गेल्या 50 वर्षांत वन्यजीवांमध्ये 68 टक्के घट, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हेलन ब्रिग्ग्स
- Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी
गेल्या 50 वर्षांत जगातील वन्यजीवांच्या संख्येत दोन तृतीयांश घट झाल्याचा निष्कर्ष विश्व वन्यजीव निधी (WWF) या संस्थेनं आपल्या अहवालात मांडला आहे.
1970 ते 2016 या कालावधीतील 'लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स' विश्व वन्यजीव निधी संस्थेनं जारी केलंय. वन्यजीवांमध्ये होत असलेली घट अत्यंत भयंकर असल्याचं सांगून विश्व वन्यजीव निधीनं त्यासाठी 'Catastrophic Decline' असा शब्द वापरलाय.
मानवाने यापूर्वी कधी नव्हे इतका पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा निष्कर्षही या अहवालात नोंदवण्यात आला आहे.
जंगलात आगी लावल्या जातात, समुद्रात भराव घातला जातो आणि जंगल नष्ट केलं जातंय, या सगळ्यामुळे वन्यजीव धोक्यात आल्याची खंत विश्व वन्यजीव निधीच्या मुख्य कार्यकारी तान्या स्टिली यांनी व्यक्त केली.
"आपण आपल्याच जगाला नेस्तनाबूत करत आहोत आणि तेही अशा जगाला ज्याला आपण घर म्हणतो. पृथ्वीवरील आपलयाच आरोग्य, सुरक्षा आणि अस्तित्त्वालाच धोक्यात टाकत आहोत. निसर्ग आपल्याला वारंवर धोक्याचे इशारे देत आहे आणि वेळही आपल्या हातून निघून जातोय," असंही तान्या म्हणतात.
विश्व वन्यजीव निधीच्या अहवालाचा नेमका अर्थ काय?
विश्व वन्यजीव निधीकडून जंगलातील लाखो वन्यजीवांचा अभ्यास पर्यावरणातील तज्ज्ञांकडून केला जातो. या अहवालातही जगातील विविध जाती-प्रजातींच्या वन्यजीवांचा अभ्यास करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
1970 पासून सुमारे 20 हजारहून अधिक सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या संख्येत घट झाली. गेल्या 50 वर्षांचा विचार करता ही घट 68 टक्के आहे.
पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप हेच मुख्य कारण त्यामागे असल्याचं झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन (ZSL) मधील संवर्धन विभागाचे संचालक डॉ. अँड्र्यू टेरी यांनी म्हटलंय.
"जर या स्थितीत बदल झाला नाही, तर वन्यजीवांची संख्या अशीच कमी होत राहील, परिणामी वन्यजीव नाहीसे होण्याची भीती आहे, याचा आपल्या पर्यावरणाला मोठा धोका आहे. याच पर्यावरणावर आपण अवलंबून आहोत," असं डॉ. अँड्र्यू टेरी म्हणतात.
विश्व वन्यजीव निधीचा अहवाल हेच सांगतोय की, कोव्हिड-19 हा मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपाचं मोठं उदाहरण आणि सतर्कतेचा इशाराच आहे.
वन्यजीवांना राहण्यासाठीच्या जागांची कमतरता आणि वन्यजीवांचा वापर, व्यापर ही काही कारणं वन्यजीव कमी होण्याची आहेत. शिवाय, कोरोनासारखं आरोग्य संकट उद्भवण्यामागेही अशाच कारणांचा समावेश असल्याचं म्हटलंय.
आपण जर आपलं उत्पादन, खाद्यपदार्थ आणि निसर्गापासूनच्या उपभोगाच्या पद्धती यांमध्ये काही बदल केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकतो, असं या अहवालातील काही पुरावे स्पष्ट करतात. त्यासाठी जंगतोड थांबवण्यासारखी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे.
