तापमान वाढीमुळे महाराष्ट्रातही 'कोरल ब्लीचिंग'चा धोका? भारतात 'इथे' आहे रेड अलर्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उष्णतेची लाट आली की त्याचे काय परिणाम होतात, हे वेगळे सांगायला नको. पण जसा हवेच्या वाढलेल्या तापमानाचा आपल्याला त्रास जाणवतो, तसाच महासागराच्या वाढलेल्या तापमानाचा, सागरी उष्णतेच्या लाटांचा पाण्यात राहणाऱ्या जीवांवरही परिणाम होत असतो.
सध्या जगभात तेच घडतंय आणि ही भारतासाठीही धोक्याची घंटा आहे.
जगभरातलं प्रवाळ सध्या वाढलेल्या सागरी तापमानामुळे संकटात सापडलं आहे. ते पांढरं पडतंय आणि मरत आहे, असं अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA- नोआ) या संस्थेनं म्हटलं असून भारताचाही त्याला अपवाद नाही.
NOAAनं काय म्हटलं आहे, कोरल ब्लीचिंग काय असतं, प्रवाळ का महत्त्वाचं आहे आणि भारतानं या समस्येकडे का लक्ष द्यायला हवं, जाणून घेऊयात.
प्रवाळ म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं?
तुम्ही कधी स्वतः समुद्रात डायव्हिंग केलं असेल किंवा समुद्राखालचं जग दाखवणारे व्हिडियो पाहिले असतील तर त्यात तळाशी काही रंगीबेरंगी दूरवर पसरलेले जीव दिसतात, त्यालाच प्रवाळ म्हणतात.
फुलांसारखे दिसत असले तरी या वनस्पती नाहीत, तर अपृष्ठवंशीय म्हणजे मणका नसलेल्या प्राण्यांच्या या प्रजाती आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळ्या प्रजातींचे हे प्राणी वसाहतीसारखे एकत्र राहतात आणि त्यांची स्वतंत्र परिसंस्था तयार होते. जुन्या प्रवाळांच्या अवशेशांचे खडक, प्रवाळबेटं, प्रवाळभित्ती (Reef) तयार होतात.
ऑस्ट्रेलियानजीक पॅसिफिक महासागरातली ग्रेट बॅरियर रीफ हे याचं उत्तम उदाहरण आहे. भारतातही लक्षद्वीप बेटं ही प्रवाळांनी बनलेली बेटं आहेत. तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यादजवळ मालवणमध्ये आणि आंग्रिया बँक या समुद्रतळाशी असलेल्या जागीही प्रवाळ वसाहती आढळून येतात.
ही समुद्रातली प्रवाळ बेटं सागरी जीवांना आसरा देतात. समुद्रातले 25 टक्के जीव हे या प्रवाळांनी तयार केलेल्या संरचनांमध्ये राहतात. त्यामुळेच त्यांना 'समुद्राचे वास्तुविशारद' असे टोपणनाव मिळाले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मासे आणि मासेमारीसाठीही प्रवाळ महत्त्वाची आहेत आणि दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची उलाढाल प्रवाळांवर अवलंबून असते.
इतकंच नाही, तर वादळं, पूर अशा संकटात प्रवाळांच्या भिंती लाटांमधली ऊर्जा थोपवून धरतात आणि एक प्रकारे किनाऱ्याचं रक्षण करतात. त्यांच्यामुळे किनाऱ्याची धूप कमी होते आणि पर्यायानं लोकांचे जीव आणि संपत्तीचा धोका थोडा कमी होऊ शकतो.
पण प्रवाळांची ही परिसंस्था अतिशय संवेदनशील असते. त्यांचं झालेलं नुकससान भरून काढण्यासाठी अनेकदा कित्येक वर्ष लागू शकतात.
कोरल ब्लीचिंग म्हणजे काय?
जेव्हा प्रवाळावर ताण पडतो होतो तेव्हा त्याचा रंग फिकट होत जातो, ते पांढरं पडतं यालाच ‘कोरल ब्लीचिंग’ म्हणजे प्रवाळांचं रंगहीन होणं, असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
समुद्राचं तापमान वाढलं किंवा त्यात रासायनिक बदल झाले तरी प्रवाळांचं असं नुकसान होतं. हे दिसायला मोहक वाटलं, तरी प्रवाळांसाठीच नाही तर त्यांच्यावर अवलंबून असलेले सागरी जीव, मासे आणि पर्यायानं मासेमारीवर पोट असलेल्यांसाठी ही एक आपत्ती असते.
अनेकदा एखाद्या छोट्या जागेत प्रवाळ नष्ट झालं असेल तर ती झीज भरून काढण्यासाठी प्रयत्न करता येतात. पण मानवप्रणित हवामान बदलामुळे सध्या महासागराचं तापमान वाढत असून मोठ्या प्रमाणात प्रवाळ नष्ट होत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एखाद्या ठिकाणी नष्ट झालेलं प्रवाळ पुन्हा पूर्ववत होण्यासाठी काही वर्ष जाऊ शकतात. वारंवार ब्लीचिंग झालं तर ही झीज भरून निघणं अतिशय कठीण असतं.
याआधी 2014-16 दरम्यान जगभरात कोरल मास ब्लीचिंग घडलं होतं, ज्याचे दूरगामी परिणाम दिसून आले. आताही जग त्याच संकटाच्या उंबरठ्यावर असल्याचं नोआनं म्हटलं आहे.
NOAA नं काय म्हटलं आहे?
नोआ ही अमेरिकन संस्था महासागरांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असते. त्यांनी एप्रिल 2024 च्या मध्यावर इशारा दिला आहे की, “सध्या जगभरातत चौथ्या ‘मास कोरल ब्लीचिंग’ म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रवाळ नष्ट होण्याच्या दुर्घटनेला सुरुवात झाली आहे.”

