फक्त बरं वाटतं म्हणून खात जाणं किती धोकादायक ठरू शकतं? हेडॉनिक इटिंग म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओनूर एरेम
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
अन्नाबरोबरचं आपलं नातं हे शक्यतो गुंतागुंतीचं आणि बऱ्याचदा आरोग्यासाठी धोकादायक असं असतं.
आपलं पोट भरलेलं असलं तरीही उगाचंच खायचं म्हणून किंवा चांगल वाटतं, आनंद मिळतो म्हणून पोटात काहीतरी ढकलत राहायचं, असं तुमच्याबरोबर कधी घडतं का? जर तसं असेल तर तुम्ही खाण्याबाबतच्या एका सवयीच्या विळख्यात अडकले असू शकता. तज्ज्ञ या सवयीला 'हेडॉनिक इटिंग' (आनंद मिळतो म्हणून खाणे) असं म्हणतात.
अभ्यासक याचं वर्णन करताना, “खाण्याची अशी सवय ज्याची प्रेरणा किंवा त्यामागचं कारण भूक लागणं नसून, आनंद मिळवणं हे आहे,” असं म्हणतात.
या सवयीला' हेडॉन' या शब्दावरून 'हेडॉनिक इटिंग' असं नाव मिळालंय. हा एक ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ “आनंद” असा आहे. ग्रीक अख्यायिकांमध्ये 'हेडॉन' ही आनंदाची देवी म्हणून ओळखली जाते.
तसं पाहता सर्वसाधारणपणे आपण जे काही खात असतो, त्या सर्वाचाच आनंद मिळण्याशी कुठंतरी संबंध हा असतोच. पण कॅलरींची गरज नसतानाही खाणं म्हणजे हेडॉनिक इटिंग याचा संबंध शक्यतो समाजातील अशा वर्गाशी जोडला जातो, ज्यांना अन्न अगदी सहजपणे मिळतं आणि भुकेले किंवा उपाशी राहणं हे त्यांच्याबाबतीत अगदी दुर्मिळ असतं.
हेडॉनिक हंगर म्हणजे काय?
आपलं शरीर आहारातून मिळणारी उर्जा किंवा जे काही खाल्लेलं किंवा प्यायलेलं असतं त्यापासून मिळणाऱ्या कॅलरीजवर कार्य करत असतं. आपण मिळवलेल्या कॅलरीपेक्षा जास्त कॅलरी खर्च करत असतो, तेव्हा शरीराची प्रतिक्रिया म्हणून आपली भूक वाढते. त्याचं कारण म्हणजे आपल्या पोटातील हार्मोन्सची यंत्रणा. त्याद्वारे आपल्या मेंदूला पोट रिकामं असल्याचा संदेश मिळतो. याला साधारणपणे शारीरिक भूक असं म्हणतात.
त्याउलट “हेडॉनिक हंगर” ही आपल्याला शारीरिकदृष्ट्या भूक लागलेली नसते तेव्हाची स्थिती आहे. तेव्हा फक्त आनंद मिळण्याच्या उद्देशानं आपण काहीतरी खात असतो, असं शास्त्रज्ञ सांगतात.
“जवळपास प्रत्येक व्यक्तिलाच हेडॉनिक इटिंगची सवय असते. त्याचप्रमाणे प्रत्येकाचं एक विशिष्ट वर्तनही असतं आणि त्याचा उद्देश आनंद मिळवणं हा असतो,” असं मत, युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधील अॅपेटाइट अँड एनर्जीचे प्राध्यापक जेम्स स्टब यांनी मांडलं.
“काही लोकांसाठी अन्न हे इतरांच्या तुलनेत त्यांना अधिक आनंद देणारं असतं.”

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक स्टब पुढे म्हणाले की, "आनंदाशिवाय आपल्या खाण्याच्या सवयी भावना, तणाव कमी करणं, अस्वस्थ वाटणं अशा इतर बाबींशीही जोडलेल्या असतात. त्यामुळे शारीरिक भूक आणि आनंद मिळण्यासाठीची भूक म्हणजेच हेडॉनिक हंगर यांच्यातील फरक धूसर होत जातो.”.
पण, जेव्हा खाण्याच्या माध्यमातून आनंद मिळवायचा असतो तेव्हा असे लोक हिरव्या पालेभाज्या, सलाड किंवा कडधान्य असं काही खातात का? तर याचं उत्तर शक्यतो नाही असंच मिळतं.
“आपल्याला शक्यतो तेल, साखर आणि मीठ यांचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ अधिक आनंद देणारे वाटतात. कारण त्यातून अधिक ऊर्जा मिळते. हे अगदी नैसर्गिकरित्या घडतं,” असं युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलमधूल अॅपेटाइट अँड ओबेसिटी रिसर्च ग्रुपच्या संशोधक आणि व्याख्यात्या डॉक्टर बेथन मेड यांनी म्हटलं.
“आपण या पदार्थांमुळं मिळणारी ऊर्जा आणि ते खाल्ल्याने मिळणारा आनंद यामुळं या पदार्थांकडे आकर्षित होत असतो. पण त्यासाठी निर्माण झालेली भावना ही शारीरिक भूकेमुळं आहे की त्यामागं हेडॉनिक हंगर हे कारण आहे, यातील फरक ओळखणं मात्र कठीण आहे.”
लठ्ठपणाचा धोका
मीठ, साखर आणि तेल याचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ हे देखिल हेडॉनिक इटिंगला चालना मिळण्याचं एक कारण ठरू शकतात.
त्यामुळं अशाप्रकारे आनंद मिळण्याच्या उद्देशानं आरोग्यासाठी धोकादायक असणारे पदार्थ खाणं याचा मोठ्या प्रमाणावर लठ्ठपणाशी संबंध असतो.

