टीम इंडियाच्या ‘ड्रेसिंग रुम मेडल’ची वर्ल्ड कपमध्ये चर्चा; लेझर, स्पायडर कॅम आणि सचिनकडून विजेता जाहीर

    • Author, ओंकार डंके
    • Role, बीबीसी मराठीसाठी

टीम इंडियानं वानखेडेवर श्रीलंकेला हरवून वन डे विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली, त्यानंतर ड्रेसिंग रूममधला एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

त्या व्हीडियोमध्ये भारतीय खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा एका मेडलनं गौरव करताना दिसतात.

आधी रविंद्र जाडेजा, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल या तिघांना नामांकन दिलं गेलं. मग विजेत्याची घोषणा एका खास पाहुण्यानं केली.

मास्टर ब्लास्टर सचिननं एका व्हीडिओद्वारे श्रेयसनं बाजी मारल्याचं जाहीर केलं.

श्रेयसनं श्रीलंकेविरुद्ध सुरूवातीला स्लिपमध्ये समरविक्रमाचा झेल घेतला होता. तसंच मिड ऑनच्या दिशेनं पळत जात दिलशान मदुशंकाचाही झेल घेत श्रीलंकेची इनिंग संपुष्टात आणली होती.

मैदानातील या सर्वोत्तम कामगिरीसाठी श्रेयसची निवड झाली. के एल राहुलनं श्रेयसच्या गळ्यात गोल्ड मेडल घातलं आणि मग संपूर्ण ड्रेसिंग रुमनं श्रेयसला मिळालेल्या मेडलचा आनंद साजरा केला.

त्याआधी प्रत्यक्ष सामन्यातही रवींद्र जाडेजानं झेल टिपल्यावर शुबमन गिल त्याच्या गळ्यात मेडल घातल्याची नक्कल करतना दिसला होता.

वर्ल्ड कपच्या याआधीच्या सामन्यांनंतरही टीम इंडियानं अशी ड्रेसिंग रूम मेडल्स दिली होती. आता हे मेडल म्हणजे आयसीसीनं दिलेला कुठला अधिकृत पुरस्कार वगैरे नाही.

पण आपल्या सहकाऱ्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा इतर टीममेट्सनी गौरव करण्याची ही नवी प्रथा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सुरू झाल्याचं दिसतंय.

‘फिल्डिंग मेडल’ची सुरुवात

विश्वचषकाआधी आशिया कप आणि अन्य स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचं क्षेत्ररक्षण काहीसं ढासळलं होतं आणि हा एक काळजीचा विषय होता.

टीम मॅनेजमेटनं त्यावर हा गोल्ड मेडलचा उपाय शोधला.

याआधीही सामना संपल्यावर टीम मीटिंगमध्ये संघाचे प्रशिक्षक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूचं तोंडी कौतुक करत असत. पण वर्ल्ड कपमध्ये त्यांना खास गोल्ड मेडल दिलं जातंय.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर खेळाडूंमधील आपसातली चुरस कायम ठेवण्यासाठी आणि फिल्डिंग सुधारण्यासाठी असं काहीतरी वेगळं करण्याचा आणि खेळाडूंना गोल्ड मेडल देण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला.

भारतीय संघानं यासाठी आयपीएलकडून प्रेरणा घेतली असावी अशीही शक्यता आहे. आयपीएलमध्ये

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये अशीच एक अभिनव कल्पना राबवलेली दिसली होती.

आयपीएलमध्ये दिवसअखेरीसस सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘ड्रेसिंग रूम प्लेयर ऑफ द मॅच’ हा खास बॅज देऊन गौरवण्यात येत असे.

कॉर्पोरेट क्षेत्रात काही कंपन्या ‘महिन्यातील सर्वोत्तम कर्मचारी’ पुरस्कार देतात ना, तसंच काहीसं आहे हे.

लेझर शो, स्पायडर कॅम आणि सचिन

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यापासून हे मेडल देण्याची प्रथा फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी सुरू केली. पहिलं मेडल विराटनं मिळवलं होतं.

आता प्रत्येक सामन्यानंतर हे मेडल कुणाला मिळणार हा सर्वाधिक उत्सुकतेचा विषय बनला आहे आणि मेडल मिळवण्याचं ध्येय गाठण्यासाठी खेळाडूंनी त्यांचा फिल्डिंगचा स्तर उंचावला आहे.

