कडक उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊन चालणार नाही, 'या' गोष्टींकडेही लक्ष द्या

उष्णता, उष्माघात

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

उन्हाळ्यात पाणी कमी प्यायल्याने घशाला सतत कोरड पडणं, चक्कर आल्यासारखं होणं, डोळे लाल होणं किंवा लघवी पिवळसर होणं, यातलं एखादी गोष्ट तरी तुमच्याबाबत सतत घडत असेल, तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकते.

तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी आणि क्षार (Electrolytes) कमी झाल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम हाेऊ शकतात. या परिणामांना निर्जलीकरण (डिहायड्रेशन) म्हणतात.

डिहायड्रेशनची तीव्रता वाढली, तर जिवावरही बेतू शकतं, असं इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

सध्या उन्हाळा सुरू आहे आणि यादरम्यान आपल्याला सतत घाम येतो. या सततच्या घामामुळे शरीरातील केवळ पाण्याचं प्रमाण कमी होत नाही, तर त्यासोबत शरीरातील क्षारही कमी होतात.

आता तुम्ही म्हणाल, एसीमध्ये राहिल्यास असा काही घाम वगैरे येत नाही, तर कायम एसीमध्ये राहून नैसर्गिक तहान कमी होते. त्यामुळे तुमच्या शरीरावर विपरित आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असं आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगतात.

डिहायड्रेशनच्या समस्येबाबत बीबीसी मराठीनं सविस्तर जाणून घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी बातचित केली.

सध्या महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनच तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक जाणवतोय. काही ठिकाणी लोकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतोय.

वाढत्या तापमानात शरीराची योग्य काळजी घेतली गेली नाही, तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ करतात.

व्यायाम केल्यावर पाणी पिणाऱ्या महिला

फोटो स्रोत, getty images

डिहायड्रेशन कधी होतं?

  • जर तुम्ही प्रखर उन्हात फारकाळ राहिला असाल तर उष्माघातामुळे निर्जलीकरण होऊ शकतं.
  • तसेच एकूणच तापमान जास्त असेल तर याचा त्रास होतो.
  • तुम्हाला डायरिया किंवा एखादा आजार असेल तर तेव्हाही शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं
  • भरपूर दारू किंवा कॅफिनयुक्त पेयं प्याल्यास शरीरातलं पाणी कमी होतं
  • भरपूर व्यायाम केल्यावर घाम निघून गेल्यावर
  • भरपूर लघवी व्हावी यासाठी तुम्हाला औषधं देण्यात आली असली तरीही हा त्रास होऊ शकतो.

डिहायड्रेशनची लक्षणं स्वतः कशी ओळखायची?

  • एकदम तहानल्यासारखं वाटणं
  • गडद पिवळी आणि तीव्र वास येणारी लघवी होत असेल तर
  • नेहमीपेक्षा कमी लघवी होत असेल तर
  • चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर
  • दमल्यासारखं होत असेल कर
  • तोंड, ओठ, जीभ कोरडी पडली असेल तर
  • डोळे खोल गेले असले तर

अशी लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला डिहायड्रेशन झालं असल्याची शक्यता असते. अशावेळेस शरीरातून गेलेले पाणी आणि क्षार भरुन काढण्याचा प्रयत्न करावा आणि डॉक्टरांची मदत घ्यावी.

शरीरातलं पाणी कमी झाल्यावर काय होतं?

पाणी पिणे

फोटो स्रोत, Getty Images

शरीरातील पाणी कमी झालंय, हे कसं ओळखायचं, असा अनेकांना प्रश्न पडतो. याचं पहिलं लक्षण तर आपल्या लघवीतून दिसतं. लघवी पिवळसर होत असेल किंवा पाणी जास्तच कमी झाल्यास लघवीचा रंग लालसर असेल, तर मग शरीरातील पाणी कमी झालंय असा अर्थ होतो.

