ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारसारखंच नाव असणाऱ्या या स्टार खेळाडूचा खून का झाला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
1994 चा फुटबॉल वर्ल्डकप होणार असेल त्याच्या जरा आधीची गोष्ट. क्वालिफायर राऊंड चालू होते. दक्षिण अमेरिकेतले दोन देश आमने-सामने उभे ठाकले होते, कोलंबिया विरुद्ध अर्जेटिना.
आता अर्जेटिनाचा फुटबॉलमध्ये त्याकाळी खूप दबदबा होता हे वेगळं सांगायला नको, पण कोलंबियाही सगळ्यांना चकवत वर आलं होतं. त्या टीमच्या सततच्या यशाने सगळेच आश्चर्यचकित झाले होते कारण त्यांच्या देशात तेव्हा जवळपास गृहयुद्धाची परिस्थिती होती.
कोलंबियाची टीम विमानतळावर उतरली तेव्हा अर्जेटिनाच्या फॅन्सनी खेळाडूंना घेरलं आणि ओरडायला सुरुवात केली... ड्रग्स, ड्रग्स, ड्रग्स.
कोलंबियाच्या खेळाडूंचं मानसिक खच्चीकरण करण्याचा तो प्रयत्न होता. तो काळ असा होता की जगभरात कोलंबिया हा देश, ड्रग्ससाठी समानअर्थी शब्द झाला होता.
पाब्लो इस्कॉबार माहीत असेलच ना? तोच कोलंबिया देशातला प्रसिद्ध ड्रग माफिया बॉस.
एकेकाळी तो जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी होता असं म्हणतात, त्याचं ड्रगचं साम्राज्य जगभर पसरलं होतं.
त्याच पाब्लोने कोलंबियात रणकंदन माजवलं होतं, त्याची सविस्तर कहाणी पुढे येईलच. पण कोलंबियाची जगात एवढीच ओळख शिल्लक राहिली होती आणि कोलंबियाच्या राष्ट्रीय फुटबॉल टीमला ती बदलायची होती.
अर्जेटिनाविरुद्धची क्वालिफायर मॅच जो जिंकेल त्याला अमेरिकेत होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये डायरेक्ट प्रवेश मिळणार होता.
अर्जेटिनाचं पारडं जड होतं पण कोलंबियाची टीम स्वतःचा मान,सन्मान, देशाची जगात असणारी इभ्रत आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी खेळत होती.
पहिल्या हाफमध्ये कोलंबियाने एक गोल केला. अर्जेटिनावर दडपण आलं होतं. आता त्यांना दोन गोल करावे लागणार होते कारण एक गोल करून मॅच टाय झाली असती तरी कोणत्याही टीमला सरळ प्रवेश मिळाला नसता.
दुसऱ्या हाफमध्ये अर्जेटिनाने आपला खेळ आक्रमक केला, पण तरी त्यांना चकवत कोलंबियाच्या डिफेंडरने गोल ठोकला. स्कोअर होता 2-0.
पुढच्या पाच मिनिटात कोलंबियाने तिसरा गोल केला. त्यांच्या प्रत्येक खेळाडूला आता गोल स्कोअर करायचा होता. याने मारला मग मीही मारणार अशी काहीशी स्पर्धा चालू होती.
कोलंबियाचा वर्ल्डकपमध्ये प्रवेश निश्चित होता. 28 वर्षांनी त्यांना हा चान्स मिळणार होता.
चौथा गोल, पाचवा !
इतिहास रचला गेला होता. बलाढ्य अर्जेटिनाला 5-0 असं कोणीचं हरवलं नव्हतं आजपर्यंत.
अर्जेटिनाच्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम. सगळे उभे राहून कोलंबियासाठी टाळ्या वाजवत होते, स्टँडिंग ओवेशन देत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कोलंबियाची ओळख फक्त ड्रग्स नाही हे जगाला पटवण्यात त्यांच्या फुटबॉल टीमला यश आलं होतं.
आता तुम्ही म्हणाल ड्रग्स आणि फुटबॉलचा काय संबंध? फारच जवळचा. विशेषतः कोलंबिया, ड्रग आणि फुटबॉल यांचं इतिहासातलं नातं अतूट आहे.
