'एका महिलेला गरोदर करा आणि पैसे मिळवा', स्कॅममधून अनेक तरुणांची फसवणूक

ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्विस

फोटो स्रोत, GETTY IMAGES

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

आपल्यापैकी बऱ्याच जणांना सायबर घोटाळे माहीत असतात, पण एक घोटाळा असा आहे की, वाचणारा माणूस चकित होऊन जाईल.

डिसेंबरच्या सुरुवातीला मंगेश कुमार (नाव बदललेलं आहे) फेसबुक चाळत होता. स्क्रोल करता करता त्याची नजर "ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस" वर गेली. हा एक व्हिडिओ होता आणि त्याने तो पाहण्याचा निर्णय घेतला.

या कामाचं स्वरूप पाहता त्याला ते चांगलं वाटलं. एका महिलेला गरोदर करायचं आणि त्याबदल्यात बरेचसे पैसे मिळणार होते.

आता हे काम वरवर तर चांगलं वाटतं होतं मात्र हा मोठा घोटाळा होता. वयाची तेहतिशी गाठलेला मंगेश आधी एका लग्नाच्या सजावट कंपनीत काम करून महिना 15,000 रुपये कमवायचा. पण आता या घोटाळ्यात अडकल्यामुळे त्याने 16,000 रुपये गमावले. एवढंच नाही तर पैशाची मागणी सतत सुरूच होती.

विशेष म्हणजे या घोटाळ्यात अडकणारा मंगेश एकमेव नाहीये. उत्तर भारतातील बिहार मध्ये असे कित्येक तरुण आहेत जे यात पुरते अडकले आहेत.

बिहारच्या नवादा जिल्ह्यातील सायबर सेलचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक कल्याण आनंद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 'हे खूप मोठं रॅकेट असून यात बरेच जण अडकले आहेत. भोळ्या भाबड्या पुरुषांना मोठ्या पगाराचं आश्वासन देण्यात आलं. त्यांना एका अपत्यहीन महिलेसोबत हॉटेलमध्ये एक रात्र काढायची होती.'

आतापर्यंत त्यांच्या टीमने आठ जणांना अटक केली असून, नऊ मोबाईल फोन आणि एक प्रिंटर जप्त केला आहे आणि अजून 18 जणांचा शोध सुरू आहे.

पण यातील पीडित पुरुष शोधणं त्याहून अवघड आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पोलिस उपअधीक्षक कल्याण आनंद सांगतात, "ही टोळी एक वर्षापासून सक्रिय आहे. त्यांनी शेकडो लोकांना फसवल्याचा आमचा अंदाज आहे. पण लाजेखातर कोणीही तक्रार करण्यास पुढे आलेलं नाही."

बीबीसीने दोन पीडितांशी संपर्क साधला. यातील एकाने सांगितलं की त्याचे 799 रुपये लुबडण्यात आलेत, पण त्याला तपशीलवार चर्चा करायची नाही.

मंगेश अलीकडेच या घोटाळ्याला बळी पडलाय. त्याने त्याच्यासोबत घडलेल्या प्रकाराची इत्यंभूत माहिती दिली.

त्याने सांगितलं, "मी व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर दहा मिनिटांनंतर, माझा फोन वाजला. त्या व्यक्तीने मला नोकरीसाठी नोंदणी करायची असल्यास 799 रुपये भरावे लागतील असं सांगितलं."

कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव संदीप होतं. या संदीपने मंगेशला सांगितलं की, तुला मुंबईच्या एका कंपनीसाठी काम करावं लागेल. त्याने एकदा साइन अप केलं की, त्याला ज्या महिलेची गर्भधारणा करायची आहे तिचे तपशील पाठवले जातील.

त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मंगेशला पाच लाख रुपये मिळणार होते. आणि यातून जर ती महिला गरोदर राहिली तर त्याला आणखी 800,000 रुपये देण्याचं वचन देण्यात आलं होतं.

