यांबाबत अस्वस्थ करणारी माहिती समोर आली आहे. यात नागरिकांवर दबाव आणि दहशतवादाच्या असंख्य कहाण्यांचा समावेश आहे.
हे पाहताना तुम्हालाच प्रत्यक्षदर्शी असल्यासारखं वाटू शकतं.
(सूचना - या बातमीतील काही मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.)
या व्हीडिओमध्ये तेथील रुग्णालयात मरणशय्येवरील जखमी आणि दु:खी लोकांचं भयानक दृश्य दिसतं.
ढिगाराख्याली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि मृतदेहांना बाहेर काढण्यासाठीच्या प्रयत्नांबरोबरच इस्रायलच्या लष्कराने हल्ला केल्यावर भीषण झालेल्या भागात वाळू आणि ढिगाऱ्याने माखलेल्या रस्त्यावरून चालत जाणाऱ्या लोकांची दृश्यं दिसतात.
ही सगळी दृश्यं विदीर्ण करणारी आहेत. सोमवारी (21 ऑक्टोबर) ला सकाळी जबालियावर झालेला हल्ल्यानंतर आलेला एक व्हीडिओसुद्धा तितकाच भीषण होता.
ती घटना इतकी हृदयद्रावक होती की बहुतांश लोक ती फोनवर रेकॉर्डसुद्धा करू शकणार नाहीत. युद्धाचं वार्तांकन करताना हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे.
21 ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता जबालिया बॉईज एलिमेंट्री स्कूलवर हल्ला झाला. निर्वासितांसाठी काम करणाऱ्या UNWRA ने या शाळेत पॅलेस्टाईनच्या निर्वासितांना आश्रय दिला होता.
या व्हीडिओत नेवीन अल दवाबी नावाची एक पॅरामेडिक अतिशय घाबरलेली दिसत आहे. जखमी अवस्थेतील लोक तसेच, आजूबाजूला मृतदेह पडलेले असताना त्या ठिकाणी ती सैरावैरा धावत आहे. तसंच हल्ला झाल्यानंतरची दृश्यं रेकॉर्डसुद्धा करत आहे.
गाझा शहरात तिचा शोध घेण्यात आम्हाला यश आलं आहे आणि नेवीननने तिच्यासोबत घडलेली परिस्थिती बीबीसीला सांगितली.
‘रक्त थांबवण्यासाठी माझ्याकडे काहीही नव्हतं’
नेवीन गंभीर जखमी झालेल्या एका रक्तबंबाळ बाईवर ओरडते आहे, “शांत रहा. मी शपथ घेऊन सांगते, रक्त थांबवण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही.”
ती खाली जाणाऱ्या रस्त्याकडे धावत जाते. तिथे आणखी जखमी लोकांची रीघ लागली आहे. ती वळते, आपली बॅग उचलते आणि म्हणते, “निघा इथून नाहीतर आणखी लोक मारले जातील.”
व्हीडिओमध्ये एका माणसाचा आवाज ऐकू येतो, “आमच्याबरोबर थांब नेवीन.”
जखमेवर लावायच्या पट्ट्यांची बॅग घेऊन ती पुन्हा जिन्याकडे धावते. तिथे जिन्यावर रक्त वाहत असतं. तिथे एका मुलीचा आवाज ऐकू येतो. तो मदतीची याचना करत असतो, “माझी बहीण मरत आहे, माझी मदत करा.”
एक महिला म्हणते की 'माझी मुलं वारली', नेवीन विचारते की, 'तुम्हाला कसं कळलं'?
महिला इशारा करून सांगते, "हे पाहा एक मुलगा हालचाल करत नाहीये. दुसऱ्याच्या डोक्याला किती मोठी जखम झाली आहे. एकतर तो गेला असेल किंवा थोड्या वेळात जाईल."
नेवीन पट्ट्या देते मात्र तेव्हापर्यंत बराच उशीर झालेला असतो.
नेवीनने मला सांगितलं की, त्या महिलेचं नाव लीना इब्राहिम अबू नामोस आहे. बीबीसीच्या सहकारी पत्रकारांनी सांगितलं की त्यांना जबालियाच्या कमाल अदावान हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. त्यांना बॉम्बचे छर्रे लागले आहेत. त्यांची सातपैकी दोन मुलं मेली आहे, सगळ्यात मोठी मुलगा आणि एकुलता एक मुलगा.
ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी लीना इब्राहिम यांचा नवरा तिथे नव्हता. कारण आधी झालेल्या एका हल्ल्यात ते जखमी झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
लीना इब्राहिम म्हणतात, “मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीला मरताना पाहात होते. मी काहीही करू शकत नव्हते. ती माझी सर्वांत मोठी मुलगी होती. ती म्हणजे माझं पूर्ण आयुष्य होती. जेव्हा तुमचं सगळ्यात मोठं मूल तुमच्या डोळ्यादेखत मरतं...मी तिला वाचवू शकले नाही, मी सुद्धा जखमी झाले होते. मी स्वत:ला सांभाळू शकले नाही. मी खाली पडले. मग मी तिच्याकडे रांगत जाण्याचा प्रयत्न करू लागले.”
नेवीनने सांगितलं की, तिला तब्बल 16-17 दिवस शाळेत ‘घेरलं’ होतं. शाळेच्या वर ड्रोन आणि क्वाडकॉप्टर उडवले जात होती. त्याचा वापर इस्रायलचं लष्कर करतं.
या माध्यमातून इस्रायलचं लष्कर गुप्तहेराचं काम करतं. त्याचबरोबर लाऊडस्पीकर वरून घोषणा करून ज्या पॅलेस्टिनी व्यक्तींना मारू इच्छितात त्यांच्यावर गोळ्या किंवा बॉम्ब टाकण्याचं काम केलं जातं.
नेवीन म्हणते, “आम्ही भीतीच्या छायेत वावरतो आहोत. जेव्हा शाळेवर हल्ला झाला तेव्हा लोक मारले गेले आणि जखमी झाले. तिथे काहीही खायला प्यायला नव्हतं. तिथे जो पाण्याचा टँकर पाठवला जातो, तो इस्रायली लोकांनी उडवून दिला. तीन दिवसांआधी सकाळी एक ड्रोन शाळेवर आला आणि लाऊडस्पीकरमधून 10 वाजेपर्यंत शाळा रिकामी करण्याची घोषणा केली होती. आपण अतिशय धोकादायक क्षेत्रात आहोत म्हणून आपल्याला सुरक्षित ठिकाणी जावं लागेल.”
“आम्हाला एक तासाचा वेळ दिला गेला होता. आम्हाला आमचं सामान बांधायला सुद्धा वेळ मिळाला नाही. 10 मिनिटांनंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी आमच्यावर बॉम्ब टाकला. हा खूप मोठा नरसंहार होता. त्यात 30 लोक जखमी झाले आणि 10 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.
या व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे शाळेचा जिनाच रक्ताळलेला आहे असं नाही. नेवीन तिथून एका जखमी व्यक्तीकडे धावते. त्या व्यक्तीने आपल्या मानेवर हात ठेवला आहे आणि बॅगेला डोकं लावून वाकलेला आहे, त्याच्या मानेवर मोठी जखम झाली होती. नेवीन पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
ती जोरात ओरडली, “मदत करा, ते मेले, ते अबू मोहम्मद काका आहेत.”
तीन दिवसांनंतर एका पॅलेस्टिनी महिला पत्रकाराला गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयाबद्दल माहिती घेण्यासाठी काही प्रश्न पाठवले होते. मी त्यांना अबू मोहम्मद यांच्याबद्दलही विचारलं.
त्या म्हणाल्या, “ते माझे शेजारी होते. त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. एका मुलाचं तर अर्ध शीरच उडालं आहे.”
त्यांनी आमच्या (बीबीसी) वार्ताहराबरोबर बोलताना तो व्हीडिओ पुन्हा एकदा दाखवला.