ही गोष्ट सुरू होते आंद्रेस एस्कोबारपासून. कोलंबियाच्या राष्ट्रीय फुटबॉल टीमचा कॅप्टन. आडनाव साधर्म्य वगळता पाब्लो एस्कोबार आणि आंद्रेस एस्कोबार यांच्यात काहीच साम्य नव्हतं, पण एका विचित्र नियतीने दोघं एकत्र बांधले गेले आणि दोघांचा मृत्यू त्याच नियतीच्या फटकाऱ्याने मागे पुढे झाला.
पाब्लो एस्कोबारचाही गोळ्या घालून खून झाला आणि आंद्रेसचाही.
पण आंद्रेस एक अतिशय गुणी फुटबॉल खेळाडू होता. कोलंबियाचं नाव जगाच्या पाठीवर नेण्यात त्याचा फार मोठा हात होता, पण एका अतितटीच्या मॅचमध्ये त्याचा एक गोल हुकला.. हुकला म्हणजे आंद्रेसने चुकून स्वतःच्याच टीमविरुद्ध गोल केला आणि याचाच बदला म्हणून काही महिन्यांनी त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या गेल्या.
तिथंपर्यंत यायचं तर आधी थोडा भूतकाळ समजून घेतला पाहिजे.
आंद्रेसचं टोपणनाव होतं, ‘द जंटलमन’. फुटबॉलसारख्या मरो या मारो खेळातही तो सभ्यपणे वावरायचा.
आंद्रेसचा जन्म 1967 साली कोलंबियातल्या मेडेलिन शहरात 1967 साली झाला. हे मेंडालिन म्हणजे पाब्लो एस्कोबारचं मेंडालिन. त्याच्या माफिया कार्टेलचं नावही मेडेलिनच होतं.
आंद्रेसचं पाब्लोशी असणारं नातं इथून सुरू झालं होतं.
आंद्रेसचं कुटुंब होतं सुखवस्तू होतं. कोलंबियाचे इतर प्रमुख फुटबॉलपटू खरंतर गरीब घरांमधून, झोपडपट्ट्यांमधून आले होते, आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात पाब्लो एस्कोबार लहानपणापासून होता.
आंद्रेसचं तसं नव्हतं. तो चांगल्या शाळांमध्ये गेला, घरात दोन वेळंचं पुरेसं जेवायला होतं पण त्यात आईचा कँन्सरने मृत्यू झाला. त्यामुळे मुळात शांत असणारा आंद्रेस आणखीच अंतर्मुख झाला.
त्याचं एकच प्रेम होतं, फुटबॉल. योगायोग बघा, पाब्लो एस्कोबारचं मनापासून एकाच खेळावर प्रेम होतं – फुटबॉल.
आंद्रेस लहानपणापासून फुटबॉल खेळायचा आणि त्याची चमक लवकरच राष्ट्रीय स्तरावरच्या प्रशिक्षकांच्या लक्षात आली. एकवेळ अशी आली की शिक्षण की फुटबॉल या दोनपैकी एकाची निवड करायची वेळ आली तेव्हा आंद्रेसने फुटबॉलची निवड केली.

फोटो स्रोत, Getty Images
कोलंबियात वेगवेगळे फुटबॉल क्लब होते आणि हे फुटबॉल क्लब तिथल्या ड्रग माफियाच्या मालकीचे आहेत अशी चर्चा सुरू असायची.
ESPN ने आंद्रेस एस्कोबार आणि पाब्लो एस्कोबार यांच्यावर ‘द टू एस्कोबार्स’ अशी डॉक्युमेंट्री केली आहे. त्यात ड्रग माफिया आणि फुटबॉलचा संबंध उलगडून सांगितला आहे.
कोलंबियाची नॅशनल टीम तसंच फुटबॉल क्लब अॅटिलेटिको नॅशनलचे (स्पॅनिश उच्चार नॅसिनिओल) कोच फ्रान्सिस्को मातुराना या डॉक्युमेंट्रीत म्हणतात, “आमच्या क्लबने फार थोड्या काळात फार मोठं यश मिळवलं. साहाजिकच लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सगळ्यांना एकच प्रश्न पडला, यांनी (नॅशनलने) हे कसं करून दाखवलं?”