रविंद्र जाडेजा आणि श्रेयस अय्यर एखादा झेल घेतल्यानंतर त्यांच्या खास सेलिब्रेशनमधून हे मेडल मिळवण्याची त्यांची दावेदारी सादर करत आहेत.

टीम मॅनेजमेंटनंही फिल्डिंग मेडल देण्याचा कार्यक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीनं करत खेळाडूंचा हा उत्साह कायम राहील याची काळजी घेतलीय.

लखनौमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर स्टेडियममधील सर्व लाईट्स बंद करण्यात आले. मग एका लेझरनं मैदानात चारही बाजूंना पुरस्कार विजेत्या के एल राहुलचं नाव ठळकपणे प्रकाशित केलं.

बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात स्टेडियममधील इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डावर विजेत्याचं नाव जाहीर करण्यात आलं.

तर धरमशालामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर बेस्ट फिल्डर म्हणून श्रेयस फोटो आणि मेडल स्पायडर कॅमनं टीमपर्यंत पोहोचवले.

मग श्रीलंकेविरुद्ध सामन्यानंतर सचिन तेंडुलकरनं विजेतेपदाचं नाव जाहीर करत या पुरस्काराला नव्या उंचीवर नेलंय.

‘आपण या मेडलबाबत बरंच बोलतो. आपल्यासाठी हे फक्त मेडल नाही. हे तुमचं स्कील,फिटनेस आणि शरीर योग्य पद्धतीनं ठेवण्याची परीक्षा आहे,’ असं मत फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर हा पुरस्कार जाहीर करताना व्यक्त केलं होतं.

टी. दिलीप यांचा प्रवास

या मेडल सेरीमनीमुळे कोच टी. दिलीप यांचं नावही सध्या चर्चेत आलं आहे. दिलीप हे मुळचे हैदराबादचे आहेत.

टीम इंडियाचा स्पिनर आर अश्विननं त्याच्या यूट्यूब पेजवर दिलीप यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांची वाटचाल कशी झाली, ते सांगितलं होतं.

दिलीप यांना आधी क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा होती पण काही कारणांमुळे ते प्रत्यक्ष खेळाडू म्हणून करीयर करू शकले नाहीत.

सर्वोच्च क्रिकेट खेळले नसले तरी दिलीप गेली चौदा वर्ष उच्च स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करतायत.

भारतीय संघ व्यवस्थापनात येण्यापूर्वी त्यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमीत फिल्डिंग कोच म्हणून काम केलं आहे तसंच भारत-अ संघासाठीही ही जबाबदारी सांभाळली आहे.

त्याआधी ते हैदराबाद क्रिकेट असोसिएशनसोबत आणि आयपीएलच्या डेक्कन चार्जर्स टीमसोबतही काम करायचे.

दिलीप भारतीय संघासोबत काम करू लागल्यापासून संघाच्या फिल्डिंगवर चांगला परिणाम दिसू लागला आहे. ईशान किशनच्या सुधारलेल्या विकेटकीपिंगचं श्रेय काहीजण त्यांनाच देतात.

भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील विजयी अभियानातही या उंचावलेल्या फिल्डिंगचा मोठा वाटा आहे.

‘त्या’ झेलमुळे मिळालेला विश्वचषक

क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणही महत्त्वाचं असतं. एखादा उत्तम झेल सामन्याचं चित्र बदलू शकतो.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 1983 झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कपिल देवनं व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा मागं पळत जाऊन अफलातून झेल घेतला होता.

कपिलच्या त्या झेलमुळे अंतिम सामना भारताच्या बाजूनं झुकला. त्यानंतर काही ओव्हर्समध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरण्याचा इतिहास रचला होता.

त्यामुळे फिल्डिंग किती महत्त्वाची आहे हे काही वेगळं सांगायला नको.

अर्थात एखादं काम बराच त्याच पद्धतीनं करताना त्यामध्ये शिथीलता येऊ शकते. विश्वचषक स्पर्धेत फिल्डिंगमध्ये ही शिथिलता येणार नाही, याची काळजी हे टीम इंडियाचं फिल्डिंग मेडल घेताना दिसत आहे.

ते खेळाडूंना फिल्डिंग सुधारण्यासाठी प्रेरणा देत आहे आणि संघभावना आणखी भक्कम करण्यातही हातभार लावत आहे.

(संकलन - जान्हवी मुळे)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)