नोआने जागभरातल्या शास्त्रज्ञांकडून अहवाल प्राप्त केल्यानंतर हिंद, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात प्रवाळांवर उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर ताण असल्याची पुष्टी केली.
फेब्रुवारी 2023 पासून किमान 54 देश-प्रदेशांत प्रवाळांचं मास ब्लीचिंग झाल्याची माहिती त्यातून समोर आली. अनेक ठिकाणी प्रवाळ ‘आजारी’ पडल्याचं, ते रंगहीन होत असल्याचं आणि कुजून नष्ट होत असल्याचं शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.
2023 मध्ये कॅरिबियन बेटांजवळ याचे पहिले संकेत मिळाले होते. तेव्हा अमेरिकेत फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर समुद्रात स्नान करणाऱ्या लोकांनी तिथलं पाणी बाथटबमधल्या पाण्यासारखं उबदार असल्याचं म्हटलं होतं.
पुढच्या काही काळात दक्षिण गोलार्धातही अशा उष्णतेची नोंद झाली. सध्या ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफसह टांझानिया, मॉरिशस, ब्राझील, पॅसिफिक बेटे, तांबडा समुद्र, पर्शियन आखात इतकंच नाही तर भारताच्या हद्दीतील प्रवाळ बेटांवरही या उष्णतेचा परिणाम होताना दिसतो आहे.

फोटो स्रोत, NOAA
नोआनं दिलेल्या ताज्या माहितीनुसार भारतातल्या प्रवाळांच्या प्रमुख वसाहती ‘रेड अलर्ट झोन’मध्ये आहेत.
या मास ब्लीचिंगसाठी समुद्रातलं अभूतपूर्व तापमान कारणीभूत आहे.
तापमानाचा उच्चांक
तापमानाच्या नोंदी ठेवण्यापासून सुरुवात झाली तेव्हापासून, 2023-24 हे सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. या कालावधीत जगाच्या सरासरी तापमाननाचे अनेक विक्रम मोडले गेले.
महासागराचा पाराही चढलेला दिसला. त्यात ‘एल निनो’ या नैसर्गिक घटनेमुळे आणखी भर पडली.
एल निनो आता मागे हटला आहे, पण म्हणजे समुद्राचं लगेच पूर्वीसारखं झपकन खाली उतरणार नाही.