त्याआधी कोलंबियाने कोणताही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जिंकली नव्हती. कोलंबियात फुटबॉलचं प्रचंड वेड असलं तरी कोलंबियाबाहेर या खेळात त्यांना ओळख नव्हती. तिथले चांगले खेळाडू नंतर इतर लॅटिन अमेरिकन देशांकडून खेळायला जायचे, किंवा इतर क्लब्स बरोबर खेळायचे.
मातुराना म्हणतात, “दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे आमच्याकडे सर्वोत्तम असे खेळाडू आले, आणि दुसरं म्हणजे त्यांना आमच्याकडे राखून ठेवण्यासाठी आमच्याकडे पैसा आला.”
हा पैसा कुठून आला?
मातुराना म्हणतात, “कोणी कधी सिद्ध करू शकलं नाही पण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की नॅशनल क्लब पाब्लो एस्कोबारच्या मालकीचा आहे.”
पाब्लो एस्कोबारचे चुलत भाऊ जेमी गार्विया ESPN च्या या डॉक्युमेंट्रीत म्हणतात, “फुटबॉलमधून कोट्यवधी डॉलर्स इकडून तिकडे होतात. काळा पैसा पांढरा करण्याचा हा सगळ्यात सोपा रस्ता आहे. त्यामुळे ड्रग व्यवसायातून जमा झालेली बेहिशोबी मालमत्ता ड्रग माफियांनी या खेळात ओतली नसती तर नवल.”
अर्थात फक्त पाब्लो एस्कोबारच फक्त फुटबॉलमध्ये पैसे ओतत होता असं नाही, त्याकाळातले सगळेच ड्रग माफिया या खेळात ढीगाने पैसा ओतत होतो.
पाब्लो एस्कोबारने कोलंबियाच्या एका मॅचच्या आधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “अॅटिलेटिको नॅशनल आणि मेंडालिन या दोन्ही क्लबसोबत आम्ही पार्टनरशिप केली आहे.” कोलंबियाच्या फुटबॉलमध्ये ड्रग्सचा पैसा आला होता, त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या.

फोटो स्रोत, Getty Images
ग्राऊंड्स चांगली झाली, खेळाडूंना पैसा मिळायला लागला, खेळाचं साहित्य मिळायला लागलं. खेळाडू घाम गाळतच होते, त्यामुळे त्यांची टीम भक्कम बनली होती.
कोलंबियाच्या इतिहासात हा काळ नार्को-फुटबॉल म्हणून ओळखला जातो. असा फुटबॉल जो ड्रग्सच्या पैशावर खेळला गेला.
पण आंद्रेस या ड्रग्स, माफिया, गँग्स सगळ्यापासून लांब होता.
वयाच्या विसाव्या वर्षी त्याला कोलंबियाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने 21 वर्षी वेंबलीमध्ये खेळताना इंग्लंडविरोधात एक अप्रतिम गोल मारला. त्याच्या करियरमधला हा पहिला आंतरराष्ट्रीय गोल होता.
जेव्हा त्याने दुसरा आंतरराष्ट्रीय गोल केला तेव्हा त्याचा जीव गेला.
पण सध्या आपण त्याच्या आयुष्यावर फोकस करू.
आंद्रेस कोलंबियाचा डिफेंडर होता, उत्तम खेळत होता. टीममधले इतरही खेळाडू मग चित्रविचित्र कपडे घालणारा, केसांचा डाला असणारा गोलकिपर रेने हिगुइटा असेल, डिफेन्सिव्ह मिडफिल्डर लिओनेल अल्वारेज किंवा अॅटॅकिंग मिडफिल्डर कार्लोस व्हाल्डेरामा.
टीम काहीतरी करिश्मा करणार हे दिसत होतंच. 1989 साली कोलंबियाने दक्षिण अमेरिकेतल्या क्लब्सची मोठी स्पर्धा कोपा लिबरटार्डोर्स जिंकली.