“या व्हीडिओत मुलींच्या मृतदेहाचे तुकडे दिसत होते. माणसांना पोटात जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे आतडे बाहेर आले होते. एका दहा वर्षांच्या मुलीचे आतडे बाहेर आले होते. तिच्या आईच्या छातीला जखम झाली होती. तिचा मृत्यू झाला होता. काही महिला ज्या स्वत:चा बचाव करण्यासाठी लपत होत्या, त्या जखमी झाल्या. त्यातल्या काहींचा मृत्यू झाला. शाळेतल्या सफाई कर्मचाऱ्याच्या शरीराचे तुकडे झाले होते. 12 वर्षांच्या एका मुलीचा एक पायच शरीरापासून विलग झाला होता. त्याच पद्धतीने उत्तर गाझामधील बेत हानून शहरातून स्थलांतर करून इथे आसरा घेणारी एक महिला जखमी झाली होती. त्यांचं वय 35 ते 40 दरम्यान असावं.”
‘हमास आमचा बचाव करतंय’
शाळेवर हल्ला झाल्याच्या एक दिवस आधी जेव्हा इस्रायलच्या लष्कराचा हल्ली तीव्र झाला तेव्हा जेरुसलेममध्ये असलेले संयुक्त राष्ट्रांचे एक ज्येष्ठ मुत्सद्दी टॉर वेनेसलँड यांनी एक निवेदन जारी केलं.
ते म्हणतात, “गाझामध्ये विध्वंस आणखी तीव्र झाला आहे. या संघर्षात गाझापट्टीतील उत्तर भागात भयंकर दृश्य समोर येत आहेत. इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत आहेत आणि अभूतपूर्व मानवी संकट निर्माण झालं आहे.”
“गाझामध्ये कोणीही सुरक्षित नाही. नागरिकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हे युद्ध थांबायला हवं. ओलिसांना सोडायला हवं. पॅलेस्टिनी लोकांचं स्थलांतर बंद व्हायला हवं आणि नागरिकांना वाचवायला हवं. लोकांपर्यंत मदत विनासायास पोहोचायला हवी.”
इस्रायलने हे आत्मरसंरक्षण असल्याचं सांगितलं आहे आणि दावा केला आहे की त्यांचं लष्कर युद्धाच्या नियमांचं पालन करतं.
गेल्या एक वर्षापासून गाझामध्ये जवळजवळ रोज आणि सध्याच्या काळात लेबनॉनमध्ये नागरिक यासाठी मारले जात आहेत कारण हमास त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे, असं इस्रायलचं म्हणणं आहे.
इस्रायली लष्कराच्या या दाव्याबद्दल आम्ही नेवीन अल दबावीला विचारलं.
नेवीनचं म्हणणं होतं, “नाही. हमास नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापर करत नाहीये. ते आम्हाला वाचवतात, ते आमच्याबरोबर आहेत.”
इस्रायलच्या बहुतांश लोकांसाठी नेवीनची ही प्रतिक्रिया 21 ऑक्टोबरला सकाळी गाझाच्या लोकांवर झालेल्या भीषण हल्ला योग्य होता हे सांगण्यासाठी एक कारण होऊ शकतं. मात्र युद्धाशी निगडित गुन्ह्यांची प्रकरण हाताळणारे वकील प्रश्न विचारतील की हा हल्ला खरंच योग्य होता का?
युद्धाचे नियम सांगतात की, नागरिकांना प्रत्येक परिस्थितीत वाचवायला हवं आणि त्यांना होणारं नुकसान प्रत्येक परिस्थितीत हल्लेखोर सैन्याला होणाऱ्या धोक्याच्या प्रमाणात असायला हवं.
जर तिथे हमासचे कमांडर उपस्थित असतील किंवा एखाद्या युद्धासाठी गोळा होत असतील इस्रायलच्या वकिलांकडून हे पाऊल योग्यच होतं असं सांगितलं जाऊ शकतं.
मात्र हमासचे काही लोक तिथे होते आणि तेव्हा हल्ला झाला असेल तर हे कायद्याचं उल्लंघन आहे. गेल्या एक वर्षांत इस्रायलच्या हल्ल्यामुळे हमासची लढण्याची शक्ती फारच क्षीण झाली आहे.
हे प्रकरण कोर्टात गेलं तर पॅलेस्टाईनचे वकील म्हणू शकतात की त्यावेळी इस्रायलच्या लष्कराला असा कोणताही धोका नव्हता की 30 नागरिक जखमी आणि काही लहान मुलांसह 10 लोकांना मारलं जाण्याचं समर्थन होऊ शकेल.