या वाढलेल्या सागरी उष्णतेचा समुद्रातल्या जीवनावर कसा परिणाम होतो आहे, याचा पहिला जागतिक पुरावा नोआच्या नोंदींमधून मिळाला आहे.
सागरी जीववैज्ञाननिक डॉ. नील कॅंटीन यांनी फेब्रुवारीत 10 दिवस ऑस्ट्रेलियाच्या सागरी विज्ञान संस्थेसाठी ग्रेट बॅरियर रीफवरून विमान उडवून पाहणी केली.
2,000 किलोमीटरवर पसरलेली ही जगातली सर्वात मोठी कोरल रीफ असून ती संयुक्त राष्ट्रांच्या नैसर्गिक वारसा स्थळांपैकी एक आहे.
नील बीबीसीला सांगतात, "ग्रेट बॅरियर रीफ मरीन पार्कच्या तिन्ही भागात आम्हाला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्लीचिंग होताना दिसलं आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात कोरल मारले जाण्याची शक्यता आहे."

फोटो स्रोत, Getty Images
2014-16 या कालावधीत झालेल्या मास ब्लीचिंग नंतर समुद्राचं तापमान एवढं वाढलं आहे की NOAA नं ते दर्शवण्यासाठी तीन नवे उष्णतेचे स्तर दर्शवणारे अलर्ट तयार केले आहेत.
प्रवाळ सलग दोन महिने नेहमीपेक्षा 1 अंश जास्त उष्ण पाण्यात राहिलं, तर ते मरून जाण्याचा धोका असतो. पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा 2 अंशांनी जास्त असेल तर अशा स्थितीत प्रवाळ महिनाभरच टिकतं.
यंदा एप्रिलमध्येच अनेक ठिकाणी समुद्राचं तापमान प्रवाळांसाठी धोकादायक स्थितीत पोहोचलं आहे.
ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यानजीक ज्या कोरल समुद्रात आहे, तिथल्या 14 एप्रिल 2024 रोजीच्या तापमानाची ही आकडेवाडीच पाहा.

समुद्राचं असं वाढलेलं तापमान ही शास्त्रज्ञांना चिंतेची बाब वाटते.
केनियातले पर्यावरणशास्त्रज्ञ डेव्हिड ओबुरा हिंद महासागरातल्या ब्लीचिंगवर लक्ष ठेवून आहेत. संशोधक आणि मासेमारी करणाऱ्या समुदायांकडून ते प्रवाळाच्या स्थितीविषयी माहिती घेत असतात.
ओबुरा सांगतात की यंदा फेब्रुवारीमध्येच मादागास्कर बेटांजवळ कोरल ब्लीचिंगच्या घटना घडल्या. त्यानंतर टांझानिया आणि कोमोरोस पर्यंत त्या पसरत गेल्या.
भारतातल्या प्रवाळाचं काय?
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात प्रवाळ आढळतात. मन्नारचं आखात, कच्छचं आखात, अंदमान-निकोबर बेटे, लक्षद्वीप बेटे इथे मोठ्या प्रवाळभिंती आहेत आणि तिथे प्रवाळांत जैवविविधताही आढळून येते.

फोटो स्रोत, bbc
त्याशिवाय भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर इतर अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात प्रवाळांच्या वसाहतीही आहेत. महाराष्ट्रात मालवण परिसरात किंवा आंग्रिया बँकमध्ये उत्तम दर्जाचे प्रवाळ आहेत.
यातल्या मन्नारच्या आखातात ब्लीचिंगला सुरुवात झाली असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.
महाराष्ट्रातली प्रवाळांची दोन मुख्य स्थानं म्हणजे मालवण आणि आंग्रिया बँकही अलर्टवर असल्याचं नोआ च्या 27 एप्रिल 2024 रोजीच्या नकाशात दिसून येतं.
पुण्याची उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्था (IITM) चे संशोधक रॉक्सी कोल यांनी अलीकडेच इशारा दिला आहे की हिंद महासागरात कायमस्वरुपी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. तसं झालं तर भारतातल्या प्रवाळ आणि अन्य सागरी जीवांवरचं संकट आणखी गहिरं बनेल.
सागरी जीववैज्ञानिक वर्धन पाटणकर यांनी भारतातल्या प्रवाळांचा अभ्यास केला आहे आणि सागरी संवर्धनासाठीही ते काम करतात. भारतामध्ये प्रवाळांची स्थिती कशी आहे, याविषयी बीबीसनं त्यांच्याशी संवाद साधला.
वर्धन सांगतात, “सध्या नोआ ने संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी ब्लिचिंग अलर्ट दिला आहे आणि भारतातल्या प्रवाळालाही स्वाभाविकपणे धोका आहे आपल्याकडे लक्षद्वीप, मन्नार अशी बरीचशी कोरल्स हाय अलर्टवर आहेत आणि त्यांच्यावर नीट लक्ष ठेवायला हवं.”