पण कोलंबियातला फुटबॉल आता ड्रग माफियांसाठी युद्धभुमी बनलं होतं.
अल मेक्सिकानो या ड्रग माफियाचा पैसा मिलीनोरिज या क्लबमागे होता, पाब्लो एस्कोबारचे अॅटिलेटिको नॅशनल आणि मेंडालिन हे क्लब होते आणि मिगेल रॉड्रिगेज या माफियाचा अमेरिका दे काली हा क्लब होता.
या क्लब्सच्या मॅचेसमध्ये जे व्हायचं, त्यावरून कधी कधी एखाद-दोन जणांचे जीवही जायचे.
काली आणि नॅशनलच्या एका मॅचमध्ये रेफरीने कालीच्या खेळाडूंची बाजू घेतली म्हणून पाब्लो एस्कोबारने त्या रेफरीचा दुसऱ्या दिवशी मुडदा पाडला होता असं म्हणतात. हा रेफरी मिगेल रॉड्रिगेजचा मित्र होता आणि त्याने मुद्दाम नॅशनलच्या विरोधात निकाल दिले असं पाब्लोचं म्हणणं होतं.
स्वतः मिगेल रॉड्रिगेजचा मुलगा फर्नांडो रॉड्रिगेजने ESPN ला सांगितलं होतं.
कोलंबियाच्या फुटबॉलमध्ये रक्तपात व्हायला लागला होता.
पाब्लो आणि फुटबॉलचं नातं
पाब्लो एस्कोबारला फुटबॉल आवडायचा हे जगजाहीर सत्य होतं. आणि म्हणूनच त्याने गरीब घरांमधून येणाऱ्या मुलांसाठी अनेक सोयी दिल्या.
झोपडपट्ट्यांमध्ये फुटबॉलची ग्राऊंड्स तयार केली, मुलांना खेळाची साधनं दिली, इतर सोयी दिल्या.

फोटो स्रोत, Getty Images
मेडेलिन (कोलंबियातलं दुसरं मोठं शहर) च्या झोपडपट्ट्यांमधून फुटबॉलच्या मॅचेस, टुर्नामेंट व्हायच्या आणि पाब्लो त्याला जातीने हजर असायचा.
पाब्लोचं बालपण अशाच एका झोपडपट्टीमध्ये गेलं होतं.
पुढे राष्ट्रीय टीममध्ये खेळणारे अनेक खेळाडू - लिओनेल अल्वारेज, रेने हिगुइटा, अलेक्सीस गार्सिया, चिंचो सेर्ना याच झोपडपट्ट्यांमधून पुढे आले.
स्पर्धेच्या ठिकाणी पाब्लो-पाब्लो असा जयघोष चालू असायचा. या लोकांसाठी पाब्लो एस्कोबार रॉबिनहूडच होता.
पाब्लोची बहीण लुझ मारिया एस्कोबार एका मुलाखतीत म्हणते, “फुटबॉलवर त्याचं मनापासून प्रेम होतं. त्याच्या आयुष्यातले पहिले बुट क्लीट्स (खास फुटबॉलचे बूट) होते आणि तो मेला त्यादिवशीही त्याच्या पायात क्लीट्स होते.”
“पाब्लोने आम्हा गरीब मुलांना ड्रग्स न देता फुटबॉल दिला हे त्याचे उपकार,” कोलंबियाचे तेव्हाचे डिफेन्सिव्ह मिडफिल्डर लिओनेल अल्वारेज म्हणतात.
पाब्लोचं ढळतं साम्राज्य, रक्तपात
सत्तर आणि ऐशींच्या दशकात अमेरिकेत कोकन एक्सपोर्ट करून पाब्लो एस्कोबारने आपलं साम्राज्य मोठं केलं. त्याने कोलंबियातल्या इतर छोट्या-मोठ्या ड्रग्स माफियांना एकतर आपल्या अंकित केलं किंवा मारून टाकलं.
