महाराष्ट्रात कुठे उष्णतेच्या लाटा, तर कुठे पावसाच्या धारा; हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलाय?

उष्णता, उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं म्हणजे IMD ने वर्तवला आहे. त्यात महाराष्ट्राची स्थिती कशी असेल? इथे उष्णतेच्या लाटांची शक्यता किती आहे? या काळात किती पाऊस पडेल? हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

2025 मध्ये एप्रिल ते जून या कालावधीसाठीचा हवामानाचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागानं जाहीर केला आहे.

देशभरातल्या हवामानाचा विचार केला, तर दक्षिण भारताचा पश्चिम भाग आणि पूर्व भारतातील तुरळक ठिकाणं वगळता देशभरात इतर बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल, मे आणि जून महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहील. तसंच, उष्णतेच्या झळांची तीव्रता आणि कालावधी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर आणि पूर्व द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि वायव्य भारतातल्या मैदानी प्रदेशात बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या दिवसांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हिट स्ट्रोकच्या 22 केसेसची नोंद झालेली आहे.

यात बुलढाणामध्ये 3, गडचिरोलीत 4, लातूरमध्ये 2, नांदेड 1, नागपूर 3, नाशिक 1, उस्मानाबाद 1, पालघर 2, परभणी 1, रायगड 1, सांगली 1, ठाणे 1, वर्धा 1 इतक्या जणांना राज्यात मार्च महिन्यात 25 दिवसांत हिट स्ट्रोक आल्याची आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्रात कोणत्या भागात उष्णतेच्या लाटा?

राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्याचा काही भाग वगळून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटांचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.

या भागात उष्णतेच्या लाटांचा कालावधी 7-8 दिवसांपर्यंत असू शकतो. हा अंदाज तीन महिन्यांसाठीचा आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटांचा अंदाज सुद्धा देण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात पूर्व आणि मध्य भारतासह लगतच्या द्वीपकल्पीय भागात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र असतील आणि त्याचा कालावधी देखील जास्त असण्याची शक्यता आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

यामध्ये तर एप्रिल महिन्यातही पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व भागात उष्णतेच्या लाटांचा कालावधी नेहमीपेक्षा तीन ते पाच दिवसांनी जास्त राहील.

एप्रिल महिन्यात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, बंगाल आणि उत्तर भारताच्या पूर्व भागात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि कालावाधी जास्त राहील.

त्यामुळे वयोवृद्ध, मुलं आणि आधीच आरोग्याच्या समस्य असलेले व्यक्ती उष्माघाताला बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी उष्णतेच्या लाटा असताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

महाराष्ट्रात कुठे पाऊस हजेरी लावणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिलमध्ये पावसाचा अंदाजसुद्धा व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये एप्रिल 2025 मध्ये देशभरात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्याचा विचार केला तर एप्रिल महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

पण हा अंदाज फक्त एप्रिल महिन्यापुरता आहे. म्हणजे एप्रिल महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे कोकणातील हापूस आंब्यांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

काही ठिकाणी पाऊस असला तरी यावेळचा उन्हाळा सर्वाधिक तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे.

उष्णतेच्या लाटांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?

शरीराचं तापमान वाढल्यास रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. याचा परिणाम रक्तदाब कमी होतो. त्यामुळे शरीराकडे रक्त पुरवठा करण्यासाठी हृदयाला अतिरिक्त कष्ट पडतात.

यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्याचा परिणाम शरीराला खाज सुटणे किंवा पाय सुजणे, यासारखी सौम्य लक्षणं दिसू शकतात.

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

त्याचवेळी, अति घाम आल्याने शरीरातील पाणी, क्षार कमी होतात. आणि मुख्य म्हणजे शरीराचं संतुलन बिघडतं.

यात कमी रक्तदाब, थकवा येणे ही लक्षणे सुद्धा समाविष्ट आहेत. याशिवाय,

  • चक्कर येणे.
  • मळमळणे.
  • शुद्ध हरपणे.
  • गोंधळलेली अवस्था.
  • स्नायूंमध्ये पेटके येणे.
  • डोकेदुखी.
  • दरदरून घाम फुटणे.
  • थकवा जाणवणे.

ही लक्षणं जाणवतातच पण जर रक्तदाब खूपचं कमी झाला तर हृदयविकाराचा धोका वाढतो.

उष्माघाताचा सर्वाधिक धोका कोणाला आहे?

वयस्कर व्यक्ती किंवा दीर्घकालीन आजारी व्यक्ती जसं की हृदयविकार, असे लोक आपल्या शरीरावर उष्णतेचा ताण सहन करू शकत नाहीत.

ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांच्या शरीरातील पाणी लवकर कमी होऊ शकतं. तसेच या रोगाच्या गुंत्यामुळे रक्तवाहिन्या आणि घाम येण्याच्या क्षमतेत बदल होऊ शकतो.

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

लहान मुले देखील अधिक असुरक्षित असू शकतात. मेंदूचे आजार, जसे की स्मृतिभ्रंश झालेले लोक उष्णतेबद्दल अनभिज्ञ असू शकतात किंवा त्याबद्दल ते काहीचं करू शकत नाहीत.

जे लोक बेघर आहेत त्यांनाही उन्हाला सामोरं जावं लागतं. वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनाही जास्त तापमानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा लोकांनी उष्णतेची लाट असताना काळजी घ्यायला हवी.

उष्णतेच्या लाटेच्या वेळी कशी घ्यायची काळजी?

राज्यात उष्णतेच्या लाटा तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं सुद्धा कशी काळजी घ्यायची यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत.

  • शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे
  • ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, कोकम सरबतचं सेवन करावं
  • पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे, सूती व आरामदायक कपडे परिधान करा
उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

  • गरमीच्या तीव्रतेत शक्यतो सावली ठिकाणी राहा
  • उन्हात जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा
  • जलयुक्त फळे जसे की कलिंगड, काकडी, टरबूज खा
  • दिवसातून 2 वेळा आंघोळ केल्यानं शरीराला थंडावा मिळतो
  • उष्णतेच्या तीव्रतेनुसार कामाच्या वेळा ठरवा

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)