मंगेशला दोन लहान मुलं आहेत. तो म्हणाला की, "मी एक गरीब माणूस आहे, मला पैशांची नितांत गरज असल्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला."

पुढच्या काही आठवड्यांत मंगेशला 16,000 रुपये मागण्यात आले. यातील 2,550 रुपये न्यायालयीन कागदपत्रांसाठी तर 4,500 रुपये सुरक्षा ठेव असल्याचं सांगण्यात आलं. आणि वस्तू आणि सेवा कर (GST) म्हणून 7,998 रुपये द्यायला सांगितले.

मंगेशने सर्व पावत्या आणि बनावट न्यायालयीन कागदपत्रं दाखवली. अधिकृत दिसणार्‍या दस्तऐवजावर त्याचं नाव आहे आणि पोलीस गणवेशातील एका माणसाचा फोटो आहे. वर मोठ्या अक्षरात, "बाळाचा जन्म करार" असं लिहिण्यात आलं असून खालच्या बाजूला "गर्भधारणा पडताळणी फॉर्म" असं लिहिलेलं आहे.

दस्तऐवजाच्या शेवटी असलेली स्वाक्षरी यूएस टॉक शो होस्ट ओपरा विन्फ्रेने केलेल्या स्वाक्षरीसारखी आहे.

ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्विस

घोटाळेबाजांनी त्याला सात-आठ महिलांचे फोटो पाठवून त्यातील एका महिलेची निवड करण्यास सांगितलं. शिवाय मंगेश ज्या शहरात राहतो त्या शहरातील हॉटेलची खोली बुक करून ती महिला तिथे भेटायला येईल असंही सांगितलं.

मंगेशने जेव्हा कामाचे पैसे मागितले तेव्हा त्यांनी त्याच्या बँक खात्यात 5,12,400 रुपये जमा केल्याची पावती पाठवली. पण बँकेने पैसे गोठवले आहेत आणि 12,600 रुपये आयकर भरल्यावर पैसे मिळतील असं सांगितलं.

तोपर्यंत, मंगेशने संपूर्ण महिन्याचा पगार गमावला होता. आता त्याच्याकडे वरचे पैसे भरण्यासाठी काहीच पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे त्याने त्याचे पैसे परत मागितले.

पण संदीपने पैसे द्यायला नकार दिला. आणि वरून धमकी दिली की तुझ्या खात्यात 5,00,000 रुपये जमा झाल्यामुळे आयकर अधिकारी घरी छापा टाकतील आणि तुला अटक करतील.

मंगेश म्हणतो, "मी एक गरीब मजूर आहे. मी एका महिन्याचा पगार गमावला होता आणि मला कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकायचं नव्हतं. मला इतकी भीती वाटली की मी माझा फोन 10 दिवसांसाठी बंद केला. मी तो परत एकदाच चालू केला होता."

डीएसपी आनंद यांच्या म्हणण्यानुसार, 'या घोटाळ्यातील माणसं शिक्षित आहेत. काही तर पदवीधरही आहेत. त्यांच्याकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त करण्यात आलेत. दुसऱ्या बाजूला या घोटाळ्यात अडकलेले पीडित भारताच्या अनेक राज्यातील आहेत. यातील बहुतेकांचं शिक्षण कमी आहे.'

मंगेश म्हणतो की, 'हा एवढा मोठा घोटाळा असू शकतो याची मला कल्पनाच आली माझी. कारण संदीप सरांनी त्यांच्या ओळखपत्रांच्या प्रती पाठवल्या होत्या. यात ते भारतीय सैन्यातील सैनिक असल्याचं समजतं. त्यांच्या व्हॉट्सअ‍ ॅपच्या डिस्प्ले फोटोला एक सुंदर विदेशी महिला नवजात बाळाला कुशीत घेऊन उभी असल्याचं दिसत होतं.'

मंगेश विचारतो, "तुम्हीच सांगा तो फोटो पाहून विश्वास कसा बसणार नाही?"