1980-81 च्या सुमारास तो इतका मोठा झाला होता की कोलंबियात त्याला कोणी धक्का लावू शकत नव्हतं. ‘पैसा घ्या नाहीतर गोळी खा’ हा त्याचा खाक्या होता. कोलंबियातले पोलीस, न्यायव्यवस्था कोणीच त्याचं काही करू शकत नव्हतं.
पाब्लो टनाने कोकेन अमेरिकेत पाठवत होता आणि ड्रगचं व्यसन अमेरिकेतल्या अधिकाऱ्यांची मोठे डोकेदुखी होऊन बसलं.
त्यावर तोडगा म्हणून अमेरिकेने ड्रगविरोधातले कायदे कडक केले. अमेरिकेच ड्रगचा व्यवसाय चालवणाऱ्या किंवा अमेरिकेत ड्रग पाठवणाऱ्यांना अटक करून अमेरिकेत खटले चालवता येतील असे कायदे बनवले. यासाठी संबधित देशांबरोबर गुन्हेगार हस्तांतरणाचे करारही केली.
यातलाच एक देश होता कोलंबिया. म्हणजे आता या ना त्या प्रकारे अमेरिका पाब्लोला अटक करून अमेरिकेत आणणार हे स्पष्ट झालं होतं.
याची कुणकुण लागताच पाब्लो निवडणुकीला उभा राहिला. त्याला गरीब वर्गाचा पाठिंबा होताच कारण त्याची प्रतिमा रॉबिनहुडसारखी होती.
असा नेता जो श्रीमंतांना लुटतो पण गरीबांना सोयी-सुविधा देतो. त्याने झोपडपट्टीतल्या लोकांसाठी दवाखाने, शाळा, ग्राऊंड, घरं बाधली होती. अपेक्षेप्रमाणे तो मेडेलिन शहरातून कोलंबियाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेव्हिवमध्ये निवडून आला.
आता पुढची चार वर्षं त्याला अमेरिका धक्का लावू शकणार नव्हती कारण त्या डिप्लोमॅटिक इम्युनिटी होती. म्हणजे पदावर असणाऱ्या राजकीय नेत्याला मिळणारं कायदेशीर संरक्षण.
पाब्लो एस्कोबारने त्या काळात जणू काही कोलंबियाला वेठीला धरलं. फुटबॉलच्या रेफ्रीने मनाविरोधात निर्णय दिला त्याचा खून. कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या माणसांना अटक केली, त्याचा खून.
कोलंबिया जगातली सर्वात धोकादायक जागा बनली होती. ‘खूनाची राजधानी’ असं नाव पडलं होतं कोलंबियाला.

फोटो स्रोत, Getty Images
निवडून आल्यावर पाब्लोची ताकद अजून वाढली. पण काही आवाज होते जे सतत पाब्लोचा विरोध करत होते. त्यातलेच एक होते कोलंबियाचे न्यायमंत्री रॉड्रिगो लारा-बोनिला आणि दुसरे लिबरल पक्षाचे नेते लुईस कार्लोस गलान.
पाब्लो स्वतः लिबरल पक्षाकडून निवडून आला होता पण वाढता रक्तपात पाहून गलान यांनी स्वतः त्याला लिबरल पक्षातून काढून टाकलं.
रॉड्रिगो लारा-बोनिला सुरुवातीपासूनच पाब्लोच्या विरोधात होते. तो सदनात निवडून आल्यानंतरही त्यांनी पाब्लोच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून सतत प्रश्न विचारायला सुरुवात केली.
1984 साली पाब्लोने आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं घोषित केलं आणि तीनच महिन्यांनी लारा-बोनिला यांचा खून झाला.
या खूनानंतर पाब्लोच्या विरोधात कोलंबियन सरकारने मोहीमच उघडली. खूनांचं एक मोठं सत्र सुरू झालं.
पाब्लोचा फंडा क्लियर होता. ‘कोलंबियात मेलो तरी चालेल पण अमेरिकेतल्या तुरुंगात जाणार नाही.’
अमेरिकेसोबत झालेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्याचा विरोध करण्यासाठी त्याने लॉस एक्सट्रॅक्डिटेबल ही बंडखोरांची सेना उभारली, त्यांना ताकद दिली.
