भरपूर खाऊनही सतत भूक का लागते?, खूप खाल्ल्यानं पोट सुटतं का?

लठ्ठ महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विल्यम पार्क
    • Role, बीबीसी फ्युचर

 सणासुदीचा काळ असो की लग्नसराईचा... किंवा आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या सुट्ट्या. आजकाल लोक भरपूर खातात.

कार्यक्रमांमध्ये वेगवेगळी पक्वान्नं केली जातात, पंगती उठतात. मेजवान्या दिल्या जातात.

सगळीकडे भेटी होतात आणि त्याबरोबर भरपूर खाणंही होतं. पण बऱ्याचदा अगदी भरपूर खाणं झालं तरी आपल्याला अजून भूक आहे असं वाटत राहातं. 

तुम्हालाही असं वाटतं का? इतकं खाऊनही परत भूक असल्याची जाणीव का होते असा प्रश्न तुमच्या मनात आला आहे का? 

जास्त खाल्लं की आपलं पोट वाढतं आणि त्यामुळे भूक वाढते असं काही लोकांना वाटत असतं. परंतु वरच्या प्रश्नांचं हे काही खरं उत्तर नाही.

जास्त खाल्लं तरी आपल्याला भूक लागते हे वास्तव आहे.

भूक लागणं ही एक जटील प्रक्रिया आहे. आपण खातो तेव्हा पोटाचा आकार तात्पुरता वाढलेला असतो हे खरं आहे.

जेव्हा पोट अन्न पचवत असतं तेव्हा पोट थोडं आकसलेलं असतं, यावेळेस पोट आपल्या अन्नाला पुढे ढकलत असतं. असं सुरू असताना पोटात गुडगुड आवाज येतो.

भूक लागण्याचा हा पहिला संकेत असतो. त्यानंतर पोट पुढच्या अन्नाची वाट पाहातं.

खाण्याचा पोटाच्या आकाराशी असलेला संबंध

खाण्याने पोटाचा आकार वाढत नाही. आपलं पोट भरपूर लवचिक असतं. जेव्हा आपण जास्त खातो तेव्हा त्याचा आकार वाढतो, ते खाणं पचतं तेव्हा ते आक्रसतं.

साधारणपणे लोकांच्या पोटाचा आकार एकसारखाच असतो, हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. पोटाच्या लांबी आणि जाडीचा त्याच्याशी संबंध नसतो. 

भूक लागल्यावर आपल्या पोटात घ्रेलिन नावाचं संप्रेरक (हार्मोन) स्रवतं. ते संप्रेरक आपल्याला भूक लागल्याचा संदेश डोक्याला देतं.

त्यानंतर आपल्या मेंदूतून एनपीवाय आणि एजीआरपी नावाची दोन संप्रेरकं स्रवतात. त्यांच्यामुळेच आपल्या भुकेची जाणीव होते.

लठ्ठ पुरुष

फोटो स्रोत, Getty Images

गंमत म्हणजे लठ्ठ लोकांपेक्षा बारीक- सडपातळ लोकांच्या शरीरात घ्रेलिन जास्त प्रमाणात स्रवत असतं. 

भूक लागण्यासाठी आपल्याला याच तीन संप्रेरकांची गरज असते. मात्र खाण्यातून समाधान वाटलं आहे अशी जाणीव करुन देण्यासाठी डझनभर संप्रेरकं कामाला लागतात.

जीआयपी आणि जीएलपी-1 सारखी संप्रेरकांकडे कार्बोहायड्रेटला नियंत्रित करणाऱ्या इन्शुलिनची जबाबदारी असते.

तर पोटाला अन्न पचवता यावं यासाठी काही हार्मोन्स आपल्या पोटातून होणारा अन्नाचा प्रवास नियंत्रित करतात.

भूक लागल्याची जाणीव होण्याचं कारण काय आहे?

भूकेची जाणीव कमी करण्यासाठी सीकेके आणि पीवायआय ही संप्रेरकं महत्त्वाची भूमिका बजावतात.

तसं पाहायला गेलं तर भुकेची जाणीव आणि पोट भरल्याची जाणीव करुन देण्याची जबाबदारी ही संप्रेरकांची असते.

त्याशिवाय आपण दिवसा-रात्री जे खातो तर त्या संकेतांची नोंदही आपला मेंदू करुन ठेवतो. मग त्याच हिशेबाने आपल्याला भूक लागते.

