टेंबा बवुमा : दक्षिण आफ्रिकेच्या दमदार कामगिरीनंतरही कर्णधार ट्रोल का होतो आहे?

    • Author, ओंकार डंके
    • Role, बीबीसी मराठीसाठी

‘मी आणखी 15 वर्षांनी श्री एमबेकी (दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष) यांच्याशी हस्तांदोलन करताना स्वत:ला पाहतो. ते मला भविष्यातील दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ तयार करण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.’

टेंबा बवुमानं 2001 साली सहावीमध्ये असताना एका निबंधात स्वत:बद्दल हे लिहलं होतं.

तसं ‘तू काही वर्षांनी स्वत:ला कुठं पाहतोस?’ हा प्रश्न शाळेच्या निबंधात किंवा नोकरीच्या मुलाखतीमध्ये अनेकदा विचारला जातो, पण त्यावेळी दिलेलं उत्तर पुढील आयुष्यात खरं करणं हे मोजक्याच मंडळींना जमतं.

टेंबा बवुमा हा या मोजक्या व्यक्तींमध्ये आहे. तो दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा नियमित कर्णधार आहे आणि त्याची टीम यंदाच्या आयसीसी वन-डे विश्वचषकात छान फॉर्ममध्ये आहे.

श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या माजी विश्वविजेत्यांना त्यांनी सहज पराभूत केलं, तर पाकिस्तान विरुद्धचा अटीतटीचा सामना जिंकला.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं उपांत्य फेरीतील स्थानही पक्कं मानलं जातंय. पण त्याच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा मात्र सोशल मीडियावर सातत्यानं ट्रोल होतोय.

टीम दमदार, कर्णधार ट्रोल

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी 'कॅप्टन्स डे' म्हणजे स्पर्धेतील सर्व दहा कर्णधारांची एकत्र पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत बवुमा डुलक्या घेत असल्याचं छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.

बवुमानं आपण झोपलो नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आणि कॅमेरा अँगलला दोष दिला. अर्थात त्याचे स्पष्टीकरण येण्यापूर्वी बवुमाचे असंख्य मीम्स व्हायरल झाले होते.

मग नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंग रुममध्ये पांढरा टॉवेल गुंडाळून बसलेला बवुमा पुन्हा सोशल मीडियावर गाजला. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबईत झालेल्या दोन सामन्यात तो न खेळताही चर्चेत होता.

पाकिस्तान विरुद्धचा चुरशीचा सामना जिंकल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ देखील सातत्यानं फॉरवर्ड होतोय.

बवुमाची खेळाडू म्हणून असलेली साधारण कामगिरी हे देखील तो ट्रोल होण्याचं मुख्य कारण आहे.

खरंतर कर्णधार हा संघाचा मुख्य चेहरा असतो. सामन्यापूर्वी अंतिम 11 निवडले जात असताना कर्णधाराचं नाव सर्वात प्रथम लिहलं जातं.

संघातील पहिली व्यक्ती म्हणून कर्णधार कसं काम करतो याकडं चाहते, माध्यमं, माजी खेळाडू आणि सहकारी यांचं सर्वाधिक लक्ष असतं.

संघ जिंकत असेल तर कर्णधाराच्या वैयक्तिक कामगिरीकडे काही काळ दुर्लक्ष केलं जातं, पण सातत्यानं अपयश दिसू लागलं की लोक बोलू लागतात, असं दिसून येतं.

बवुमाची कामगिरी काय सांगते?

वन-डे विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी बवुमा 56 कसोटी खेळलाय. त्यामध्ये त्याची फलंदाजीतली सरासरी आहे 35.25.

जानेवारी 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू होण्याचा विक्रम बवुमानं केला होता. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी मार्च 2023 मध्ये त्यानं कसोटी कारकिर्दीमधील दुसरं शतक झळकावलं.

आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये तर बवुमाच्या नावावर आत्तापर्यंत फक्त 1 अर्धशतक आहे. त्याची फलंदाजीतील सरासरी आहे 21.61.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र बवुमाची कामगिरी तुलनेनं सरस आहे. वन डेत 34 सामन्यांनंतर त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. त्यानं या प्रकारात 4 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत.

बवुमा कर्णधार का झाला?

बवुमा कर्णधार होण्यात त्याच्या कातडीचा रंग कारणीभूत आहे अशी ओरड सातत्यानं होते. याबाबतचं मत तयार करण्यापूर्वी तो कर्णधार झाला त्यावेळेसची परिस्थिती समजणं आवश्यक आहे.

या शतकाच्या पहिल्या दशकात दशकात कोलपॅक करारापासून दक्षिण आफ्रिकेतल्या क्रिकेटला गळती लागली. तिथले अनेक खेळाडू इंग्लंडकडे वळले.

