हवामान बदल : मालदिवमध्ये सुरू आहे नव्या शहराची निर्मिती

फोटो स्रोत, Hassan Mohamed
हवामान बदलाचे परिणाम भविष्यात संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत, असं सांगितलं जातं. पण मालदिवला वर्तमान काळातच हवामान बदलविषयक पर्यावरणीय संकटांना तोंड द्यावं लागत आहे.
मालदिवमधील समुद्रकिनाऱ्यांवरचे रिसॉर्ट जगभरात लोकप्रिय आहेत. पण आता त्यांचं अस्तित्वंच धोक्यात आलं आहे. इथल्या 1200 वेगवेगळ्या बेटांपैकी 80 टक्के बेटांवर पाण्याची पातळी जवळपास 1 मीटरने वाढली आहे.
पण मालदिवने या संकटाचा सामना करायचं ठरवलं आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न मालदिवमध्ये सुरू आहे.
एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून हुलहूमाले या नव्या शहराची निर्मिती याठिकाणी सुरू आहे. हुलहूमाले शहराला सिटी ऑफ होप असंही संबोधण्यात येत आहे.
जमिनीची उंची वाढवण्याची प्रक्रिया
मालदिवमध्ये समुद्रातील वाळूचाच वापर जमिनीची उंची वाढवण्यासाठी करण्याचं नियोजन आहे. या वाळूच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या बेटाची उंची समुद्रसपाटीपेक्षा 2 मीटर उंच असेल.

फोटो स्रोत, Getty Images
या कामाचा पहिला टप्पा 1997 साली सुरू झाला होता. 2019 च्या अखेरपर्यंत हुलहूमाले शहरात नागरीक येऊन राहण्यासही सुरूवात झाली होती.
पण नव्या बेटाबाबत महत्त्वाकांक्षा यापेक्षाही मोठ्या आहेत. याठिकाणी 2 लाख 40 हजार नागरिक राहू शकतील, अशा प्रकारे सोयीसुविधा देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे.
हवामान बदलाचा विचार करून डिझाईन
हुलहूमाले शहराचं डिझाईन करताना हवामान बदलाच्या संकटाचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे.
येथील इमारती आणि लोकवसाहतींचं डिझाईन अतिशय सुयोग्य पद्धतीने करण्यात येईल, अशी माहिती सिटी ऑफ होप प्रकल्पातील हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक अरीन अहमद यांनी दिली.
ते सांगतात, "उष्णता रोखण्यासाठी इथल्या इमारती उत्तर-दक्षिण दिशेने बांधण्यात येतील. यामुळे परिसरात थंडावा राहील. येथील रस्ते वाऱ्याचा वेग कमी राखतील. सुयोग्य डिझाईनमुळे इथे एअर कंडिशनिंगचा कमीत कमी वापर करावा लागेल. शाळा, मशिद आणि पार्क रहिवासी भागातून पायी अंतरावरच असतील, यामुळे वाहनांचा वापर मर्यादित राहील.

फोटो स्रोत, Mr Sham'aan Shakir- Shammu
नव्या शहरात वीजेवर चालणाऱ्या बसेस, सायकल यांना प्राधान्य असेल. शिवाय, सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचं नियोजन हुलहूमालेच्या नगररचनाकारांनी केलं आहे. सोबतच रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे पाण्याचा साठा मुबलक राहील, याची काळजी घेण्यात आली आहे.
प्रवाळ भित्तींच्या बदल्यात जमीन?
पण या सर्व सोयीसुविधा देण्यात येत असल्या तरी हे नवीन बेट कृत्रिमरित्या तयार करण्यात येत आहे, हे आपण विसरून चालणार नाही. अशा प्रकारचं कृत्रिम बेट तयार करताना त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल?
विशेषतः या परिसरातील कोरल रिफ (प्रवाळ भित्ती) किंवा पांढऱ्या चमकदार वाळूसाठी हे बेट धोकादायक असेल का?
नॉर्थमब्रिया युनिव्हर्सिटीच्या भूगोल आणि पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. हॉली ईस्ट यांच्याशी आम्ही याबाबत चर्चा केली. मालदिवमधील कोरल रिफ या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. कृत्रिम बेटनिर्मिती पर्यावरणासाठी समस्या निर्माण करू शकते, असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Handout photo released by the Republic of Maldives
"नव्या बेटामुळे परिसरातील कोरल रिफ उद्ध्वस्त होतीलच, शिवाय इतर भागातील कोरल रिफच्या अधिवासांवरही त्यांचा परिणाम होईल, सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो," असं ते सांगतात.
उच्च महत्त्वाकांक्षा
वाढत्या लोकसंख्येमुळे भू-सुधार विषयक कामं करणं आता मालदिवकरांसाठी अनिवार्य बनलं आहे.
या सर्वांमध्ये एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. वर्ल्ड बँकेच्या 2020 च्या अहवालानुसार, ग्रेटर माले क्षेत्रात, हुलहूमाले परिसरात नैसर्गिक अधिवास नसल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात कोरल रिफ जास्त प्रमाणात आढळून येत नाहीत.
मालदिवकरांच्या दृष्टीने हुलहूमालेची निर्मिती महत्त्वाची आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या संकटादरम्यान बेटनिर्मितीच्या क्षेत्रात मानवी विकासात याचं अत्यंत मोठं योगदान पाहायला मिळणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