लठ्ठ मुलगा

फोटो स्रोत, Getty Images

म्हणजेच दुपारी भरपूर खाल्लं असलं तरीही रात्री खाण्याच्यावेळेस तुम्हाला भुकेची जाणीव होणार. 

जर तुम्ही टीव्ही पाहाताना काही ना काही खात असाल तर त्या सवयीचीही नोंद मेंदू करतो.

त्यामुळे तुम्ही भरपूर खाऊनही टीव्ही पाहायला बसलात तरी आपल्याला काहीतरी अजून खावसं वाटतं.

काहीतरी करत असताना खाण्याची सवय

नेदरलँडच्या मास्ट्रिख्ट विद्यापीठातील कॅरोलन व्हान डेन एक्कर सांगतात, जास्तं खाणं ही फार वाईट गोष्ट नाही... परंतु काही विशेष काम करत असताना खाणं वाईट आहे.

अशा सवयींपासून सुटका करुन घेणं सोपं नसतं.

जेव्हा एखाद्या विशिष्ट पदार्थाकडे आपण आकर्षित झालो असतो तेव्हा त्याच्या वासानेच आपल्याला भुकेची जाणीव होते.

पिझ्जा

फोटो स्रोत, Getty Images

शरीरातही काही बदल होऊ लागतात. जसं की अशावेळेस तोंडात लाळ सुटते. 

पावलोव नावाच्या एका शास्त्रज्ञांनी असाच एक प्रयोग कुत्र्यांवर केला होता. या प्रयोगात घंटा वाजवल्यावर कुत्र्यांना खाणं दिलं जात असे. त्यानंतरच्या काळात नुस्ती घंटा वाजवल्यावर कुत्र्यांच्या तोंडातून लाळ बाहेर पडायला लागे. 

आपली स्थितीही काहीशी अशीच असते असं शास्त्रज्ञांना वाटतं. ही गोष्ट अनेक प्रयोगांतून सिद्ध झालेली आहे.

कॅरोलिन एक्कर सांगतात, ही सवय तुम्ही एक दोन ग्रॅम चॉकलेट खाण्यानेही लागू शकते. अर्थात तुम्ही रोज ठराविक वेळेसच ते चॉकलेट खात असाल तर.

जास्त खाण्य़ाच्या सवयीची अनेक कारणं 

मूड खराब असेल किंवा दमल्यावरही अनेक लोक जास्त खातात. वास्तवात त्यावेळेस लोकांच्या भावना खाण्याशी जोडलेल्या असतात. 

सिद्धांतांचा विचार केल्यास आपला मूड चांगला असेल तरीही जास्त खाण्यासाठी आपण प्रेरित होतो. उदाहरणार्थ आपण मित्र-मैत्रिणींबरोबर किंवा कुटुंबीयाबरोबर असलो तर जास्त खातो. कारण लोकांबरोबर एकत्र असल्याच्या आनंदात आपण किती खातोय याकडे लक्ष जात नाही.

पोट भरल्याचंही कळत नाही. ही माहिती समजून घेतली तर खाण्याच्या चुकीच्या सवयी मोडण्यास मदत होऊ शकते. 

बिर्याणी

फोटो स्रोत, Getty Images

कॅरोलिन सांगतात, “आम्ही लोकांना त्यांचा आहार कमी करण्यास सांगत असतो तेव्हा आम्ही त्यांना खाण्याच्या जुन्या सवयी सोडण्यास सांगत असतो. एखादा पदार्थ खाल्ल्यावर त्यांना आनंदी वाटत असेल तर तो दुसऱ्या दिवशीही खाल्लाच पाहिजे असं नाही, हे त्यांना सांगितलं जातं.” 

कारण आपण खाण्यासंदर्भातल्या ज्या वाईट सवयींपासून सुटका करुन घेतो त्या परत आपल्या मानगुटीवर बसतात. 

त्यामुळे, मेजवानीत चांगलं जेवूनही नंतर भूक लागली तरी धक्का बसण्याची गरज नाही. विशिष्ट क्षणांना आपण जास्त खातोच हे त्याचं कारण आहे. तिथं आपला मेंदू संकेत मिळताच भुकेची संप्रेरकं स्रवू लागतो.

त्यामुळे पुढच्यावेळेस मेजवानीत जेवल्यावर परत भूक लागली तर आपलं पोट वाढलंय असा समज करुन घेऊ नका.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)