त्या धक्क्यातून संघ सावरत असतानाच नवे वाद निर्माण होत गेले. 2021साली ट्वेन्टी20 विश्वचषका दरम्यान क्विंटन डी कॉकच्या भूमिकेमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.

त्या स्पर्धेदरम्यान ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या वर्णद्वेषीविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटर्सनी सामना सुरू होण्यापूर्वी गुडघा टेकून बसण्याचा म्हणजे Taking the knee (टेकिंग द नी) ही कृती करण्याचा निर्णय घेतला होता.

पण दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं ही कृती करणं त्यांच्या संघातील खेळाडूंसाठी सक्तीचं केलं होतं.

डीकॉक तेव्हा टीमचा कर्णधार आणि प्रमुख खेळाडू होता आणि त्यानं याला विरोध केला. विश्वचषकातील सामन्यातून त्यानं माघार घेतली.

डी कॉकच्या या भूमिकेमुळे मोठं वादळ निर्माण झालं. डी कॉकनं अचानक कर्णधारपद सोडलं, तेव्हा बवुमाला संघाचं कर्णधार करण्यात आलं.

बवुमानं हे संपूर्ण प्रकरण संयमानं हाताळलं. दक्षिण आफ्रिका या देशासाठी संवेदनशील असलेल्या या प्रकरणात त्याच्या नेतृत्त्वाची मोठी कसोटी होती. या कसोटीत तो उत्तीर्ण झाला.

वाद मिटल्यावर डी कॉकनं पुनरागमन केलं, तेव्हा बवुमानं पुन्हा संघात स्वागत केलं. डी कॉकनं बवुमाचे विशेष आभार मानले होते.

‘लोकांना कदाचित लक्षात येणार नाही पण तो जबरदस्त नेता आहे,’ असं डी कॉक तेव्हा म्हणाला होता.

यथावकाश वन डे आणि नंतर कसोटी संघाचं कर्णधारपद बवुमाला देण्यात आलं.

तेव्हापासून बवुमा दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. या काळात त्यानं दक्षिण आफ्रिकन टीमला स्थिरता दिली. अनेक वादळातून संघाला बाहेर काढलंय.

बवुमा लक्ष्यवेधक ठरणार?

यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत केपलर वेसल्स, हॅन्सी क्रोनिए, शॉन पोलॉक, ग्रॅमी स्मिथ, एबी डि व्हिलियर्स, फॅफ ड्यू प्लेसिस या दिग्गज खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्त्व केलंय.

या सर्व दिग्गजांना विजेतेपदानं हुलकावणीच दिली. ‘चोकर्स’ हा आफ्रिकेला टॅग याच कर्णधारांच्या कारकिर्दीत लागला. इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तर दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरी देखील गाठता आली नव्हती.

चार वर्षांपूर्वीच्या निराशाजनक कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेत मोठे बदल झाले आहेत.

कोलपॅक करारामुळे अनेक खेळाडूंनी इंग्लंडची वाट धरली होती. एक नवा संघ घडवण्याचं आव्हान दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड आणि कर्णधारापुढं होतं.

या जडणघडणीत बवुमाचं कर्णधार म्हणून मोठं योगदान आहे. दक्षिण आफ्रिकेची नवी टीम घडवण्यात आणि विश्वजेतेपदाची प्रबळ दावेदार बनवण्यात त्यानं मोठा वाटा उचलला आहे.

भारतीय पिचवर यशस्वी होतील असे आक्रमक फलंदाज दक्षिण आफ्रिकेकडं आहेत. क्विंटन डी कॉक तर धावांच्या राशी रचतोय. त्यांना गोलंदाजही तितकीच साथ देतायत.

म्हणूनच नेदरलँड्सकडून पराभवाचा धक्का पचवल्यावर दक्षिण आफ्रिकेनं पुढच्याच सामन्यात इंग्लंडला सहज नमवलं. पाकिस्तानविरुद्धचा अटीतटीचा सामना त्यांनी जिंकला.

त्याआधी श्रीलंकेविरुद्ध तर त्यांनी विश्वचषकात कुणाला न जमलेला विक्रम केला.

तरीही साधारण कामगिरी, कोटा पद्धती, शारिरीक उंची या सारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे बवुमाला वारंवार ट्रोल केलं जातं.

संघाचं बुडतं जहाज स्थिर करणारा बवुमा आता आपल्या टीमला विश्वविजेतेपदाच्या दिशेनं घेऊन जाणार का हे पाहावं लागेल. पण एक नक्की गोष्ट नाकारता येणार नाही.

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटच्या बदलाचा इतिहास भविष्यात लिहिला जाईल त्यामध्ये आज ट्रोल होणाऱ्या बवुमाच्या कर्णधार म्हणून कारकिर्दीचा आदरपूर्वक उल्लेख केला जाईल.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)