विराट कोहली हे धावांचं मशीन की शतकांचा शहेनशाह?

    • Author, द्वारकानाथ संझगिरी
    • Role, क्रिकेट समीक्षक आणि लेखक

विराट कोहली हे धावांच मशीन आहे की शतकांचा शहेनशाह?

त्याने वन डेतलं 48वं शतक पुण्यात बांगलादेशविरूध्द असं झळकावलं की ट्रॅफिक जाममुळे जवळ जवळ चुकलेले विमान दरवाजा बंद होता होता पकडावे.

तो त्या शतकाच्या विमानातून वर उडला आणि त्याच्या लाखो चाहत्यांनी निःश्वास सोडला.

शतकं ठोकणं ही क्रिकेट मधली सोपी कला नाही.

शंभराची किंमत फक्त एका धावेचा फरक असून 99ला नाही. म्हणून तर " Hundred is a Hundred " असं म्हटलं जातं.

अनेक चांगल्या फलंदाजाना कसोटीत शतक मिळालेलं नाही. काहींना एका शतकावर समाधान मानावं लागलं आहे.

विराट 'सवयीने' शतकं ठोकतो. एखाद्या माणसाने सवयीने रोज दाढी करावी तसं.

आपल्याला आंतरराष्ट्रीय शतकाची सवय सुनील गावस्करने लावली, तो लळा वाढवला सचिनने आणि आता विराट अशी शतकं ठोकतो आहे की माणसाच्या हाताला एखादी सवय होते तशी त्याच्या बॅटला झाली आहे.

ती बॅट बुमराने खेळायला नेली तरी ती सवयीने शतक करेल असं वाटतं.

विराट कोहलीच्या शतकामागे, उत्स्फूर्तता नाही. ती रोहितच्या शतकामागे आहे.

रोहितनं ॲक्कसीलरेटर पाय ठेवला की तो अपघाताचा विचार करत नाही. त्यामुळेच तो कधी दीड दोनशे करतो किंवा सत्तरीत विकेट देऊन बसतो.

पण विराट स्थिरावला की शतक हे त्याच ध्येय असतं.

"No failure but low aim is a crime " हे सुभाषित त्याने जणू लहानपणापासून पाठ केलंय.

विराटच्या डोक्यात शतकाची आखणी, आराखडे, कधी डावाचा टेम्पो वाढवायचा वगैरे गोष्टी तयार असतात.

त्यानंतर गोलंदाजाला त्याची विकेट काढावी लागते, एखादा चांगला चेंडू पडावा लागतो किंवा नशिबाला क्रूर व्हावं लागतं. तरच तो बाद होतो.

मी हे जास्त वन डे च्या बाबतीत म्हणतोय. तिथे तिसरा क्रमांक हा त्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे.

वन डे मध्ये फलंदाजाला सेट होऊन धावा करायला 11 ते 40 ही षटकं अतिशय उपयोगी आहेत.

सुरवातीच्या षटकामधला स्विंग सोडला , तर मग खेळातून स्विंग जवळ जवळ हद्दपार होतो. कारण दोन नवे चेंडू आता वापरले जातात.

त्यामुळे चेंडू जास्तीत जास्त 25 षटकं जुना होतो. तो पूर्वीसारखा रिव्हर्स स्विंग होत नाही.

आता क्रॉस सीम स्क्रॅंबल्ड सीम वगैरे प्रकार आले आहेत. पण पूर्वी सारखा चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही.

बरं 11 ते 40 षटकात फक्त चार क्षेत्ररक्षक वर्तुळाबाहेर असतात.

त्यामुळे गोलंदाजांवर खूप दबाव येतो. चेंडू प्लेस करून एकेरी धाव जोखीम न घेता हसत मिळते.

चेंडूने टप्पा आणि दिशाची शिस्त मोडली तर कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह फ्लीक, वरतून फटका मारताना येतो. आणि चेंडू शेवटच्या 41 ते 50 षटकात जास्त नवीन असल्यामुळे टणक राहतो. त्यामुळे मोठे फटके आरपार मारता येतात.

विराट कोहलीची खेळी

भारताची धावसंख्या 1 बाद 88 असताना. 12 ओवर्स संपल्या होत्या. जिंकायला आपल्याला किती धावा हव्या होत्या? 168 धावा.

विराटला शतक करून जिंकायचं तर पुढच्या भागीदारीत त्याच्या धावा जास्त व्हायला हव्यात. म्हणजे साथीदार जास्त आक्रमक नको.

रोहित बाद झाला होता त्यामुळे मोठा झंझावात शमला होता.

त्याने त्या मधल्या षटकात जी फलंदाजी केली ती गिल, अय्यर साठी रॅपिड कोर्स होता. काय चेंडू प्लेस केले. त्यालाही गुणवत्ता लागते.

कारण चेंडू हवा तिथे ढकलण्यासाठी, तुमच्याकडे किंचित जास्त वेळ लागतो. म्हणजे चेंडू इतरापेक्षा आधी दिसायला लागतो आणि उशिरा खेळायला लागतो. त्याला तर महानपण म्हणतात.

विराटचा फिटनेस, स्टॅमिना प्रचंड असल्याने तो एकाच्या जागी दोन धावा क्षेत्र रक्षकावर दबाव टाकून लीलया धावला.

गिल, अय्यरने उंच प्रेक्षकांत मारण्याच्या नादात विकेट गमावल्या.

विराटने मोठे फटके मारले पण त्याचे लाडके कव्हर ड्राईव्ह ते पण पुढचा पाय चेंडूच्या जवळ नेत. किंवा ऑन ड्राईव्ह, फ्लिक.

पोझिशन अशी की चेंडू गवताच्या कुशीतून बाहेर आलाच नाही.

ऑस्ट्रेलिया विरूध्द तो पूल वर बाद झाला होता. ह्यावेळी त्याने पूल मारले पण गवतालगत. समोरून मोठं आक्रमण न झाल्याने त्याला जोखीम न घेता एक आवश्यक स्त्राइक् रेट ठेवता आला.

राहुल ने एक चौकार मारला आणि षटकार त्यावेळी विराटतं शतकाच गणित चुकू शकत असं वाटलं.

कारण विराटच्या शतकाला आणि भारताच्या विजयाला 20 धावा हव्या होत्या.

मग एकेरी धावा टाळल्या गेल्या. स्ट्राईक विराटला मिळेल हे पाहिलं गेलं. एखाद दोन मोठे फटके खेळावे लागले.

शेवटी विराटनं गणित जमवलं आणि शंभरात शंभर मिळवले.

मॅच नक्की जिंकणार असल्यामुळे विराटचे टी शर्ट घालून आलेल्या हजारो प्रेक्षकाना त्याच शतक हवंच होत.

शतकी खेळी कशी उभारावी ह्याचं हे प्रेझेंटेशन होत. करोडोनी पाहिलं. ते नुसतं पाहून , टाळ्या मारून कौतुक करून सोडून द्यायचं नाहीये. त्यातून शिकायचंय.

मला खात्री आहे गिल त्यातून काही तरी शिकला असेल. विराटची परंपरा पुढे त्यालाच चालवायची आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)