याबाबत डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, “सतत उन्हात फिरल्याने किंवा गरम भट्टीशेजारी काम केल्याने शरीरातील केवळ पाणीच कमी होत नाही, तर सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड आणि बायकार्बोनेट असे इतर क्षार (Electrolytes) यांचं प्रमाणही कमी होतं. हीच अवस्था दीर्घकाळ राहिली तर शरीरातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचं प्रमाणही कमी होतं.”

प्रौढ माणसाचे शरीर हे 60 ते 70 टक्के पाण्याने व्यापलेलं असतं.

डॉ. भोंडवे यांच्या मते, "पाण्याच्या या पातळीत मोठी तफावत निर्माण झाली, तर मात्र आपल्या शरीराच्या चयापचयावर परिणाम होतो. म्हणजे, जेवण केलेलं पचत नाही. तसंच, एखाद्या व्यक्तीला झटकेही येऊ शकतात. श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो."

उन्हाळा

फोटो स्रोत, ANI

एवढेच नाही, तर दीर्घकाळ अशी अवस्था राहिल्यास माणसाच्या श्वासोच्छवास आणि मेंदूवर परिणाम होऊन तो दगावण्याची भीतीही डॉ. भोंडवे व्यक्त करतात.

पाण्याच्या अभावामुळे त्वचा रुक्ष पडू लागते, असंही ते सांगतात.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, केवळ पाणी न प्यायल्यानेच डिहायड्रेशन होतं असं नाही, तर अतिसारामुळेही शरीरातील पाणी कमी होतं. अतिसाराच्या वेळी पाणी आणि क्षार यांचं प्रमाण कमी होतं.

शिवाय, उलट्या, घाम, मूत्र आणि श्वासोच्छवासाद्वारे शरीरातील क्षार कमी होतात, असंही जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

या स्थितीत व्यक्तीला सुस्ती, बेशुद्धी, खोलवर गेलेले डोळे, पाणी प्यावं न वाटणं अशी शरीराची अवस्था होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अशी अवस्था म्हणजे डिहायड्रेशनची गंभीर स्थिती असू शकते.

बाजारात मिळणाऱ्या ओआरएस पाकिटांमध्ये कोणते क्षार असतात?

ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स म्हणजे ओआरएसच्या पाकिटांमध्ये सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, सोडियम सायट्रेट आणि ग्लुकोज ही द्रव्यं असतात.

'फक्त पाणी पिऊन चालणार नाही'

डॉ. रेवत कानिंदे हे मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. ते सांगतात, "कडक उन्हाळ्यात तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास टाळायचा असेल, तर केवळ पाणी पिऊन चालणार नाही. पाणी इतर द्रव्यांचं सेवन करणं गरजेचं आहे."

डॉ. रेवत पुढे सांगतात की, "सध्याच्या कडक उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. पण तेवढ्यावर शरीराची तहान भागत नाही. शरीराची डिहायड्रेशनची अवस्था टाळण्यासाठी आपण सरबत, फळांचा ज्यूस, ताक, कोकम, निरा, उसाचा रस, मठ्ठा असे द्रवयुक्त पदार्थ थोडे मिठ टाकून प्यावे. नारळपाण्यानेही शरीराला फायदा होतो.

"उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे. साधारणपणे आपल्या शरीरात 70 टक्के भाग हा पाणीयुक्त असतो."

मात्र, शरीराला पाण्याच्या आश्यकता असते, म्हणून एकाचवेळी भरमसाठ पाणी पिणेही योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तहान लागल्यावर आठवणीने पाणी पिणे हा एकच उपाय आहे, असं तज्ज्ञ सल्ला देतात.