1985 चा सुमार असेल. हे बंडखोर रस्त्यावर येऊन सरकारविरोधात सशस्त्र उठाव करत होते.
या रक्तपाताचा उच्चांक तेव्हा गाठला गेला जेव्हा कोलंबियाच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश अमेरिकेसोबत झालेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्याची वैधता तपासण्यासाठी कोर्टात एकत्र जमले होते आणि त्या इमारतीतवरच हल्ला झाला, बॉम्बस्फोट झाला.
सुप्रीम कोर्टांच्या न्यायधीशांपैकी अर्ध्ये मरण पावले.
रस्त्यावर पाब्लो एस्कोबारचे गुंड आणि कोलंबियन पोलीस यांच्यात अक्षरशः युद्ध चालू होतं आणि लोक मरत होती.
सुप्रीम कोर्टाने गुन्हेगार हस्तांतरण कायदा बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं.
पाब्लो पुन्हा जिंकला होता, पण अल्पावधीच नव्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा नव्याने अमेरिकेसोबत करार केला.
1989 साली पाब्लोच्या आज्ञेवरून लिबरल पक्षाचे नेते गलान, ज्यांनी पाब्लोला आपल्या पक्षातून बाहेर
काढलं होतं, यांची हत्या झाली.
पाब्लोच्या सांगण्यावरून गलान यांचे उत्तराधिकारी यांनाही मारण्याचा प्रयत्न झाला. ते ज्या विमानाने जाणार होते त्यात बॉम्ब ठेवण्यात आला. गलान यांचे उत्तराधिकारी सिझर गावरिया त्या विमानात बसले नाहीत म्हणून वाचले पण इतर 107 प्रवाशांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
पोलीस, न्यायाधीश, वकील, सर्वसामान्य माणसं... या काळात कोलंबियात जवळपास 5000 लोकांचे खून झाले म्हणतात.
दुसऱ्या बाजूला आंद्रेसची फुटबॉल टीम आपल्या देशाची उरलीसुरली इज्जत वाचवण्यासाठी धडपडत होती.
कोलंबिया म्हणजे ड्रग्स, माफिया, पाब्लो एस्कोबारच्या पलिकडे एक देश आहेत, त्या देशात कष्टकरी, हाडामासाची खरी माणसं राहातात, ती माणसं जगासमोर आणण्याच्या प्रयत्नात होती.
1994 चा वर्ल्डकप, चुकलेला गोल आणि हत्या
सततचं खूनसत्र थांबवण्यासाठी कोलंबियन सरकारने पाब्लो एस्कोबारला शरणागती पत्कारण्याचं आवाहन केलं.
त्याला स्वतःचं खाजगी जेल बांधण्याची आणि त्यात राहाण्याची मुभा देण्यात आली. अमेरिकेसोबत झालेला गुन्हेगार हस्तांतरण कायदा पुन्हा रद्द करण्यात आला होता. 1991 साली पाब्लोने शरणागती पत्कारली.
पण तो स्वतःच्या ऐश्वर्यसंपन्न जेलमध्ये राहात होता, तिथून आपला कारभार हाकत होता.
इकडे कोलंबियन टीम दक्षिण अमेरिकेतल्या स्पर्धा जिंकत होती. त्यांचे काही खेळाडू आता युरोपच्या क्लबकडून खेळत होते.
1991-93 या काळात अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी क्वालिफायर राऊंड झाले. कोलंबियाच्या टीमने आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली.
देशात इतकं भयानक काही घडलं असताना, घडत असताना या खेळाडूंना देशातल्या लोकांना एक आशेचा किरण दाखवायचा होता.
कोलंबिया या दोन वर्षांच्या काळात एकूण 26 मॅचेस खेळलं आणि फक्त एकदा हरलं.
1994 चा वर्ल्डकप सुरू होण्याआधी महान फुटबॉलपटू यांना कोणीतरी विचारलं की यंदाचा वर्ल्डकप कोण जिंकणार? त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं – कोलंबिया.