वर्धन माहिती देतात की मन्नारच्या आखातात काही ठिकाणी प्रवाळ फिकी पडली आहेत आणि काही ठिकाणी ब्लीचिंग सुरू झालं आहे.
ते सांगतात, “ही निश्चितच चिंतेची बाब आहे. पुढचे एक दोन महिने अतिशय महत्त्वाचे असतील. सर्व संशोधक, व्यवस्थापक, मरिन नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांना प्रवाळांवर लक्ष ठेवावं लागेल. ब्लीचिंगपासून प्रवाळ कसं वाचवायचं, याची योजना आखावी लागेल.”
“हा धोका किती मोठा आहे हे आत्ताच सांगता येणार नाही. प्रवाळांचा मृत्यूदर किती आहे हेही पाहायला हवं. ब्लीचिंग होतं तेव्हा सुरुवातीला प्रवाळ फिकी पडतात. पण त्यातलं झुझँथल (एक प्रकारचं शैवाल) परत आलं तर प्रवाळांचं पुनरुज्जीवन करणं शक्य आहे. आपण आपल्या प्रवाळ भिंतींची काळजी घ्यायला हवी.”

फोटो स्रोत, Getty Images
पण ही काळजी नेमकी कशी घ्यायची? वर्धन यांच्या मते प्रवाळ भिंतींचं दोन कारणांनी नुकसान होतं - ब्लीचिंगसारख्या घटना आणि मानवी हस्तक्षेप.
“आपल्याकडच्या प्रवाळांना हवामान बदलासोबतच मानवी कारणांनीही खूप धोका आहे. कारण भारतात किनारी भागांत लोकसंख्येची घनता जास्त आहे. मोठ्या प्रमाणात इथे लोक समुद्रातील साधनसंपत्तीवरही अवलंबून असतात.
“समुद्रातली जहाजं नांगर टाकतात, तेव्हा खालच्या प्रवाळांचं नुकसान होऊ शकतं. पर्यटनस्थळी लोकांच्या समुद्रात वर्दळीमुळेही कोरल्सचे फिन्स तुटतात.
"त्याशिवाय किनाऱ्यावर विकासकामं मोठ्या प्रमाणात होतात, त्यानं गाळ साचतो किंवा बीचवरच्या रिसॉर्ट वगैरेंचा सगळा कचरा समुद्रात जातो. त्यामुळेही समुद्राच्या पाण्याचा 'पीएच' (आम्लाचं प्रमाण) बदलतो , प्रदूषकांनीही नुकसान होतं आणि प्रवाळ नष्ट होऊ शकतं.”
स्थानिक पातळीवरचं नुकसान टाळण्यासाठी या सगळ्या गोष्टी टाळणं आपल्या हातात आहे. तर जगभरात वेगानं आणि मोठ्या प्रमाणात होणारं कोरल ब्लीचिंग रोखायचं, तर जगभरात होणारं कार्बन उत्सर्जन कमी करायला हवं, असं तज्ज्ञ सांगतात.
नोआसाठी संशोधन करणाऱ्या आणि मास ब्लीचिंगविषयी ताजा अहवाल तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या डॉ. जेनिफर मॅकव्होर्टर सांगतात, की सध्या जे उपाय सुरू आहेत ते तात्पुरते ठरत आहेत.
“हे म्हणजे प्रवाळात राहणाऱ्या सागरी प्राण्यांना पक्की घरं आणि इमारतीऐवजी नुसत्याच मचाणावर राहायला सांगण्यासारखं ठरेल. अशा तात्पुरत्या मचाणावर राहायला कुणाला आवडेल का?”
(अतिरिक्त रिपोर्टिंग बीबीसी क्लायमेट रिपोर्टर जॉर्जिना रेनार्ड आणि व्हिजुअल जर्नलिस्ट एरवान रिवॉल्टे)