पाणी

फोटो स्रोत, Getty Images

"सध्या ऑफिस, घर, हॉटेल्स असं सगळीकडे एसीचा वापर वाढलाय. त्यामुळे आपली नैसर्गिक तहान कमी झालीय आणि आपण गरजेपेक्षा कमी पाणी पितो. पण अशा चुका टाळायाला हव्यात," असं डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

 "पाणी पिण्याची आठवण राहावी यासाठी आपण मोबाईलमधील अॅपची मदत घेऊ शकता. जेणेकरून दर तासाने थाेडे-थाेडे पाणी पिणं होईल आणि परिणामी शरीरातील पाणी पातळी योग्य राहील."
Getty Images
"पाणी पिण्याची आठवण राहावी यासाठी आपण मोबाईलमधील अॅपची मदत घेऊ शकता. जेणेकरून दर तासाने थाेडे-थाेडे पाणी पिणं होईल आणि परिणामी शरीरातील पाणी पातळी योग्य राहील."
डॉ. रेवत कानिंदे
वैद्यकीय अधिकारी, जे. जे. रुग्णालय मुंबई

आरोग्यविषयक जाणकार असंही सांगतात की, तहान लागली म्हणून एकाचवेळी अगदी दाेन-तीन ग्लास पिण्याचं टाळावं. सावकाश पाणी पिणे चांगले. एकाच वेळी जास्त पाणी पिल्यास नकळत पोटावर ताण येऊन भूक कमी होते.

डॉ. कानिंदे उन्हाळ्यातील आहाराबाबतही सल्ला देतात. त्यांच्या मते

  • उन्हाळ्यात बाहेरच तेलकट पदार्थ खाणं टाळावं. घरातून जेवण करून निघावं किंवा स्वत:चा डबा घेऊनच बाहेर पडावं.
  • लिंबूवर्गीय फळे ‘सी’ जीवनसत्त्वासाठी चांगली. कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षे, आंबा, डाळिंब, करवंद, जांभूळ यांचा आहारात समावेश करावा.
  • आवळा, कोकम, कैरी यांच्यातही ‘सी’ जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक असतात.

लहान मुलांच्या शरीरातील पाणी कमी झालं तर?

सध्या वाढलेली उष्णता जशी प्रौढ व्यक्तींसाठी त्रासदायक ठरतेय, तशीच लहान मुलांसाठीही. त्यात एप्रिल-मे महिन्यांमध्ये शाळांना सुट्ट्या असतात, त्यामुळे मुलं घरीच असतात. मग उन्हा-तान्हात खेळतात. अशावेळी उष्णतेचा त्यांना त्रास होण्याची शक्यताही वाढते.

मुलं एकदा खेळायला गेल्यानंतर त्यांच्या तहान-भूक लक्षात राहत नाही. हा अनुभव तुमच्या गाठीशीही असेल. मग आधीच उष्णता आणि त्यात पाणी न प्यायल्यास व्हायचे ते त्रास होण्यास सुरुवात होऊ शकते.

त्यामुळे पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी, असं फरिदाबादमधील अमृता हॉस्पिटलचे डॉ. हेमंत ताहिलरामानी सांगतात.

उन्हाळा

फोटो स्रोत, ANI

लहान मुलांमधील डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी डॉ. हेमंत ताहिलरामानी काही उपाय सूचवतात. त्यांच्या मते :

  • मुलांच्या पाणी पिण्याकडे पालकांनी दिवसभर लक्ष द्यावं. मुलं जेव्हा बाहेर खेळण्यासाठी जात असतील, तेव्हा त्यांच्यासोबत पाण्याची बाटली द्यावी. शक्यतो त्यांना थेट उन्हात खेळण्यास पाठवू नये.
  • कलिंगड, काकडी, संत्री आणि स्ट्रॉबेरी अशी पाणीदार फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
  • दिवसा 10 ते 4 वाजण्याच्या दरम्यान मुलांना उन्हात खेळायला पाठवणं टाळावं.
  • मुलांना शक्यतो सैल आणि फिकट रंगाचे कपडे घालावीत.
  • मुलांच्या शरीरातील पाणी फार कमी झालं तर त्यांना ताबडतोब ORS (Oral Rehydration Salts) द्यावे.

शरीरातील पाणी कमी होण्याची वेळच येऊ न देणे, यासाठी मुलांना कडक उन्हात जाऊ न देणे आणि पाणी पिणे हाच उत्तम उपाय असल्याचं डॉ. ताहिलरामानी सांगतात.