इस्रायल पत्रकारांना थांबवत आहे
मला नाईलाजाने असं म्हणावं लागतंय कारण हा सगळा प्रकार जिथे घडला आहे त्या जबालियामध्ये प्रत्यक्षदर्शींशी बोलून लिहायला हवं होतं. मात्र मी ते जेरुसलेममध्ये बसून लिहितोय.
जर घटनास्थळी वार्ताहरांना जायला बंदी घातली तर सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांना कायमच अडचणी येतील.
जेव्हा इस्रायलवर हल्ला झाला तेव्हा इस्रायलने गाझाजवळ असलेल्या इस्रालच्या वस्त्यांमध्ये जाण्याची परवानगी दिली होती.
जेव्हा इस्रायली लोकांच्या मृतदेहांना बाहेर काढत होते तेव्हा मी कफार अज्जा किबुत्ज येथे होतो. जिथून गोळीबार होत होता त्या इमारतीचीं सैनिक चाचपणी करत होते. हमासने इस्रायलच्या 1200 नागरिकांची कशी हत्या केली आणि कसं 250 जणांना ओलीस ठेवलं हे त्यांना पत्रकारांना दाखवायचं होतं. यात बहुतांश नागरिकांचा समावेश होता.
इस्रायलने गाझामध्ये जे केलं त्याचे पुरावे ढीगाने दिसत आहेत पण पत्रकारांनी ते पहावं असं त्यांना वाटत नाही. म्हणूनच ते आम्हाला त्या भागात जाऊ देणार नाहीत. यदाकदाचित जाऊ दिलं तर लष्कराच्या निगराणीखाली जावं लागेल.
मी युद्धाच्या पहिल्या महिन्यात गाझाला गेलो होतो. इस्रायल लष्कराच्या कारवाईमुळे उत्तर गाझा भाग उद्ध्वस्त झाला होता.
त्यामुळे गाझाच्या पॅलेस्टिनी लोक जे व्हीडिओ करतात, पत्रकार त्यावर विश्वास ठेवतात.
त्याशिवाज गाझामध्ये जाण्याची परवानगी असलेले आंतरराष्ट्रीय राजनैतिक अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि मदतकार्य करणारे कर्मचारी नेवीन सारखे स्मार्टफोन मध्ये गोष्टी रेकॉर्ड करणाऱ्या लोकांवर पत्रकार विश्वास ठेवतात.
तिकडे हॉस्पिटलमध्ये लीना इब्राहिम अबू नामोस आपली मोठी मुलगी आणि आपल्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे शोकमग्न आहे. त्यांचं घरही उद्धवस्त झालं आहे.
त्या म्हणतात, “माझी सात मुलं होती. आता फक्त पाच राहिलेत. काय सांगू मला काही सूचत नाहीये. खुदा कसम त्यांनी आमच्या हृदयाची चाळण केली आहे. आम्ही थकलो आहे. भावनिकदृष्ट्या रिते झालो आहोत. आम्ही सगळं गमावून बसलो आहोत, मुलांनी काय गुन्हा केला होता. त्यांनी काय केलं होतं? आम्ही काय केलं होतं की आमच्याबरोबर असं झालं?”
“आम्ही इस्रायलच्या लोकांचं काय वाकडं केलं? शपथ सांगते, त्यांनी आमच्या मुलांना उद्धवस्त केलं आहे.” त्या म्हणाल्या.
“मी खूप घाबरले आहे, मी काहीही खाऊ पिऊ शकत नाहीये. मला फक्त एवढं वाटतं की माझी मुलं माझ्याबरोबर राहावीत कारण आम्ही घाबरलो आहोत आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. माझ्या मुली आणि माझ्यासाठी आता काय उरलं आहे? घर नाही, कुठे सुरक्षित जागा नाही. काहीही नाही. जी लोक कुठेही जाऊ शकत नाही, जे लोक कुठेच सुरक्षित नाही मी त्यांच्यापैकी एक आहे. मी थकून गेली आहे.” त्या पुढे म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)