अर्जेंटिनाला हरवून जेव्हा कोलंबियाने वर्ल्डकपमध्ये आपला प्रवेश निश्चित केला तेव्हा लोक रस्त्यावर येऊन वेड्यासारखे नाचत होते. अनेक वर्षांनी त्यांना आनंद साजरा करण्यासारखं काहीतरी सापडलं होतं.
फुटबॉल कोलंबियाचं नवं प्रतीक बनला होता. कोलंबियन लोकांना सततच्या हिंसाचारात कधी नव्हे ती एक सकारात्मक गोष्ट सापडली होती आणि मग... पाब्लो एस्कोबार पोलिसांच्या हातून मारला गेला.
त्याचं असं झालं की, तो स्वतःच्या ऐश्वर्यसंपन्न जेलमध्ये राहात असताना त्याला कळलं की पोलीस त्याला आता साध्या तुरुंगात नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मग तो स्वतःच्या खाजगी जेलमधून पळून गेला. एक वर्षं त्याने पोलिसांना चकवत काढलं आणि 2 डिसेंबर 1993 ला तो पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेला.
इथून कोलंबियाचं वातावरण पुन्हा ढवळलं गेलं. आतापर्यंत कोलंबियातल्या ड्रग मार्केटवर पाब्लोची एकाधिकारशाही होती पण त्याच्या मृत्यूनंतर रिकामी झालेली जागा बळकवण्यासाठी लहान-मोठे ड्रग माफिया संघर्ष करायला लागले.
पुन्हा रक्तपात सुरू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ल्डकपमधली कोलंबियाची पहिली मॅच... खेळाडूंवर फार दडपण होतं. एकतर त्यांच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या होत्या आणि देशात पुन्हा अशांतता माजली होती.
इथून हरून परत गेलो तर काय होईल याची त्यांना भीती होती.
पहिली मॅच होती रोमानियाविरुद्ध आणि खरं सांगायचं तर कोलंबियावाले वाईट खेळले. 92 हजार लोकांसमोर कोलंबिया ती मॅच 3-1 अशी हरलं.
खेळांडूंना धमक्यांचे फोन यायला लागले. ड्रग माफियांनी कोलंबियाच्या जिंकण्यावर खूप पैसा लावला होता आणि आता कोलंबिया हरलं म्हणून ते खवळले होते.
कोणी म्हणे तुमचे पाय तोडू, कोणी म्हणे तुमच्या मुलाबाळांना मारून टाकू, बायकांवर बलात्कार करू.
खेळाडूंची मनस्थिती आणखीच बिघडली.
22 जून 1994 ला दुसरी मॅच होती. कोलंबिया विरुद्ध अमेरिका. हीच मॅच आंद्रेसच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.
मॅचच्या 22 व्या मिनिटाला आंद्रेस अमेरिकन खेळाडूने मारलेला बॉल डिफेंड करायला गेला आणि चुकून आपल्याच नेटमध्ये बॉल मारला.
आंद्रेसने स्वतःच्याच टीमविरोधात गोल केला.

फोटो स्रोत, Getty Images
फुटबॉलमध्ये सेल्फगोल काही नवी गोष्ट नाही. अधूनमधून अशा गोष्टी होत राहातात. खेळ म्हटल्या की चुका होतातच.
पण ही चूक कोलंबियाला महागात पडली आणि कोलंबिया स्पर्धेतून बाहेर पडलं.
इतर कोणी खेळाडू असता तर लगेच देशात परत आला नसता. धमक्या मिळत होत्या, वातावरण वाईट होतं. पण आंद्रेस आपल्या देशात लगेच परत आला आणि त्याने कोलंबियाच्या मोठ्या वर्तमानपत्रांसाठी लेख लिहिले.
बीबीसीच्या ‘विटनेस हिस्ट्री’ या कार्यक्रमात याचा उल्लेख आहे. त्याने लिहिलं, “माझ्या आयुष्यातल्या सर्वात वाईट दिवसांपैकी एक दिवस हा आहे. मला रात्रीची झोप लागत नाही. आम्ही एका महत्त्वाच्या क्षणी चुकलो आणि वैयक्तिक माझं म्हणाल तर मला अजून दुःख होतं. त्या एका गोलमुळे आम्ही हरलो. माझ्याकडून आधी असं कधीच झालेलं नाही.”