फोटो स्रोत, Getty Images
“सध्याच्या काळात आपल्या आजुबाजुला अत्यंत चविष्ट, सहज उपलब्ध होणारे आणि 'रेडी टू इट 'असे अनेक प्रकारचे पदार्थ सहज उपलब्ध असतात,” असं प्राध्यापक स्टब्स म्हणाले.
“त्याचा परिणाम म्हणजे सध्याच्या सामाजिक परिस्थितीत वजन वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त वातावरणनिर्मिती त्यामुळं होते. त्यामुळं सध्या पृथ्वीवरील आठपैकी एका व्यक्तीला लठ्ठपणाची समस्या आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.”
आपण काय करू शकतो?
तज्ज्ञांच्या मते, आनंद मिळवण्यासाठी खाण्यात तसं काहीही चुकीचं नाही. कारण त्यातून काहीतरी मिळाल्याची भावना निर्माण होत असते. पण, खूप जास्त खाणं, खाण्याचं व्यसन लागणं किंवा लठ्ठपणा ही धोक्याची घंटा ठरू शकते.
ह्युमन न्यूट्रिशन आणि डाएटेटिक्स या विषयावर जानेवारी 2024 मध्ये तुर्कीमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला होता. त्यात लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या प्रौढांच्या हेडॉनिक हंगरबरोबर असलेल्या संबंधाचं विश्लेषण करण्यात आलं होतं.
त्यांना असं जाणवलं की, जास्त वजन असणाऱ्यांमध्ये हेडॉनिक हंगरचं प्रमाण वाढलं की त्यांचा आत्मसन्मान कमी होत जातो तसंच वजनाच्या बाबतीत स्वतःबद्दल अत्यंत वाईट भावनाही वाढू लागते.

फोटो स्रोत, Getty Images
मग, हेडॉनिक हंगरमुळं अतिरिक्त खाणं टाळण्यासाठी आपण काय करू शकतो?
“अभ्यासकांच्या मते, जेव्हा आपण वजन कमी करतो तेव्हा हेडॉनिक हंगरचं प्रमाणही कमी होतं, ” असं उत्तर डॉक्टर मेड यांनी दिलं.
“कदाचित जे लोक हे करण्यात यशस्नी होतात ते अशा खाद्यपदार्थांना कसा प्रतिसाद द्यायचा यात बदल करत असतील. किंवा त्यांना कशाने चांगलं वाटतं, त्यातच ते बदल करत असावेत.”
वजन कमी करणं, खाण्याच्या नव्या सवयी लावणं किंवा अधिक आरोग्यदायी अशी नवीन जीवनशैली स्वीकारणं हे तसं सर्वांसाठी एवढं सोपं नसतं. पण त्याला चांगल्या किंवा आनंददायी हेडॉनिक सवयींमध्ये बदलण्याचा मार्ग असल्याचं, प्राध्यापक स्टब्स सांगतात.
“उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्हाला तर शारीरिक हालचालींमध्ये वाढ करायची असेल तर अशा गोष्टी करण्याचा विचार करा ज्यातून तुम्हाला तुलनेनं अधिक आनंद मिळू शकेल. मग, जिममध्ये जाण्याऐवजी वॉक करणं किंवा मित्रांबरोबर डान्स करणं, हा पर्याय निवडावा.”
“कोणत्या प्रकारच्या आनंदानं तुमच्या जीवनात नवा उत्साह निर्माण होतो, हे लक्षात घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानुसार आनंद मिळणाऱ्या गोष्टी आणि नवीन सवयी यांची सांगड आपल्याला घालता येईल.”
80:20 जीवनशैलीचा पर्याय
विचारपूर्वक खाणं हा जास्त खाणं टाळण्याचा किंवा हेडॉनिक इटिंगपासूनही दूर राहण्याचा चांगला मार्ग ठरू शकतो.
पण, “अगदीच कॅबेज डाएटही चालणार नाही,” असं म्हणत प्राध्यापक स्ट्ब्स यांनी अधिक संतुलित आहार सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.
“हेडॉनिक इटिंगच्या कारणाने खाणाऱ्या लोकांना थांबवण्याचा आमचा हेतू नाही. आम्हाला त्यांना अधिक आरोग्यदायी पदार्थ खाऊन, तो आनंद मिळवण्याच्या दिशेकडं वळवायचं आहे,” असंही त्यांनी म्हटलं.
जीभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांमुळं जो अनंद मिळतो त्याच्याशी तडजोड न करताही, अन्नाबरोबर अधिक सकारात्मक नातं तयार करणं शक्य असल्याचं मत त्यांनी मांडलं.
“त्यासाठी आम्ही ज्याला 80:20 जीवनशैली म्हणतो त्याचा अवलंब करता येईल,” असं त्यांनी सांगितलं.
“जर तुम्ही आहारात आरोग्यदायी, कमी कॅलरी आणि अधिक पोषणतत्वे असलेल्या 80% पदार्थांचा आस्वाद घेत असाल तर, उर्वरित 20% टक्क्यातून तुम्हाला हवा असलेला आनंद मिळू शकतो. कारण अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते महत्त्वाचं ठरत असतं,” असं मत त्यांनी मांडलं.











