असा देश जिथे उकाड्यामुळे ब्रेड आणि दूधापेक्षाही महाग आहे बर्फ

बर्फ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रिया सिप्पी
    • Role, बीबीसी न्यूज

एप्रिल महिन्यातच राज्यात, देशात पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळाली.

ही परिस्थिती केवळ आपल्या जिल्ह्यात, राज्यात किंवा देशात नाहीये, तर जगभरातील अनेक भागांत लोकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

पश्चिम आफ्रिकेतील माली देशात रेकॉर्ड ब्रेक तापमानवाढ पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, इथं आइस-क्यूब्ज (बर्फाचे तुकडे) ब्रेड आणि दुधापेक्षा जास्त किमतीनं विकले जात आहेत.

मालीची राजधानी बमाकोमध्ये एका दुकानाबाहेर फातूमा यातारा यांना आम्ही भेटलो. त्यांनी सांगितलं की, “प्रचंड उष्णता आहे. मी इथे बर्फ खरेदी करायला आलीये.”

वीजेचीही समस्या आहे. वीज गेल्यामुळे लोकांच्या घरातले फ्रीजही काम करत नाहीयेत.

फातूमा यांनाही त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेच्या लाटेदरम्यान गारवा टिकवून ठेवण्यासाठी आइस क्यूब्जची मदत घ्यावी लागतीये.

बमाकोमध्ये सध्या तापमान वाढून 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतंय.

खरंतर अशा परिस्थितीत आइस क्यूब्ज एका मर्यादेपर्यंतच काम करतात आणि त्यांच्या किमती ज्यापद्धतीने वाढत आहेत, लोकांचं आयुष्य खडतर होताना दिसत आहे.

फातूमा सांगतात, “काही ठिकाणी आइस क्यूब्जच्या एका पिशवीची किंमत 300 ते 500 फ्रँक्स सीएफएपर्यंत पोहोचली आहे. हे प्रचंड महाग आहे.”

फातूमा यातारा

फोटो स्रोत, COURTESY OF FATOUMA YATTARA

फोटो कॅप्शन, फातूमा यातारा

बमाकोमध्ये आइस क्यूब्जच्या किमती ब्रेडपेक्षाही महाग झाल्या आहेत. ब्रेडची साधारण किंमत 250 फ्रँक्स सीएफएपर्यंत असते.

नाना कोनाते त्राओरे यांच्यासाठी हा उकाडा अजून एक समस्या घेऊन आला आहे. आधी ते आठवड्यातून एकदाच जेवण बनवत होते आणि आता त्यांना दररोज स्वयंपाक करावा लागतो.

त्या सांगतात, “कधी-कधी दिवसभर वीज गायब असते. त्यामुळे जेवण खराब होतं आणि तुम्हाला फेकून द्यावं लागतं.”

मालीमध्ये वीजेची समस्या जवळपास वर्षभराआधी झाली होती.

सरकारी वीज कंपनीवर गेल्या काही वर्षांत कोट्यवधी डॉलर्सचं कर्ज झालं होतं. त्यानंतर ते मागणीच्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात अपयशी ठरले.

सोमैला मॅगा नावाच्या एका तरुणाने सांगितलं की, “आम्ही लोक खरंच खूप त्रासलोय.
फोटो कॅप्शन, सोमैला मॅगा नावाच्या एका तरुणाने सांगितलं की, “आम्ही लोक खरंच खूप त्रासलोय."

मालीमध्ये बहुसंख्य लोकांकडे जनरेटरची सुविधा नाहीये. कारण त्यामध्ये डीझेल किंवा पेट्रोल भरणं हे त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे.

वीज नसल्यामुळे रात्री पंखेही लावता येत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने लोकांना घराच्या बाहेर झोपावं लागतंय. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होत आहे.

राजधानी बमाकोपासून काही अंतरावर सोमैला मॅगा नावाच्या एका तरुणाने सांगितलं की, “आम्ही लोक खरंच खूप त्रासलोय. रात्री तापमान 46 डिग्री सेल्सियसपर्यंत जातंय जे आमच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. उकाडा वाढल्यामुळे मला चक्कर येत आहे. शरीर थंड ठेवण्यासाठी पाणी शिंपडून घेतो.”

मार्च महिन्यात मालीमधील काही भागांत तापमान 48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. या उकाड्यात 100 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास जास्त होत आहे.

उष्णता
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बमाको युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रोफेसर यकूबा टोलोबा यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या इथे रोज जवळपास 15 लोक दाखल होत आहेत. अनेक रुग्णांना डिहायड्रेशन (शरीरात पाण्याची कमतरता होणं), खोकला, श्वासाशी संबंधित समस्यांसारखे त्रास होत आहेत."

मुस्लीमबहुल असलेल्या मालीमध्ये रमजानच्या महिन्यादरम्यान अनेक लोकांना रोजे न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

प्रोफेसर टोलोबा सांगतात की, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला अजून योजना बनवण्याची गरज आहे. अशी परिस्थिती वारंवार उद्भवू शकते. यावेळी तर उकाड्याने आम्हाला कधी न आलेला अनुभव दिला आहे.

उकाड्यामुळे केवळ मालीमधली परिस्थितीच अशी आहे, असं नाही. शेजारच्या सेनेगल, गिनी, बुर्किना फासो, नायजेरिया, निगेर आणि चाडसारख्या देशांतही हीच परिस्थिती आहे.

वर्ल्ड वेदर एट्रिब्यूशनच्या शास्त्रज्ञांच्या मते, मानवी हस्तक्षेपामुळे होणारा हवामान बदल या वाढत्या उष्म्यासाठी जबाबदार आहे.

संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे की, जर माणसांनी जीवाश्म इंधनं (पेट्रोल, डिझेल, गॅससारखी इंधनं) जाळून या पृथ्वीला उष्ण केलं नसतं, तर माली बुर्किना फासो भागातील सरासरी तापमान 1.4 ते 1.5 ने कमी राहिलं असतं.

येत्या काही दिवसांत बमाकोचं तापमान 40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहणार आहे, त्यामुळे लोक आता परिस्थितीशी जुळवून घेत आहेत.

राजधानीत सूर्यास्त झाला की, कोनाते त्राओरे अंगणात चटाया घेऊन येतात. त्या सांगतात की, “उकाड्यामुळे आम्ही बाहेरच राहतो. जास्त उष्णता वाढली तर आम्ही आजारी पडू शकतो. आयुष्य काही फार सुखावह नाहीये.”