“पण ते घडलं आणि कोलंबियन फुटबॉलच्या इतिहासातल्या सर्वात महत्त्वाच्या क्षणी ते घडलं.”
या कार्यक्रमात बोलताना आंद्रेसचे मित्र आणि पत्रकार लुईस फर्नांडो रिस्ट्रेपो म्हणतात, “त्याने सगळ्यांसमोर चूक मान्य करण्याचं धैर्य दाखवलं. तो लपला नाही. त्याने लोकांना सांगितलं, हे पहा मी इथेच आहे.”
अमेरिकेसोबत जी मॅच झाली त्यानंतर अगदी दहाच दिवसांनी, 2 जुलैला आंद्रेस त्याचं शहर मेडेलिनमधल्या एका क्लबमध्ये गेला होता.
त्यावेळी तो अवघा 27 वर्षांचा होता. त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलं होतं. लग्न ठरलं होतं, इटलीतला क्लब एसी मिलानकडून खेळण्याचं कॉन्ट्रॅक्ट आलं होतं.
त्याने देशवासीयांची माफी मागितली होती आणि तो नव्या दमाने खेळायला तयार होता.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्यादिवशी रात्री लुईसपण त्या नाईटक्लबमध्ये होते. थोड्यावेळासाठी त्यांना आंद्रेस दिसलाही.
“तो त्याच्या मित्रांबरोबर होता, मी जाता जाता त्याला हॅलो म्हटलं आणि तोही हसला.”
“थोड्या वेळाने मी ज्या रेडियो स्टेशनमध्ये काम करत होते तिथल्या स्टुडिओ मॅनेजरचा मला फोन आला आणि तो म्हणाला, अरे ताबडतोब ऑफिसमध्ये ये, आंद्रेस एस्कोबारचा खून झालाय.”

फोटो स्रोत, Getty Images
लुईसला क्षणभर पटलंच नाही की काय घडलंय. “मी ओरडलो, असं कसं शक्यंय? खरं सांगताय ना? ते म्हणाले, हो.”
“मी 8 तास ब्रॉडकास्ट केलं. घरी गेलो आणि ढसाढसा रडलो.”
पण आंद्रेसला कोणी मारलं?
त्यावेळी बातम्या आल्या होत्या की एका माफिया ड्रगच्या बॉडीगार्डने आंद्रेसला गोळ्या घातल्या. त्या माफियाने कोलंबिया जिंकण्यावर खूप पैसे लावले होते आणि कोलंबिया हरल्याने त्याचं नुकसान झालं. पण लुईस बीबीसीशी बोलताना म्हणतात की इतकं साधंसोपं स्पष्टीकरण नव्हतं ते.
“कोलंबियाची परिस्थितीतच तेव्हा इतकी वाईट होती. 100-200 डॉलर्सवरून मुडदे पडत होते. वाद नक्कीच आंद्रेसच्या सेल्फगोलवरून सुरू झाला. त्याचा खूनी प्यायलेला होता, आंद्रेस त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याने आंद्रेसला गोळ्या घातल्या. हिंसाचार हीच त्यावेळी कोलंबियाची संस्कृती बनली होती. त्यात काही नवं नव्हतं.”
आंद्रेसच्या मृत्यूनंतरही कोलंबियात शेकडो लोकांचा जीव गेला.
आंद्रेसच्या मृत्यूने संपूर्ण जग हळहळलं. त्यांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी लोटली. पाश्चात्य मीडियात याचं वर्णन ‘ड्रग माफियाचा बदला’ असं केलं गेलं.
पण काळ पुढे सरकत राहिला.
“अधूनमधून फुटबॉल स्टेडियममध्ये आंद्रेसच्या नावाचं बॅनर दिसायचं. कोणीतरी ओरडायचं, ‘फुटबॉलचा जंटलमन अमर राहो’ पण ते तेवढ्यापुरतंच. त्या काळात कोलंबियात वर्षाला 30 हजार लोकांचा मृत्यू हिंसाचारात होत होता. आंद्रेसही त्यातलाच एक ठरला.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