सायबर कायदा तज्ञ पवन दुग्गल स्पष्ट करतात की, भारतातील लोक मोठ्या प्रमाणावर विश्वास ठेवतात आणि क्वचितच इंटरनेटवर माहितीची स्वतंत्र पडताळणी करतात. अति आत्मविश्वासामुळे अशी प्रकरणं घडतात.

मात्र, नवादा मध्ये जो काही घोटाळा घडला त्याची कार्यपद्धती अगदीच नवीन असल्याचं ते म्हणाले.

"घोटाळेबाजांनी त्यांना पैसे आणि शारीरिक संबंधांचं आमिष दाखवलं. अशावेळी भल्या भल्यांची विवेकबुद्धी मागे पडते."

कोरोनाच्या साथीनंतर तर सायबर गुन्ह्यांचा सुवर्णकाळ सुरू झाला. आणि इशारा देताना ते म्हणतात की, हे गुन्हे आणखीन बरीच दशकं चालतील.

सायबर गुन्हेगार नाविन्यपूर्ण ऑफर घेऊन येत असल्याने, मंगेश सारखे लोक घोटाळेबाजांना बळी पडतात. याचं प्रमाण कमी करण्यासाठी भारताला कठोर परिश्रम घ्यावे लागतील असं ते म्हणतात.

"लोकांचा सरकारवर अधिक विश्वास असल्याने सरकारने रेडिओ आणि दूरचित्रवाणी प्रसारणाद्वारे जनजागृती करणं आवश्यक आहे."

पण सरकार भारतातील 1.4 अब्ज लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.

ते म्हणतात, "लोकसंख्या प्रचंड आहे. आणि एकट्या सरकारवर अवलंबून राहिलो तर खूप वेळ लागेल. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी सरकारने खाजगी क्षेत्रालाही प्रोत्साहन द्यायला हवं."

ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्विस

दरम्यान, घोटाळेबाजांनी अजूनही मंगेशची पाठ सोडलेली नाही.

गेल्या आठवड्यात माझ्याशी फोनवर बोलत असताना त्याला एक फोन आला. त्याने मॅडमचा फोन आलाय असं म्हणत माझा फोन कट केला. नंतर मला त्याने सांगितलं की, ज्या महिलेला भेटण्याचं वचन दिलं होतं त्याच महिलेचा फोन आला होता.

रविवारी रात्री, त्याने मला सांगितलं की तो तिच्याशी दररोज बोलत असतो.

ती आता त्याला सांगत होती की संदीप सर मोठा घोटाळेबाज आहे. त्याने मंगेशला जे 5,00,000 देण्याचं वचन दिलं होतं त्यातले अर्धे पैसे त्यानेच लंपास केले. पण जर मंगेशने 3,000 रुपये जीएसटी म्हणून दिले तर त्याला 90,000 रुपये मिळू शकतात.

यावर मंगेश म्हणाला, "मी आता संपलोय. मी तिला माझे पैसे परत करण्याची विनंती केली पण ती म्हणाली ते शक्य नाही. माझी इच्छा आहे की तिने किमान 10,000 रुपये तरी परत करावेत."

मग मी मंगेशला विचारलं की, त्याचा अजूनही घोटाळेबाजांवर विश्वास आहे का?

यावर मंगेश म्हणतो, "मला आता काय करावं हेच कळत नाहीये. मी पूर्ण महिन्याचा पगार गमावून बसलोय. माझं कुटुंब बिहारमध्ये आहे, मी त्यांना एक पैसा पाठवला नाहीये. माझी पत्नीही माझ्यावर खूप चिडली आहे. तिने माझ्याशी बोलणं सोडून दिलंय."

"संदीप सर" आता त्याचा फोन उचलत नाहीत म्हणून मंगेश चिडून आहे.

तो म्हणतो, "ज्यांनी माझी फसवणूक केली त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे. मी 500 रुपयांसाठी दिवसभर राबराब राबतो. मला माहित आहे की मी खूप मोठी चूक केली आहे. पण त्यांनी माझ्यासोबत जे केलं ते खूप चुकीचं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)