निसर्गवादी कार्यकर्ते आणि माहितीपटकार सर डेव्हिड अॅटनबरो म्हणतात, "ज्यावेळी मानवाचा निसर्गात हस्तक्षेप सुरू होतो, अशावेळी आपण योग्य समतोल साधला, तर नक्कीच फरक पडू शकतो. मात्र, यासाठी योजनाबद्धरित्या काम करावं लागेल. म्हणजे, आपण अन्ननिर्मिती कशी करतोय, ऊर्जा कशी बनवतोय, समुद्रांमध्ये किती हस्तक्षेप करतो आणि त्याही गोष्टींचा किती वापर करतोय, हे सर्व महत्त्वाचं आहे."
सर डेव्हिड अॅटनबरो पुढे म्हणतात, "मात्र, यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे, निसर्गाकडे पर्याय म्हणून पाहणं किंवा 'चलता है' हा दृष्टिकोन कमी केला पाहिजे."
निसर्गाचं नुकसान झाल्याचं कसं मोजलं जातं?
खरंतर पृथ्वीवरील वन्यजीवांचा अभ्यास करणं, मोजणी करणं हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा वापर केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, यासंदर्भातील अभ्यास सादर करताना, ते पुरावे देतात की, मानवी इतिहासात कशाप्रकारे जैवविविधता नष्ट केली जातेय.
आपण विश्व वन्यजीव निधीच्या या अहवालाबाबत विचार केल्यास, त्यांनी वन्यजीवांची संख्या कमी होतेय की वाढतेय, यावर लक्ष केंद्रित करून अहवाल सादर केलाय. ते नष्ट झालेल्या किंवा नामशेष झालेल्या प्रजातींची संख्या सांगत नाहीत.
वन्यजीवांच्या संख्येत सर्वाधिक घट उष्णकटीबंधीय प्रदेशात झाल्याचं दिसून येतं. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये 94 टक्के घट झालीय म्हणजे जगातील इतर भागांपेक्षा सर्वाधिक घट या दोन ठिकाणी आढळून येते.
विश्व वन्यजीव निधीचा हा अहवाल जागतिक स्तरावरील स्थिती सांगतो आणि ही स्थिती बदलण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे संकेत देतो, असं ZSL चे ल्युइज मॅकरे म्हणतात.
हे चित्र बदलण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासंदर्भात मदतीसाठीही हा अहवाल महत्त्वपूर्ण आहे.
'नेचरसजेस्ट्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात स्पष्ट म्हटलंय की, आपल्या अन्ननिर्मिती आणि अन्नसेवन याबाबत मोठ्या सुधारणांची गरज आहे. शिवाय, अन्नाच्या नासाडीबाबत विचार करण्याची गरजही यात व्यक्त केलीय.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठीची पावलं ही एकमेव गोष्ट जैवविविधतेच्या नुकसनाचा आलेख वळवण्यासाठी पुरेशी नसल्यचं मत UCL चे प्रा. डेम जॉर्जिना मॅक म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"सर्व क्षेत्रातून पावलं उचलण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अन्न-व्यवस्था. म्हणजे कृषी आणि पुरवठा या दोन्हींच्या बाजूने यावर विचार व्हायला हवा," असं प्रा. डेम म्हणतात.
निसर्गाच्या नुकसानाबद्दल इतर उपाय काय सांगतात?
यूनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) ने नष्ट होऊ पाहत असलेल्या वन्यजीव आणि वनस्पतींबाबत माहिती, आकडेवारी एकत्र केलीय.
त्या माहितीनुसार, IUCN ने एक लाखाहून अधिक वन्यजीव आणि वनस्पतींचं मूल्यांकन केलं. त्यातील सुमारे 32 हजार वन्यजीव आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असं आढळलं.
2019 मध्ये शास्त्रज्ज्ञांच्या आंतर-सरकारी पॅनलच्या अभ्यासाअंती निष्कर्षानुसार, जवळपास दहा लाख प्रजाती (पाच लाख प्राणी आणि वनस्पती, तर पाच लाख सूक्ष्म जीव) यांचं अस्तित्व पुढच्या काही दशकातच धोक्यात असेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









