ग्रेट बॅरियर रीफ धोक्यात, युनेस्कोचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक वारसा असणाऱ्या स्थळांच्या यादीतली ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात असणारी 'ग्रेट बॅरियर रीफ' धोक्यात असल्याचं युनेस्कोने म्हटलंय.
हवामान बदलाचा परिणाम या ग्रेट बॅरियर रीफवर होऊ नये यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने पुरेसे प्रयत्न केले नसल्याने हे स्थळ धोक्यात आल्याचं युनेस्कोने म्हटलंय. ऑस्ट्रेलियन सरकारने याचा निषेध केलाय.
ग्रेट बॅरियर रीफ म्हणजे सर्वात मोठी प्रवाळभित्ती किंवा प्रवाळं असणारा पट्टा.
समुद्राच्या पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी ठेवण्यात आलेली उद्दिष्टं पूर्ण झाली नसल्याचं युनेस्कोने म्हटलंय.
तर युएनचे तज्ज्ञ त्यांनी पूर्वी दिलेल्या वचनांपासून फारकत घेत असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरण मंत्री सुझन ली यांनी म्हटलंय.
पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या बैठकीमध्ये युनेस्कोच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा विचार ऑस्ट्रेलिया करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. सुझन म्हणाल्या, "यामागचं राजकारण उघड आहे. हे ठरवण्यासाठीची प्रक्रिया मागे पडून राजकारणाला महत्त्वं दिलं जातंय."
21 देशांच्या या वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं अध्यक्षपद चीनकडे आहे. आणि गेल्या काही वर्षांत चीन आणि ऑस्ट्रेलियामधले संबंध बिघडले आहेत.
"हवामान बदल ही जगभरातल्या प्रवाळांसाठीच्या जैवसंस्थेसाठी सगळ्यात मोठा धोका आहे. जगभरात 83 अशा जागतिक वारसा असणाऱ्या नैसर्गिक जागांना हवामान बदलाचा धोका आहे. त्यामुळे फक्त ऑस्ट्रेलियाला असं वेगळं काढणं योग्य नाही," ली म्हणाल्या.

फोटो स्रोत, Gety Images /James D. Morgan
पण युनायटेड नेशन्सने घेतलेल्या या निर्णयावरून ऑस्ट्रेलियाने हवामान बदलाबद्दल केलेल्या अपुऱ्या उपाययोजना दिसून येत असल्याचं पर्यावरणवादी गटांचं म्हणणं आहेत.
"ऑस्ट्रेलियन सरकारने आपला नैसर्गिक वारसा जपण्यासाठी आणि हवामान बदलापासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी पावलं उचललेली नाही, असं युनेस्कोने दिलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट आणि निःसंदिग्धपणे म्हटलंय, " वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर - ऑस्ट्रेलियाचे समुद्र विभागासाठीचे प्रमुख रिचर्ड लेक सांगतात.
या ग्रेट बॅरियर रीफवरून युनेस्को आणि ऑस्ट्रेलियामध्ये वाद सुरू आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यापासून 2,300 किलोपर्यंत पसरलेल्या या प्रवाळ पट्ट्याचा 1981मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा असणाऱ्या पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. हा प्रवाळ पट्टा "वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आणि मौल्यवान बारकावे असणारा" असल्याचं सांगण्यात आलं होतं.
ही रीफ धोक्यात असल्याचं 2017मध्ये युनेस्कोने पहिल्यांदा म्हटल्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने या रीफच्या संवर्धनासाठी 3 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सपेक्षा जास्तीची तरतूद केली.
पण या रीफमधल्या अनेक 'ब्लीचिंग'च्या घटनांमुळे गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक प्रवाळं नष्टं झाली.
ग्लोबल वॉर्निंगमुळे समुद्राचं तापमान वाढल्याचा हा परिणाम असल्याचं संशोधकांनी म्हटलंय.
या रीफचा दर्जा आणखीन खालावल्याचं सांगत 2019 मध्ये खुद्द ऑस्ट्रेलियाच्याच रीफ अथॉरिटीने या गर्तेचा दर्जा 'Poor' वरून 'Very Poor' म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीवर आणला होता.
जैव इंधनांच्या वापरामुळे मोठा हवामान बदल होतो, पण ऑस्ट्रेलियाने यासाठीची पावलं उचलण्याची तयारी दाखवलेली नाही.
ऑस्ट्रेलियातून कोळसा आणि गॅसची मोठी निर्यात होते आणि 2015 पासून त्यांनी त्यांच्या हवामान बदलासाठीच्या उद्दिष्टांमध्ये वाढ केलेली नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








